नवे वर्ष गोड व्हावे

ऋचा मुळे
सोमवार, 4 एप्रिल 2022

गुढी पाडवा विशेष

यंदा कोरोनाला मागे टाकून आपण पुन्हा सणवार साजरे करायला लागलोय. पाडवा घरोघरी आणि मिरवणुकांतूनही छान साजरा होऊ दे, आनंद वाढू दे, नवं वर्ष सुखाचं होऊदे... सर्वांना मनापासून नववर्षच्या शुभेच्छा!

समाधान आरोग्य पूर्णत्वभावे
मनी मानसी अंतरी ते वसावे
भले कार्य हस्ते करावे, घडावे
नवे वर्ष अवघे असे गोड व्हावे

भारतातले बरेचसे सण देशभर साजरे होत असले तरी काही सण खास त्या त्या मातीचे आहेत. तसा गुढी पाडवा खास मराठमोळा सण. नव्या वर्षांचं स्वागत करणारा. आनंदाची गुढी उभारून समृद्धीची प्रार्थना करणारा. 

मला आठवतंय, पाडव्याच्या दिवशी मला बाल्कनीत उभं राहून किंवा गल्लीतून फिरत सगळ्यांच्या गुढ्या बघायला, कुठली जास्त छान दिसते, की आपलीच जास्त छान दिसते ते मनातल्या मनात तुलना करून ठरवायला खूप आवडायचं. घराघराच्या प्रवेशद्वारांवर नाहीतर गॅलऱ्यांतून उभारलेल्या काठ्या, कुठे चांदीचे, कुठे तांब्याचे, कुठे पितळी तर कुठे स्टीलचे वेगवेगळ्या आकारांचे, देखण्या घाटांचे, लख्ख चमकणारे लोटे किंवा गडवे त्यावर उपडे घातलेले, जरीकाठाची झुळझुळीत कापडं किंवा साड्या, कडुनिंबाची डहाळी, गाठींचे हार, फुलांचे हार सगळं मनात साठायचं. वर्णन करून घरी सांगायला मजा यायची. 

घरी आईबाबा मिळून पूजेची तयारी करायचे. वय वाढत गेलं तसं आम्ही दोघी बहिणीही तयारीत सामील व्हायचो. आमची आई अर्धवट डावरी आहे, स्वतः साडी नेसतानासुद्धा ती उलट्या हाताने निऱ्या करते. त्यामुळे गुढीच्या कापडाच्या निऱ्या बरेचदा बाबा करत, आणि मग हळूहळू ते काम आमच्याकडे आलं. बाबा परंपरागत भिक्षुकी करणाऱ्या कुटुंबात वाढलेले. ते साग्रसंगीत पूजा करायचे. आमच्या घरची गुढीची पूजासुद्धा अर्धा-पाऊण तास चालायची. आम्ही बहिणी मोठ्या होत गेलो तसं केव्हा एकदा पूजा पार पडेल म्हणजे बाहेर जाता येईल असं व्हायचं. बाबांशी वादही घालायचो, पण सगळंच मजेत.

कडुनिंबाचा पाला खाणं मला फार आवडायचं. पितळी खलबत्त्यात कडुनिंब, जिरं आणि गूळ कुटायचा, गोळ्या करून ठेवायच्या, आणि सकाळी दात घासल्या घासल्या अनोश्या पोटी त्या खायच्या. साधी बाळबोध प्रथा होती. त्याची कडूगोड चव आणि जिऱ्याचा छान वास आणि स्वाद आम्हाला सगळ्यांनाच मनापासून आवडायचा. कडुनिंबाच्या गोळीसाठी वाकडी झालेली तोंडं मी आमच्या घरात तरी कधीच पाहिली नाहीत. आमच्याकडच्या कडुनिंबाच्या गोळ्या शेजारच्या मुलामुलींनाही आवडायच्या.

लहानपणी परकरपोलकं आवर्जून घालायचो. चापून चोपून वेण्या घालायचो, गजरा नाहीतर फूल माळायचो, गुढीच्या पूजेनंतर पाटीची पूजा करायचो. बाबा तांत्रिक सरस्वती काढण्यात वाकबगार होते. ते सरस्वती काढताना बघत बसायचो. हाताने लिहिताना नेहमी काढतो तसा एकाचा आकडा न काढता छान बाकदार १ असा ते काढायचे. आम्ही बहिणी त्याला कालनिर्णयमधल्यासारखा १ म्हणायचो. पाडव्यानंतर वार्षिक परीक्षाच असायच्या बहुतेक वेळा, त्यामुळे पाटीपूजेच्या वेळी, ‘चांगली बुद्धी दे, मी चांगला अभ्यास करीन, चांगले मार्क पाडीन’ अशा मागण्या आणि आश्वासनांची देवाशी देवाणघेवाण होई.

श्रीखंड पुरणयंत्रातून काढण्याचा एक कार्यक्रम असायचा. कधी बाबांसोबत तर कधी बहिणीसोबत बसून पुरणयंत्र फिरवायचो. आम्ही अशा दोघी पुरणयंत्राशी बसलो की आजी म्हणायची, “आमच्यावेळी आम्ही जात्यावर बसायचो दोघी दोघी जणी, यांना साध्या पुरणयंत्राशीपण सोबत लागते.” नंतर मग जेवताना त्या श्रीखंडाचं कौतुकही करायचं. सगळंच मजेशीर...

त्यातून मी डोंबिवलीकर. गुढी पाडव्याला नववर्षस्वागतयात्रा काढण्याचा पायंडा पाडणारे आम्ही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या घरोघरी घरगुती स्वरूपात साजरा केला जाणारा पाडवा आम्ही   सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला शिकलो आणि जगाला शिकवलं. 

हा पायंडा पडला तेव्हा मी साधारण दहा वर्षांची होते. कोरोनानं धुमाकूळ घालायला सुरुवात करेपर्यंत अव्याहतपणे दर गुढी पाडव्याला ही यात्रा सुरू होती. आपणच आपलं भलं पाहावं म्हणून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या परंपरेत दोन वर्षं खंड पाडून घेतला. आणि दोन वर्षांनंतर आता याही वर्षी ती होणार म्हटल्यावर सर्वांनाच खूप आनंद झाला आहे. आता पुन्हा सुरुवात होत असताना लहानपणीपासूनच्या आठवणी येतायत. 

पहिल्या यात्रेला आजीची नऊवारी साडी, खोपा, नथ वगैरे घालून गुढीची प्रतिकृती हातात घेऊन रस्त्यातून मिरवत गेले होते ते आठवतंय. गुढीवरचा तांब्या, हार वगैरे पडू नये म्हणून बाबांनी त्यांच्या सुपीक डोक्यातल्या कल्पना लढवून, आतल्या बाजूने खळ लावून, घट्ट बांधाबांध केलेली गुढीसुद्धा आठवतेय. ती पुढे बरेच दिवस तशीच ठेवली होती. नंतर मग कधीतरी आमच्या नकळत ती सोडवली असेल आईबाबांनी.

नंतरही दरच वर्षी कधी साडी नेसले, कधी नवे ड्रेस घातले, कधी भावंडांसोबत, कधी शाळा कॉलेजातल्या मित्रमैत्रिणींसोबत वेगवेगळ्या भारतीय वेशभूषेच्या थीम्स ठरवून सहभागी झाले, कधी नाचत मिरवणुकीत सहभागी झाले, कधी ढोल वाजवला, कधी भगवा ध्वज घेऊन नाचले, कधी लेझीम खेळले, आणि कधी कधी तर ‘आरएसपी’च्या गणवेशात मिरवणुकीची गर्दी नियंत्रित करण्यातसुद्धा सहभाग घेतला. लग्नानंतर एका वर्षी नवऱ्याला आवर्जून ही यात्रा अभिमानाने दाखवलीही.  

ध्वज घेऊन नाचणं, ढोल वाजवणं आणि गर्दीचं नियंत्रण करणं हे माझे सगळ्यात लाडके उद्योग होते. गर्दी नियंत्रण करताना खूप विशेष नेतृत्व वगैरे काही नव्हतं कधी माझ्याकडे. साधे शिपाई असायचे, त्यातच एक मी. पण शेवटी गर्दी नियंत्रण करणाऱ्या विद्यार्थी पथकांचा भाषणात कौतुकाने उल्लेख व्हायचा. यात्रेच्या हर्षोल्लासात सामील होण्याऐवजी सामाजिक जबाबदारीचं भान बाळगणारे युवक युवती वगैरे शब्दांनी भरघोस कौतुक व्हायचं. कोण अभिमान वाटायचा तेव्हा. आपण कोणीतरी आहोत, कोणीतरी चांगले आहोत, असं मनापासून वाटायचं. आता विचार करताना वाटतं माणूस म्हणून जडणघडणीत या सामाजिक प्रसंगांचा खूप मोठा वाटा आहे. 

पुढे भारतीय संस्कृतीचा इतिहास शिकताना कळलं की ‘व्रतशिरोमणि’ या ग्रंथात गुढी उभारण्याचा विधी दिला आहे, त्याचसोबत गुढीची प्रथा कशी सुरू झाली याची एक कहाणीही आहे. ती महाभारतातली कथा म्हणून सांगितली आहे. चेदि राजाला इंद्राने प्रजेच्या संरक्षणासाठी आणि अनुशासनासाठी एक काठी दिली. राजाने तिची आधी पूजा केली, त्या पूजेत प्रथेप्रमाणे काठीला वस्त्र, पात्र, पुष्पहार अर्पण केले, आणि ती काठी राजाच्या सुशासनाचं प्रतीक झाली. तिला ब्रह्मध्वज, ब्रह्मध्वजा, इंद्रध्वजा आणि ध्वजा अशी नावं संस्कृतात दिसतात. हळूहळू एका राजाने दुसऱ्या राज्यावर विजय मिळवला की तिथे विजयाचं प्रतीक म्हणून स्वतःची ध्वजा उभारायला सुरुवात केली. त्यामुळे हे विजयोत्सवाचं, आनंदोत्सवाचं प्रतीक म्हणून भारतात सर्वत्रच मानलं जाऊ लागलं. नवीन वर्षाच्या सुरुवातीचा किंवा कोणताही विशिष्ट दिवस गुढी उभारण्यासाठी ठरलेला नव्हता. 

मात्र महाराष्ट्राच्या प्रांतावर राज्य करणाऱ्या सातवाहन राजांनी शकांचा पराभव केला तेव्हा नवी कालगणना सुरू केली. आपण त्याला शालिवाहन शक या नावाने ओळखतो. ते नवं वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होतं, आणि म्हणून शकांवरील विजयाच्या स्मृतीच्या निमित्ताने मराठी मनांत विजयाची इच्छा आणि आशा जागती ठेवण्याच्या हेतूने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी गुढी उभारण्याची परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली. 

गुढी हा शब्दही खास मराठी आहे. तो संस्कृतच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या दक्षिण सीमा भागातील द्राविडी भाषांच्या प्रभावाने रूढ झाला आहे. कानडी, तुळू, तेलगू यासारख्या भाषांत ‘गुडारऊ’, ‘गुडारि’ असे शब्द आहेत, त्यांचा अर्थ सौंदर्यपूर्ण गोलाकार असा होतो. महानुभाव पंथाच्या अकराव्या शतकातल्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथात ‘गुढारुल’, ‘गुढारिले’, ‘गुढारू’ असे शब्द दिसतात. ‘सजवले’, ‘सुंदर’, ‘डेरेदार’, ‘सुंदर गोलाकार’ असा त्यांचा अर्थ होतो. त्यावरून गुढी शब्द आला. गुढीच्या सुशोभित रचनेशी त्याचा अर्थ मिळताजुळता आहे हे आपल्याला सहजच दिसतं.

हे सगळं शिकवणाऱ्या आमच्या शिक्षकांनी दिलेल्या ह्या जाणिवा. आज गुढी पाडव्याच्यानिमित्तानं ह्याही आठवणी जाग्या झाल्या.

यंदा कोरोनाला मागे टाकून आपण पुन्हा सणवार साजरे करायला लागलोय. पाडवा घरोघरी आणि मिरवणुकांतूनही छान साजरा होऊ दे, आनंद वाढू दे, नवं वर्ष सुखाचं होऊदे...

समाधान आरोग्य पूर्णत्वभावे।
मनी मानसी अंतरी ते वसावे।।
भले कार्य हस्ते करावे, घडावे।
नवे वर्ष अवघे असे गोड व्हावे।।

सर्वांना मनापासून नववर्षाच्या शुभेच्छा!

संबंधित बातम्या