बहारदार फूलवेली 

प्रिया भिडे
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...

गच्चीवर प्रवेशद्वाराशीच गर्द जांभळ्या रंगांच्या फुलांचा लसूण वेल, नाहीतर पांढऱ्याशुभ्र फुलांची झुंबरे असलेला  थंबरजिया किंवा नाजूक गुलाबी रंगांच्या फुलांचे घोस असलेला रंगून वेल बागेची शोभा वाढवतो. आकर्षक रंगांची फुले असलेल्या फूलवेलींना बागेत स्थान हवेच. फूलवेलींची कमानी, मांडव, आडोसा, नाहीतर पॅगोडासारखी रचना करून बैठक करण्यासाठी उपयोग होतो.

निसर्गात वृक्ष आणि वेली यांचे सहजीवन असते, कारण वेलींना आधार लागतो. वेलीचे खोड सुरुवातीला नाजूक असते, परंतु वेली अतिशय वेगाने वाढतात. सूर्यप्रकाश शोषण्यासाठी उंच वाढण्याची यांची वृत्ती असते. आधार शोधण्यासाठी वेली अतिशय चतुरपणाने स्वतःभोवती विळखे घालत आधाराच्या दिशेने झेपावत जातात. त्यांची ही वृत्ती निश्चितच आपण शिकण्यासारखी आहे. किंबहुना माणसाने विविध प्रकारचे पीळ असलेले दोरखंड तयार करण्याची प्रेरणा निश्चितच निसर्गातल्या वेलींकडून घेतली असणार. गच्चीवर वेली वाढवताना त्यांना योग्यप्रकारे आधार देणे गरजेचे असते, कारण त्यामुळे त्या सूर्यऊर्जा घेऊन ऋतुमानानुसार भरभरून फुलतात.

वेली लावताना मोठ्या आकाराची निदान ४५ बाय ४५ सेंटिमीटरची कुंडी घ्यावी, त्यामुळे वेलीला भरपूर पोषण मिळते. प्लॅस्टिकची कुंडी असल्यास कुंडीला सर्व बाजूंनी भोके पाडावी, केवळ तळाला असलेली भोके पुरेशी होत नाहीत. कारण घातलेल्या पाण्याचा निचरा खूप सावकाश होतो व त्यामुळे हळूहळू माती घट्ट होत जाते व वेलींची मुळे गुदमरतात अथवा कुजतात. याउलट कुंडीला बाजूने भोके असतील, तर पाण्याचा निचरा पटकन होतो व पाणी वाहून जाण्याचे मार्ग तयार होतात. त्यामध्ये हवा खेळती राहते व माती घट्ट होत नाही.

फूलवेलींचे खूप पर्याय आपल्याकडे आहेत. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये फुलांचा घोस आणि लगडलेली संक्रांत वेल जाळीवर चढवल्यास गच्च वाढ होते व केशरी फुलांनी सजलेली भिंत खूप आकर्षक दिसते. याचा छोटासा आडोसाही तयार करता येतो. रोपवाटिकेत रोप मिळते, नाहीतर मैत्रिणीकडून ४५ ते ६० सेंटिमीटरचे कडे आणून मातीत खोचल्यास रोप तयार होते.

कधीतरी गच्चीवर पाणी वाहून जाण्याचे पाईप किंवा इतर काही नजरेला खटकणाऱ्या गोष्टी असू शकतात. अशावेळी वेगाने वाढणारा, गर्द हिरव्या पानांचा, पांढऱ्या, निळ्या फुलांचा थंबरजिया ग्रांडीफ्लोरा लावावा. या वेलीचे वैशिष्ट्य म्हणजे याला वर चढायला आवडते, तसेच भिंतीवरून खाली यायलाही आवडते. त्यामुळे एखाद्या भिंतीवरून खाली वाढवल्यास फुलांचे झुंबर मंद वाऱ्यावर छान डोलतात. थंबरजियाची छोटी पांढरी फुले असणारी वेल खांबावर किंवा जाळीवर छान वाढते. पटकन वाढणारी व नेहमी पांढरी शुभ्र फुले देणारी वेल आहे. मात्र बियांपासून खूपच रोपे तयार होतात, त्याचा कधीकधी त्रासही होऊ शकतो.

थंबरजिया मैसूरेंसी व थंबरजिया कॉक्सिनिया यांना मात्र मांडव लागतो, कारण त्यांच्या फुलांची झुंबरे वरून खाली लटकतात. या झुंबरांवर अनेक पक्षी मधुरस प्यायला येतात.

लसूण वेलांचे जांभळ्या फुलांचे घोस दिसतात खूप सुंदर, पण फुले व पानांना लसणासारखा उग्र वास असतो. कडी खोचल्यास सहज रुजतो. 

रंगाच्या वैविध्यामुळे बोगनवेल लोकप्रिय आहे. याची फुले छोटीच असतात, परंतु त्याभोवती असलेल्या पानांची रचना फुलांसारखी आकर्षक रंगाची असल्यामुळे वेल सुरेख दिसते, भरभरून फुलते. पांढऱ्या रंगाची बोगनवेल अक्षरशः धबधब्यासारखी भासते. एक दोन मजले उंच सहज वाढते. बोगनवेल कुंडीत बुटकी ठेवून सतत कापल्यास, छान आकार दिल्यास बागेची शोभा वाढवते. गुलाबी, ताम्रवर्णी, गर्द राणी आणि फिकट जांभळी  अशा असंख्य रंगात बोगनवेली फुलतात. कधीकधी यांची आक्रमक वाढ त्रासदायक ठरते. काटेरी वजनदार फांद्या कापल्यानंतर विल्हेवाट लावण्यासाठी त्रासदायक ठरतात. नवीन कुंडी भरताना किंवा कंपोस्टिंगच्या खड्ड्यामध्ये तळाला या फांद्या घालाव्या.

गर्द पिवळ्या किंवा किरमिजी रंगाची फुले असलेला आलमांडाही एक आकर्षक लोकप्रिय सदस्य आहे. भरपूर ऊन असल्यास बारा महिने थोडीफार फुले देत राहतो. वास थोडा कडू असतो. एकेरी दुहेरी पाकळ्यांची फुले छान दिसतात. आजकाल रोपवाटिकेत बुटका आलमांडा मिळतो.

रंगून वेल, बहुतेक लोक हिला मधुमालती या नावाने ओळखतात. नाजूक गुलाबी रंगांच्या फुलांचे घोस हळूहळू गर्द होत जातात. फुलांना मंद असा सुवास असतो. फुले नसली तरीदेखील ही वेल छान दिसते. कमानीवर चढल्यास फुलांचे घोसच्या घोस खाली लटकतात. याचीही बुटकी राहणारी रोपे, तसेच दुहेरी पाकळ्यांची रंगून वेल आता उपलब्ध आहे. 

सुशोभनासाठी, आपल्या सोयीसाठी नैसर्गिक वनस्पतींमध्ये बदल करणे, विज्ञानाचा वापर करून वनस्पतींची विविधता निर्माण करणे हे तंत्रज्ञानामुळे सहज शक्य झाले आहे. पण त्यामुळे बऱ्याच वेळा नैसर्गिक वनस्पतींचा त्रास होण्याचा धोका असतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

कृष्णकमळ फ्रुट ही पॅसिफ्लोरा कुटुंबातील वेल जाळीवर छान वाढते. जांभळी फुले असणारे कृष्णकमळ, पांढरे फूल असणारे पॅशन फ्रुट व गर्द लाल रंगाची फुले असणारे रक्तकमळ, क्वचितच आढळणारे पिवळे फूल सर्वच फुले सुंदर दिसतात. पॅशन फ्रुटचा वेल खूप आक्रमकरीत्या वाढतो, भरपूर फळेही देतो. पॅशन फ्रुटचे सरबत छान होते.

कृष्ण कमळाच्या पानावर टोनी कोस्टर फुलपाखरांच्या आळ्या वाढतात. त्यामुळे पानांवर आळ्या दिसल्यास त्यांना मारू नये, त्यांनी पाने खाल्ली तरी पाने परत फुटतात.

खरखरीत पाने असल्यामुळे सँडपेपर वेल असे नाव मिळालेला पॅट्रीया बागेचे खास आकर्षण ठरू शकतो. कारण निळसर जांभळ्या रंगाची फुले अतिशय सुंदर दिसतात. वाऱ्याबरोबर खाली भिरभिरत येणाऱ्या फुलांमुळे याला  भिरभिरे असे सार्थ नाव आहे. ही फुले पुस्तकात ठेवून वाळल्यावर त्याची सुरेख भेटकार्डे किंवा फोटो फ्रेम तयार करता येते.

एखाद्या ठिकाणी भिंतीचा मोठा भाग झाकून टाकण्यासाठी गर्द हिरवी पाने असलेला गर्द लाल फुलांचे गुच्छ असलेला क्लोरडेड्रम वेल लावता येतो. हा खूप आक्रमकरीत्या वाढतो, खूप हिरवाई निर्माण करतो. बहरल्यावर फारच सुंदर दिसतो. शिंजीर, बुलबुल अनेक पक्ष्यांना याची फुले आवडतात. याच्या मुळांपासून नवीन फुटवे येतात. त्यापासून रोपे तयार करता येतात, नाहीतर जाड फांदी कापून त्याचे कडे करून जमिनीत खोचावे व रोप तयार करावे.

टॅकॉमा हा रूढार्थाने वेल नसला, तरी नाजूक खोडामुळे उंच वाढतो, फारसा आधार द्यावा लागत नाही. घंटेसारख्या फुलांचे छान घोस येतात. गर्द केशरी, ताम्रवर्णी व गुलाबी रंगातला टॅकॉमा छान दिसतो. पिवळ्या रंगाच्या टॅकॉमाला खूप फुले येतात. मधमाश्‍यांना ही फुले खूप आवडतात. खारीची पिल्ले तर फुलेच खातात.

अगदी नाजूक पानांचा, गर्द लाल रंगाच्या नाजूक फुलांचा गणेश वेल एकदा लावला, की बागेचा कायम सदस्य होतो कारण बियांनी सहज रुजतो.

रस्त्याच्या कडेला अगदी सहज उगवलेला दिसणारा गुलाबी फुलांचा आइस्क्रीम वेल, रंग व नाजूक फुलांमुळे छान दिसतो. यामध्ये क्वचित पांढरा रंगही मिळतो. मला स्वतःला हा सहज वाढणारा वेल खूप आवडतो.

सकाळी उमलणारी आणि संध्याकाळी कोमेजणारी निळ्या रंगाची फुले असणारा स्काय ब्ल्यू क्लस्टर वाइन जाळीवर छान वाढतो. भरपूर बिया तयार होतात व बियांपासून सहज रोपे तयार होतात. 

आयपोमिया कुटुंबातील जांभळ्या, पांढऱ्या, गुलाबी रंगांच्या फुलांचे वेल कमानीवर चढवण्यासाठी छान वाटतात  किंवा खांबांवर चढवण्यासाठी हे वेल उपयुक्त ठरतात.

रानावनात फुलणारी रानजाई, अतिशय सुंदर व सुगंधी फुले असणारी ही वेल जरूर लावावी. फारशी देखभाल न करता भरघोस फुले देते.

आकर्षक रंगांच्या फुलांचा बहुतेक वेली परदेशातून इथे आणल्या गेल्या व त्या लोकप्रिय झाल्या. पण आपल्या रानावनात फुलणाऱ्या अनेक वेलींची आपल्याला माहितीच नसते, जसे गर्द पिवळ्या व लाल रंगाची फुले असलेल्या कळलावीचा वेल, नाजूक फुलांचा वाघाटीचा वेल, असे अनेक स्थानिक वेलही आपण बागेत वाढवू शकतो.

वेलवर्गीयांची खासियत म्हणजे फारशी देखभाल न करता ऋतुमानाप्रमाणे फुलतात. गच्चीवरच्या बागेमध्ये विविध रंगांची फुले निश्चितच शोभा देतात. बहर येऊन गेल्यानंतर छाटणी केल्यास नवीन जोमदार फूट येते. दोन महिन्यांतून एकदा तयार खताची मात्रा दिल्यास वेलींचे आरोग्य चांगले राहते.

आपल्या बागेत झोपाळ्यावर बसून आजूबाजूच्या वेलींच्या  झोपड्यांवर झुलणारे पक्षी बघणे याहून अधिक आनंद तो काय?

संबंधित बातम्या