रंभाफळ 

प्रिया भिडे
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...

गच्चीवर फळझाडे लावायची का? हो लावायची. त्यातले माझे आवडीचे फळ रंभाफळ. आता तुम्ही म्हणाल, ही कोणती रंभा? आम्हाला कशी माहीत नाही? तुम्हालापण माहीत आहे हे रंभाफळ. लहान थोरांना, सगळ्यांनाच आवडणारी केळी. गच्चीवर सहज लावता येतात, किंबहुना प्रत्येकाने स्वतःच्या, सामायिक गच्चीवर केळी आवर्जून लावावी. माझ्याकडे गेली बारा वर्षे केळी आहे, बारावी पिढी सुरू आहे. 

गच्चीवर खूप ऊन असते व काँक्रीटचे छत खूप तापते, त्यामुळे झाडांना मायक्रो क्लायमेटसाठी केळीचा उपयोग होतो. पत्र्याचे किंवा प्लॅस्टिकचे पिंप २०० लिटरचे घ्यावे, त्याला पाच मिमीची निदान दीडशे भोके असावीत. तळाला बागेतील काटक्याकुटक्या, कापलेल्या फांद्या, मुळे, तण असा उशिरा कुजणारा माल घालावा. त्यावर  अर्धा भाग भरेल इतका पालापाचोळा घालावा. वर शेण पाणी शिंपावे. ते नसेल तर नुसत्या पाण्याने भिजवावे. त्यावर तयार पालाखतात नीमपेंड व कोकोपिथ घालून पिंप पूर्ण भरावे. पिंप भरून झाल्यावर त्यात केळीचे पिल्लू म्हणजे केळीचे छोटे रोप लावावे. केळीत विविध प्रकार आहेत; वेलची केले, मोठी केळी, लाल रंगाची केळी. काही केळ्यात बियासुद्धा असतात, ती चवीला किंचित आंबट असतात. आपल्या आवडीचे रोप घ्यावे. एकदा रोप लावले की ते नंतर पिल्ले देत राहते. रोपाला पाणी भरपूर द्यावे. एकूणच केळीला पाणी प्रिय आहे. भांडी धुतलेले पाणीसुद्धा केळीला आवडते. पूर्वी परसदारी भांडी धुण्याच्या मोरीजवळच केळी असायच्या. केळीचे रोप भराभर फोफावते. लांब लांब कोवळी पोपटी पानांची सुरनळी बाहेर पडते आणि अलगद उलगडत जाते. पाच-सहा फुटी एकेक पान अशी हळूहळू ३०-३५ पाने येतात. अशी मोठी पाने व त्यानंतर येणारा घड भरण्यासाठी रोप लावताना मोठ्या पिंपाची गरज असते. लहान पिंपात केळी चांगली पोसली जात नाही. केळीला खूप खाद्य लागते. निदान दोन  घरांचा ओला कचरा ती सहज खाते. तुम्हाला शक्य असेल तर मासळीचा खाऊ देऊ शकता. मासळी विक्रेत्यांकडचा राहिलेला माल ते आनंदाने देतात. दोन महिन्यांतून एकदा असा खाऊ द्यावा. मग अतिशय तुकतुकीत कांतीचे खोड अन त्यावर देखणा पर्णसंभार बघितला, की या लावण्यवतीला रंभा का म्हणतात ते  कळते.  

नऊ-दहा महिन्यांनी आपली प्रतीक्षा संपते आणि केळीच्या खोट्या खोडातून केळफूल बाहेर येते. मोठा जाडजूड दांडा आणि त्याला टोकाला गर्द अमसुली रंगाच्या पाकळ्यांचा कोन. या कोनात दडलेल्या असतात नाजूक फुलांच्या फण्या. हळूहळू अमसुली रंगाची एक एक पाकळी उलगडत गळून जाते आणि फुलांची फणी बाहेर पडते.

एकदा माझ्याकडे एक स्त्रीरोग तज्ज्ञ आल्या होत्या. केळीला नुकतेच केळफूल आले होते, त्याकडे बघत त्या म्हणाल्या ‘एखादी गर्भार मुलगी असावी, तशी केळ सतेज दिसत आहे नाही का गं?’ किती सुंदर भावना व्यक्त केल्या त्यांनी! अनेक कवींना या रंभेने भुरळ घातली आहे. कवी अनिल ‘रंभागर्भ’ या कवितेत म्हणतात,

वारा कुजबुजे, आकाश ऐकत होते  

रात्रीला थोडीशी लागे चाहूल  

रंभागर्भातून बाहेर येता, केळीचे फुल

मिस्कील हसल्या प्राजक्ताच्या कळ्या

त्याही तितक्याच होत्या उमललेल्या 

गुलाब-मोगरे टपोर बिचारे, 

जाणतेपणाने झाले गोरेमोरे

पावसाचे थेंब वेळीच आले 

नव्या बाळाला न्हाऊ घातले  

नात्याची ती कर्दळीबाई पंचरंगांचा बाळंतविडा 

जरा आधीच घेऊन येई...... 

अशी ही केळी मृदू आणि लोभस. केळीला आधार देणारे खोड इतर वृक्षांसारखे नसते, तर त्यात एकावर एक आवरणे असतात, त्यातून पाने आणि केळफूल बाहेर येतो, असा हा रंभा गर्भ.

एकदा का केळफूल बाहेर पडले, की बाळंत मुलीचे लाड करावे लागतात. मग आठवड्यातून एकदा थोडा मासळीचा खाऊ आणायचा, कधी भुर्जीवाल्याकडून किंवा केक करणाऱ्या मैत्रिणीकडून अंड्याची साले आणायची, कधी केळीची साले घालायची. केळीत खूप पाणी असल्याने तिथे गांडुळे छान वाढतात. खूप ओला कचरा खातात आणि केळीला अन्न पुरवतात. केळ फोफावत असताना तिला नवी पिल्ले फुटत राहतात. दोन पिल्ले आपल्यासाठी ठेवून बाकीची मैत्रिणींना द्यावीत. 

केळफूल बाहेर पडले, की त्याचा दांडा वाढत जातो. फुलांचे परागीभवन होऊन केळीच्या छोट्या छोट्या फण्या तयार होतात. शेवटी अमसुली पानात दडलेली फुले आपल्याला भाजीसाठी वापरता येतात. फुलांची चटणीही छान होते. 

केळीचा घड भरायला तीन-चार महिने लागतात. एका घडात पंच्याहत्तर ते 

ऐंशी केळी असतात. एकमेकाला बिलगलेली केळी हळूहळू भरत जातात, ती भरताना बघायला छान वाटते. झाडाच्या भाराने

केळ वाकते, अशावेळी तिला आधार द्यावा लागतो.

केळीचे अनेक उपयोग होतात. कच्च्या केळीची भाजी, कीस, चिप्स करता येतात. एक केळ पिवळे झाले, की  घड कापून घ्यावा. हळूहळू केळी पिकत जातात. घरची सुकुमार सोनपिवळी केळी खाण्याचा आनंद वेगळाच. पूर्वी परसदारी केळ असे व मुलांच्या दिमतीला आज्जीच्या हातचा, वेलदोडा घातलेला केळीच्या नाजूक कापांचा रंभापाक असे. खूप केळी आली की फ्रुटसॅलेड, केक, पाय, ओले खोबरे घालून केलेले काप अशा खास पाककृती करता येतात.  

तुम्हाला सोसायटीतील दोन-तीन जणांना मिळून गच्चीवर केळीचे रोप वाढवता येईल, अथवा सोसायटीत एखाद्या कोपऱ्यात पिंप ठेवून त्यात रोप लावता येईल. आमच्या दोन-तीन मित्रांकडे गच्चीत केळीचे पिंप दिले, आता ते तीन घरांचा कचरा त्यात जिरवतात. वर्षातून एकदा आलेला घड वाटून घेतात. केळीच्या पानांचाही खूप उपयोग होतो. पोहे, उपमा, इडली खायला पाने वापरता येतात. पानग्या करायला, मोदक वाफवायला पानांचा उपयोग होतो. आपल्या मंगलकार्यातही केळीला अग्रभागी स्थान असते. नैवेद्य, गोग्रास पानावर घालता येतो. आमची केळ बघून ओळखीच्या एक मंगलकार्यालयामध्ये त्यांनी दारातच पिंपात दोन केळी लावल्या आहेत. रोजचा भाजीचा ओला खाऊ खाऊन रसरसलेल्या या केळी पाहुण्यांचे स्वागत करतात.  

एकदा आम्ही मित्राकडे जेवायला गेलो होतो. कार्याची पंगत केळीच्या पानावर होती. मी आणि सुनील दोघांच्याही मनात एकच विचार आला, तो आम्ही मित्राकडे बोलून दाखवला. जेवण झाल्यावर केळीची पाने कचऱ्यात टाकण्यापेक्षा आमच्या झाडांना खाऊ म्हणून नेतो असे सांगितले आणि चक्क बारा पोती भरून केळीची पाने घेऊन आलो. आपल्या झाडांसाठी याहून अधिक उत्तम खाद्य नसते.

सगळ्यात मजेशीर उपयोग कधी होतो, तर आपल्या घरात कधीकधी भांडी घासणाऱ्या बाई येणार नसल्या तर हिरव्यागार पानावर वरण, भात, तूप, मीठ, लिंबू असे खास जेवणही करता येते. आपले जेवण झाल्यावर पान परत झाडाला खायला देता येते; निसर्गाचे हे चक्र पूर्ण होते. 

कार्बाईडमध्ये खोटी पिकवलेली पिवळीधम्मक केळी खाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. पण कधीतरी हळूहळू पिकत जाणारी आपल्या घरची सुमधुर केळी खायची चैन आपण अनुभवू शकतो.

घड काढल्यावर केळ मरते. त्याच्या खोडाची एकावर एक असलेली आवरणे काढावीत. या आवरणाचा गौरवर्ण, तुकतुकीत कांती बघून आपण थक्क होतो. आत एक पांढरा शुभ्र दांडा मिळतो. याची भाजी, कोशिंबीर छान होते. यात इतके पाणी असते, की चिरतानासुद्धा पाणी गळते. भरपूर फायबर व पाणी असलेले हे व्यंजन बंगाली लोकांना खूपच आवडते. केळीचे खोड, पाने, फूल, फळ असा प्रत्येक भागाचा आपल्याला उपयोग होतो. आपल्याला भरपूर पिल्ले देऊन केळ जीवन संपवते.

भारतात केळीची शेती खूप मोठ्या प्रमाणात होते, पण शहरात आपण केवळ नको असलेल्या ओल्या कचऱ्यावर केळी वाढवू शकतो. लहान गावात आजही घराभोवती केळवन असते. खास गोव्याच्या निसर्गश्रीमंत भूमीतले ज्येष्ठ कवी बा .भ. बोरकर ‘माझे घर’ कवितेत लिहितात,

मागे विहीर काठाची वर प्राजक्ताचे खोड 

गर्द हिरवे, न्हाणीशी, निरफणसाचे झाड

केळवनाच्या कडेला स्वच्छ छोटासाच गोठा

त्याच सवत्स कपिला, ओल्या चाऱ्याचा नि साठा

अशा घरात राहण्यासाठी म्हणे आता दिवसाला हजारो रुपये देतात आणि त्याला होम स्टे म्हणतात!

संबंधित बातम्या