शुभ्र सुगंधी फुले 

प्रिया भिडे
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...

बागेमध्ये कितीही हिरवाई असली तरी फुलांशिवाय तिला शोभा नाही. आपण फुलांची निवड करताना पांढऱ्याशुभ्र सुगंधी फुलांची निवड करूया. देवपूजा सण-समारंभात सुगंधी फुलांना खास स्थान असते. 

त्यातही विशेष मानाचा म्हणजे मोगरा. मध्यम आकाराच्या कुंडीत मोगरा लावावा. यामध्ये एक पाकळीचा मोगरा, अनेक पाकळ्यांचा मोगरा, वेली मोगरा असे वेगवेगळे प्रकार असतात. वेलवर्गीय मोगऱ्याला थोडासा आधार देऊन कमानीवर चढवता येते. डिसेंबर, जानेवारी महिन्यात मोगऱ्याची काही पाने काढून टाकावी, त्यामुळे नवीन फुटवे येतात. त्यानंतर रोपाला पाणी कमी द्यावे. गच्चीवरील बागेत पाणी एकदम तोडून चालत नाही, कारण खूप ऊन  असल्यामुळे झाडावर ताण येऊ शकतो. एप्रिल-मेमध्ये मोगरा कळ्यांनी डवरून जातो. बहर गेल्यानंतर जाडसर फांद्यांची छाटणी करून नवीन रोपे तयार करता येतात.

मोगऱ्यासारखे मदनबाणाचेही एखादे रोप बागेत असावे. फुल मोगऱ्याच्या फुलापेक्षा आकाराने मोठे, पांढरेशुभ्र व सुगंधी असते. फांद्या लवचीक असल्यामुळे याला छोटासा मांडव किंवा आधार काठी लागते. जाई, जुई व सायली लावायची असल्यास जूनच्या सुरुवातीस वेलास तयार खताची मात्रा द्यावी, त्यामुळे भरपूर व टवटवीत फुले येतात. जाईचा वेल दणकट काष्ठाचा असतो. त्यामानाने जुई व सायलीचे वेल नाजूक असतात. ही फुले संध्याकाळी उमलतात. मांडव केल्यास वेल छान पसरतो. जुईची छाटणी करून झुडुपासारखे लहानपण ठेवता येते. बहरलेली जुई रात्री बघितली, तर जणू अंगणात चांदण्या आल्याचा भास होईल. सायलीची फुले नाजूक असतात, सुगंध थोडा मादक असतो. आधाराने छान वाढते. जाईजुईची दाब कलमे करून रोपे करतात. एखादी सशक्त फांदी कापून तिचे गोल कडे करून मातीत खोचायचे व त्यावर जड दाब ठेवायचा. मुळे फुटली की नवीन पाने फुटतात. अशा रीतीने नवे रोप करता येते. सायलीच्या मुळामधून नवे फुटवे येतात, ते अलगद काढून नवे रोप करता येते. 

सुकुमार फुलांचा कुंद मोठ्या कुंडीत लावला तर भरभरून फुले देतो. याच्या पाकळ्यांमागे लालुंगी छटा असते. याची बहीण म्हणता येईल अशी नेवाळीची फुले पांढरीशुभ्र असतात, तर रानावनात आढळणारी कुसूरची फुले कुंदासारखीच पण पाकळ्या अधिक नाजूक असतात. हे वेल खूप मोठे होतात, त्यामुळे छानशी कमान करावी अथवा छाटणी करून बुटकेच ठेवावे. याला जून व जानेवारी असे दोन बहर येतात. 

शुभ्र फुले, अतिशय सात्त्विक सुगंध असणारा अनंत आवर्जून लावावा असाच! मोठ्या कुंडीत लावावा, कारण तसा हा छोटेखानी वृक्षच आहे. डिकेमालीच्या कुटुंबातला अनंत, याची पाने तजेलदार हिरवीगार असतात. ऊन आवडते, आम्लधर्मीय माती लागते. सामू कमी झाला तर मुळे पोषक द्रव्ये शोषू शकत नाहीत, पाने पिवळी पडतात व झाड धोक्यात येते. त्यामुळे महिन्यातून एकदा सेंद्रिय खाऊ खालावा. कधीतरी ताकाचे पाणी घालावे. मातृवृक्षावर गुटी कलम करून नवे रोप करता येते. नाहीतर जाडसर काडी खोचून रोप तयार होते. भेट देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. फुलांची लयलूट करणारी कुंती किंवा कामिनी दिवाणखान्यातील गच्चीत, मोठ्या कुंडीत लावली तर घर  सुगंधाने दरवळून जाईल. कढीलिंबाच्या कुटुंबातली कुंती खरे तर लहानसा वृक्षच, पण कुंडीमध्ये छान वाढतो. गुटी किंवा काडी खोचून येतेच, पण बियांनीसुद्धा रोपे होतात. याच्या फुलांवर भरपूर मधमाश्या येतात, त्यामुळे  परागीभवनाला मदत होते. रातराणीची फुले पांढरी नाहीत, पण सहज येणारी, मादक सुगंधाने रात्री भारून टाकणारी म्हणून आवर्जून लावावी. छोट्या कुंडीत काडी खोचली तरी येते. काहीच देखभाल लागत नाही. फांद्या आडव्या वाढत असल्याने पसारा होतो म्हणून सतत छाटणी करावी.

बागेच्या एखाद्या कोपऱ्यात तुळशी वृंदावन ठेवून कृष्ण तुळस लावावी आणि त्याच्या शेजारी योगेश्वर कृष्णाचा आवडता वृक्ष पारिजातक लावावा. मी लावला आहे. यासाठी मी १०० लिटरचा ड्रम वापरला आहे. तुम्ही मोठी कुंडी वापरू शकता. याला ऊन आवडते. पावसाळ्याच्या आधी सेंद्रिय खाऊ व निमपेंड घालावी म्हणजे खूप फुलतो. नाजूक पाकळ्यांची केशरी देठाची फुले सायंकाळी उमलतात अन सकाळी गच्चीत वृंदावनावर सडा घालतात. हे पश्चिम बंगालचे राज्यपुष्प आहे. तेथील लोक याची पाने तळून खिचडीबरोबर पापडासारखी खातात. कडसर लागतात पण कुरकुरीत होतात. पूर्वी अंगणात फुलांचा सडा पडला,  की ती वेचून कृष्णाला लक्ष वाहण्याचा संकल्प असे. देवघर सात्त्विक सुगंधाने भरून जाई. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले... म्हणत आमचे बालपण सरले, गंधित आठवणी ठेवून.

शुभ्र सुगंधी फुले घरी फुलली, तर आठवणींचे हे सुगंधी गजरे आपण आजही अनुभवू शकतो.   

संबंधित बातम्या