रसाळ फळांची दुनिया  

प्रिया भिडे
सोमवार, 7 डिसेंबर 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...
प्रिया भिडे

गच्चीला भारदस्तपणा देणारे झाड कोणते? असे कोणी विचारले तर मी एकच नाव सांगेन.. पपई! झपाट्याने वाढणारे, जाडजूड बुंध्याचे, कातरलेल्या विस्तीर्ण पानांचे पपईचे झाड म्हणजे गच्चीवरील हिरवीगार छत्री. याला वाढायला निदान शंभर लिटर (६० सेमी X ६० सेमी X ६० सेमी)चे मोकळेढाकळे पिंप हवे. त्यात तळाला काटक्याकुटक्या, नंतर कोरडा पाला, त्यावर शेणपाणी किंवा सूक्ष्मजिवांचे विरजण घालावे. वरच्या थरात तयार पालाखत, नीमपेंड व कोकोपिथचे मिश्रण घालून पिंप भरले की पपईचे रोप लावावे. माझ्याकडे बारा वर्षांहून अधिक काळ पपई आहे. एक पपई तीन वर्षे चांगली फळे देते. या फळातील बियांपासून नवीन रोपे करते. म्हणजे आता चौथी पिढी सुरू आहे. सहज लावता येणारे, भरपूर कचरा खाणारे व खूप फळे देणारे हे गुणी झाड. यात नर व मादी रोपे असतात, तर काहींमध्ये नर व मादी फुले एकाच झाडावर असतात. रोप आणताना बघून आणावे. काही जाती बुटक्या असतात. पण माझ्याकडे गावरान पपई आहे. ती तीन-चार मीटर वाढते. रोप लावल्यावर महिन्यातून एकदा शेणपाणी द्यावे. पानांचा आकार चाळीस सेमी बाय चाळीस सेमी होतो. पानांच्या आकारावरून व रंगावरून झाडाचे आरोग्य कळते. 

चार-पाच महिन्यांत फुले धरतात. आपले कीटक मित्र परागीभवन करून आपल्याला मदत करतात व लहान लहान पपयांनी झाड लगडून जाते. आता या लेकुरवाळीसाठी आठवड्यातून दोन वेळा भाजीवाल्याकडून, उसाच्या रसवाल्याकडून, अमृततुल्यवाल्याकडून किंवा अंडा भुर्जीवाल्याकडून खाऊ आणावा; ते आनंदाने देतात. झाडाभोवती एक किलोभर खाऊ पसरावा आणि पाल्याने किंवा तरटाने झाकून टाकावा. मातीतले रहिवासी त्याचा फन्ना उडवतील आणि लेकुरवाळीचे पोषण करतील. 

पपया भरण्यास दोन महिने सहज जातात. पण थाय सॅलडसाठी अनेक मैत्रिणी कच्च्या पपया नेतात. कीसपण छान होतो. मिरची, कढीलिंब, तीळ घालून भाजी करता येते. या तुकतुकीत कांतीच्या पपयांवर एखादा पिवळा डाग पडला, की काढून कागदात गुंडाळून ठेवावी. सेंद्रिय मालावर वाढलेल्या पपईचे साल इतके पातळ असते, की आपण सालासकटसुद्धा खाऊ शकतो. कारण आपण कोणतीही रासायनिक खते घालत नाही, फवारणी करत नाही. नाहीतर सालाचा उपयोग त्वचेला लावण्यासाठी, सौंदर्य वर्धनासाठी करता येतो. काही वर्षांपूर्वी एकाने फोन केला, ‘मला कळले तुमच्याकडे पपईचे झाड आहे. मला पाने मिळतील का?’ ते पाने घेऊन गेले. नंतर फोन आला की पानाच्या रसाचा त्यांना फायदा झाला, खूप खूप धन्यवाद दिले. मी म्हणले, ‘अहो धन्यवाद पपईच्या झाडाला देऊ या, कारण तिने औषधी द्रव्य निर्माण केले.’ अशी ही गुणी पपई तीन वर्षे छान फळे देते. नंतर पानांचा व फळांचा आकार लहान होत जातो. मग ती काढून पाने, खोड दुसऱ्या रोपाला खाऊ घालावे. खोड व पानांचे वजन पन्नास साठ किलो सहज भरते. ही सूर्यऊर्जा वाया घालवू नये. पपईचे तंतुमय खोड गांडूळ व इतर किड्यांना खूप आवडते.

माझ्या बागेत तीन ते चार पपईची झाडे असतात. या हिरव्या छत्र्या, माझ्या इतर झाडांचे तीव्र उष्णतेपासून रक्षण करतात. प्रत्येक गृहनिर्माण संस्थेमधील गच्चीत या हिरव्या छत्र्या लावल्या, तर गच्चीवरील तापमान नक्की कमी होईल.

पपईप्रमाणेच एखाद्या पिंपामध्ये शेवगा लावावा. आजकाल शेवग्याच्या बुटक्या जाती मिळतात. कारण शेवगा खूप उंच झाला की शेंगा काढणे अवघड होते. गेली सहा वर्षे माझ्याकडे शेवग्याची दोन झाडे आहेत. त्यातील एक प्रत्येक वेळी निदान दिडशे ते दोनशे शेंगा देते. आश्चर्य वाटले ना? ही किमया सूक्ष्मजिवांची! आपल्याला माहीत नसते, पण एक ग्रॅम मातीत वेगवगळ्या प्रकारचे कोट्यवधी जीव असतात. जीव जेवढे जास्त तेवढी आपली माती सकस. म्हणून बागेत भरपूर सेंद्रिय माल वापरायचा. तुम्ही पिंपात शेवगा रोप लावल्यावर रोपाभोवती पहिले दोन तीन महिने महिन्यातून एकदा राख भुरभुरावी. रोप वेगाने वाढते, त्याला आधार द्यावा. महिन्यातून एकदा वर वाढणारा शेंडा खुडावा, त्यामुळे आडवी वाढ होते व भरपूर फुले येतात. पाच महिन्यांनी फुले धरतात. काही वर्षांपूर्वी एक मैत्रीण आली. गच्चीत पाय टाकताच थबकली, ‘अगं काय सुंदर दिसतंय!’ शेवगा हिमवर्षाव झाल्यासारखा फुलांनी डवरला होता. तिने फोटो तर काढलेच, पण लगेच तिच्या गच्चीत शेवगा लावला. हा शेवगा एकदा फुलला की सारी सृष्टीच यावर मोहित होते. पहाट झाली की पहिली हजेरी धनेशाची, मग बुलबुल, मुनिया अनेक जण कोवळी पाने फस्त करतात. नाजूक चोचीने शिंशीर मधुरस पितात आणि भुंगे व अनेक प्रकारच्या माश्या मधुरसाचा आनंद घेतात आणि मग नाजूक शेंगा लटकू लागतात. 

शेवगा अनेक जीवनसत्त्वांचा खजिना आहे. मी त्याचा पाला आमटी, सांबर, थालीपीठ, पोहे, उपम्यात घालते. भाजी जरा कडसर होते. पाला वाळवून भाकरीतही घालता येतो. गोड गराच्या शेंगा पिठले, आमटी, सांबर, कढी, रसभाजी, सूप, लोणचे करण्यासाठी नाही तर चमचमीत तवा मसाला शेंगा करून वापरता येतात. शेवग्याप्रमाणे हादगा सुद्धा लावता येतो. याला थोडी लहान कुंडीपण चालते. पंधरा वीस फुले आली तरी भाजी नाहीतर भजी करता येतात. वडापावसारखा भजी पाव खाता येतो. 

पक्ष्यांच्या छोट्याशा मेंदूला समजते की शेवग्याची, हादग्याची पाने फुले खावीत, त्यात खूप पोषक मूल्ये आहेत. पण शहरातील माणसांना मात्र या पानांचा, फुलांचा कचरा वाटतो; गंमतच आहे.

गच्चीवर लावण्याजोगी अजूनही खूप फळझाडे आहेत. सीताफळ बिया लावून सहज रुजते. चिक्कूचे, डाळिंबाचे मात्र चांगले रोप आणावे. 

राय आवळ्याची फांदी खोचली तरी फुटते. फांद्या लालसर मोहोरांनी डवरतात आणि काही दिवसांत टप्पोरे आवळे एकमेकांना बिलगतात. जाता येता तोंडात टाकता येतात. मिरचीबरोबर ठेचा, नाहीतर जेली करता येते. मीठ लावून मुले माकड मेव्याचा आनंद घेतात.

तुतीची पण फांदी खोचली तर येते. याच्या फांद्याचा पसारा असतो, पण भरपूर आंबट गोड तुती मिळतात. कार्तिक महिन्यात तुळशी विवाहासाठी व विष्णू पूजनासाठी लागणाऱ्या डोंगरी आवळ्याचे रोप मोठ्या पिंपात, कुंडीत, टायरमध्ये लावता येते.

जंगलामध्ये आपण वृक्ष वेलींचे सहजीवन पाहतो. तसेच ही झाडे मोठ्या पिंपात लावली, तर या झाडांचा वेलींना आधार म्हणून उपयोग होतो. शेवग्यावर दोडका, चिक्कूवर घोसाळे, सीताफळावर कारले चढवता येते. 

गच्चीत ही झाडे असली नसली तरी चालतील, पण सगळ्यात महत्त्वाचे, लोकप्रिय व रोज लागणारे लिंबू मात्र आपल्या बागेत हवेच. रोप आणताना पातळ सालीचे लिंबू आणावे. लिंबामध्ये खूप प्रकार असतात. माझ्याकडे संत्रालिंबू व कागदी लिंबू आहे. लिंबाला पाणी कमी लागते, त्यामुळे मी त्याच पिंपात आले किंवा अळू लावते. अधिकचे पाणी शोषले जाते, कारण पालामातीत ओल जास्त धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो. लिंबाला प्राणीजन्य खत, मासळीखत आवडते. त्यातून फॉस्फेट मिळते. महिन्यातून एकदा नीमपेंड घालावी. फुले धरल्यावर पाणी कमी करावे. मी पाणी पूर्ण तोडत नाही, कारण गच्चीवर ऊन खूप असते. या फळझाडांच्या जवळ मोहरी लावली, तर त्यावर मधमाश्या येतात व परागीभवन चांगले होते. भरपूर लिंबे येतात. लिंबाचे काय करायचे हे सुगरणींना सांगायला नको.

फुलपाखराच्या अळ्यांना लिंबू वर्गीय झाडांची पाने आवडतात. त्या आल्या तरी काळजी करू नये, आपल्याला लिंबे मिळतात.

पपई, शेवगा, हादगा, डाळिंब, सीताफळ, चिक्कू, पेरू अनेक पर्याय आहेत. तुम्हाला आवडेल तो निवडावा, कारण निसर्गाबरोबरचे हे सहजीवन आपल्याला खूप समृद्ध करते.

संबंधित बातम्या