सहजीवनाची सुरेल मैफल 

प्रिया भिडे
सोमवार, 28 डिसेंबर 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...
प्रिया भिडे

पहाटेच्या वेळी धुक्याचा पट समोर असतानाच कुहू कुहू स्वरांच्या नांदीने पट अलगद बाजूला होतो नि   सूर्याचा तेजस्वी गोल आकाशाच्या रंगमंचावर येतो. गच्चीवरून दिसणारे हे विलोभनीय दृश्य माझ्यासाठी रोज वेगळा आविष्कार घेऊन येते. कोवळी सतेज किरणे झाडांवर विसावतात. ती अंगावर घेत दयाळ पक्षी पारिजातकावर बसून गोड गोड सूर आळवतो. दयाळ खूप धीट असतात. मी मातीत काम करू लागले की बाजूला येऊन किडे, गांडुळे मटकावतात. सूर्य थोडा वर आला की पुन्हा कोकिळेचे सूरगान सुरू होते. कधी कधी जरा जास्तच आक्रमक स्वर असतात. कोकिळेचा डेरा तुतीवर असतो. त्यांचा मुक्काम हलेपर्यंत दुसऱ्या कोणाला त्या येऊ देत नाहीत. बुलबुल, मुनिया, वटवट्या अशा छोट्या पक्ष्यांच्या घरट्यावर यांचा डोळा असतो. त्यांची अंडी पळवणे हे नेहमीचेच. 

सकाळी सव्वा नऊला माझ्याकडे स्वयंचलित तुषार सिंचन सुरू झाले की बुलबुल, मैना, सन बर्ड, दयाळ, ॲशी प्रीनिया, व्हाईट आय सगळेजण आधारासाठी लावलेल्या काठ्यांवर बसून तुषार स्नानाचा आनंद घेतात. 

दुपारच्या वेळी गंभीर आवाजात घूम.. घूम असा आवाज करत दोन तीन भारद्वाज गच्चीत फिरत असतात. सगळीकडे फिरून कुठे गोगलगायी, किडे मिळाले की ताव मारायचा आणि सायलीच्या गच्च वेलीत बसून परत घूम घूम रियाज सुरू करायचा ही यांची सवय. एकदा बहरलेला जाईचा वेल सुकला होता, फांद्या इकडे तिकडे वाढल्या होत्या, कापायच्या राहिल्या. एक दिवस त्याच्या टोकाला मादी सन बर्डची लगबग दिसली आणि बघता बघता एक खोपा लटकू लागला. काळ्या तुकतुकीत रंगाचा नर व मादी दोघे जात येत होते. एक दिवस सकाळी त्या खोप्यावर भारद्वाज बसलेला दिसला. तो त्याची चोच खोप्यात घालणार इतक्यात माझी चाहूल लागल्याने तो उडाला. काही क्षणात हे नाट्य घडले. काही दिवसांनी पिल्लाला आई बाबा भरवताना दिसले. मला आनंद झाला. 

घेवड्याचे फूल तुरे, शेवग्याची शुभ्र फुले सन बर्डला खूपच आवडतात. फुलातला मकरंद घेताना त्यांची लगबग उडते. 

सकाळी न्याहारीसाठी पपईच्या झाडावर धनेश हमखास येतो आणि चीकीर्र.. चीकीर्र... अशा स्वरात सगळ्या कुटुंबाला बोलावून घेतो. मग एक दोन पपयांचा फन्ना उडतो. त्यांनी खाऊन खाली पडलेल्या पपई  फुलपाखरे, बुलबुल चाखून बघतात.

धनेशासारखाच तार स्वर लावणारा खंड्या सकाळी कमळाच्या तळ्यात झपकन सूर मारतो, जरा पंख फडफडवतो, रंगून वेलावर बसून पंख साफ करतो आणि परत तीव्र स्वरात गायन सुरू करतो. कधी कधी दहा पंधरा मिनिटे रियाज सुरू राहतो.

पोपट, मैना, होले यांची रंगमंचावर जा-ये सुरूच असते. आमची बाग, म्हणजे या सगळ्यांची बाग, आम्ही यातले एक पात्र.

छोटे टीट पक्षी, मुनियापार्श्व यांची नाजूक चिवचिव, तांबटची पुक पुक असे पार्श्वसंगीत सुरू असते. कधी कधी दुपारी अचानक खूप जण कलकलाट करतात. अशावेळी बहुतेक शिक्रा येऊन शांतपणे विसावलेला असतो. एकदा संध्याकाळी सुनील झाडाला पाणी घालत असताना झपकन शिक्रा आला आणि क्षणात आमच्या समोर बसलेल्या ॲशी प्रीनियाला पळवले. जिवो जीवस्य जीवनम् याचा प्रत्यय आला.

सकाळी अन दुपारी एका ठेक्यावर चक चक चक ओरडत राहाणाऱ्या खारी महाउपद्व्यापी. डाळिंब, सीताफळ, टोमॅटो, अंजीर, आलेले प्रत्येक फळ जणू आमच्यासाठी, अशी त्यांची भावना असते. बर एक फळ पूर्ण खातील तर ते नाही, सगळ्या फळांची चव घेऊन बघायची. आधारासाठी बांधलेल्या सुतळ्या पळवून घर बांधायचे. मग पिल्ले गच्चीवर हुंदडत राहतात. एकदा एक पिल्लू चुकून पाईपवरून खाली पडले. त्यानंतर पाऊण तास आई त्याला वर चढायला शिकवत होती. पिल्लाबरोबरचे तिचे संवादकौशल्य विलक्षण होते. या खारींचे दिशा, अंतर, उंची, खोलीचे ज्ञान व उड्या मारण्याचे कौशल्य पाहून थक्कच व्हायला होते. 

संवाद कौशल्यात माहीर असलेल्या मधमाश्या आपण गच्चीत फिरताना समूहगान करत फुलाफुलावर  विहरत असतात. आपण कुठून मकरंद आणला त्या फुलाची जागा त्या इंग्रजी आठ आकारात नाच करून सहकारी माशीला सांगतात. मोहरीचे फूल तुरे यांना खूप आवडतात. 

फुलोरी मधमाशी मवाळ असते, पण लाल आग्या माश्‍या चिडक्या असतात. एकदा जास्वंदीच्या झाडाच्या आधाराने थंबरजिया व मायाळूने छत्री केली. त्याखाली फुलोरी माशांनी पोळे केले. गुण.. गुण... करत हजारो माश्या गोलाकार फिरत हळूहळू पोळे करतात. हे दृश्य बघण्यासारखे असते. सकाळी, संध्याकाळी जलाशयावर किंवा पाणी वाहून जाण्यासाठी टाकलेल्या खडीवर या पाणी प्यायला येतात. आजकाल त्यांना रसायन विरहित, प्रदूषण विरहित पाणी मिळत नसावे असे वाटते. या माश्या स्थलांतर करताना पण गुणगुण करत एकत्र जातात. आग्या माशांनी सध्या प्लम्बिंगच्या उरलेल्या पाईपमध्ये संसार थाटला आहे. तो पटकन लक्षातही येत नाही. एकदा आवरा आवरी करताना त्यांनी मला चांगलाच प्रसाद दिला. आता त्यांच्या घराशेजारी पाटी लावली आहे, सावधान इथे मधमाश्या राहतात! आपण त्यांच्या पासून लांब राहिलो, तर त्या शेजार धर्म पाळतात व परागीभवनास मदत करतात. याशिवाय अनेक छोट्या गुणगुण करणाऱ्या  काळ्या, हिरव्या पंखाच्या माश्या, ढाल कीटक येत जात आपली भूमिका निभावत असतात. ढाल कीटक मावा व इतर किडी खातात, त्यामुळे ते आपले मित्रच असतात. रताळ्यावर सोनेरी रंगाचा कासवाचा आकाराचा सुंदर ढाल किडा हमखास आढळतो.   

काळेभोर मोठ्ठे भुंगे गुणगुणत आले की आपलीच त्रेधा उडते. काही भुग्यांच्या पोटावर गडद पिवळा पट्टा असतो. सकाळी पाणलिली व कमळाभोवती हे जणू तराणे गात असतात. काही भुंगे आधार बांबूला धरून टर्र टर्र आवाज करत सुंदर गोल भोक पडून घर करतात. आपण ड्रिल मशीनची प्रेरणा यांच्या कडूनच घेतली असावी.

बागेत याशिवाय लाखो जीव मातीत असतात, निरव जीवन जगतात. बुरशी, गांडुळे, किडे, कीटक मोजदाद शक्य नाही. असे हे बागेत राहणारे, येणारे पाहुणे कलाकार सूर्य कलला की शांत होतात.

सध्या संध्याकाळी सातला एक ॲशी प्रीनिया जेवायच्या खोलीजवळ थंबरजियाच्या वेलावर झोपायला येतो. वाराही त्याला हलकेच हिंदोळ्यावर झुलवतो, कधी पावसातही भिजत झोपलेला असतो. रात्रीचे विश्व वेगळेच. चंद्र प्रकाशात झाडांच्या एकमेकात गुंतलेल्या सावल्या, क्वचित शृंगी घुबडाचे दर्शन आणि साथीला रातकिड्यांची रानगीते. दिवस संपलेला असतो, शांत मनाने चंद्ररस अंगावर घेत या गीतांचा आनंद घ्यायचा. दुसऱ्या दिवशी पुन्हा सूर्य उगवणारच आणि हे निसर्ग चक्र ऋतू मागून ऋतू सुरूच राहणार; ही न संपणारी सुरेल मैफील आहे. 

गच्चीवरच्या या बागेत माती न वापरता केवळ पालापाचोळ्यावर ताटवे बहरले, फळे लगडली, कारण निसर्गाचे चक्र सांभाळले. पाण्याचा पुनर्वापर, स्वयंचलित ठिबक सिंचन, एक ना दोन खूप प्रयोग केले.  निसर्ग शिकवत गेला. कोणत्याही क्षेत्रात वेगळी वाट निवडली की यशासाठी सगळ्यांना श्रम करावे लागतात, ते केले. आमच्या वेगळ्या प्रयोगाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. श्रमाचे फळ मिळाले, म्हणून हे अनुभव तुम्हाला सांगितले. तुम्ही अशी बाग करत असाल तर अनुभव वाटा, करत नसाल तर कोणाचे तरी बोट धरून या वाटेवर या.

कवी अनिल ‘दोन वाटा’ कवितेत म्हणतात,          

वाट चुकार वासरा शिवाय फिरकलेले कोणी नसते

अशा जागी गेली वाट, सरत सरत आली असते

तिथे पुन्हा दोन वाटा फुटलेल्याच्या खुणा दिसतात

एक जरा सरावलेली दुसरी वरती ठसे नसतात

तिने चाहूल नाही म्हणून पाऊल-पाऊल ओढून नेले 

सोडून दिल्या वाटेकडे फिरून फिरून पाहू दिले 

किती वेळ दिसत होती धरली नाही तीच वाट

तिची वळणे, हेलकावे, तिचे उतार, तिचे घाट

तिनेच गेलो असतो तर? ही कदाचित मिटली असती

तसे व्हावयाचे नव्हते! हीच माझी वाट होती 

निसर्गाच्या भव्य रंगमंचावर या अनवट वाटेवरच तर तुमच्याशी भेट झाली. तुम्हाला नवीन वर्षाच्या नव्या प्रयोगांसाठी शुभेच्छा.

(समाप्त)

संबंधित बातम्या