लस, लसीकरण म्हणजे काय?

डॉ. अविनाश भोंडवे
बुधवार, 1 जुलै 2020

सध्या जगभरात कोरोनासारखा संसर्गजन्य आजार धुमाकूळ घालत आहे. यापूर्वीही असे काही आजार येऊन गेले आहेत. या संसर्गजन्य आजारांवर खात्रीशीर उपाय म्हणजे त्या आजारावर लस शोधून काढणे. मात्र, ही लस म्हणजे काय आणि ती कशाप्रकारे त्या आजारावर काम करते, हे जाणून घेणे गरजेचे आहे...

पौराणिक कथांमध्ये देवांना ऋषी शाप द्यायचे, कधी मानवांना देव शाप द्यायचे, कधी गंधर्वांना आणि अप्सरांनाही शाप मिळायचे आणि मग त्या शापावर उ:शापही दिले जायचे. त्या उ:शापांमुळे त्या शापित व्यक्ती मुक्त व्हायच्या. आज मानवजातीला कोरोना विषाणूच्या संसर्गाचा जणू एक शापच मिळालेला आहे. पण त्या शापावरचा उ:शाप म्हणजे लस काही अजून मिळालेली नाही. महाभारतातला अश्वत्थामा ज्याप्रमाणे चिरंजीव असूनही माथ्यावरची जखम भरून यावी म्हणून तेल मागत फिरत असतो, तशीच आज समस्त मानव जात, त्यातले डॉक्टर्स, सरकारे, संशोधक सारेजण कोरोनाच्या संकटावरील उ:शाप शोधत आहेत.   

लस म्हणजे काय?
 कोणतीही लस म्हणजे एक अजब रसायन असते. त्यात एखाद्या आजाराचे रोगजंतू म्हणजे जिवाणू किंवा विषाणू असतात. लशीमध्ये हे रोगजंतू तीनपैकी एका पद्धतीने वापरले जातात. हे जिवाणू अथवा विषाणू एकतर मृतावस्थेत असतात, नाहीतर जिवंत पण अर्धमेले केलेले असतात किंवा विषारी गुणधर्म असलेले जिवंत स्वरूपातलेही असू शकतात. असे हे रसायन एखाद्याला टोचल्यावर त्या व्यक्तीच्या शरीरात त्या विषाणू किंवा जिवाणूला नष्ट करण्याची आणि पर्यायाने त्या आजाराविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण होते. ही लस शरीरात गेली, तर जणू काही त्या रोगाची रंगीत तालीमच होते. लशींत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाही, पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लस तीन प्रकारे वापरतात. इंजेक्शनद्वारे टोचणे, थेंबांच्या स्वरूपात तोंडामध्ये देणे किंवा नाकात सोडणे. एखाद्याला या पद्धतीने लस देणे म्हणजे लसीकरण. लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा काही आजार टाळले जातात.    

लशीचा इतिहास
अठराव्या शतकाच्या शेवटी एडवर्ड जेन्नर या इंग्रज डॉक्टरने आपल्या काळातील एका शहरी दंतकथेला काही सत्य आहे का हे पडताळायचे ठरवले. त्या काळात गायीच्या आचळांना जखमा होण्याचा आजार होत असे. त्याला 'काऊ पॉक्स' किंवा 'व्हॅक्सिनीया' म्हणत असत. गाईचे दूध काढणाऱ्या माणसांनासुद्धा हा आजार होत असे. पण फक्त त्यांच्या हातांवर काही जखमा होऊन तो बरा व्हायचा. मात्र, ज्यांच्या हातांना अशा 'काऊ पॉक्स' व्हायच्या त्यांना त्याच काळात होणारा देवीचा आजार म्हणजे 'स्मॉल पॉक्स' व्हायचा नाही. त्या काळात देवीच्या आजाराने असंख्य माणसे डागावर होती. मात्र, या काऊ पॉक्स होणाऱ्या व्यक्ती त्यातून पूर्ण बचावत असत. 

 ही गोष्ट लक्षात घेऊन एडवर्ड जेन्नरने एक प्रयोग केला. आज अमेरिकेतील एफडीए किंवा भारतातील आयसीएमआर अजिबात मान्यता देणार नाही, असा हा प्रयोग होता. जेन्नरने जेम्स फिप्स नावाच्या एका आठ वर्षांच्या मुलाला काऊ पॉक्स झालेल्या गायीच्या व्रणातून आलेला द्राव टोचला. त्याला तो आजार होऊन गेल्यावर दीड महिन्याने त्या मुलाला देवीचे जंतू असलेले इंजेक्शन दिले आणि अहो आश्चर्यम... त्या मुलाला देवीचा आजार झाला नाही. त्यानंतर जेन्नरने आणखी २२ जणांवर पुन्हा हा प्रयोग करून पाहिला. त्यांनाही देवी झाल्या नाहीत. नंतर ही प्रक्रिया अनेकांवर करत १७९८ मध्ये जेन्नरने 'वेरियोला व्हॅक्सीन: कारणे आणि परिणाम' हा आपला प्रबंध सादर केला. काऊ पॉक्सला 'व्हॅक्सिनीया' म्हणत असल्याने, नंतर त्यावरून निघालेला उपचार म्हणजे व्हॅक्सीन, म्हणजेच लस हा शब्द प्रचलित झाला. मनाची आणि बुद्धीची कवाडे उघडी ठेवणाऱ्या एका डॉक्टरमुळे वैद्यकीय विश्वाला लसीचा एक अनोखा उपचार मिळाला आणि त्यातून आलेल्या लसीकरणामुळे पुढे देवीच्या आजारातून मानवजातीला कायमचे मुक्त होता आले.
आजमितीला अनेक प्रकारच्या लशी उपलब्ध आहेत. यात बालकांसाठी 

 •      बीसीजी- क्षयरोगासाठी
 •      एचआयबी  
 •      डीपीटी - त्रिगुणी लस (डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात)
 •      पोलिओ
 •      हिपॅटायटिस बी
 •      गोवर
 •      द्विगुणी लस (घटसर्प व धनुर्वात)

याशिवाय कांजिण्या, मेंदूज्वर, रोटाव्हायरस, एचपीव्ही, रुबेला अशाही लसी बालकांना, तरुण-तरुणींना दिल्या जातात. याशिवाय फ्लूसाठी इन्फ़्लुएन्झा, श्वानदंशामध्ये दिली जाणारी रेबीज लस या लशीदेखील वापरल्या जातात. आज भारतामध्ये पेंटाव्हॅलंट लस बालकांना दिली जाते. यामुळे बालकांचे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपिटायटिस बी आणि हिब (हिमोफीलस इन्फ्लूएन्झा टाईप बी) या पाच प्राणघातक रोगांपासून संरक्षण होते. भारतामध्ये डीपीटी (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आणि हेपिटायटिस बी) यांचा समावेश नियमित लसीकरण कार्यक्रमात या आधीच करण्यात आला आहे. यामध्ये हिब लस नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. एकत्रितपणे या समुच्चयाला ‘पेंटाव्हॅलंट’ असे संबोधण्यात येते.

रोगप्रतिकार कार्यप्रणाली
लस कशी काम करते हे समजून घेण्यासाठी, आजारात काय होते ते पाहावे लागेल. जिवाणू, विषाणू, एकपेशीय जीव, बुरशीसमान जीव अशा बाह्यजगातील आक्रमक जीवजंतू असतात. त्यांना रोगजंतू म्हणतात. जेव्हा मानवी शरीरावर हे रोगजंतू आक्रमण करतात त्याला संसर्ग (इन्फेक्शन) म्हणतात.     

आपल्या शरीरात या जंतुसंसर्गाशी लढा देण्यासाठी एक प्रणाली कार्यरत असते. त्याला इम्युन सिस्टीम किंवा रोगप्रतिकारक प्रणाली म्हणतात. ही प्रणाली संसर्गाशी लढण्यासाठी अनेक साधने वापरते.     

रक्तात तांबड्या आणि पांढऱ्या रक्तपेशी असतात. ऊती आणि अवयवांना ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य तांबड्या पेशी करतात. मात्र, पांढऱ्या पेशी रोगजंतूंच्या संसर्गाशी लढण्यामध्ये या पांढऱ्या पेशी प्रमुख कार्य करतात. मॅक्रोफेजेस, बी-लिम्फोसाईट्स आणि टी-लिम्फोसाईट्स हे पांढऱ्या पेशींचे काही प्रकार प्रतिकारशक्तीच्या प्रणालीत कार्यरत असतात.

 •      मॅक्रोफेजेस रोगजंतूंना गिळून टाकतात आणि पचवतात. काही रोगजंतू, तसेच मृत किंवा मरणासन्न पेशींना मॅक्रोफेजेस रक्तात तसेच सोडून जातात. 
 •      आक्रमक रोगजंतूंच्या काही भागांना अँटिजेन्स म्हणतात. ते आपल्या शरीराला घातक असतात. रोगप्रतिकारक प्रणाली त्यांची शहानिशा करून ओळखते आणि प्रतिपिंडे (अॅंटीबॉडीज) निर्माण करते. या प्रतिपिंडांना रोगजंतूंवर हल्ला करण्याचे संकेत रोगप्रतिकारक प्रणालीकडून दिले जातात.
 •      बी-लिम्फोसाईट्स या संरक्षक पांढऱ्या रक्तपेशी असतात. मॅक्रोफेजेसने मागे सोडलेली प्रतिजैवी प्रतिजैविके त्या निर्माण करतात.
 •      टी-लिम्फोसाईट्स या आणखी एका प्रकारच्या बचावात्मक पांढरा रक्तपेशी असतात. आधीच संक्रमित झालेल्या शरीरातील पेशींवर त्या हल्ला करतात.

शरीराला पहिल्यांदा रोगजंतूंचा सामना करावा लागतो, तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती जंतूशी लढण्यासाठी लागणारी सर्व साधने तयार करण्याचे, ते वापरण्याचे आणि प्रतिकाराचे कौशल्य शिकून घेते. याबाबतची पक्की स्मृती काही टी-लिम्फोसाईट्समध्ये कायमची ठेवली जाते. त्यांना स्मृती पेशी म्हणतात. शरीरामध्ये तेच रोगजंतू पुन्हा येतात, तेव्हा रोगप्रतिकार प्रणाली त्या अँटिजेन्सना ओळखते आणि बी-लिम्फोसाईट्स त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी प्रतिपिंड तयार करतात. ही प्रतिपिंडे लशीच्या निर्मितीत संशोधनाकरता वापरली जातात.

लस काय करते
 एखाद्या व्यक्तीला लस दिल्यावर त्यामध्ये असलेले कमी संख्येतील जिवंत, मृत किंवा अर्धमेले जंतू शरीरातील पांढऱ्या पेशींना एक रंगीत तालीम देतात आणि त्यामधून प्रतिपिंडे निर्माण होतात. ही टी-लिम्फोसाईट्सच्या स्मृतीत राखून ठेवली जातात. त्यानंतर जेव्हा कधी खरोखरच्या रोगजंतूंचा संसर्ग होतो आणि शरीरावर त्यांचे आक्रमण होते. त्यावेळेस या स्मृतीपेशी प्रतिपिंडे तयार करतात आणि रोगजंतूंचा पाडाव करतात. 

लशीचे घटक
लशीमध्ये रोगजंतू किंवा त्यांच्याशी संबंधित गोष्टी वगळता इतरही काही घटक असतात. त्यामुळे लस द्रवस्वरूपात काही ठराविक काळापर्यंत टिकून राहते. यात अॅडजुव्हन्टस्, स्टॅबिलायझर्स, फॉर्माल्डीहाईड वापरली जातात. मल्टीडोस व्हायल्समध्ये थिमर्सोल नावाचा रासायनिक घटक वापरला जातो.  
 

लस संशोधनाचे टप्पे
कोणतीही लस तयार करण्यापूर्वी त्या जिवाणू किंवा विषाणूचा पूर्ण शास्त्रीय अभ्यास केला जातो. त्या रोगजंतूच्या सर्व क्रिया-प्रक्रियांची पडताळणी केली जाते. त्यानंतर लस तयार करून प्रथम प्रयोगशाळेत जिवाणूंवर प्रयोग केले जातात. त्याला 'इनव्हिट्रो स्टडीज' म्हणतात. त्यानंतर उंदीर-ससा अशा प्राण्यांवर तसेच माकडांवर प्रयोग केले जातात. याला 'इनव्हिट्रो स्टडीज' म्हणतात. यामध्ये लशीचा सकारात्मक परिणाम दिसून आल्यास माणसांवरील प्रयोगांच्या पहिल्या टप्प्याला परवानगी मिळते. त्यात एकूण तीन टप्पे किंवा फेजेस असतात.  

 • फेज १ : यामध्ये पाच ते दहा व्यक्तींवर या लशीचा प्रयोग केला जातो. यात लशीचा रोगजंतू नष्ट करण्याचे कार्य आणि सुरक्षितता समजून येते आणि परिणामकारक डोस ठरवला जातो.
 • फेज २ : यामध्ये सुमारे १०० ते २०० व्यक्तींवर आणि क्वचित प्रसंगी एक हजार व्यक्तींवर लशीचे परिणाम पडताळले जातात. लस या सर्वांमध्ये सातत्याने तेवढाच अपेक्षित परिणाम देते आहे ना? हे पाहिले जाते आणि लशीच्या साइड इफ्फेक्ट्सची नोंद केली जाते. जास्त गंभीर दुष्परिणाम असल्यास प्रयोग थांबवले जाऊ शकतात.
 • फेज ३ : यामध्ये हजारो लोकांवर व्यापक स्वरूपात प्रयोग केले जातात. यामध्ये निरनिराळ्या वंशाच्या, वर्णाच्या, वयाच्या निरोगी स्त्रीपुरुषांचा समावेश केलेला असतो. यात लशीच्या उपयुक्ततेचे आणि दुष्परिणामांचे अनुभव सर्वेक्षणात नोंदवले जातात. यामध्ये क्वचित प्रसंगी उद्‌भवणारे दुर्मीळ साइड इफेक्टसुद्धा पाहिले जातात.
 • फेज ४ : तिसऱ्या टप्प्यानंतर लस बाजारात आणली जाते किंवा निरनिराळ्या देशात ती देण्याचे कार्य सुरू होते. यामध्येही सर्वेक्षण सुरू ठेवतात. लशीचे आधी लक्षात न आलेले दुष्परिणाम, जंतूंचे बदललेले स्वरूप याकडे लक्ष पुरवले जाते. अनेकदा या टप्प्यातदेखील लशीच्या स्वरूपात महत्त्वाचे बदल करून ती उपलब्ध केली जाते.      

लशींचे प्रकार 

 •      लशींच्या निर्मितीनुसार त्यांचे विविध प्रकार पडतात. 
 •      जिवंत सूक्ष्म जिवाणू किंवा विषाणू असणाऱ्या लशी. 
 •      रोग संक्रमण क्षमता कमी करण्यात आलेल्या सूक्ष्म विषाणू किंवा
 •       जिवाणूंपासून निर्मिती केलेल्या लशी. 
 •      मृत सूक्ष्म जिवाणू/विषाणूंपासून केलेल्या लशी. 
 •      एकाच प्रकारचे सूक्ष्म जंतू असणाऱ्या लशी. 
 •      अनेक प्रकारचे सूक्ष्म जंतूंचे एकत्रीकरण केलेल्या लशी किंवा मिश्र प्रकारच्या        लशी.  

लशीचे दुष्परिणाम
 उपलब्ध असलेल्या सर्व लशी प्रदीर्घ संशोधन आणि सर्वेक्षण करून तयार केलेल्या असतात. त्यामुळे त्या देण्याबाबतीत सुरक्षित असतात. तरीही त्यात ताप येणे, इंजेक्शनची जागा सुजणे, अंगावर पुरळ येणे असे त्रास दिसून येतात. लस वापरण्यासंबंधी, ती साठवून ठेवण्यासंबंधी, काही पावडर स्वरूपात असलेल्या लशींमध्ये द्राव मिसळून ते तयार करण्यासंबंधी, लशीचे डोसेजेस, ती देण्याची पद्धत, ती देताना बालकांना सर्दी-ताप नसणे अशा गोष्टींच्या सूचना लशीबरोबर असलेल्या परिपत्रकावर दिलेल्या असतात. त्याचे पालन नीट न झाल्यास क्वचित प्रसंगी काही गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. 

सध्या उपलब्ध असलेल्या लशींमध्ये दोन ते दहा टक्के व्यक्तींना लस देऊनही आजार होतो असे लक्षात आलेले आहे. मात्र दोन किंवा तीन डोस असलेल्या लशींमुळे त्या रोगाविरुद्ध १०० टक्के संरक्षण मिळते. प्रचलित लशींना ९८ ते १०० टक्के संरक्षण मिळते. आज कोरोनाच्या जागतिक साथीमध्ये सर्वसामान्य लोक लस केव्हा येणार? आणि एवढा उशीर का होतोय? हे प्रश्न सातत्याने विचारत असतात. पण लस शोधून काढून ती सर्व जगासाठी उपलब्ध करणे एवढे सोपे काम नसते. आज जगामध्ये ३०० पेक्षा जास्त संशोधन संस्थांमध्ये लशींवर संशोधन सुरू आहे. त्यातील इंग्लंड, अमेरिका आणि चीनमधील संस्थांच्या लशी क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. अजूनही त्यांची परिणामकारकता आणि चाचण्यांचे फलित तपासून, त्या उपलब्ध व्हायला दोन अडीच महिने लागणार आहेत. पण त्या उपलब्ध होऊन जगात सगळ्यांचे लशीकरण व्हायला बराच काळ लागणार आहे. लस उपलब्ध होईपर्यंत आणि झाल्यावरही प्रतिबंधक उपायांना पर्याय नसेल. म्हणूनच सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, परिसराची, घरांची आणि कार्यालयांची स्वच्छता ठेवणे हेच ते प्रतिबंधक उपाय. त्यामुळे अजूनही लक्षात ठेवा... घरी रहा, सुरक्षित रहा, कोरोनामुक्त रहा.   

संबंधित बातम्या