साथीचा नवा आजार-कोरोना  

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

आरोग्य संपदा
 

काही दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ डिसेंबर २०१९ रोजी जेव्हा सर्व जग एका नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात मशगूल होते, त्याच दिवशी चीनमधल्या ह्युबेई प्रांतातील वुहान शहरात २७८ रुग्ण विविध रुग्णालयांत न्यूमोनियाच्या आजाराचे उपचार घेत होते. या साऱ्यांना विषाणूजन्य न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले होते. पण हा विषाणू आजवरच्या वैद्यकीय ज्ञानाच्या चौकटीत न बसणारा एक अनोळखी विषाणू होता. या विषाणूमुळे झालेल्या रुग्णांची माहिती याच दिवशी 'जागतिक आरोग्य संस्थेला' कळवण्यात आली. 
आरोग्य संस्थेच्या दृष्टीने ही एक चिंताजनक बाब होती. कारण कुठल्याही संसर्गजन्य आजाराचा विषाणू जर अनोळखी असेल, तर त्याचा प्रसार होण्याची कारणे, त्याचे आरोग्यदृष्ट्या गांभीर्य हे सारेच अज्ञात असते.

त्यानंतर आठच दिवसांत, म्हणजे ७ जानेवारीला चीनच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी कळवले, की या नव्या विषाणूचा अभ्यास त्यांनी केला आणि आजवर विज्ञानाला माहिती नसलेला एक संपूर्णपणे नवाच विषाणू या न्यूमोनियाच्या साथीला कारणीभूत असल्याचे त्यांनी जाहीर केले. या विषाणूचे 'नॉव्हेल कोरोना व्हायरस' असे त्यांनी नामकरण केले. शास्त्रीय परिभाषेत त्याचे नाव '2019-N-Cov' असे निश्चित करण्यात आले आहे. सर्दीला कारणीभूत होणाऱ्या विषाणूंच्या प्रजातीमधलाच तो आहे. सार्स (SARS) आणि मर्स (MERS) हे गंभीर विषाणूजन्य आजारदेखील याच प्रजातीमधले आहेत.

चीनमध्ये २१ जानेवारीपर्यंत २७८, थायलंडमध्ये २ आणि जपान, तसेच कोरियामध्ये प्रत्येकी १ रुग्ण या आजाराने बाधित झाल्याची नोंद झाली. मात्र, हा रहस्यमय आजार नक्की कसा सुरू झाला? त्याचा उगम एखाद्या प्राण्यापासून किंवा पक्ष्यापासून झाला का? यावर जागतिक आरोग्य संस्थेच्या मार्गदर्शनाखाली चीनमध्ये संशोधन सुरू आहे. मात्र, 'पेकिंग युनिव्हर्सिटी हेल्थसायन्स सेंटर'च्या मते हा विषाणू सापांमधून पसरला आहे. त्याचवेळेस चीनच्या 'अॅकॅडमी ऑफ सायन्सेस'च्या संशोधनात तो वटवाघळांपासून पसरला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

प्रसार टाळण्यासाठी
 'कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या या आजाराचा प्रसार होऊ नये, म्हणून काही मार्गदर्शक तत्त्वे जागतिक आरोग्य संस्थेने घोषित केली आहेत. 

 • अल्कोहोल बेस्ड हॅंड रबने किंवा साध्या साबण-पाण्याने हात वरचेवर धुवावेत.
 • खोकला किंवा शिंका आल्यास तोंडावर रुमाल किंवा टिशू पेपर धरावा. हा टिशू लगेच कचरापेटीत टाकून द्यावा.
 • जैववैद्यकीय कचऱ्याची नियोजित विल्हेवाट लावावी. 
 • खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरू नये, त्याऐवजी कोपर वाकवून ते तोंडासमोर धरावे.
 • ताप आणि खोकला असलेल्या रुग्णाचा सहवास टाळावा.
 • तुम्ही या विषाणूने पसरलेल्या साथीच्या भागात प्रवास केला असेल आणि जर ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरज वाटल्यास रुग्णालयात भरती व्हावे.
 • प्राण्यांचा सहवास टाळावा. त्यांना स्पर्श करू नये. 
 • कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांस खाऊ नये. कच्चे दूध घेऊ नये, त्याचप्रमाणे प्राण्यांच्या मांसाला अजिबात हात लावू नये. 

महाराष्ट्रातील उपाय योजना
 महाराष्ट्र सरकारच्या आरोग्यसेवा संचालनालयाने २२ जानेवारी २०२० रोजी जारी केलेल्या एका परिपत्रकान्वये, भारत सरकारने मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुरू केले आहे. अशा तपासण्यांत आढळून आलेल्या संशयित रुग्णांचा आणि त्यांच्या सहवासितांचा पाठपुरावा एकात्मिक रोग सर्वेक्षण तत्त्वांप्रमाणे केला जाणार आहे. पुण्याची राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) येथे या आजाराच्या निदानाची व्यवस्था उपलब्ध केली गेली आहे. आरोग्य खात्याच्या अनुमानाप्रमाणे सध्यातरी या आजाराचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, २००९ च्या स्वाईन फ्लूच्या साथीमध्ये आलेल्या अनुभवामुळे दक्षता घेण्याची आवश्यकता भासते. यासाठी सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांना आणि इन्फ़्लुएन्झा, श्वसनसंस्थेचा तीव्र दाह अशा स्वरूपाचे आजार असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण सर्व आरोग्यसंस्थांनी, रुग्णालयांनी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.  

 • यामध्ये पाच वर्षांखालील बालकांमध्ये सर्दी, ताप, खोकला आणि न्यूमोनियाची लक्षणे असल्यास रुग्णालयात त्वरित भरती करावे. 
 • प्रौढांमध्ये आणि पाच वर्षांवरील बालकांमध्ये ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ताप अचानक आल्यास, तीव्र खोकला, घसा बसणे, दम लागणे, श्वास घेण्यास अडथळा वाटणे अशी लक्षणे असल्यास संशयित रुग्ण म्हणून त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे अशा मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या आहेत. 
 • अशा रुग्णांना विलगीकरण केलेल्या विभागात (आयसोलेशन वॉर्ड) ठेवावे असेही सूचित करण्यात आले आहे.
 • रुग्णालयामधील व्हेंटिलेटर आणि जीवनावश्यक प्रणाली सुविधा सक्षमरीत्या चालू असावी.

सर्वसामान्य जनतेने घ्यायची काळजी
 सर्दी, ताप, तीव्र खोकला आणि श्वास घेताना दम लागणे अशी या आजाराची काही लक्षणे आढळली, तर लगेच डॉक्टरांकडून औषधोपचार करून घेतले पाहिजेत. हा आजार नेमका कसा होतो, त्याची लक्षणे कोणती आणि त्याच्यापासून बचावासाठी काय केले पाहिजे, याची माहिती प्रत्येकाने ठेवली पाहिजे.

आजारी व्यक्तीच्या शिंकण्यामुळे आणि खोकल्यामुळे उडणाऱ्या थेंबांमुळे हा आजार हवेतून इतरत्र पसरतो. सर्वसाधारणपणे या आजाराचे स्वरूप सौम्य असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या आजाराला न घाबरता हा आजार पसरू नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नागरिकांनी स्वत:हून काळजी घेतली पाहिजे. कोणताही आजार वाढू नये आणि त्याचा संसर्ग इतरांना होऊ नये, यासाठी वेळेवर उपचार सुरू करणे अत्यावश्यक असते. 

सौम्य ताप असेल तसेच खोकला, घशाला खवखव होत असेल, डोकेदुखी, जुलाब आणि उलट्याचा त्रास होत असेल, तर थुंकीचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावयाची गरज नसते. मात्र या रुग्णांचा जनसंपर्क कमी करावा, तसेच घरातील इतर व्यक्तींशी जास्त संपर्क टाळावा. या रुग्णांवर त्यांच्या लक्षणानुसार थोडा बहुत औषधोपचार करणे गरजेचे असते.

या लक्षणांबरोबर तीव्र घसादुखीचा त्रास होत असेल, घशाला सूज आली असेल आणि ताप ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, तर अशा अतिजोखमीच्या रुग्णांचा म्हणजे - गरोदर माता, उच्चरक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोग, दमा हे आजार असणाऱ्या रुग्णांचा स्वॉब घेऊन त्याची तपासणी आवश्यक आहे. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू करावा. घरात त्यांना इतर सदस्यांपासून दूर ठेवावे आणि अँटीबायोटीक्सचा वापर करण्यात यावा.

या लक्षणांबरोबर धाप लागणे, छातीत दुखणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, रक्तदाब कमी होणे, नखे निळसर काळी पडणे, मुलांमध्ये चिडचिड आणि झोपाळूपणा वाढणे अशी लक्षणे आढळून आल्यास अशा रुग्णांचा तातडीने स्वॉब घेऊन संबंधित रुग्णास रुग्णालयात भरती करणे अत्यंत गरजेचे ठरते. 

या रुग्णांचे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तातडीने उपचार सुरू झाल्यावर, रुग्णाच्या निकट सहवासात असणाऱ्या व्यक्तीत फ्लूसारखी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत.

इन्फ्ल्यूएंझा, स्वाईन फ्लू आणि कोरोना व्हायरस असे तीव्र सांसर्गिक आजार टाळण्यासाठी 

 • बाहेरून घरी आल्यानंतर साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुतले पाहिजेत.
 • जेवणामध्ये पौष्टिक आहार घेतला पाहिजे. 
 • लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या अशा आरोग्यदायी घटकांचा समावेश आहारात असला पाहिजे. 
 • पुरेशी विश्रांती आणि झोपही आपल्या सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहे. 
 • दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. 
 • घरात अथवा बाहेर कोठेही असो, शिंकताना, खोकताना नाक आणि तोंडावर रुमाल धरावा. 
 • शरीरात ताप असेल, कणकण येत असेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार विनाविलंब सुरू करता येतील. फ्लूवरील उपचार ४८ तासांच्या आत सुरू झाल्यास ते अधिक गुणकारी ठरतात. 
 • फ्लू प्रतिबंधक लस घेतल्याने संभाव्य धोका टळतो. 
 • विशेषतः गरोदर माता, मधुमेह, अथवा उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती आणि स्थूल व्यक्ती यांनी ही लस घेणे आवश्यक आहे. या शिवाय, जुनाट गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींनीही ही लस डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी.

खरे तर प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी अथवा घरी असतानाही काही काळजी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. फ्लूची लक्षणे असतील तर इतरांशी हस्तांदोलन करू नये, सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. औषधांचा कोर्स डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्ण करावा, तो अर्धवट सोडू नये.

बहुतांश फ्लू रुग्ण हे सौम्य स्वरूपाचे असतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे अशा रुग्णांची घरीच चांगली काळजी घेतली पाहिजे. घर मोठे असेल तर रुग्णासाठी वेगळी खोली निश्चित करावी. रुग्णाने स्वत:च्या नाकावर रुमाल बांधावा. घरात इतर कोणी अतिजोखमीचे व्यक्ती असतील, तर त्यांच्याजवळ जाणे रुग्णाने टाळावे. रुग्णाने वापरलेले टिशू पेपर अथवा मास्क इतरत्र टाकू नयेत. त्याने वापरलेले रुमाल गरम पाण्यात अर्धा तास भिजवून नंतर स्वच्छ धुवावेत. 

रुग्णाने भरपूर विश्रांती घेणे आवश्यक आहे. धूम्रपान करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत. दिवसातून किमान दोन वेळा गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. तसेच गरम पाण्यात निलगिरी तेल किंवा मेंथटल टाकून त्याची वाफ घ्यावी. प्रत्येक आजाराच्या बाबतीत रुग्णाने स्वत:ची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. सध्याच्या वातावरणात कोरोना व्हायरसचा प्रसार जास्त होऊ नये, यासाठी वेळेवर उपचार आणि योग्य प्रतिबंधक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने वैद्यकीय सेवा त्वरित देण्याबरोबरच जनजागृतीवर भर दिलेला आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. 

संबंधित बातम्या