रसना तृप्ती करणारी पाने 

प्रिया भिडे
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...
प्रिया भिडे

गच्चीवरच्या बागेत शोभिवंत पाने, रंगीत सुगंधी फुले, बहारदार वेली हव्यातच, पण तरी एक छोटासा कोपरा राखून ठेवायला हवा ताज्या भाज्यांसाठी. ताज्या करकरीत भाज्यांची मजा वेगळीच असते. कारण एरवी बाजारातून आणलेली भाजी आपल्यापर्यंत पोचायला त्या भाज्यांना खूपच प्रवास करावा लागतो. भाज्यांची काढणी, भरणी  नंतर मोठ्या मंडईपर्यंत प्रवास, पुढे छोट्या विक्रेत्यांपर्यंत प्रवास आणि नंतर आपल्या घरापर्यंत प्रवास या सगळ्यांमध्ये त्यांचा ताजेपणा निश्चितच निघून जातो. मुख्य म्हणजे हा सगळा प्रवास झेपण्यासाठी रसायनांचा वापर, वेष्टनांचा वापर अनिवार्य ठरतो. याउलट आपण आपल्या या छोट्याशा बागेत थोडा भाजीपाला लावला तर ताजी भाजी मिळते. 

आजकाल अनेक ठिकाणी ‘फूड माईल’ मोजले जातात. म्हणजे आपण खात असलेल्या अन्नपदार्थांना/त्यातील घटकांना किती प्रवास करावा लागला, त्यामुळे किती कर्बचिन्हे (कार्बन) निर्माण झाली असे मोजले जाते. जेवढा प्रवास जास्त तेवढे फूड माईल जास्त, तेवढी कर्ब पदचिन्हे जास्त निर्माण होतात आणि अर्थातच जेवढे जास्त कर्ब पदचिन्हे निर्माण होतील तेवढा पर्यावरणाला जास्त धोका. अनेक ठिकाणी ‘ग्रो लोकल इट लोकल’ अशा चळवळी होत आहेत. आपल्याकडे ही संकल्पना फार पूर्वीपासूनच आहे, कारण पूर्वी घरोघरी अंगणात परसबागा असतच. आता अंगण आणि परसबाग नसली, तरी गच्चीवर भाजीपाला लावण्याची आपल्या आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या आरोग्यासाठी गरज आहे. सुरुवातीला सहज, कमी वेळात येणाऱ्या, स्वयंपाकघरात नेहमी लागणाऱ्या, स्वाद वाढवणाऱ्या उपयुक्त पाने देणाऱ्या वनस्पतींची निवड करावी.

आजीच्या हातच्या अळूच्या वड्यांची चव आजही अनेकांच्या जिभेवर रेंगाळत असेल. महाराष्ट्रीय जेवणाचा अविभाज्य भाग अळूची भाजी. वडीचा अळू व भाजीचा अळू वेगळा असतो. भाजीच्या अळूचे देठ पारदर्शक असते, तर वडीच्या अळूचे काळपट असते, पानेही थोडी काळसर असतात. अळूची लागवड कंद लावून करतात. हे कंद म्हणजेच अळकुडी. अळकुड्यांचीसुद्धा भाजी करता येते, नाहीतर नुसत्या उकडूनही खाता येतात. लागवडीसाठी प्लॅस्टिक घमेले, बादली, कुंडी कशाचाही वापर करता येतो. पाल्याचे खत, कोकोपिथ, नीमपेंडचे मिश्रण भरून त्यात अळकुड्या खोचाव्यात. ‘कंद’ आणताना खाजरा नाही ना याची खात्री करावी. शक्यतो माहितीच्या ठिकाणाहून कंद आणावे. महिन्यात छान पाने फुटतात, पाने कोवळी असतानाच काढून घ्यावीत. अळूला पाणी आवडते. विशेष करून भांडी धुतलेले पाणी जरूर घालावे. माझ्या गच्चीवर दोन पोती पालापाचोळा ओतला व त्यात अळकुड्या खोचल्या आहेत. आता तिथे बेटच तयार झाले आहे. एक मीटर बाय दोन मीटर सोलरच्या १० सेमी उंचीच्या ट्रेमध्ये २०० अळूची पाने निघतात. गौरीच्या वेळी सगळ्यांना वाटता येतात. वर्षातून एकदा कंद काढून त्यांना निदान दोन-तीन आठवडे विश्रांती द्यावी व कुंडीत नवीन माल भरून कंद लावावेत. नाहीतर पानांचा आकार हळूहळू कमी होत जातो. घरात अळू असला तर अचानक पाहुणे आले तरी वड्या करता येतात, कधी मैत्रिणींना पाने देता येतात. पाल्याच्या खतात वाढलेल्या या पानांच्या वड्या जिभेवर ठेवताच विरघळतात. सामूहिक गच्चीवर तर अळूची शेती करता येईल.

आमटी, कढी, बटाटा भाजी, सांबार यासाठी कढीलिंब हमखास लागतो. त्याची व्यवस्था घरच्याघरी होऊ शकते. रोप लावल्यास पटकन वाढते. एखाद्या मैत्रिणीकडे मोठ्या झाडाखाली आलेल्या पिल्लावळीतील रोप आणून लावावे. बीपासूनही रोप तयार करता येते, परंतु वाढीला वेळ लागतो. जुन्या पिंपात, मोठ्या कुंडीत, रंगाच्या बादलीत रोप लावावे. कढीलिंबाला ऊन आवडते, पाणी कमी लागते. आम्लधर्मीय माती आवडते. रंगाचा बादलीतही एक दीड मीटर सहज वाढतो, छान डवरतो. रोप वाढल्यावर महिन्यातून एखाद्या वेळी ताकाचे पाणी, दह्याचे पाणी घालावे. सुवासिनी नावाची कढीलिंबाची जात प्रचलित आहे. कढीलिंबाला पांढऱ्या रंगाचे फुलांचे गुच्छ येतात. त्यावर खूप मधमाश्‍या येतात. त्याची काळी गोल फळे पक्ष्यांना खूप आवडतात. 

ढगाळ हवेत सर्दी खोकला झाल्यास हमखास लागणारा, चहाचा स्वाद वाढवणारा, आरोग्यवर्धक गवती चहा हा गवताचा एक प्रकार आहे. पसरट कुंडी, आडवे कापलेले प्लॅस्टिकचे पिंप, यामध्ये पाल्याचे खत भरून मुळे असलेली एक-दोन कांड लावली, तर हळूहळू कुंडी भरून जाते. गवती चहाला पाणी आवडते, मध्यम उन्हातही छान वाढतो. सूप, थाय करी करताना पानांचा छान उपयोग होतो. गवती चहाची पाती काढून, कापून, सावलीत वाळवून ठेवता येतात. पानाच्या टोकात सर्वात जास्त औषधी द्रव्य, तेल द्रव्य असतात. कुंडी भरल्यावर किंवा वर्षभरात एकदा, गवती चहाच्या कांडाची विरळणी करावी. जास्तीची रोपे लावून ठेवावी, भेट देण्यास उपयुक्त होतात.

पाणीपुरी, चाट, चटणी, रायते करण्यासाठी लागणारा पुदिना छोट्याशा आडव्या कुंडीत, जुन्या प्लॅस्टिकच्या बास्केटमध्ये सहज लावता येतो. पुदिन्याच्या काड्या मातीवर आडव्या पसरून त्यावर कोकोपिथ किंवा मातीचा पातळ थर द्यावा, काड्यांना असलेल्या डोळ्यांमधून मुळे फुटतात व पुदिना रुजतो. त्याला आडवे वाढायला आवडते. पुदिन्याच्या काड्या पाण्यात बुडवून ठेवाव्यात. रोज पाच ते सात दिवस पाणी बदलले, तर मुळे फुटलेली दिसतात. या काड्या मातीत लावाव्यात. त्याला मध्यम ऊन लागते, पाणी आवडते. वरचेवर पाने खुडावीत त्यामुळे नवीन जोमदार पाने फुटतात. पुदिन्याला पांढऱ्या फुलांचे तुरे येतात, त्यावर अनेक कीटक येतात. पानाच्या उग्र वासामुळे कीड नियंत्रणात राहते. त्यामुळे बागेत एक दोन ठिकाणी पुदिन्याच्या छोट्या-छोट्या कुंड्या जरूर ठेवाव्या. पाने पाचक असल्यामुळे, लिंबाचा रस आणि पुदिन्याची दहा-बारा पाने घालून अतिशय सुंदर सरबत तयार करता येते. उन्हाळ्यात हे हलक्या हिरव्या रंगाचे, थंडगार सरबत पाहुण्यांची रसना तृप्ती करते.

चटणी किंवा वाटणासाठी लसणीची पात घरच्याघरी मिळू शकते. प्लॅस्टिकचे छोटे डबे, शीतपेयाच्या बाटल्या आडव्या कापून त्यात तयार खत, कोकोपिथचे मिश्रण भरावे. लसणाचा टपोऱ्या पाकळ्या साल न काढता, टोकेरी बाजू वर करून खोचाव्यात. तीन आठवड्यात पातीची छोटीशी गड्डी मिळते. हिरवी मिरची, लसूण पातीची चटणी खूपच छान होते. लसणाचा कंद तयार होण्यात बराच वेळ जातो व त्यासाठी मोठा वाफा करून लसूण लागवड करावी लागते.

मूळची मेक्सिकोमधली, ओव्याचा स्वाद असलेली, मांसल पाने असणारी लहानशी वनस्पती बहुतेकांना माहीत असते. ओव्याचे झाड या नावाने ती ओळखली जाते, पण याला ओवा येत नाही. जेमतेम फूटभर वाढणारी, भरपूर पसरणारी, लहानशी काडी लावली तरी सहज रुजणारी. या पानांची भजी छान होतात. पाने कापून थालीपीठ किंवा पराठ्यात वापरता येतात. याला देखभाल अजिबात लागत नाही. फांद्यांची छाटणी करून आटोक्यात ठेवले तर  छान दिसते.

मायाळू म्हणजे शोभिवंत पानांची, नावाला साजेशी भरपूर वाढणारी वेल. सुंदर बदामी आकाराची हिरव्या लालुंगी रंगाच्या पानांची भजी अतिशय कुरकुरीत होतात. एका प्रकारात वेलाचे खोड लाल असते, तर एकाचे हिरवे असते. ओडिशा, पश्चिम बंगाल इकडे याला पोई म्हणतात. वेल खूप वेगाने वाढतो, सुंदर दिसतो. मनीप्लांटसारखा अंतर्गत सजावटीसाठी घरात कुंडी ठेवूनही वाढवता येतो. त्याला पांढरट जांभळ्या रंगाची छोटी फुले येतात. नंतर काळ्या  मण्यांसारखे फळांचे घोस येतात. ही फळे कुस्करली तर गर्द आमसुली रंगाचा गर मिळतो. फळांना चव नसते, पण  सरबतात घातल्यास छान आमसुली रंग येतो. मायाळूच्या पानांची परतून भाजी छान होते. यात मोहरी, जिरे, बडीशेप, मेथी व कलौंजी म्हणजे कांद्याचे बी घालतात. ही पंचफोरन घातलेली मायाळूची भाजी बंगाली लोकांमध्ये खूप प्रिय आहे. या पानांची ताकातली भाजीही छान होते. कर्नाटकात सांबारमध्ये याचे कोवळे देठ घालतात, तर  ओडिशामध्ये माशाचा रस्सा करताना याचा वापर करतात. आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे, परंतु महाराष्ट्रीय पदार्थांमध्ये त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही. मायाळूचा वेल शोभेसाठी, कधीतरी भाजी किंवा भज्यांसाठी लावायला काहीच हरकत नाही. छोटीशी काडी लावली तरी सहज रुजतो. बिया पडूनही खूप रोपे येतात.

रसना तृप्ती करणारी ही पाने बागेत नक्कीच असावीत.

संबंधित बातम्या