जुगार ः व्यसन नव्हे, व्याधी! 

डॉ. अविनाश भोंडवे 
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

आरोग्याचा मूलमंत्र
आधुनिक मनोचिकित्सा शास्त्र जुगाराला व्यसन नव्हे, तर एक आजार किंवा मानसिक व्याधी मानते. डायग्नोस्टिक ॲण्ड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स - याच्या चौथ्या आणि पाचव्या आवृत्तीत (डीएसएम-४) जुगार खेळण्याच्या व्यसनाला मानसिक आजार मानले गेले आहे. 
 

अनादी काळापासून जुगार हे एक मानवी व्यसन मानले गेले आहे. द्युतामध्ये आपले राज्य आणि द्रौपदीला पणाला लावणाऱ्या पांडवांपासून क्रिकेटसारख्या खेळांवर पैसे लावणाऱ्या सट्टेबाजांपर्यंत असंख्य प्रकारचा जुगार युगानुयुगे खेळला जात आहे. पाश्‍चात्त्य देशातही जुगाराला राजमान्यता देऊन असंख्य कॅसिनोसारखी ‘द्युतगृहे’ चालवणारी लास वेगससारखी शहरे आहेत. संगणकामुळे वेबसाईटद्वारे जुगार चालवणारी अगणित संकेतस्थळे जगभरात जोमाने फोफावली आहेत. 

आधुनिक मनोचिकित्सा शास्त्र मात्र जुगाराला व्यसन नव्हे, तर एक आजार किंवा मानसिक व्याधी मानते. डायग्नोस्टिक ॲण्ड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स - याच्या चौथ्या आणि पाचव्या आवृत्तीत (डीएसएम-४) जुगार खेळण्याच्या व्यसनाला मानसिक आजार मानले गेले आहे. 

इतर व्यसनांप्रमाणेच यामध्येही त्या व्यक्तीला व्यसनापासून दूर राहिल्यास अनियंत्रित आणि तीव्र लालसा (क्रेविंग) निर्माण होते. मद्यपानाचे व्यसन पूर्ण बरे होण्याची शक्‍यता असते, पण जुगाराच्या व्यसनाबाबत तसे नसते. जुगाराचे व्यसन ही एक मानसिक व्याधी असून ती पूर्णपणे कधीही बरी होऊ शकत नाही, तर ती फक्त ताब्यात आणता येते, असे वैद्यकीयशास्त्र सांगते.

व्याख्या - पूर्ण शुद्धीत असताना, हेतुपुरस्सर एखाद्या घटनेमध्ये पुढे काय होईल याबद्दल तर्क करून त्याबद्दल पैसे किंवा एखादी मौल्यवान गोष्ट पणाला लावून ती जास्त प्रमाणात परत मिळेल अशी ईर्ष्या बाळगणे, म्हणजे जुगार. थोडक्‍यात स्वेच्छेने निर्धारित होणारे पैजेसारखे उपक्रम धोक्‍याची जाणीव असूनही लाभाच्या आशेने अंगीकारणे म्हणजे जुगार होय. 

गमतीखातर एखाद्या पैजेमध्ये भाग घेणे हे व्यसन मानले जात नाही, मात्र आपल्या आर्थिक परिस्थितीचा कसलाही विचार न करता, आपल्या मनासारखे ‘दान’ पडले नाही तर आपली किती दारुण अवस्था होईल याचा विचार न करता, जेव्हा या खेळात पुनःपुन्हा भाग घेतला जातो, तेव्हा त्या व्यक्तीला जुगाराचे व्यसन आहे असे मानले जाते. यालाच मनोविकृती शास्त्रात ‘ल्युडोमॅनिया’ म्हणतात. 

प्रकार : मनोविकार शास्त्रानुसार जुगाराच्या व्यसनाचे दोन प्रकार पडतात. 
१. प्रॉब्लेम गॅम्बलिंग : यामध्ये व्यक्तीला जुगाराचे व्यसन असते, पण त्याला ते मान्य नसते. तो सतत जुगार खेळत असतो पण ते केवळ गंमत म्हणून किंवा एक साहस म्हणून अशी त्याने स्वतःचीच कल्पना करून घेतलेली असते. 

२. पॅथॉलॉजिकल गॅम्बलिंग : यात जुगार खेळणाऱ्या व्यक्तीला आपल्याला हे व्यसन लागले आहे, याची जाणीव असते. मात्र जुगार खेळण्यापासून तो स्वतःला रोखू शकत नाही. या व्यसनाचे सर्व दुष्परिणाम आणि त्याच्या आयुष्याची होणारी वाताहत त्याला कळत असते, पण तरीही तो आपला खुळा नाद सोडत नाही. एवढेच नव्हे, तर या प्रकारात या व्यक्तीला जुगार खेळायला संधी मिळाली नाही, तर तो तणावग्रस्त होतो आणि खेळायला मिळाले की त्याचा तणाव दूर होतो. 

जुगाराचे व्यसन ही सातत्याने वाढत जाणारी एक मानसिक विकृती असते. त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये आणि त्याच्या कुटुंबात मानसिक ताणतणाव, नातेसंबंधांत दुरावा, आर्थिक प्रश्‍न आणि सामाजिक समस्या निर्माण होतात. 

अनेकांचा असा समज असतो, की नातेवाइकांबरोबर किंवा जवळच्या मित्रांबरोबर पत्ते खेळताना मजा म्हणून लहान रकमेची पैज लावण्यात काही चूक नाही. मात्र जुगाराचे व्यसन लागलेल्या लोकांनी, केवळ क्षणिक मजा म्हणून लहान लहान पैजा लावूनच सुरवात केलेली असते. मात्र सुरवातीला निरुपद्रवी वाटणारा खेळ, घातक वळणे घेऊन, शेवटी सर्वनाश करणाराच ठरतो.

छोट्या मुलांच्याबाबतीत हे खास करून लक्षात येऊ शकते. बहुतांश मुलांना लहान पैजा जिंकण्यात मजा वाटते आणि मग त्यांना मोठ्या रकमेची हाव लागते. जुगाराच्या व्यसनावरील ॲरिझोना मंडळाने अमेरिकेत केलेल्या एका दीर्घ संशोधनाने याला पुष्टी दिली आहे. या संशोधनानुसार - 

 •     जुगाराचे व्यसन लागलेल्या अनेकांनी लहान वयापासूनच, खेळांवर किंवा मित्रांबरोबर अथवा नातेवाइकांबरोबर पत्ते खेळताना पैज लावण्यास सुरवात केली होती. 
 •     मुले सहसा, कुटुंबाबरोबर किंवा मित्रांबरोबर घरीच पत्त्यांच्या खेळांवर जुगार खेळण्यास सुरवात करतात. 
 •     जुगार खेळणारी तीस टक्के मुले, त्यांच्या अकराव्या वाढदिवसाच्या आधीपासूनच जुगार खेळायला लागली होती. 
 •     अनेक किशोरवयीन जुगारी, गुन्हे किंवा अनैतिक कृत्ये करून आपले व्यसन पुरे करतात. 

आजाराची लक्षणे 
एखाद्या व्यक्तीत खालील गोष्टींपैकी चार बाबी वर्षभरात त्याच्या आयुष्यात जर आढळून आल्या, तर त्याला जुगाराचे व्यसन लागले आहे असे ठरवता येते. 

 • जुगारातून मिळणारी एक्‍साईटमेंट किंवा भावोनोत्तेजना प्राप्त होण्यासाठी दरवेळी जुगारात वाढत्या प्रमाणात रक्कम वापरली गेली. 
 • जुगार खेळण्यास अटकाव केला गेला तर अस्वस्थपणा आणि चिडचिड खूप जास्त प्रमाणात होते. 
 • जुगार खेळणे कमी करण्याचे किंवा पूर्ण थांबवण्याचे प्रयत्न पुनःपुन्हा निष्फळ आणि अयशस्वी ठरतात. 
 • जुगार खेळताना आलेले चांगले - वाईट अनुभव, पुढच्या जुगाराची तयारी करणे आणि तो खेळण्यासाठी पैसे कुठून मिळवता येतील, अशा विचारांमध्ये स्वप्नावस्थेत असल्याप्रमाणे सतत गुंग राहणे. 
 • दुःखी किंवा निराश वाटले म्हणून जुगार खेळणे. 
 • जुगारात एकदा पैसे गमावल्यावर ते पुन्हा मिळवण्यासाठी परत परत खेळत राहणे. 
 • कुटुंबीयांपासून, मित्रमैत्रिणींपासून आणि समाजामध्ये आपण जुगार खेळतो ही गोष्ट दडवून ठेवणे. 
 • जुगारामुळे वैवाहिक संबंध, मित्र, नातेवाईक यात वितुष्ट येणे किंवा दुरावा निर्माण होणे. त्याचप्रमाणे नोकरी, करिअर, शिक्षण यामधील संधी दवडणे. 
 • जुगारामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक समस्यांवर इतरांच्या मदतीची अपेक्षा ठेवणे. जुगाराचे व्यसन असलेल्या काही रुग्णांमध्ये कधी कधी अजिबात जुगार खेळावासा न वाटण्याचा काळ येतो. मात्र थोड्याच दिवसात त्याला पुन्हा जुगार खेळण्याची जोरदार हुक्की येते. 
 • जुगाराच्या व्यसनाचा कल हा काही व्यक्तींत कौटुंबिक वारसा असतो. जुगार खेळणाऱ्या व्यक्तींच्या मुलांमध्ये आनुवंशिकतेने ही विकृती उद्‌भवते. 
 • पुरुषांना हे व्यसन अगदी लहानपणी किंवा पौगंडावस्थेत लागते. तर स्त्रियांमध्ये मात्र हे व्यसन उतारवयात जास्त करून लागते. 

कारणे 
अमेरिकेतील इलिनॉय इन्स्टिट्यूटमधील व्यसनमुक्ती केंद्रामध्ये झालेल्या संशोधनानुसार, 

 • जुगाराचे व्यसन असलेल्या व्यक्तींच्या मानवी मज्जासंस्थेमध्ये नॉर-एपिनेफ्रिन हे रासायनिक द्रव्य सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा खूप कमी स्रवते. याच्या अभावामुळे तणाव, उत्तेजित होणे आणि काही तरी साहस करावे या दृष्टिकोनातून या व्यक्ती जुगाराच्या आहारी जातात. 
 • हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या एका अहवालानुसार, जुगारी व्यक्तींच्या मेंदूमधील जुगार खेळताना होणाऱ्या क्रिया या कोकेन घेतल्यावर होणाऱ्या क्रियांसारख्याच घडतात. 
 • सिरोटोनिन नावाच्या आणखी एका द्रव्याचा अभाव या व्यक्तींना जुगार खेळण्यास उद्युक्त करतो.

उपचार 
या व्यक्तींना औषधोपचारामध्ये नैराश्‍यावरील औषधे आणि मानसिक उत्तेजना कमी करणारी औषधे दिली जातात. मात्र औषधांपेक्षा या व्यक्तींना समुपदेशनानेच अपेक्षित परिणाम साधता येतो. 
गॅम्बलिंग ॲनॉनिमस - ही संस्था सपोर्ट ग्रुपप्रमाणे कार्य करते. मात्र या संस्थेचे कार्य अत्यंत गुप्तरीत्या चालते. यात या संस्थेतील एक व्यक्ती रुग्णाचा मार्गदर्शक बनते आणि सतत त्याच्याबरोबर राहते. ही व्यक्ती पूर्वी जुगाराचे व्यसन असलेली, परंतु नंतर त्या व्यसनाचा पूर्णपणे त्याग केलेली असते. या संस्थेचा एक टप्प्याचा कार्यक्रम आहे, त्याद्वारे ते या रुग्णाला व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करतात.

मानसोपचार 
या रुग्णांवर मानसोपचारतज्ज्ञ कॉग्निटीव्ह बिहेवीअरल थेरपी या तंत्राने उपचार करतात. रुग्णाशी सातत्याने संवाद साधून त्याच्या व्यसनाचे मूलभूत कारण शोधून त्याला रोगमुक्त करतात. जुगाराचे व्यसन सोडवण्यासाठी त्या रुग्णाच्या नातेवाइकांना विशेषतः दांपत्यामधील दुसऱ्याला रुग्णाला खूप आधार द्यावा लागतो. रुग्णाच्या घरातील व्यक्तींनी काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागतात. यात - 
काय करू नये : 

 • रुग्णाला सतत उपदेश करू नये. त्याचे काय चुकतेय याबद्दल भाषण देऊ नये. त्याचा रागराग तर मुळीच करू नये. रुग्णाला ‘जुगार खेळणे सोड’ हे त्याने हजारदा ऐकलेले वाक्‍य न ऐकवता त्याच्यात दडलेल्या चांगल्या माणसाचे त्याला दर्शन घडवून द्यावे. 
 • घरातील दैनंदिन गोष्टींपासून त्याला दूर ठेवू नये. उलटपक्षी सण-समारंभ, कौटुंबिक भोजन, संमेलन यात त्याला न चुकता सामील करावे. 
 • या आजारातून रुग्ण लगेच बरा होईल अशी अपेक्षा बाळगू नये. त्याचप्रमाणे त्याने जुगार खेळणे सोडले म्हणजे तो आता सुधारला किंवा व्यसनमुक्त झाला अशी समजूत करून घेऊ नये. 
 • समाजातून त्याला वाळीत टाकू नये. 
 • त्याच्या इतर गरजांपासून त्याला वंचित ठेवू नये किंवा त्याचा आजार घरातील इतर व्यक्तींपासून लपवून ठेवू नये. 

काय करावे : 

 • सपोर्ट ग्रुप्समध्ये सामील करावे. 
 • त्याच्या इतर चांगल्या गुणांची जाणीव ठेवावी. 
 • त्याच्या जुगारासंबंधी किंवा त्यामुळे कुटुंबावर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा करताना आरडाओरडा न करता शांतपणे बोलावे. 
 • त्याच्या जुगाराच्या व्यसनामुळे स्वतःवर आणि कुटुंबावर होणाऱ्या परिणामांबाबत आपण वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय मदत घेत आहोत याची जाणीव त्याला असू द्यावी. 
 • घरात किशोरवयीन मुले असतील, तर त्यांना जुगाराचे परिणाम काय होतात याची माहिती द्यावी. 
 • जुगाराचे व्यसन सुटण्यासाठी खूप कालावधी लागतो याची रुग्णाला जाणीव करून देत राहावे. 
 • कुटुंबाचे आर्थिक व्यवहार स्वतःच्या ताब्यात ठेवावेत. रोकड रक्कम, दागिने बॅंकखाते, क्रेडिट कार्डस, उत्पन्नाची इतर साधने यांची डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी. 

बेलगाम जुगार खेळणे म्हणजे एक व्यसन असले तरी मर्यादित प्रमाणावर जुगार खेळणेसुद्धा आक्षेपार्ह आहे. जुगाराच्या व्यवसायात आर्थिक रकमांची अवाढव्य उलाढाल होत असली, तरी त्याने अर्थशास्त्रदृष्ट्या समाजाच्या संपत्तीत यत्किंचितही भर पडत नाही. करमणुकीखातर जुगार खेळणे नैतिकदृष्ट्या समर्थनीय नाही. कारण पैसे कमावणारांना सुख मिळते, पण पैसे गमावणारांना दुःख होते. म्हणजे तो आनंद आसुरीच असतो. त्याने मनुष्य कठोर आणि स्वार्थी बनून त्याचे नैतिक अधःपतन होत जाते. आयते धन मिळविण्याची मनोवृत्ती जुगारामुळे बळावते आणि विद्याकलानैपुण्य, न्यायप्रियता, आर्थिक जबाबदारी घेणे, या उच्च प्रकारच्या गुणांचा ऱ्हास होतो.

दुष्परिणाम 

 • जुगाराबरोबर या व्यक्तींना इतर व्यसने विशेषतः मद्यपान आणि ड्रग्ज, यांची सवय लागण्याची दाट शक्‍यता असते. 
 • जुगार खेळायला पैसे मिळवण्यासाठी हे रुग्ण चोऱ्या, दरोडे, जबरी चोरी, रस्त्यावर लूटमार करणे, पैसे असलेल्या व्यक्तींवर हल्ला करणे, त्यांचा खून करणे अशा ही गोष्टी करू शकतात. 
 • आजार वाढत गेल्यास त्यांना इतर मानसिक रोग निर्माण होण्याची शक्‍यता असते. 
 • हे लोक आत्महत्या करण्याचीसुद्धा शक्‍यता असते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या