कुंडीचे प्रकार व कुंडी भरणे 

प्रिया भिडे
सोमवार, 16 मार्च 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...

जमिनीवरील बागेसाठी नैसर्गिक माती उपलब्ध असतेच, पण आपण गच्चीवरील बागेसाठी माती तयार कशी करायची हे पाहिले. आता ही तयार केलेली माती भरायची कशात हेसुद्धा महत्त्वाचे आहे. आपण बागेचा आराखडा केल्यावर कोणती रोपे/झाडे लावायची ते ठरवले, की त्यानुसार कुंडी/पात्र योजना करायची. आपण रोपे लावण्यासाठी नेहमी कुंडी वापरतो, पण त्याशिवाय वेगवेगळ्या वस्तूंचा वापर रोपे लावण्यासाठी करता येतो. त्यासाठी आपण लावलेल्या रोपाच्या वाढीचा काळ, आकारमान, फुले, फळे याविषयी माहिती असेल तर निवड सोपी जाते. तसेच प्रत्येक कुंडीचे काही फायदे, तोटे असू शकतात. जसे -

मातीच्या कुंड्या : याला एकच भोक असते व सहज पाहता येत नाही. त्यामुळे तळाजवळ विटांचे तुकडे/वाळूचा चाळ/करवंटी चिप्स टाकाव्या. यामुळे यामध्ये हवा खेळती राहते, पण पावसाळ्यात कुंडीवर शेवाळे जमते. शेवाळे घासून काव दिली की कुंड्यांना नवेपणा येतो. काव लावलेल्या कुंड्यांमुळे बागेला शोभा येते. पण मातीच्या मोठ्या कुंड्या हाताळणे, उचलणे अवघड होते. फुटण्याचाही धोका असतो.

प्लास्टिक कुंडी : यामध्ये हवा खेळती राहत नाही, कारण प्लास्टिक नॉन ब्रिदिंग मटेरीअल आहे. त्यामुळे कुंडीला भरपूर भोके पडून घ्यावीत. कुंडीला तळाला भोके असतात, त्याचा उपयोग पाण्याचा निचरा होण्यासाठी होतो. पण झाडांच्या मुळांनाही हवेची गरज असते. कुंडीत भरपूर हवा खेळती राहण्याची सोय हवी. त्यासाठी कुंडीला बाजूने भोके पडून घ्यावीत. काही कुंड्यांच्या तळाला पाय असतात, अशा कुंड्यांच्या खालून पाण्याचा निचरा लगेच होतो. 

फायबरच्या कुंड्या : यामध्येही हवा खेळती राहत नाही व याला भोकेपण पडता येत नाहीत. या कुंड्यांमध्ये तळाला नारळ करवंटीचे २ ते ३ से.मी.चे तुकडे घालून त्यात माती भरून रोप लावावे. फायबरच्या कुंडीत प्लास्टिकचा जुना डबा ठेऊन त्यात रोप लावावे. बाहेरून आकर्षक फायबरची कुंडी दिसायला छान दिसेल. 
याशिवाय झाडाच्या वाढीनुसार कुंडीची/पिंपाची/क्रेटची योजना करावी. कारण केळीसारख्या झाडाला किंवा भोपळ्यासारख्या वेलाला भरपूर खायला लागते. तरच ते आपल्याला चांगली पोसलेली फळे देऊ शकेल (input - output) म्हणून योग्य आकाराच्या कुंडीची गरज असते. जसे -
२००/१५० लिटर पिंप - केळी
१०० लिटर पिंप - शेवगा, पपई, चिक्कू, तुती, पेरू, आवळा इत्यादी 
५०/३० लिटर पिंप/कुंडी/२ टायर - लिंबू, संत्र, डाळिंब, वेल वर्गीय भाज्या, लाल भोपळा इत्यादी  
२० लिटर रंगाची बादली/कुंडी - वांगी, मका, टोमॅटो, घेवडा 
शोभेच्या झाडांसाठी याहून लहान कुंड्या चालतात. याव्यतिरिक्त तुमच्याकडे उपलब्ध कोणतेही पात्र तुम्ही कल्पकतेने झाड लावण्यासाठी वापरू शकता.

आता पाहू कुंडी कशी भरायची : 
तळाला आठ ते दहा सेंटिमीटर जाडीचा नारळाच्या करवंटीचे बारीक तुकडे करून त्याचा थर द्यावा (याला मी करवंटी चिप्स असे नाव दिले आहे). हे तुकडे तीन-चार सेंटिमीटरपेक्षा अधिक मोठे नसावेत. करवंटी चिप्समुळे पाण्याचा निचरा चांगला होतो व पोकळ्यांमध्ये माती भरल्यानंतरही भरपूर हवा खेळती राहते. त्यावर उशिरा कुजणाऱ्या काटक्या आडव्या घालाव्या. काटक्या उशिरा कुजतात त्यामुळे झाडांना हळूहळू पोषक द्रव्ये मिळत राहतात व काटक्यांचापण उपयोग होतो. मी नारळ शेंड्या वापरात नाही, कारण त्याचा अर्धगोलाकार आकार व ओल धरून ठेवण्याचा गुणधर्म यामुळे गोगलगायी होण्याचा धोका असतो. कुंडी भरताना नारळ शेंड्या वापरायच्या असतील, तर एका शेंडीचे तीन तुकडे करावेत किंवा पुरेशी पिंजून घ्यावी. करवंटी चिप्स व काटक्यांच्या थरावर आपण तयार केलेल्या मातीमध्ये नीमपेंड व कोकोपिथ घालून त्याचे मिश्रण करावे व कुंडी भरावी. त्यानंतर आणलेल्या रोपाची प्लास्टिकची काळी पिशवी कडेच्या शिवणीवर फाडून रोप अलगद बाहेर काढावे व मातीत छोटा खड्डा करून त्यात रोप ठेवावे. वरून परत थोडी माती घालावी व राख घालावी. रोप लावल्यावर लगेच पाणी द्यावे. शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी रोपे लावावीत. नीमपेंडचा सढळ वापर झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतो. कुंडीखाली पाचोळा ठेवल्यास गांडुळांना निवारा मिळतो व ती कुंडीमध्ये ये-जा करू शकतात. त्यामुळे माती मोकळी राहते. 

आजकाल खूप गृहनिर्माण संस्थांमध्ये कचरा जिरवण्याचे प्रकल्प असतात. यामध्ये तयार झालेले माध्यम सदस्यांना वाटले जाते. पण यामध्ये जास्त करून स्वयंपाक घरातील ओला कचरा जिरवला जातो. त्यामध्ये पालापाचोळा घातला जात नाही, त्यामुळे या माध्यमाचा C:N रेशो कमी असू शकतो. त्यामुळे असे माध्यम कुंडी भरण्यासाठी वापरणार असाल, तर त्यात १:१ पालापाचोळा, नीमपेंड व कोकोपिथचे मिश्रण जरूर घालावे. 

घरात येणारे नवे झाड म्हणजे आपल्या घरातील नवा सदस्य. त्याची आवड निवड पाहिली, तर ते आपल्याला खूप आनंद देते. 

कुंडी भरण्याची सचित्र माहिती पाहूया पुढील भागात.

संबंधित बातम्या