तण व कीड व्यवस्थापन 

प्रिया भिडे
सोमवार, 21 डिसेंबर 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...
प्रिया भिडे

फुलझाडे, शोभिवंत पानांची झाडे, फळभाज्या, पालेभाज्या, फळझाडे, सुगंधी वनस्पती, गवतांचे प्रकार,  सजल सक्यूलंट काटेरी कॅक्टस, नाजूक सौंदर्याचा आविष्कार असलेले ऑर्किड्स अशा अनेक वनस्पती आपण हौसेने आपल्या बागेत लावतो. आपल्या घरातील या सदस्यांची आपण खूप काळजी घेतो. त्यामुळे आपण लावलेल्या रोपांपेक्षा वेगळी रोपे बागेत आली, की आपण अस्वस्थ होतो. ही रोपे कशी येतात, तर निसर्गात बीज प्रसाराची क्रिया सतत सुरू असते. मातीत बीज पडले की सहज उगवते आपल्यासाठी हे तण असते. आपण लावलेल्या रोपांच्या मधे हे अनाहूत पाहुणे येतात व फोफावतात. मग अन्नामध्ये वाटेकरी होतात, तसेच बागेच्या सौंदर्याला बाधा येते. मग काय करायचे? हे तण कोणते आहेत हे ओळखायला शिकायचे. म्हणजे, राजगिरा, घोळ, केनी, किलवरसारख्या आकाराची नाजूक पिवळी फुले येणारी अंबोशी, एकदांडी म्हणजे दगडीपाला, नागरमोथा कुटुंबातले सुगंधी मुळांचे गवत, तर काही वड, पिंपळ, औदुंबर अशी मोठ्या वृक्षांची रोपेपण येतात. मोठ्या वृक्षांची रोपे काढून टाकावीत. शक्य असेल तर वाढवून योग्य हाती सोपवावीत. 

काही वेळा आपल्याच बागेतील झाडांचे बी पडून खूप रोपे उगवतात, ती वाटून टाकावीत. पण नको असलेल्या तणाचे काय करायचे? 

प्रतिबंध : जमिनीचा कस कमी झाला, त्यातील सेंद्रिय कर्ब कमी झाला की तण येतात. त्यासाठी जमिनीत सेंद्रिय माल व पालाखताची भर घालावी. काही लोक माती बदलतात, त्याची गरज नसते. निसर्गात माती बदलली जात नाही, तर त्यात सेंद्रिय मालामुळे पोषक द्रव्य मिसळण्याची प्रक्रिया होते. आपणही तेच करायचे.

मातीत पाण्याचा निचरा झाला नाही तर ती घट्ट होते. माती भुसभुशीत ठेवण्यासाठी सेंद्रिय मालाचा उपयोग होतो. 

तण काढणी : झाडांभोवतीचे, कुंड्यांमधील तण खुरपून काढावेत. माती भुसभुशीत असेल तर तण सहज उपटता येतात. बी धरण्याआधी तण काढावे. यास बाळ कोळपणी म्हणतात. बाळ रोपे कुंडीत जिरवून टाकावीत त्यामुळे नत्र मिळते. मोठी जागा, वाफा असेल तर आपण लावलेल्या रोपाभोवती वर्तमानपत्राचे आच्छादन केले, तर सूर्यप्रकाश न मिळाल्याने तणाचे बी उगवत नाही. हा सोपा उपाय आपले पुढचे श्रम वाचवतो.  

तणाचे पोषक द्रावण : कोळपणी, खुरपणी करायला वेळ झाला नाही, तर तण वेगात फोफावतात. त्याला फुले येऊन बी धरते, मग ते वाऱ्याने पसरून पुन्हा रुजते. त्यामुळे हे तण काढून बादलीत घालावेत. तण बुडतील इतकेच पाणी घालावे. चार पाच दिवस ते कुजवून पाणी झाडांना घालावे. कुजलेले तण गांडुळांना खूप आवडतात. या पद्धतीमुळे बीजप्रसार होऊन तण पुन्हा उगवण्याचे कमी होते. निसर्गात सहज येणाऱ्या स्थानिक वनस्पती आपण हिरवळीचे खत म्हणून वापराव्या. त्यामुळे मातीचा कस टिकतो. तणातसुद्धा नत्र, स्पुर्द, पलाश व इतर सूक्ष्म पोषक मूल्ये असतात. हरळी, नागरमोथा गवत अशी तण आक्रमक जमिनीचा कस वाढला तर कमी होतात.

खाद्योपयोगी तण : तणांची ओळख करून घेतली, तर तणांचा भाजीसाठी वापर करता येतो. गुलाबी मीडेखांचा नाजूक पानांचा घोळ, जाडसर पानांचा पिवळ्या फुलांच्या घोलाचो परतून किंवा गूळ घालून पातळ भाजी करता येते. राजगिरा, हिरव्या माठाची कोवळी पाने व बियांचे तुरे परतून छान लागतात. टाकळ्याच्या पानांची परतून भाजी करावी. याच्या मुळावरील गाठी जमिनीत नत्र स्थिर करतात. नाजूक निळ्या फुलाच्या केनीची लांब गोल पाने डाळीच्या पिठात बुडवून तेलात सोडली की टम्म फुगतात आणि तोंडात अक्षरशः विरघळतात. मग केनी बागेत असल्याचा आनंदच होतो. 

विषारी तणनाशकांचा वापर करण्यापेक्षा मातीचा कस राखणे, तण वेळीच काढणे, मातीवर आच्छादन करणे व आलेल्या तणाचा वापर करणे असे शाश्वत उपाय करावेत.       

निसर्गात उत्पत्ती, स्थिती आणि लय असे तीन अंकी नाटक सुरू असते आणि यात अनेक पात्रे येत जात असतात, हे बागेत काम करताना कळते. आपण लावलेल्या सुंदर सुंदर झाडांवर आपल्या सारखेच आणखीही काही जीव लुब्ध होतात. त्यांच्याकडे आकर्षित होतात. कारण त्यांचे जीवन याच वनस्पतींवर अवलंबून असते. हे जीव म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कीड. झाडांना वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यात  किडीपासून जपावे लागते. 

प्रतिबंध : रोपांची लागवड केल्यावर त्याभोवती नीमपेंड भुरभुरावी. लिंबोणीमध्ये मोठ्या प्रमाणात तेल द्रव्य असते. त्यातील  

आझादीरेक्टीन व इतर घटक बुरशीनाशक म्हणून काम करतात. तसेच यामुळे मातीतील सूक्ष्म कृमींचा नाश होतो. 

रोपे एक महिन्याची होईपर्यंत आठवड्यातून एकदा राखेचे रिंगण करावे. यामुळे खोड खाणाऱ्या किडीपासून बाळरोपांचे रक्षण होते. 

ऊन कमी झाले अथवा ढगाळ हवा असली, तरी किडीचा प्रादुर्भाव वाढतो. काही किडींना ठराविक झाडे आवडतात. कर्दळ, पेरू, जास्वंद, टोमॅटो यावर पांढरी माशी हमखास येते. थोड्याच पानांवर माशी असेल तर तो भाग कापून टाकावा. टोमॅटोच्या झाडाचा जीवनक्रम संपत आला की पानांचा, फळांचा आकार लहान होत जातो व ते रोगास बळी पडते. मग रोप उपटून मातीत मिसळून टाकावे. 

पांढऱ्या माशीसाठी पिवळ्या रंगाचे सापळे लावावेत. एक जुनी प्लॅस्टिक बाटली घ्यावी. त्याला पिवळ्या रंगाची चिकट पट्टी गुंडाळावी. त्यावर व्हॅसलिन किंवा पेट्रोलियम जेली/चिकट द्रव लावावा. पांढऱ्या माशीला पिवळा रंग आवडतो व ती बाटलीकडे आकर्षित होऊन बाटलीला चिकटते. थोड्या दिवसांनी बाटली पुसून परत जेली लावावी. हा सोपा व स्वस्त उपाय आहे. 

मातीतून बुरशीजन्य रोग झाडावर येऊ शकतात. अशावेळी ट्रायकोडरमा बुरशी पाण्यात घालून मातीत मिसळता येते.

काही वेळेला मातीत हुमणी आढळते. अर्धवट कुजलेले खत किंवा जास्त सेंद्रिय माल व त्यामानाने सूक्ष्म जीव संख्या कमी, असे असेल तर हुमणी येते. कारण ती खादाड आहे. अशा वेशी हुमण्या काढून टाकाव्या. पाण्यात टाकून ते पाणी झाडाला घालावे. कुंडीत सूक्ष्मजिवांचे विरजण घालावे.    

पावटा घेवडा वर्गीय वेलांवर मावा हमखास येतो. माव्याने तयार केलेला चिकट द्रव मुंग्यांना आवडतो. यास प्रतिबंध करण्यासाठी महिन्यातून एकदा नीम अर्क फवारावा. रात्री अर्धा लिटर पाण्यात दोन तीन चमचे नीम अर्क घालून ठेवावा. दुसऱ्या त्यात दिवशी एक चमचा साबण घालून मिश्रण फवारावे. साबणाने फवारणी चांगली होते. 

मावा आल्यास आधी पाणी फवारून संख्या कमी करावी. मग मिरचीचा ठेचा पाण्यात घालून तो फवारावा. 

झाडाप्रमाणे किडीचे पण वाढीचे टप्पे असतात. त्यावेळी वेगवेगळे उपाय करता येतात. मी दीड ते दोन महिन्यांनी १:२० असे गोमूत्र पाण्यात मिसळून त्याची फवारणी करते.

कडुलिंबाच्या पानाच्या रसाची फवारणी, गोमूत्र फवारणी, एरंड व सीताफळाची पाने भिजत घालून त्या अर्काची फवारणी करता येते. तुम्हाला उपलब्ध असलेली पाने वापरू शकता. मी नीमपेंडचा भरपूर वापर करते. महिन्यात एकदा मुठभर घालते. झाडाची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर रोग कमी येतात.

पेंटर या शास्त्रज्ञाने झाडाच्या प्रतिकार शक्तीविषयी सखोल संशोधन करून निष्कर्ष काढला, की प्रत्येक जातीची प्रतिकारशक्ती, किडींना तोंड देण्याची क्षमता वेगळी असते. जनुकीय बदलानुसार ती बदलते. कीड व झाड यांच्यातील संघर्षात यश व अपयश झाडाच्या प्रतिकार शक्तीवर अवलंबून असते. आपण हे लक्षात घेतले तर रोगाचा प्रतिबंध करणे सोपे जाते. माती झाडाचे पोषण करते. ही माती सकस व सजीव असेल तर झाड स्वबळावर स्वसंरक्षण करू शकते. तसेच झाडांमध्ये पोषणद्रव्य शोधण्याचे काम मुळे करतात. भरपूर पांढरी मुळे झाडाच्या उत्तम आरोग्याचे रक्षण करतात. त्यासाठी माती घट्ट होऊ न देणे, पाण्याचा निचरा  होतोय ना हे बघणे, मातीत सेंद्रिय मालाची भर घालणे या गोष्टींकडे लक्ष दिल्यास झाडाचे आरोग्य चांगले राहते. बागेत रोपांची विविधता जपावी. लसूण, पुदिना, झेंडू व मोहरी बागेत नेहमी असावी. त्यामुळे कीड कमी येते. 

झाडे सशक्त व टवटवीत राहण्याची, भरभरून फुलण्याची खूप कारणे आहेत. त्यातले एक म्हणजे झाडांबरोबर संवाद. झाडे व्यक्त होतात; त्यांना काय हवे नको ते खोड, पाने, फुले, फळे सांगत असतात. ते जाणून घ्यावे, कारण संवाद हेच आरोग्याचे मर्म आहे.

संबंधित बातम्या