शारीरिक व मानसिक स्वास्थ्य...

डॉ. अविनाश भोंडवे
गुरुवार, 22 मार्च 2018

आरोग्याचा मूलमंत्र
 

आरोग्य मग ते वैयक्तिक असो किंवा सार्वजनिक, त्यात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य एकत्रितपणे नांदावे लागते. आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक स्वास्थ्य सांभाळायलाच आपल्याला वेळ नसतो, तर मानसिक स्वास्थ्याबद्दल तो कुठून असणार? याचा परिणाम म्हणून आज शारीरिक व्याधींबरोबर मानसिक विकार आणि श्रांत शरीरामध्ये अस्वस्थ मनातून निर्माण होणारे मनोशारीरिक आजारसुद्धा वाढीला लागले आहेत. 

सर्वंकष आरोग्यासाठी आहार, व्यायाम आणि विश्रांती जेवढी आवश्‍यक आहे, तेवढेच आशा-निराशेच्या गर्तेत सापडणाऱ्या नित्य दोलायमान मनाला शांत करणाऱ्या उपायांचीसुद्धा गरज भासू लागली आहे. यासाठी ‘मेडिटेशन’ किंवा ‘ध्यानधारणा’ यासारखा दुसरा कोणताही उपाय नसतो, हे आता वैद्यकीय शास्त्रदेखील मानू लागले आहे. 

मेडिटेशन म्हणजे काय? 
मेडिटेशन किंवा ध्यानधारणा ही एक आध्यात्मिक संकल्पना आहे. मानवी मनाला आणि शरीराला संजीवनी देणारी ती एक रहस्यमय देणगी आहे. शरीर, मन आणि आत्मा यामध्ये संतुलन साधण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आध्यात्मिकदृष्ट्या तर याचे महत्त्व अपरंपार आहेच; पण आता वैज्ञानिक संशोधनाने मेडिटेशनचा मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासलेला आहे. त्यामुळे दररोज काही काळ केल्या जाणाऱ्या मेडिटेशनमुळे मानसिक आणि पर्यायाने मनोशारीरिक विकारांवर नियंत्रण आणता येते हे सर्व वैद्यकीय शाखांनी मान्य केले आहे. 

मेडिटेशनच्या पद्धती 
जगातील विविध धर्मांमध्ये ध्यानधारणा आणि मेडिटेशन आचरले जाते. 

 •  मंत्र मेडिटेशन - ॐकार जप, मंत्रसाधना, नाम जपसाधना अशा पद्धतीमध्ये मंत्र किंवा काही शब्द १०८ वेळा किंवा १००८ वेळा पुनःपुन्हा जपले जातात. ॐ, सोहम, ॐ नमः शिवाय, श्रीराम अशा मंत्रांतील शब्दांच्या उच्चारांमुळे निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे मनाची एकाग्रता होते. वैदिक, बुद्ध आणि इतर धर्मियांत या पद्धतीने ध्यान केले जाते. सर्वसामान्यांच्या दृष्टीने यातील प्राथमिक पायऱ्या अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली केल्यास ते उपयुक्त ठरू शकते. 
 •  नाद ध्यान : यात शास्त्रीय वाद्यवादन, भजन याद्वारे मनाची एकाग्रता केली जाते. 
 •  ट्रान्सेडेंटेटल मेडिटेशन : महर्षी महेश योगी यांनी १९५० च्या दशकात जगात प्रसारित केलेली ही ध्यानपद्धती. त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या ‘बीटल्स’ या पाश्‍चात्त्य संगीतकारांनी ही पद्धत अवलंबिली होती. पाश्‍चिमात्य देशात खूप अवडंबर माजवलेल्या या तंत्रामध्ये मंत्रोच्चार, पूजा आणि साधना यावर भर दिला जातो. 
 •  योगिक ध्यान - सुमारे चार हजार वर्षांचा वारसा असलेली योगिक साधना ही सर्वोच्च मानली जाते. योग ही एक जीवनपद्धती आहे. यात आध्यात्मिक शुद्धी आणि स्वत्वाची जाणीव या गोष्टी मुख्यत्वाने साधल्या जातात. या पद्धतीचे चार टप्पे असतात. 

     यम-नियम : हे वैयक्तिक जीवनातील आचरणाचे नियम. 
     योगासने : हे शारीरिक व्यायाम. 
     प्राणायाम : श्‍वसनाचा तांत्रिक व्यायाम. 
     प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी : हे मनन, चिंतन आणि ‘स्व’निरीक्षण करीत आत्मसाधनेत लीन होणे. योगाभ्यासात आजच्या जीवनशैलीतील दोष टाळण्याचा संदेश आहे. 

 •  इतर ध्यान पद्धती - योगावर आधारित चक्रध्यान किंवा कुंडलिनी शक्ती ध्यान ही एक पद्धत आहे. यामध्ये असे मानले जाते, की सर्व विश्‍वाला चालवणारी ‘कुंडलिनी’ ही एक महाशक्ती ब्रह्मांडरूपाने स्थित आहे, तीच पिंडरूपाने शरीरातही स्थित आहे. प्रत्येकाच्या शरीरात ही शक्ती सूप्तावस्थेत असते. तिला जागृत केल्यावर ती मानवाला ‘महामानव’ बनवते. 
 • शरीरात साडेतीन कुंडले ही शक्ती अर्थात अधोमुख स्थित असते. मानवी शरीरात इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तीन नाड्या असतात. पैकी इडा ही डावी नाडी (श्‍वासनलिका) तर पिंगला उजवी नाडी असते. सुषुम्ना ही अत्यंत सूक्ष्म नाडी त्या दोन्हींमध्ये असते. कुंडलिनी जेव्हा आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा यांच्या अभ्यासाने जागृत होते. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा अशा सहा योगचक्रांचा भेद करते. या चक्रांना योगात कमळ असे म्हणतात. या कमळांच्या पाकळ्यांवर गण म्हणजेच वर्ण असतात. 
 • यातील तांत्रिक गोष्टी खूप आध्यात्मिक असल्या तरी राजयोग, क्रियायोग, त्राटक, विज्ञभैरव, नादयोग, रमण महर्षींचा आत्मविचार योग अशा पद्धतीत याचे सहजीकरण केले आहे. या पद्धती आचरता येतात. 
 •  बौद्धधर्मीय ध्यानधारणा - गौतम बुद्ध आणि त्याच्या शिष्यांनी आखून दिलेली ध्यानपद्धती जपान, चीन आणि अन्य पौर्वात्य राष्ट्रांनी जगात लोकप्रिय केली. यात पद्मासन घालून एकाग्रता करावयाचे झेन मेडिटेशन, श्‍वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करून केली जाणारी विपश्‍यना, सचेतन ध्यान, स्वतःशी आणि जगाशी हितगूज करून सर्वांचे सुख इच्छिणारे मेट्टा किंवा मैत्री मेडिटेशन असे प्रकार येतात. 
 •  ताओइझम - इ.स.पू. सहाव्या शतकातील चिनी तत्त्वज्ञ लाओ-त्सू याचा ताओवाद त्यामधील झुओवांग, कुन्क्‍सीयांग, झुआंगी, नायगुआन अशा मेडिटेशन पद्धतीद्वारे ओळखला जातो. या शिवाय चिकुंग हाही एक प्रकार आहे. या सर्वांत मन रिकामे करणे, बंद डोळ्यांनी दृष्टी समोर चित्र आणणे, श्‍वसनावर नियंत्रण आणणे अशाच गोष्टींचा वेगळ्या पद्धतीने वापर केला जातो आणि आत्मज्ञान तसेच एकाग्रता साधली जाते. 
 •  ख्रिश्‍चन धर्मीय मेडिटेशन - यात बायबलचे वाचन आणि प्रार्थना तसेच ईश्‍वराशी संवाद अशा गोष्टी येतात. पौर्वात्य ध्यानधारणेत जसे मनाच्या एकाग्रतेला महत्त्व दिलेले आहे तसे यात नाही. या ख्रिस्ती धार्मिक मेडिटेशनमध्ये मनाचे पावित्र्य आणि ईश्‍वराशी जवळीक यांना महत्त्व दिलेले आहे. 
 •  आधुनिक ध्यानधारणा - यात गायडेड मेडिटेशन येते. यात ‘कल्पनादर्शन’ हे एक ध्यान उपचाराचा भाग म्हणून वापरले जाते. डॉक्‍टर किंवा थेरपिस्ट ठराविक गतीने एखाद्या दृश्‍याचे वर्णन करतात आणि रुग्ण ते चित्र आपल्या मनचक्षूने पाहतात. ल्युसिड ड्रिमिंग ही स्वप्नांना जागृत करणारी पद्धत, तर ‘आय लव्ह यू, आय ॲम सॉरी, प्लीज फर्गिव्ह मी आणि थॅंक यू’ ही चार वाक्‍ये सतत ऐकवणारी, ‘हो पोनोपोनो’ ही हवाईयन तऱ्हा आणि आपल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थांना नियंत्रित करणारे सजगता ध्यान येतात. 
 •  स्वसंमोहन - आत्मसंमोहन, स्वयंसूचना तंत्र म्हणजेच स्वसंमोहन. स्वसंमोहन म्हणजे स्वतःच स्वतःला संमोहित करणे होय. आपणच आपल्या मनाची एकाग्र अवस्था साधून आपल्याला आवश्‍यक आणि उपयुक्त अशा सूचना घेणे. यासाठी अनुभवी संमोहन तज्ज्ञाकडून शास्त्रीय पद्धतीने आत्मसंमोहन करून स्वयंसूचना घेण्याचे तंत्र शिकून घेतलेले असणे आवश्‍यक आहे. 

कोणते? केव्हा? किती वेळ? 
या प्रश्‍नांची उत्तरे प्रत्येक पद्धतीप्रमाणे बदलतात. मात्र सर्वसाधारणपणे सुरवातीला किमान पंधरा मिनिटे मेडिटेशन करावे. दिवसाआड एकदा असे करून ते दिवसातून दोन वेळा करावे. एखादे वेळी मानसिक तणाव जास्त वाटत असेल, तर त्या वेळी आणखीन एकदा करायला हरकत नसते. दिवसाच्या सुरवातीला - शक्‍यतो पहाटे ध्यान केल्यास दिवसातील तणावाला खंबीरपणे सामोरे जाता येते. मात्र आजच्या गडबडीच्या रहाटगाडग्यात, अजिबात काही न करण्यापेक्षा कोणत्याही वेळी, अगदी झोपताना जरी केले तरी चालू शकेल.

ध्यान करताना शांत वातावरण आणि स्वतंत्र खोली असणे उत्तम. पण आजच्या जीवनात या बाबी मिळणे दुष्प्राप्य असते. त्यामुळे ते करताना वातावरण किमान आपल्याला त्रास देणारे नसावे. टीव्ही, मोबाईल, फोन बंद असणे चांगले. मेडिटेशन पद्मासन घालूनच करावे असे नाही. खुर्चीत किंवा जमिनीवर मांडी घालून केले तरी चालेल. 

फायदे 

 • मानसिक आजार : ताणतणावामुळे निर्माण होणारे मानसिक विकार; काळजी करणे, चिंता, नैराश्‍य, चिडचिड, निद्रानाश, व्यसनी वृत्ती, न्यूनगंड, एकलकोंडेपणा, स्वभावदोष यांचे नियंत्रण, उपचार आणि निराकरण मेडिटेशनद्वारे करता येते. मानसिक तणावाशी संबंधित तक्रारी उदा. डोकेदुखी, व्रण, निद्रानाश, स्नायू आणि सांध्यांसंबंधित तक्रारी कमी होतात. ध्यानामुळे रक्तातील लॅक्‍टिक ॲसिडची मात्रा कमी होते, ज्यामुळे उगीचच भीती वाटणे कमी होते. तसेच सेरोटोनीन निर्मिती वाढते, ज्यामुळे आपला मूड आणि वर्तन सुधारण्यास सहाय्य होते. 
 •  शारीरिक आजार : मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार या आजच्या जीवनशैलीतील आजारांचे एक महत्त्वाचे कारण मानसिक तणाव आहे. ध्यान करून मानसिक चिंता नियंत्रित होतात आणि त्यामुळे निर्माण झालेले हे शारीरिक आजार आटोक्‍यात येतात. मेडिटेशन करणाऱ्या व्यक्ती साध्या आणि गंभीर शारीरिक आजारातसुद्धा पूर्ण गलितगात्र होत नाहीत. त्यांच्या आजारात लवकर सुधारणा होते. कर्करोगासारख्या आजारात लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती मेडिटेशनद्वारेच मिळू शकते, हे सिद्ध झालेले आहे. 
 •  स्मरणशक्ती : ध्यानातून मिळणारी ऊर्जा मेंदूला उत्तम आणि जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने एकाग्रता वाढते. त्यामुळे आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती वाढते. शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मेडिटेशन नियमित करणे नितांत आवश्‍यक आहे. 
 •  वाईट सवयी : खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अति विचार करणे, अति मद्यपान करणे, तंबाखू खाणे यासारख्या अनेक वाईट सवयींना नियमित ध्यानधारणा करून तिलांजली मिळू शकते. क्रीडापटूंना आपल्या खेळातील दोष घालवायला याचा उपयोग होतो. 
 •  मानसिक आनंद : कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य पराभव, अपमान आणि वेदना यांनी भरलेले असते. मात्र पराभव, अपमान आणि वेदना असूनही मेडिटेशन करणाऱ्याचे मन नेहमी शांत आणि आनंदी असते. 
 •  कार्यक्षमता : ध्यानातून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक कामांचा उरक वाढतो. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. कमीतकमी कार्यशक्तीचा वापर करून अनेक लहान-मोठी कामे केली जातात. 
 •  झोप : ध्यानातून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला येणारी उभारी यामुळे या व्यक्ती कमी काळात पूर्ण झोपेचा आनंद मिळवतात आणि अधिक काळ इतर कामे करू शकतात. 
 •  नातेसंबंध : नातेसंबंध चांगले होतात. 
 •  विचार आणि निर्णयशक्ती : आपल्या लक्ष्यापर्यंत पोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तीची गरज असते. मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ती मिळवतात आणि त्यामुळे त्वरित निर्णय घेण्याची शक्ती नाट्यपूर्ण रीतीने प्रत्यक्षात येते. 
 •  जीवन स्थैर्य : जीवनाचा विशिष्ट उद्देश, विशेष कार्य, रचना आणि योजना सजगतेने समजून जीवनातले स्थैर्य प्राप्त होते. 
 • आजच्या आधुनिक जीवनात संपूर्ण आरोग्यासाठी प्रत्येकाने मेडिटेशन शिकून ते नियमितपणे करायला हवे.

संबंधित बातम्या