ताज्या पालेभाज्या

प्रिया भिडे
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...
प्रिया भिडे

टोपलीमधली कोवळी, हिरवीगार पालकाची पाने काढून चिरायला घेतली. विळीवर पाने चिरताना त्याचा करकरीतपणा, ताजेपणा जाणवत होता. उकळत्या पाण्यात बारीक चिरलेली पाने टाकली. मीठ, मिरे आणि अर्धा चमचा बटर घातले. घरातील प्रत्येकाने दोन बाऊल सूप प्यायले. ताज्या भाज्यांची चव वेगळीच असते.

छोट्या बाल्कनीत, मध्यम ऊन येत असेल तर पालेभाज्या छान येतात. पालेभाज्या लावण्यासाठी दोन विटांचे वाफे, समृद्धीची प्लॅस्टिकची गोल घमेली, भाजीपाला वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारे क्रेट वापरता येतात. प्रत्येकाचे काही फायदे काही तोटे आहेत. वाफे केले तर त्यात पालेभाजीसाठी उंच गादी वाफा करावा, प्लॅस्टिक घमेल्याला तळाला भोके पाडवीत, नाहीतर पाणी साठेल. क्रेट वापरलेत तर तळाला व कडेला वर्तमान पत्राची घडी घालावी म्हणजे माती वाहून जाणार नाही. बुरूड आळीतून बांबूच्या/वेताच्या छोट्या टोपल्या आणल्यात, तर तळाला प्लॅस्टिक कागद किंवा कापडाचा तुकडा घालावा. या पर्यावरणपूरक टोपल्यांमध्ये पालेभाजी छानच येते. टोपल्या दोन वर्षे सहज टिकतात.

पालेभाजीसाठी मी पाल्यापासून तयार झालेली काळी दळदार माती वापरते. माझ्याकडे तयार झालेला हा ह्युमसच  असतो. एक घमेले भरायचे असेल तर त्यासाठी तयार खत, त्यात दोन ओंजळी कोकोपिथ, एक ओंजळ नीमपेंड घालून एकत्र करावे व त्याने घमेले भरावे. ज्यांनी आधीच माती आणली असेल त्यांनी निम्मी माती निम्मे तयार खत घ्यावे. कोकोपिथमुळे ओलावा धरून ठेवला जातो. नीमपेंड कीडनिरोधक म्हणून काम करते. 

शेती उद्योगाच्या, बी-बियाणाच्या दुकानातून ताजे बी आणावे. पालेभाजीचे खूप पर्याय आहेत. पालक, शेपू, मेथी, करडई, अंबाडी, आंबट चुका, माठ, राजगिरा वगैरे. 

सुरुवातीला पालक किंवा मेथी लावून सुरुवात करावी. टोपलीत गोलाकार पद्धतीत बियाणे भुरभुरावे. वर मातीचा हलका थर पसरावा. यामुळे पाणी घालताना बियाणे हलत नाही. बियाणे लावल्यावर हलक्या हाताने झारीने पाणी द्यावे. दोन ते तीन पाने फुटेपर्यंत झारीने/हलक्या हाताने पाणी घालावे नाहीतर रोपे आडवी होतात. वाफा असेल तर स्प्रिंकलर बसवावा, त्यामुळे रोपे छान वाढतात. स्प्रिंकलरमुळे हवेत गारवा व आर्द्रतापण राहते. याचा सगळ्या बागेला फायदा होतो. पालकाला पाणी आवडते. महिन्याभराने आपण पालकाची पाने खुडू शकतो. रोपे न उपटता फक्त पाने काढून घेता येतात. याला खुडवा म्हणतात. पाने काढल्यावर नवी फूट येते. पाने एकदा काढून घेतल्यानंतर रोपांना तयार खताची मात्रा द्यावी, त्यामुळे नवीन फूट जोमदार होते. एकाच रोपाची पाने दोन तीन वेळा काढता येतात. पालक वर्षभरात कधीही लावू शकतो. पालक गड्डी विकत आणल्यास पाने काढून घेऊन, मुळे मातीत खोचल्यास सलाडसाठी कोवळी पाने मिळतात. कोवळी पाने पोहे, उपम्यासाठी वापरता येतात. सूप, भाजीसाठी ताजा पालक हाताशी असला तर सोय होते. अख्ख्या पानाची पत्ता भजी तर तोंडात विरघळतात.

चायनीज पालक नावाची खूप भरभर वाढणारी, नाजूक हिरव्या पानांची, खूप सुंदर जांभळ्या फुलांची वनस्पती छोट्या कुंड्यांमध्ये आपण लावू शकतो. पानांचा उपयोग ऑलिव्ह तेल किंवा तिळाच्या तेलात परतून सलाडमध्ये घालण्यासाठी करता येतो. शोभेची कुंडी म्हणूनही ही रोपे छान दिसतात.

छोट्या टोपलीमध्ये मेथी लावली, तर तीस चाळीस दिवसांत भाजी मिळते. बिया गोलाकार लावाव्यात, नाहीतर बोटाने सरी करून त्यात बी लावावे. ताजी मेथी पराठे, डाळ, कढी अशा अनेक पाककृतींसाठी वापरता येते. सलाडसाठी वापरायची असेल, तर दहा पंधरा दिवसांत कात्रीने अलगद कापून घ्यावे. मायक्रोग्रीन म्हणून वापरायची असेल तर सात दिवसांतच काढावी. 

कोकणात, माटुंगा मार्केटला समुद्राच्या वाळूत वाढलेल्या बोटभर लांबीच्या मेथीच्या छोट्या जुड्या मिळतात. आपणही आपल्याकडे पसरट ट्रेमध्ये वाळू घालून त्यात मेथी लावू शकतो, समुद्राची वाळू पाहिजे असे काही नाही. साधी वाळूपण वापरू शकतो. याला सात दिवस फक्त पाणी घालायचे आणि मग नाजूक, कोवळी, दोन पानांची, रोपे काढून सलाडमध्ये घालायची. अगदी सहज, सोपे आणि आरोग्यपूर्ण. 

शेपू ही उग्र वासाची भाजी आहे. काहीजणांना ही खूपच आवडते, तर काही जणांना याचा वासही सहन होत नाही. पण लावायला ही भाजी खूप सोपी आहे. आडव्या क्रेटमध्ये किंवा यामध्ये बियाणे लावल्यास तीस दिवसांनंतर हिरवागार कोवळा शेपू मिळतो. शेपूलापण पाणी आवडते. शेपूची थोडीशी पाने स्वादासाठी रवा इडली, थालीपीठ, तांदूळ पिठाच्या पानगीत घालता येतात, अर्थात शेपूचा स्वाद आवडत असेल तरच.

अंबाडीची भाजी, त्यावर कोवळ्या लसणाची फोडणी, तीळ लावलेली भाकरी असा धुंधुरमास बेत करायचा, तर   मोठ्या क्रेटमध्ये अंबाडी लावावी. नाहीतर दोन छोट्या टोपल्या कराव्यात. हिरवी अंबाडी बुटकी असते, तर लाल अंबाडी झुडपासारखी मोठी होते. हिची फुले खूपच सुंदर दिसतात. अंबाडी कणखर प्रकृतीची भाजी आहे. फारशी देखभाल लागत नाही. एकदा लावली की खूप दिवस पाने देत राहते. काही रोपे ठेवून त्यापासून बी पकडता येते. 

लाल माठ, हिरवा राजगिरा अगदी सहज येतो. याची पाने काढून घेऊन रोप वाढवले तर फुलांचे तुरे येतात, या तुऱ्यांवर खूप मधमाश्या येतात. राजगिऱ्याचे बी पडून खूप रोपे येतात. कोवळी भाजी काढून खावी, नाहीतर रोपे अलगद उपटून हिरवे खत म्हणून झाडांना घालून टाकावे. राजगिरा व माठ याचे बी पकडण्यासाठी रोपे वाढवली, तर बियांचे तुरे अलगद काढून घेऊन, झाडाचे खोड भाजीसाठी वापरता येते. मूळ काढून टाकायचे व शेवग्याच्या शेंगांसारखे असलेल्या खोडाचे बोटभर लांबीचे तुकडे करायचे. कांदा, मिरचीची फोडणी करून त्यावर हे तुकडे घालून पाणी शिंपून भाजी करावी. मुगाची डाळ घालून याची रसभाजीही खूप छान होते. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यात असलेले फायबर. छोट्याशा गावच्या बाजारात गेलात, तर हातभर लांबीची अशी झाडाची जाड डेख विकायला असतात. म्हणजे प्रत्येक भागाचा अतिशय निगुतीने वापर करण्याचा प्रयत्न दिसतो. आपल्याला वाटेल हे गरिबाचे खाणे, पण किती आरोग्यपूर्ण आहे याचा विचार करायला पाहिजे.

चंदन बटवा, चाकवत या भाज्या जरा वेगळ्या चवीच्या असतात. चाकवत नाजूक प्रकृतीचे असते. फार पाणी घालू नये, पटकन कुजते. चंदन बटवाचे बी मिळाले तर जरूर लावावे. कांदा घालून भाजी छान होते. आंबट चुका सहज येतो. याचे बी गुलाबीसर कागदी फुलासारखे असते. थोडेच आणावे कारण वजनाने हलके असल्यामुळे थोड्या वजनात भरपूर मिळते. आडव्या ट्रेमध्ये बियाणे पसरून वरून मातीचा थर द्यावा. महिन्याभरात हिरव्यागार पानांनी ट्रे भरून जातो. आंबट चुक्याची पाने खुडून वापरता येतात. गूळ घालून चुक्याची भाजी छान होते. सँडविचसाठी हिरव्या मिरच्या घालून केलेली आंबट चुक्याची चटणी हवीच, त्यासाठी बागेत एखाद्या टोपलीत चुका लावावा.

कोथिंबीर रोज लागणारी. धने आणून, चोळून दोन पाकळ्या उकलल्या की मग मातीवर टाकाव्या, वरून मातीचा थर द्यावा. कोथिंबीर नाजूक प्रकृतीची आहे. पाणी घालताना काळजी घ्यावी. आधी इतर पालेभाज्या लावून हात बसला, की मग कोथिंबीर लावावी. कोवळी कोथिंबीर पक्षी, खारीपण खातात. कधीतरी त्यांनाही आनंद घेऊ द्यावा. 

रोजच्या धावपळीत हे काहीच जमणार नसेल, तर एखाद्या छोट्या कुंडीत, डब्यात माती घालून चमचाभर गहू पेरावा. सात दिवसात गव्हांकुर येईल. आठवड्यातून दोनदा तीनदा गव्हांकुराचा रस सहज घेता येतो.

पालेभाज्या कमी काळात मिळतात, त्यामुळे उत्साह वाढतो. आलटून पालटून वेगवगळ्या भाज्या लावता येतात.

भाजीपाला लावताना आपण लक्षात ठेवले पाहिजे, की हे सगळे हौसेसाठी करायचे. बागेत भाजी लावली तरी आपल्याला हवी ती भाजी विकत आणावी लागते. 

आपले शेतकरी बंधू घाम गाळून, जिवाचे रान करून भाजीपाला पिकवतात. त्यांच्या कष्टाची जाणीव आपल्याला आपण भाजी पिकवायला लागल्यावर निश्चित होते आणि ताज्या भाजीची किंमत कळते.

संबंधित बातम्या