अखेर कोरोना लस दृष्टिपथात 

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

कव्हरस्टोरी

या वर्षीच्या पहिल्या दिवसापासून जगभरात कोरोना विषाणूने आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. मार्च महिन्याच्या ११ तारखेला जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूचा फैलाव ही एक जागतिक महासाथ (पॅनडेमिक) आहे असे जाहीर केले. त्यानंतर हा आजार बरा करणारे कोणतेही औषध नाही आणि त्याला रोखण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही, हे ज्ञानसुद्धा सर्व जगाला झाले. पण सूक्ष्म जीवशास्त्रातील जगातील अगणित संशोधक, असंख्य वैद्यकीय संस्था तसेच बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या अनेक नामांकित औषध कंपन्या यांनी या लसीच्या संशोधनाच्या कार्याचा श्री गणेशा केला.. त्यानंतर सुरू झाली लस शोधून काढण्याच्या स्वप्नाची पूर्तता करणाऱ्या एक अहोरात्र परिश्रमाची निरंतर गाथा..

आज अखेरीस म्हणजे कोरोना विषाणूच्या उदयानंतर अवघ्या सहा-सात महिन्यांत, कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखणाऱ्या, त्या विषाणूविरोधी प्रतिकारप्रणाली मानवी शरीरात निर्माण करण्याचे साध्य सिद्ध करणाऱ्या तब्बल २१८ लसी संशोधनाच्या विविध टप्प्यांवर येऊन पोचल्या आहेत. 

जगातील जवळजवळ दोनशे देशांतील नागरिकांना बाधित करणाऱ्या लसीच्या निर्मितीला पाहता पाहता एका स्पर्धेचे स्वरूप आले. या स्पर्धेला राजकीय रंगदेखील लाभत गेले. कोरोनाच्या विळख्यामुळे आलेल्या आर्थिक मरगळीला नवचैतन्य देणारी व्यापारी घटना असाही एक दृष्टिकोन लसीच्या निर्मितीबाबत निर्माण झाला. 

लसीच्या संशोधनामधील टप्पे
लस म्हणजे मानवी शरीरात दिले जाणारे एक जैवरासायनिक औषध असते. त्यामुळे त्याचे संशोधन करताना विषाणू किंवा जीवाणूंना नष्ट करण्याच्या लसीच्या क्षमतेप्रमाणे त्यापासून होणाऱ्या संभाव्य परिणामांची शक्यतासुद्धा काटेकोरपणे पडताळून पाहावी लागते. त्यामुळे या संशोधनांचे दोन मुख्य भाग असतात. पहिला भाग प्रयोगशाळेतील चाचण्या म्हणजे क्लिनिकल ट्रायल्स आणि त्या यशस्वीपणे पार पडल्यावर होणाऱ्या मानवी चाचण्या म्हणजेच ह्युमन ट्रायल्स, हा दुसरा भाग.

प्रयोगशाळेतील चाचण्या - कोणतेही नवे औषध विकसित करताना जे टप्पे पार पाडणे आवश्यक असतात, तेच लस विकसित करतानाही वापरले जातात.  

चाचण्यांसाठी मान्यता अर्ज - लस निर्मितीची प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रणाची पद्धत, लसीची सुरक्षितता, प्राणी तपासणीमध्ये ‘संरक्षणात्मक प्रतिरक्षा प्रतिसाद’ (इम्युनोजेनिसिटी) तपासण्याची क्षमता; तसेच मानवी चाचणीचा प्रस्तावित क्लिनिकल प्रोटोकॉल याविषयी माहिती समाविष्ट असलेला एक अर्ज त्या देशाच्या संशोधनांना मान्यता देणाऱ्या केंद्रीय संस्थेकडे किंवा अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवावा लागतो. याला इन्व्हेस्टिगेशनल न्यू ड्रग (आयएनडी) अॅप्लिकेशन म्हणतात.

 1. पहिला टप्पा - वरील अर्जाला मान्यता दिल्यावर त्या लसीचा परिणाम प्रयोगशाळेत वाढवलेल्या विषाणूंवर आणि जिवाणूंवर बाह्य पद्धतींनी (इनव्हिट्रो) तपासला जातो.
 2. दुसरा टप्पा - इनव्हिट्रो प्रयोगातील परिणाम सकारात्मक आल्यावर त्या लसीचा वापर उंदीर, ससा, गिनीपिग अशा प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांवर केला जातो. त्यामध्ये त्या प्राण्यांच्या शरीरात प्रतिपिंडे (अॅण्टिबॉडीज) कितपत तयार होतात हे तपासले जाते.
 3. तिसरा टप्पा - त्यानंतरच्या टप्प्यात माकडासारख्या थोड्या विकसित प्राण्यावर लसीची चाचणी घेतली जाते. त्यामध्ये प्रतिपिंडे कितपत होतात हेसुद्धा पाहिले जाते.

या तिन्ही टप्प्यातील चाचण्यांचे निकाल केंद्रीय समितीला सादर केल्यानंतर आणि ते यशस्वी झाल्याची मान्यता मिळाल्यानंतर पुढच्या भागाला म्हणजे मानवी चाचण्यांना सुरुवात करण्याची परवानगी मिळते.

मानवी चाचण्या - यामध्ये साधारणतः कोणताही गंभीर आजार नसलेल्या, सर्व वयाच्या निरोगी स्त्री-पुरुषांना ही लस दिली जाते. या चाचण्यांमध्ये लसीचा डोस, ती किती काळानंतर परत घ्यायची, लसीमुळे किती प्रमाणात प्रतिपिंडे निर्माण होतात, लस दिल्यावर त्या व्यक्तीबाबत ती कितपत परिणामकारक आहे आणि त्या लसीपासून काही दुष्परिणाम दिसून येतात का, हे काटेकोरपणे पाहिले जाते. काही दुष्परिणाम लस घेतल्यावर लगेच होतात तर काही कालांतराने दिसून येतात. 

या दुष्परिणामांमध्ये ताप येणे, उलट्या होणे, आजाराची सौम्य लक्षणे दिसून येणे, अंगावर पुरळ येणे, श्वास घायला त्रास होणे असे त्रास दिसून येतात. काही वेळा हृदय, मूत्रपिंडे, यकृत यावर परिणाम झाल्याचे कालांतराने आढळून येते. 

हे दुष्परिणाम लस दिलेल्या व्यक्तींपैकी किती टक्के व्यक्तींमध्ये आढळून येते हे जोखले जाते.
मानवी चाचण्यांचे तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात साधारणतः १० ते ४०० रुग्णांवर, दुसऱ्या टप्प्यात ३०० ते १५०० रुग्णांवर प्रयोग केले जातात आणि तिसऱ्या टप्प्यात १००० ते काही लाख रुग्णांवर या लसीची चाचणी केली जाते. 

या चाचण्या चालू असताना प्रत्येक टप्प्यावरचे निकाल केंद्रीय समितीला पाठवावे लागतात. यात भाग घेणाऱ्या स्वयंसेवकांची ओळख मुळीच जाहीर करायची नसते. 

सध्या चर्चेत असलेल्या लसी
जगभरातील जवळपास २०० देशांमध्ये फैलावलेल्या कोरोनाच्या संसर्गाने लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याचवेळी कोरोनाच्या संसर्गाला रोखणाऱ्या लसीच्या निर्मितीसाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. शास्त्रज्ञांच्या या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे आशादायक चित्र आहे. कोरोनाचा प्रतिबंध करणाऱ्या अनेक लसींच्या चाचण्या जगभरात मोठ्या धूमधामीत होत आहेत. कोरोनाच्या साथीबाबत ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे. यातील काही लसी तर अगदी निर्णायक टप्प्यावर आहेत.

कोरोनाच्या संसर्गाला मात देण्यासाठी अटकाव करण्यासाठी विविध देशांतील शंभराहून अधिक कंपन्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. बऱ्याच कंपन्यांनी आपली लस प्रभावी ठरत असल्याचा दावा केला असून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीकडे त्यांनी वाटचाल केली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने २२ जून रोजी कोरोनाच्या लसीबाबत एक निवेदन जाहीर केले. त्यात SARS-COV-2 विषाणूमुळे होणाऱ्या कोरोनाच्या आजारावर मात करण्यासाठी तेरा लशी ‘क्लिनिकल इव्हॅल्यूएशन’च्या टप्प्यात आहेत असे नमूद केले. ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या लसीची चाचणी सुरू होणार आहे. त्याशिवाय १२९ लसी या प्री-क्लिनिकल इव्हॅल्यूएशनच्या पातळीवर आहेत. सध्या १३ लशींवर क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यावर आहेत.

निर्णायक टप्प्यावरील लसी 

 • - जगभरातल्या लशींमध्ये सध्या एकुणापैकी १३ लशी चाचण्यांच्या निर्णायक टप्प्यावर आहेत.
 • - यामध्ये मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात खालील लसी आहेत -  
 • • ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्रा झेनिका कंपनीची लस. 
 • • चीनमधील बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि कॅनसिनो बायोलॉजिकल इनकॉर्पोरेशन. 
 • • अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अॅण्ड इन्फेक्शियस डिसिसेस आणि मॉडर्ना कंपनी. 
 • • चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स आणि सायनोफार्मा.  
 • • बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स आणि सायनोफार्मा. 
 • • चीनमधील सायनोव्हॅक (दुसरा टप्पा). 
 • • बायोएनटेक,फ्युजन फार्मा, फिझर प्लॅटफॉर्म आरएनए. 
 • तर खालील लशी मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आहेत -  
 • • भारतातील आयसीएमआर आणि एनआयव्ही या संस्थांनी विकसित केलेली आणि भारत बायोटेक या लस निर्मितीमध्ये अग्रगण्य असलेल्या भारतीय कंपनीची कोव्हॅक्सिन लस. 
 • • झायडस कॅडिला या अहमदाबादच्या कंपनीनेदेखील झायकॉव्ह-डी या लसीच्या मानवी चाचण्यांच्या पहिल्या टप्प्याचा श्रीगणेशा केला आहे. 
 • • नोवावॅक्स. 
 • • चायनीज अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स.  
 • • इनोव्हिओ फार्मास्युटिकल्स. 
 • • जेमलेया रिसर्च इन्स्टिट्यूट.  
 • • इम्पिरियल कॉलेज, लंडन.
 • • क्युअरव्हॅक.  

ऑक्सफर्डची चाचणी अंतिम टप्पात
ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्रा झेनिका यांची कोरोना प्रतिबंधक लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोचली आहे. अंतिम टप्प्यात आलेली जगातील ही पहिली लस आहे. ChAdOx1 nCov-19,  ही लस आता एकूण १० हजार २०६ स्वयंसेवकांना देण्यात येणार आहे. या लसीची चाचणी ब्रिटनबरोबरच दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये होते आहे. त्याशिवाय ब्रिटनसह चार देशांमध्ये लसीचे उत्पादन सुरू झाले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट या लस उत्पादक कंपनीतर्फे ही लस बनवण्यात येत आहे. ही लस ChAdOx1 या विषाणूपासून विकसित झाली आहे. हा विषाणू सामान्यपणे येणाऱ्या सर्दीच्या विषाणूचा एक उपप्रकार आहे. त्यामध्ये जनुकीय बदल केल्यामुळे माणसांवर त्याचा दुष्परिणाम होत नाही.

या लसीच्या चाचणीत लस घेणाऱ्या व्यक्तीला दुहेरी संरक्षण मिळते. त्यामध्ये प्रतिपिंडे तर तयार होतातच, पण शरीरातील प्रतिकार शक्तीप्रणालीमध्ये मुख्य कार्य असणाऱ्या ‘टी’ लिम्फोसाईट्सच्या संख्येत आणि क्षमतेत या लसीमुळे वाढ होते. टी लिम्फोसाईट्स वाढत असल्याने या लसीमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दीर्घकाळ संरक्षण मिळेल असे प्रतिपादन केले गेले आहे. 

चिनी लस दुसऱ्या टप्प्यात
बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि कॅनसिनो बायोलॉजिकल इनकॉर्पोरेशन यांनी संयुक्तरीत्या विकसित करत असलेल्या लसी मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात आहेत. ही लस ‘नॉन-रेप्लिकेटींग व्हायरल व्हेक्टर प्लॅटफॉर्म’वर काम करते. त्याशिवाय आणखी एक चिनी बनावटीची लस निर्णायक टप्प्यावर असल्याची माहिती चीन सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. सप्टेंबरपर्यंत ही लस उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. चीनमधील लसीच्या मानवी चाचण्या बांगलादेश, ब्राझील आणि अबुधाबी येथे केल्या जात आहेत. या देशांना त्या लवकर देण्यात येतील. 

मॉडर्ना कंपनीची अमेरिकन लस
अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीने आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अॅण्ड इन्फेक्शस डिसिजेस यांनी एकत्रितपणे विकसित केलेल्या या लसीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात आहे. या लसीच्या चाचणीत उत्तम संख्येने अॅण्टीबॉडीज तयार होत असल्याचा अहवाल मिळाला आहे. ही लस कोरोनाच्या विषाणूला निष्क्रिय करते, असा या लसीच्या उत्पादकांचा दावा आहे. या लसीच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात mRNA-1273 नावाची ही लस कोरोनावर उत्तमप्रकारे प्रभावी ठरते आहे, असे जाहीर करण्यात आले आहे.

वुहानमधील लस 
चीनच्या ज्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता त्याच वुहानमध्ये ही कोरोनाचा प्रतिबंध करणाऱ्या लशीची चाचणी सुरू आहे. या लसी पहिल्या, दुसऱ्या टप्प्यात आहेत. या लसींच्या विकासात बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स, सायनोफार्म, सायनोवॅक, बायोएनटेक, फ्युजन फार्मा, नोवावॅक्स अशा कंपन्या सक्रीय आहेत. 

भारतीय लसीच्या चाचण्या 
संपूर्ण स्वदेशी स्वरूप असलेली ‘कोव्हॅक्सिन’ ही भारतीय लस हैदराबादमधील भारत बायोटेक या कंपनीकडून तयार केली जात आहे. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) यांनी ही लस भारतीय रुग्णांच्या नमुन्यातून विकसित केली आहे. नुकतीच केंद्रीय औषध नियंत्रण विभागाकडून (डीसीजीआय) मानवी चाचण्यांसाठी परवानगी मिळाली.

पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर या लसीची परीक्षा केली जाणार आहे. यामध्ये नव्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात १०० स्वयंसेवकांवर याची चाचणी होईल. एम्सच्या एथिक्स कमिटीकडून या चाचणीला मंजुरी मिळाल्यानंतर स्वयंसेवक होण्यासाठी आवाहन करण्यात आले आणि काही तासातच एक हजारापेक्षा जास्त जणांनी स्वयंसेवक होण्यासाठी संपर्क साधला. 

या पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी वय वर्षे १८ ते ५५ या वयोगटातील निरोगी आणि सदृढ व्यक्तींची निवड केली जाणार असून यामध्ये गर्भवती नसणाऱ्या पाच महिलांचाही समावेश असणार आहे. २४ जुलैपासून या चाचण्यांना सुरुवात झाली आहे. 

शुक्रवार, ता. २४ जुलै रोजी एका ३० वर्षीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस दिला गेला. यानंतर या स्वयंसेवकाला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले गेले. त्यानंतर त्याला कसलाही त्रास जाणवला नाही, म्हणून घरी सोडण्यात आले. यानंतर पुढील सात दिवस त्याच्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवले जाईल. भारतातील कोव्हॅक्सिन लसीचा हा पहिलाच डोस होता. डोस देण्याआधी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग तपासण्यांमधून या ३० वर्षीय व्यक्तीला पात्र ठरवण्यात आले. अशा चाचण्यांमध्ये सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांची नावे संशोधनामधील नैतिक करारानुसार गुप्त ठेवली जातात. त्यामुळे या पहिल्या भारतीय स्वयंसेवकाचे नाव जाहीर केले गेले नाही. 

चाचणीसाठी तयार झालेल्या एकून ३७५ उमेदवारांना ‘आयसीएमआर’ने देशभरात विविध ठिकाणी निवडलेल्या १२ वैद्यकीय रुग्णालयामध्ये लसी दिल्या जाणार आहेत. या ठिकाणांमध्ये दिल्लीतील एम्स, पाटणा येथील एम्स, गोव्यातील रेडकर हॉस्पिटल, ओडिशामधील भुवनेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस तसेच सम हॉस्पिटल यांचा समावेश आहे. याशिवाय किंग जॉर्ज हॉस्पिटल - विशाखापट्टणम, बी. डी. शर्मा पीजीआयएमएस, युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस - रोहतक, जीवनरेखा हॉस्पिटल - बेळगाव,  गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल - नागपूर, राणा हॉस्पिटल - गोरखपूर, एसआरए मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर - चेंगालपट्टू तमिळनाडू, निजाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस - हैदराबाद, डॉ. गंगाधर साहू - भुवनेश्वर ओडिशा, प्रखर हॉस्पिटल कानपूर यांचा समावेश आहे.

चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ७५० जणांवर लसीची परीक्षा केली जाणार आहे. पहिल्या डोसनंतर १४ दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे. लसीच्या परिणामांबाबत निश्चित केलेला कालावधी संपल्यानंतर ज्यांच्यावर चाचणी केली गेली त्या स्वयंसेवकांची कसोशीने तपासणी करून त्यांच्या रक्तात तयार होणाऱ्या अॅण्टिबॉडीज तपासल्या जातील. या दरम्यान त्यांना जाणवणारे सौम्य, मध्यम आणि तीव्र अशा दुष्परिणामांची नोंदही केली जाणार आहे. 
    
यानंतर तिसऱ्या टप्प्यात १५०० ते ५००० व्यक्तींवर चाचण्या केल्या जातील. त्यानंतर निर्माण होणारे कोव्हॅक्सिन मानवी वैद्यकीय चाचणीनंतर जानेवारी ते मार्च २०२१ मध्ये सर्व भारतीय जनतेला वापरासाठी उपलब्ध होईल असा कयास आहे.  

इतर लसी - कोरोनावर विकसित होणाऱ्या आणखी काही लसी पहिल्या टप्प्यात आहेत. यामध्ये लंडन येथील इम्पिरियल कॉलेजने विकसित केलेली लस आहे. ही लस आरएनए आधारीत आहे. एमआरएनएवर आधारीत क्युअरव्हॅक ही लसदेखील चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आहे. त्याशिवाय, गेमलेया रिसर्च इन्स्टिट्यूट, इनोविया फार्मास्युटिकल्स आणि चायनीज अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या लशीदेखील मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आहेत. 

लस आणि कोरोनावर मात 
एखादी लस तयार व्हायला १०-१२ वर्षे लागतात. पण कोरोनाचा जागतिक उद्रेक लक्षात घेऊन शास्त्रज्ञ हे काम काही महिन्यांमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत. बहुतांश तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की २०२१ च्या मध्यापर्यंत कोरोना विषाणूवरील लस उपलब्ध होऊ शकेल. म्हणजे कोरोना व्हायरस जेव्हा पहिल्यांदा जगासमोर आला तेव्हापासून दीड वर्षाचा काळ लोटल्यानंतर यावर लस येऊ शकेल. त्यानंतर औषधे प्रमाणित करणाऱ्या संस्थांनी या लसीला त्वरित मान्यता द्यावी लागेल. 

भारताचा विचार केला तर आपल्या देशातील १३० कोटी जनतेसाठी या लसीचे अब्जावधी डोस कसे बनवता येतील याची तजवीज करावी लागेल. तसेच या सर्व कंपन्यांना जगभरातल्या अब्जावधी लोकांपर्यंत ही लस पोचवण्यासाठी पुरवठा यंत्रणा सक्षम करावी लागेल.
    
थोडक्यात लस आली, की लगेच कोरोना आटोक्यात येईल असे नाही. घोडामैदान आता जवळ आले असले तरी दिल्ली तो बहुत दूर है।

संबंधित बातम्या