मौखिक अारोग्य कसे जपावे?

डॉ. अविनाश भोंडवे
शुक्रवार, 9 मार्च 2018

आरोग्याचा मूलमंत्र
मुखाच्या तपासणीत रुग्णाच्या अनेक आजारांची प्राथमिक कल्पना येऊ शकते. याचे कारण म्हणजे बिघडलेले मौखिक आरोग्य हे कित्येक आजारांना कारणीभूत ठरू शकते, एवढेच नव्हे तर आपल्या शरीरातील इतर आजारांची लक्षणे तोंडाच्या तपासणीत डॉक्‍टरांना सापडतात.

संत तुकारामांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे, 
शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी I
अमृताची वाणी, देह देवाचे कारणी II
सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ I
तुका म्हणे जाती, ताप दर्शने विश्रांती II

या अभंगात जरी आध्यात्मिक विचार मांडला असला, तरी त्यात शारीरिक आणि वैचारिक शुद्धतेशी कसा संबंध आहे, हे मांडले आहे. याच विचारांचा वेध घेतला, तर आपल्या जीवनात सर्वांग सुंदर आरोग्यासाठी मौखिक शुद्धता खूप महत्त्वाची आहे असे म्हणता येईल.  

कोणीही डॉक्‍टर जेंव्हा रुग्णाची वैद्यकीय तपासणी करतात, तेंव्हा त्याला ’आ’ करायला सांगतात. कारण मुखाच्या या तपासणीत रुग्णाच्या अनेक आजारांची प्राथमिक कल्पना येऊ शकते. याचे कारण म्हणजे बिघडलेले मौखिक आरोग्य हे कित्येक आजारांना कारणीभूत ठरू शकते, एवढेच नव्हे तर आपल्या शरीरातील इतर आजारांची लक्षणे तोंडाच्या तपासणीत डॉक्‍टरांना सापडतात. म्हणजे एका दृष्टीने रुग्णाने उघडलेल्या मुखात त्याची तपासणी करणाऱ्या डॉक्‍टरांना त्याच्या आजाराचे ’विश्‍वरूप दर्शन’ घडू शकते.

मौखिक, शारीरिक आरोग्यसंबंध
आपल्या शरीरातील इतर बऱ्याच अवयवांप्रमाणे आपल्या तोंडातदेखील असंख्य प्रकारचे जिवाणू असतात. दात, हिरड्या, जीभ, गालांची आतील त्वचा, टॉन्सिल्स, घसा या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जंतूंची एकप्रकारे वस्तीच असते. मात्र यातील बरेच जिवाणू तसे निरुपद्रवी असतात. दैनंदिन स्वच्छतेमध्ये रोजच्या रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दात व्यवस्थितपणे घासले तर या जंतूंची संख्या नियंत्रणात राहते. साहजिकच जर मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष केले आणि दात रोज नीटपणे स्वच्छ केले नाहीत तर या जंतूंची संख्या अमर्याद वाढून मौखिक आरोग्य बिघडून जाते. साहजिकच दात किडणे, हिरड्या सुजणे असे विकार सुरू होतात.

औषधे ः आपल्या तोंडात नित्यनेमाने लाळ पाझरत असते. या लाळेमुळे अन्नातील काही घटकांचे पचन होते आणि खाल्लेल्या घासाला द्रवरूप येऊन ते घशाकडे सरकवले जाते. तोंडातील जिवाणू विशिष्ट प्रकारची आम्ले निर्माण करतात. त्यांचा दातांवर परिणाम होऊन दातावरील वेष्टण कमकुवत होते. लाळेमुळे या आम्लांचे निष्क्रीयीकरण होते. वैद्यकीय औषधोपचारांमध्ये काही औषधांचा  परिणाम होऊन आपल्या तोंडात स्त्रवणारी लाळ कमी होते. यामध्ये सर्दीची औषधे, वेदनाशामक औषधे, खाज किंवा ॲलर्जीसाठी वापरली जाणारी औषधे, मूत्राचे प्रमाण वाढवणारी डाययुरेटिक्‍स, नैराश्‍यावरील औषधे इत्यादींचा समावेश होतो.

दातांचे आजार ः मधुमेह, एचआयव्ही अशा आजारांमध्ये रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी झालेली असते. अशा व्यक्तींमध्ये तोंडातील जंतूंमुळे दातांवर कमालीची सूज येते आणि दात, हिरड्या खूप जास्त सुजतात. पेरीओडोंटायटीस नावाचा एक गंभीर त्रास उद्भवतो. या त्रासामधून काही दीर्घ स्वरूपाचे इतर गंभीर शारीरिक आजार निर्माण होतात.

गंभीर आजार
मौखिक आरोग्यातील त्रुटी आपल्या शरीरात कित्येक गंभीर आजारांना निमंत्रण देतात. 

एंडोकार्डायटीस ः दातांची निगा नीट न राखल्याने तोंडात जे जंतू आणि अन्य जिवाणू निर्माण होतात, ते लाळेसमवेत किंवा अन्नाच्या घासासमावेत पोटात जातात. तिथून ते रक्तात पसरतात. रक्ताभिसरणाच्या क्रियेद्वारे ते हृदयातून जातात. अशावेळेस हृदयाच्या आतील आवरणाशी विशेषतः हृदयातील झडपांशी त्यांचा संपर्क येतो. त्याठिकाणी या जंतूंची अमर्याद वाढ होऊन जंतूंचे गठ्ठे तयार होतात. त्यामुळे त्या आवरणाला सूज येते आणि ’बॅक्‍टेरियल एंडोकार्डायटीस’ नावाचा गंभीर हृदयविकार होतो. यामध्ये रुग्णांच्या स्पंदनावर तर परिणाम होतोच पण हृदयाच्या झडपा निकामी होऊ शकतात.

याच कारणाने हृदयावरील शस्त्रक्रियेआधी रुग्णाच्या मौखिक आरोग्याची तपासणी करून त्यात असे काही जंतुसंसर्ग आढळल्यास त्याचा उपचार अगोदर करून घ्यावा लागतो.

अर्धांगवायू ः तसे पाहायला गेल्यास अर्धांगवायू किंवा लकवा होण्याची अनेक करणे आहेत. पण रक्तवाहिन्या अरुंद होणे आणि रक्तातील पेशींच्या गुठळ्या निर्माण होणे ही दोन महत्त्वाच्या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरतात. दातातील अमर्याद जंतुसंसर्ग सतत रक्तात जात राहिला तर त्याचा रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन त्यांचा आतील व्यास कमी होतो आणि त्या अरुंद होतात. त्याचप्रमाणे रक्तातील जंतू रक्तपेशींच्या गुठळ्या निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात. या दोन्ही कारणांचा परिणाम म्हणून दातांचे आरोग्य खूप बिघडलेले असल्यास त्या व्यक्तीला अर्धांगवायूचा त्रास होण्याची भीती असते.

गर्भधारणा आणि प्रसूती ः मातांमधील दातांच्या जंतुसंसर्गामुळे अपुऱ्या दिवसात प्रसूती होणे तसेच बाळ कमी वजनाचे जन्मणे असे त्रास होऊ शकतात.

मधुमेह ः दातांची निगा न राखल्याने जंतुक्षय होऊन दात खराब झालेले असतात, अशा रुग्णांचा मधुमेह आटोक्‍यात येण्यास त्रास होतो. त्यांच्या उपचारात दातांचे आरोग्य सुधारल्यास मधुमेह नियंत्रण होऊ शकते. मात्र अनियंत्रित मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये दातांचे असे आजार वरच्यावर होत राहतात. मधुमेह नसलेल्या व्यक्तींपेक्षा मधुमेही व्यक्तींना होणारे जंतुसंसर्ग आटोक्‍यात आणणे थोडे जिकिरीचे असते.

एचआयव्ही ः एड्‌स असलेल्या रुग्णांमध्ये तोंडाच्या आणि टाळ्याच्या आतील आवरणाला सतत तीव्र वेदना देणारे अल्सर्स होत राहतात.  

ऑस्टिओपोरोसिस ः या आजारात रुग्णांची हाडे कमकुवत आणि ठिसूळ होतात. या आजारामध्ये दातांचे बाह्य आवरण नष्ट होऊन दात पडतात. त्याचवेळेस ऑस्टिओपोरोसिसच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा विपरीत परिणाम जबड्याच्या हाडांवर होऊन ती खराब होऊ शकतात.

अल्झायमर्स ः या आजारात दातांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन मौखिक आरोग्य बिघडत जाताना दिसून येते. 

फुफ्फुसाचे आजार ः सीओपीडी या आजारात फुफ्फुसांची क्षमता खूप कमी होते आणि सतत जंतुसंसर्ग होऊन खोकला येतो, तीव्र दम लागतो. हा आजार, तसेच फुफ्फुसाला रोगजंतूमुळे सूज येऊन होणाऱ्या न्यूमोनिया हे दोन्ही आजार होण्याच्या इतर कारणांबरोबर बिघडलेले मौखिक आरोग्यसुद्धा कारणीभूत ठरते. किडलेले दात, दातांच्या मुळाशी झालेले जंतुसंसर्ग, सुजलेल्या हिरड्या आणि त्यातून होणारा रक्तस्राव तोंडावाटे पोटात आणि सर्व शरीरात जाऊन विविधप्रकारचे जंतूसंसर्ग निर्माण होतात. 

इतर आजार ः मौखिक आरोग्य उत्तम नसल्यास भुकेच्या आणि अन्नपचनाच्या तक्रारी वाढल्याचे लक्षात येते. संधिवातामधील सांध्यांच्या वेदना आणि सूज वाढते. तसेच डोके आणि मानेच्या भागात होणारे कर्करोगांचा संबंध बिघडलेल्या मौखिक आरोग्याशी आढळून येतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, अनेक रुग्णांमध्ये अन्ननलिकेच्या कर्करोगाचा संबंध तोंडातील रोगजंतूंशी असतो असे निदर्शनास आले आहे. सतत तोंडाला कोरड पडणाऱ्या ’स्यॉग्रेन्स सिंड्रोम’चाही प्रादुर्भाव होताना दिसून येतो.

उपाय
मौखिक आरोग्य जपण्यासाठी बऱ्याच आरोग्यासंबंधी काही मूलभूत गोष्टी पालव्या लागतात.

 • सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करणे गरजेचे असते. यासाठी शक्‍यतो फ्लूओराईड टूथपेस्ट वापरावी.
 • दात साफ करताना आरोग्यशास्त्रामध्ये वर्णिलेली दात घासण्याची आदर्श पद्धत वापरावी.
 • दातांमधील फटीत अडकलेले अन्नकण ’फ्लॉस’ वापरून काढावेत.
 • चौरस आहार असावा आणि दोन जेवणांमध्ये अरबट चरबट खाऊ नये.
 • दात स्वच्छ करण्याचा ब्रश दर दोन ते तीन महिन्यांनी बदलावा. ब्रिसल (टूथब्रशचे केस) वेडेवाकडे झालेले किंवा कडक झालेले ब्रश दीर्घकाळ वापरू नये.
 • दातांवर कीटण किरमाण होऊ लागल्यास, दात दुखल्यास, हिरड्या सुजल्यास किंवा दातांसंबंधी काहीही तक्रार निर्माण झाल्यास, दातांच्या डॉक्‍टरांकडे वेळच्या वेळी जाऊन दाताच्या आरोग्याची खात्री करून घ्यावी. त्यात काही दोष आढळल्यास त्वरित उपचार घ्यावेत.
 • तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, पान खाणे, खूप उष्ण किंवा कमालीची थंड पेये टाळावीत.
 • काहीही खाल्यावर चुळा भराव्यात. त्यासाठी वापरण्याची औषधे डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.
 • मौखिक आरोग्य चांगले राखण्यासाठी या सर्व गोष्टी मुलांना अगदी लहानपणापासून, घरात आणि शाळेत शिकवल्या गेल्या पाहिजेत.

जीभ
मौखिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी दातांबरोबर जिभेचे आरोग्यसुध्दा महत्त्वाचे असते. मौखिक आरोग्य बिघडल्यामुळे जिभेच्या आवरणाला सूज येऊन तोंड येते. त्या आवरणास जखमा होतात, त्यात पू निर्माण होऊ शकतो. जिभेच्या या जखमात अन्यप्रकारचे जिवाणू, बुरशीजन्य जंतू निर्माण होतात. त्यामुळे सतत तोंड येणे हा मौखिक आरोग्य बिघडल्याचा उत्तम संकेत असतो. अंगातील रक्त कोणत्याही कारणाने कमी झाल्यास, आहारातील जीवनसत्त्वे कमी पडल्यास, जिभेवरील आवरण लाल होते आणि तोंड येते. दीर्घकाळ असे तोंड येणे हे ॲनिमियाचे एक लक्षण असते. 

आपण काहीही खाल्ल्यावर जिभेवर त्याचा एक थर निर्माण होत असतो. हा थर रोजच्या रोज स्वच्छ न केल्यास त्यामध्ये जंतूसंसर्ग होऊन मौखिक आरोग्य बिघडते. मौखिक आरोग्यातील त्रुटींमुळे होणाऱ्या आजारात जिभेचे आरोग्य लक्षात घ्यावे लागेल. आपल्या शरीरावर होणाऱ्या रोजच्या मुखप्रक्षालनाच्या वेळेस दात घासल्यानंतर जीभसुद्धा स्वच्छ करणे आवश्‍यक असते.

जीभ आणि शारीरिक आजार

 • क्रॉहन्स डिसीज ः या आजारात जिभेपासून गुद्‌द्‌वारापर्यंतच्या संपूर्ण अन्नपचनमार्गात जखमा होतात. साहजिकच जिभेवर असलेले अल्सर्स हे या आजाराचे निदान करताना महत्त्वाचे निरीक्षण ठरते.
 • अल्सरेटिव्ह कोलायटीस या आजारात जिभेवरच्या जखमा, ओठांच्या कोपऱ्यामध्ये होणाऱ्या जखमा आणि सूज (अँग्युलर स्टोमॅटायटिस), त्यातून होणारा रक्तस्त्रव अशी लक्षणे आढळून येतात.
 • यकृताच्या आणि अन्य आजारांमध्ये लायकेन प्लानस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जखमा जिभेवरही आढळून येतात.
 • रक्ताचा कर्करोग, लिम्फोमा, मल्टिपल मायलोमा, सायक्‍लिक न्युट्रोपेनिया, रक्तपेशींच्या निर्मितीबाबत असलेल्या अशा अनेक आजारात जिभेवर जखमा होण्याचे प्रमाण आढळून येते.
 • विविध जीवनसत्त्वांचा विशेषतः ब आणि क जीवनसत्त्वांचा अभाव आणि लोह, झिंक अशा खनिजांची कमतरता शरीरात असल्यास तोंड येण्याचे प्रमाण वाढलेले आढळते.

आपले मौखिक आरोग्य म्हणजे आपल्या आरोग्याचा आरसा असतो. आपल्या शरीरातील कमतरता आणि आजार यांचे चित्र तोंडाच्या तपासणीत आढळून येत असते. पण त्याचबरोबर सर्वांगीण आरोग्यातील या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास त्यामधून असंख्य प्रकारच्या व्याधी निर्माण होत असतात. हेदेखील ध्यानात ठेवायलाच हवे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या