नव चैतन्याचा उत्सव...

डॉ. नयना कासखेडीकर
सोमवार, 4 एप्रिल 2022

गुढी पाडवा विशेष

चैत्र शुद्ध प्रतिपदा! म्हणजे वर्षारंभाचा दिवस. याच दिवशी सृष्टीच्या निर्मात्याने, ब्रह्मदेवाने युगारंभ केला, कृतज्ञता म्हणून ‘गुढी’ अर्थात ‘ब्रह्मध्वज’ पूजन करण्याची पद्धत आहे. हा वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवससुद्धा. आपल्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो.

ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद।
प्राप्तेऽस्मिन्‌ वत्सरे नित्यं मग्द्ऋहे मंगलं कुरु।।

गुढी पाडवा हा ऋतुंवरून प्रचारात आलेला सण आहे. त्याच बरोबर त्याला धार्मिक अधिष्ठान आहे आणि एक पर्यावरणाचा संदर्भसुद्धा आहे. चैत्रापासून पुढील चार महिने सर्व प्राणिमात्रांसाठी जलदान करावे, पाणपोई बांधावी किंवा रोज एकाच्या घरी माठ भरून पाणी नेऊन द्यावे.  इथे धार्मिक दृष्ट्या दान म्हटले असले तरी दान म्हणजे समोरच्याला मदत किंवा त्याची सोय करणे असा आहे. इथे पर्यावरणवादी दृष्टिकोन दिसतो. हे चार महिने उन्हाळ्याचे असतात. मनुष्याला उन्हाचा त्रास होतो, तसा प्राणी आणि पक्ष्यांनाही होतो; झाडांना पण होतो. एरवीही आपण आपल्याकडे भर उन्हात कोणीही घरी आल्यानंतर त्याला प्रथम पाणी देण्याची पद्धत आहे. उन्हाळा असेल तर द्यायलाच हवे. हाच धर्म आहे म्हणजे कर्तव्य आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला मत्स्य जयंती असते, असेही मानले जाते.

नवनिर्मितीचा आरंभ

पाडवा म्हणजे नव निर्मितीचा आरंभ होण्याचा दिवस असतो. पाडव्याला वर्षारंभीच सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपली कर्तव्ये करण्यास सुरुवात करायची असते. यात अनेक गोष्टी येतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेताची मशागत करून ठेवणे, यंदा कदाचित पाऊस कमी झालाच तर त्याची सोय म्हणून विहिरी, पाट, तलाव यांची नीट सोय करून ठेवणे, दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन धान्य, चारा यांची साठवण करून ठेवणे. बी बियाणे आणून ठेवणे अशी कामे पावसाळ्यापूर्वी संपवायची असतात. तर नव्या गोष्टींचा आरंभ या दिवशी करतात. वसंत हा सर्वश्रेष्ठ ऋतू म्हणजेच ऋतूंचा राजा समजला जातो. जल, वायु, धरती, आकाश आणि अग्नी या पाच तत्त्वांचं मोहक रूप या काळात अनुभवता येतं. शरदानंतरच्या हेमंत आणि शिशिर ऋतूत लोप पावलेलं निसर्गाचं सौंदर्य वसंतात पुन्हा प्राप्त होतं. चैत्र प्रतिपदेला, वसंताचं आगमन होणाऱ्या काळात शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाला महत्त्व असतं. आरोग्यास हितवर्धक,पचन क्रिया सुधारणारा, पित्तनाशक, त्वचा रोग बरा करणारा, शिवाय धान्यातील किडीचा नायनाट करणारा कडुनिंब आयुर्वेद दृष्ट्या महत्त्वाचा आहे. म्हणून त्या दिवशी कडुनिंबाची पाने खायची प्रथा आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याची ही प्रथा उपयोगीच आहे. वसंताचा उत्सव आशावादाचे प्रतीक आहे.

शकाची निर्मिती
शालिवाहनाने परकीय आक्रमकांचा पराभव करून विजय मिळविला तो याच दिवशी. तिथूनच शालिवाहन शक सुरू झाले आणि हा दिवस विजयोत्सव म्हणून लोक साजरा करू लागले. लंकापती रावणाच्या वधानंतर प्रभू श्रीराम अयोध्येला चौदा वर्षांनी परत आले तो विजय साजरा करण्यासाठी अयोध्यावासीयांनी घरोघरी ब्रह्मध्वज, गुढ्या तोरणे उभी करून आनंदोत्सव साजरा केला, असा उल्लेख रामायणात आहे. कवी योगेश्वर अभ्यंकर यांचं भावगीत तुम्हाला स्मरत असेल. श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्या कशी सजली होती, लोकांना किती आनंद  झाला होता याचं हे वर्णन खूप बोलकं आहे.     
विजयपताका श्रीरामाची, झळकते अंबरी,

प्रभू आले मंदिरी.
गुलाल उधळून नगर रंगले, भक्त गणांचे थवे नाचले,
राम भक्तीचा गंध दरवळे,
गुढ्या तोरणे घरोघरी...

ही गुढी, ब्रह्मध्वज आनंदोत्सवाची द्योतक आहे. आपल्या संत साहित्यातही या प्राचीन परंपरेचे उल्लेख आहेत. म्हाइंभट्ट यांच्या लीळाचरित्र ग्रंथापासून, संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा तसेच संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखा मेळा, संत एकनाथ यांच्या रचनांमध्ये गुढीचे उल्लेख आहेत.

उत्सवाची परंपरा...
विविध परंपरांनी उत्सवी काठी किंवा गुढी यांचे पूजन सांगितले आहे. उत्सवी काठीचा उल्लेख एक प्राचीनतम पूजा म्हणून इतिहासात आढळतो. आपल्याप्रमाणेच इतर देशांतही काठीपूजा करण्याची परंपरा आहे. दक्षिण आफ्रिकेत दामारा जमातीमध्ये, सायबेरियातील सामोयीड्समध्ये, इस्राईलमध्ये, युरोपमध्ये ख्रिश्चन पूर्व काळात मेपॉल काठी उत्सव, पॅसिफिक क्षेत्रात कुक बेटावर आदिवासींचा काठी पूजा उत्सव, तसेच ग्रीस, व्हिएतनाम, कोरिया, म्यानमार या देशांतही काठी उत्सवांची परंपरा आहे. बलुचिस्तानातील हिंदू समाजानेही काठी पूजेची परंपरा जपली आहे. 

भारतीय उपखंडात या काठी पूजेला निरनिराळी नावे आहेत. नेपाळमध्ये ‘काठी उत्सव’, आसाममध्ये ‘बास पूजा’, मणिपूर, त्रिपुरामध्ये ‘काठी पूजा’, राजस्थान, मध्यप्रदेशमध्येही काठी पूजनाची परंपरा आहे, तर ओरिसामध्ये आदिवासींची ‘खंबेश्वरी’ देवीची पूजा ही काठी पूजा असते. भारतातल्या विविध प्रांतांमध्ये ह्या नववर्षदिनाची विविध नावे आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात या नववर्ष संवत्सरास ‘उगाडी’ म्हणतात. तमीळमध्ये ‘पुथंडू’ म्हणतात. श्रीलंकेतही हा सण साजरा होतो. काश्मीरमध्ये हा सण ‘नवरेह’ म्हणून साजरा करतात. आसाममध्ये ‘बिहू’, केरळमध्ये ‘विशु’, बंगालमध्ये ‘नोब बोर्ष’ तर पंजाबमध्ये ‘बैसाखी’ म्हणून हा सण साजरा होता. सिंधी बांधव चैत्र महिन्यात भगवान झुलेलाल यांचा जन्मोत्सव ‘चेटीचंड’ साजरा करतात. 

सगळीकडच्या या परंपरा पाहिल्या की लक्षात येतं आपली संस्कृती धर्म, विज्ञान, पर्यावरण, सामाजिक आणि कौटुंबिक सलोखा या धाग्याने बांधली आहे. नव्याचं स्वागत करा. जुने विसरून जा, एकमेकांशी सौहार्दाने वागा ही आणि अशी अनेक आदर्श मूल्ये आणि संस्कार अशा सणांमधून प्रसारित होत असतात.
म्हणून कवयित्री बहिणाबाई म्हणतात, 

गुढीपाडव्याचा सन,
आतां उभारा रे गुढी |
नव्या वरसाचं देनं,
सोडा मनातली आढी | 
आजच्या परिस्थितीत हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. 
म्हणूनच, 
सर्वस्तरतु दुर्गाणि सर्वो भद्राणि पश्यतु।
सर्वः कामानवाप्नोतु सर्वः सर्वत्र नन्दतु।।

संबंधित बातम्या