मज हवी खरोखर शुध्द हवा 

डॉ. अविनाश भोंडवे 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

आरोग्य संपदा

वातावरणातले वाढते प्रदूषण हा आजकाल नेहमीच चर्चेचा विषय असतो. आपल्याला नेहमी वाटते, की आपल्या खोलीबाहेर, रस्त्यावर, बाजारात, चौकात खूप दूषित हवा असते आणि आपल्या घरात एकदम शुद्ध. पण गमतीची गोष्ट अशी, की कित्येकदा घरातल्या हवेची शुद्धता, बाहेरील वातावरणापेक्षा दोन ते पाचपट वाईट असते. त्यामुळे सध्या जागतिक बाजारात काही नवीन आणि आधुनिक पद्धतीची वायु-शुद्धीकरण तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे आली आहेत. त्यांच्या मदतीने आपण श्वास घेत असलेल्या हवेची गुणवत्ता मोजता येते आणि त्यातल्या यांत्रिक करामतींमुळे ती हवा अधिक शुद्ध करता येते. 

जागतिक स्तरावर झालेल्या निरनिराळ्या संशोधनांमधून सिद्ध झाले आहे, की वायू प्रदूषण मुख्यत्वे पेट्रोल, डिझेल, तेल, नैसर्गिक वायू, लाकूड आणि धुपासारख्या ज्वलनशील पदार्थांपासून तयार होणाऱ्या अतिसूक्ष्म कणांमुळे होते. या कणांमुळे मानवी शरीरातल्या एकूण एक अवयवाला हानी पोचू शकते. परंतु अमेरिकन लंग असोसिएशनच्या मते, घरातल्या फरशीची शोभा वाढवणारे गालिचे, भिंतीला दिलेले चमकदार रंग आणि साफसफाईसाठी वापरली जाणारी रसायने अशा गोष्टींच्या वापरानंतर कित्येक काळ त्यातले अतिसूक्ष्म कण हवेत तरंगत आणि रेंगाळत राहतात. हे अतिसूक्ष्म कणच घरातील हवेच्या शुद्धतेला बाधा आणतात आणि आरोग्याबाबत काही गंभीर समस्या निर्माण करतात. 

प्रदूषणाने होणाऱ्या आजारात अॅलर्जिक सर्दी, खोकला, दमा, सीओपीडीपासून कर्करोगापर्यंत अनेक आजार उद्‍भवू शकतात. 

साध्या डोळ्यांनी न दिसणारे हे अतिसूक्ष्म कण, मानवी आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाबच झाली आहे. त्यामुळे हे कण घरातल्या हवेतून गाळून काढणे आणि घरातील हवा स्वच्छ करणे ही आजच्या आधुनिक जीवनातली प्रमुख गरज मानली जाते. गरज ही शोधाची जननी असते, या न्यायाने घरातील चीजवस्तूंमुळे होणाऱ्या प्रदूषणातून मार्ग काढण्यासाठी अनेक देशात विविध संशोधने झाली. त्याचा परिपाक म्हणून घरातील अंतर्गत हवा शुद्ध करणारी अनेकविध उपकरणे शोधली गेली. व्यापार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, हवा शुद्ध करणाऱ्या उपकरणांचा बाजार दरवर्षी १० ते १२ टक्क्यांनी वाढत राहील आणि येत्या ३ वर्षांत म्हणजे २०२३ पर्यंत ३३ बिलियन डॉलर्सपर्यंत पोचेल. 

लोकांची गरज, वाढते प्रदूषण आणि व्यापारविषयक अंदाज या साऱ्याचा परिणाम म्हणून समाजाच्या सर्व स्तरातून अशा उत्पादनांना मागणी येऊ लागली. या निमित्ताने ग्राहकांच्या सततच्या वाढत्या मागणीला सामोरे जाणारी उत्पादने तयार करण्याची एक प्रकारची अनोखी शर्यतच या क्षेत्रातील उद्योगांमध्ये सुरू झाली. डायसन आणि मॉलेक्युल अशासारख्या या क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांच्या लक्षात आले, की लोक वाटेल ती किंमत मोजून अशी उपकरणे विकत घेतील. साहजिकच अशा उपकरणांची किंमत ७०० डॉलर्सपेक्षाही (रुपये ५२०००) जास्त ठेवली जाऊ लागली. वायूमधील प्रदूषके काढून टाकून ती नष्ट करणाऱ्या हवा शुद्धकरण साधनांची एक ‘हवा’ निर्माण झाली. मोठ्या शहरांतील मोठमोठ्या इमारतींमध्ये एक उंच मनोरा बांधून त्यात घराघरातील अशुद्ध हवा बाहेर काढून, मनोऱ्यातील यंत्रांद्वारे ती शुद्ध करून पुन्हा आत सोडणाऱ्या अवजड यंत्रप्रणालींचादेखील विचार करण्यात येऊ लागला. 

भावी काळात म्हणजे येत्या ३० वर्षांत, २०५० पर्यंत जगातील दोन तृतीयांश लोक शहरात राहतील असा लोकसंख्याविषयक तज्ज्ञांचा कयास आहे. नवीन शहरे तयार होतील आणि मुळात मोठ्या असलेल्या शहरांत लोक जास्तच दाटीवाटीने राहू लागतील. अशा शहरांत जागेचे भाव खूप जास्त असणार, त्यामुळे कमीत कमी जागेत अशी हवा शुद्धीकरण यंत्रे बसवावी लागतील हे काही उत्पादकांनी ओळखले. त्यामुळे कमीतकमी स्क्वेअर-फुटेज व्यापणाऱ्या नावीन्यपूर्ण यंत्रांची निर्मिती करण्याकडे या उद्योजकांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये इंटेलिप्युअर या कंपनीने घरातील भिंतीवर बसवायचे, उभ्या आकाराचे एक छोटेखानी उपकरण बाजारात आणले आहे. थोड्याच काळात अतिशय लोकप्रिय झालेल्या या ब्रँडच्या उत्पादकांतर्फे येत्या वर्षभरात आणखी अशीच उपकरणे विक्रीसाठी आणण्याची योजना आखली जात आहे. 

आजच्या जगात कोणत्याही बाजारात वस्तू दर्जेदार आणि किंमत कमी असेल तर त्याला जास्त उठाव मिळतो. याला अनुसरून ब्ल्यूअर आणि कोवे या दोन कंपन्यांनी १०० ते ५०० डॉलर्स (७००० ते ३५००० रुपये) किमतीची आणि अतिशय उच्च प्रतीची उपकरणे बाजारात आणली, आकाराने लहान आणि दिसायला स्टाइलिश अशी ही साधने भिंतीवर लावली किंवा शोकेसमध्ये ठेवली, तर घरातल्या अंतर्रचनेत पूर्ण सामावून जातात. ही उपकरणे म्हणजे वायु शुद्धीकरणाच्या बाजारपेठेमधला अलीकडच्या काळातील हा सर्वांत महत्त्वपूर्ण बदल ठरला. 
 
एअर-क्वालिटी सेन्सर - आपल्या घरातील हवेच्या शुद्धतेबाबत अनेक लोक जागरूक असतात खरे; पण घरातील हवा कितपत शुद्ध आहे, हे कसे कळणार? या प्रश्नाचे उत्तर मिळवायला हवेची शुद्धता मोजण्याचे उच्च तंत्रज्ञान अवगत असलेल्या संस्थेला पाचारण करावे लागते. त्या संस्थेचा कर्मचारी हातात एक मीटर घेऊन ती मोजायचा आणि आपल्याला त्याचा रिपोर्ट द्यायचा. या कामाला खर्चही तेवढाच वारेमाप यायचा. पण आता या कामासाठी काही कंपन्यांनी एक छोटे उपकरण आणले आहे. हे उपकरण आपल्या स्मार्टफोनला जोडायचे की बस्स, घरातील हवा कितपत शुद्ध आहे हे लगेच कळेल. याची किंमत आजमितीला १४ हजार रुपये आहे. पण या क्षेत्रात आणखी काही नवे स्पर्धक आले, की नक्की त्याची किंमत कमी होईल. 

  • • कैटेरा लेझर एग प्लस केमिकल - हे उपकरण आपल्या स्मार्टफोनला जोडले की हवे तेव्हा आणि हव्या त्या वेळी घरातील हवेतील दूषित घटकांचे पृथक्करण मोबाईलच्या स्क्रीनवर सादर करते. याची किंमत १७० डॉलर्स आहे. 
  • • एम-१० एअर क्वालिटी मॉनिटर - या यंत्रात तो स्मार्टफोनला न जोडता नुसती एक नजर टाकली तरी स्वतंत्रपणे हवेचे गुणधर्म दाखवत राहतो. साधारणतः ८० डॉलर्स किमतीला तो अमेरिकेत मिळतो. 
  • • इंटेलिप्यूर सेन्सर टेक या कंपनीने तयार केलेल्या एका उपकरणाने घरातल्या हवेबरोबर बाहेरच्या हवेचे गुणधर्मही समजतात. समजा घरातील हवेत बाहेरच्या हवेपेक्षा जास्त अशुद्धता असेल, तर तुम्हाला संदेश येतो, ‘तुमच्या बेडरूममध्ये पार्टिक्युलेट कणांचे जास्त प्रमाण आहे, परंतु बाहेरच्या हवेची गुणवत्ता चांगली आहे. तेव्हा, चला... खिडक्या उघडा.’ 
  • • इंटेलिजेंट एअरप्युरिफिकेशन - हवेच्या शुद्धतेचे मोजमाप करणारी प्रणाली विकसित करून ती गुगल नेस्टसारख्या इंटेलिजंट होम सिस्टीमबरोबर जोडता येईल, असेही प्रयत्न सध्या जोमाने सुरू आहेत. म्हणजे गुगल नेस्टमध्ये ज्याप्रमाणे घरातील टीव्ही, पंखे, फ्रीज, वॉशिंग मशीन,स्पीकर्स याबाबत चालू - बंद करायचे संकेत दिले जातात, त्याचप्रमाणे ही वायूशुद्धतेची प्रणालीदेखील गुगल नेस्टला जोडली जाईल आणि खिडक्या उघडायची किंवा बंद करण्याची सूचना देईल.   
  • • एचव्हीएसी सिस्टीम - हॉट व्हेंटिलेशन अॅण्ड एअरकंडिशन सिस्टीममध्ये घरातील हवा आवश्यकतेपेक्षा गरम झाल्यास एसी चालू होतो आणि ठराविक पातळीच्या खाली गेल्यास हवा गरम करण्याची प्रणाली सुरू होते. या यंत्राला हे हवा शुद्धतेचे यंत्र जोडून एक नवी समायोजित प्रणाली निर्माण करण्याची तयारी सध्या दृष्टिक्षेपात आहे. 

वेअरेबल साधने - वातावरणाच्या प्रदूषणापासून स्वतःला जपावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. कामासाठी रोजचा प्रवास करतानासुद्धा आपण एखादा घाणीने भरलेला विभाग असेल, तर रस्ता बदलतो. लॉबडेल आणि रीड या अमेरिकन उद्योजकांनी नेमके हेच हेरले आणि अंगावर परिधान करण्याची वेअरेबल साधने आणायची तयारी त्यांनी सुरू केली आहेत. कामाला जाताना आपल्या स्मार्ट फोनला हे उपकरण जोडले, की आजूबाजूच्या प्रदूषणाचा आपल्याला अंदाज येत राहतो आणि जर एखाद्या रस्त्यावर प्रदूषण जास्त असेल तर आपल्याला वेगळा रस्ता दाखवला जाईल. गुगल मॅपमध्ये ज्याप्रमाणे एखाद्या रस्त्यावर गर्दी असेल तर पर्यायी रस्ता दाखवला जातो, तसेच काही यामध्ये घडेल. 

याचा विशेष उपयोग शाळकरी मुलांना शाळेत जाताना आणि येताना होईल. ज्या रस्त्यावर जास्त प्रदूषण आहे ते रस्ते टाळून स्वच्छ वातावरणातून मुलांना शाळेत जाता-येता येईल. याबाबत २०१९ मध्ये लंडनमधील किंग्ज कॉलेजने एक विशेष संशोधन केले. वायु गुणवत्ता मोजणाऱ्या मॉनिटर्ससह सुसज्ज असलेल्या बॅकपॅकसह २५० शाळकरी मुलांना हा विशेष पोशाख दिला गेला. विविध प्रकारच्या ४९० दशलक्ष मोजमापांच्या ज्ञानाने सुसज्ज अशा मुलांनी घरून शाळेत आणि शाळेतून घरी असा तीन महिने प्रवास केला. या मधील सूचनांच्या साह्याने ३१ टक्के मुलांना लंडनमधील वायू प्रदूषणाचा धोका कमी व्हावा याकरिता, त्यांचा दररोजचा प्रवास बदलण्यात आला. 

या विविध संशोधनांनी दिसून आले, की हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करता आले तर आपण प्रदूषण निर्माण करणाऱ्या सवयी बदलतो. हवेची गुणवत्ता कमी करणारी उपकरणेसुद्धा बदलू शकतो. आज प्रदूषण नियंत्रणासाठी जागतिक स्तरावर अनेक प्रयत्न चालू आहेत. त्यांचे फलित येईल तेव्हा येवो, पण या प्रदूषण मापणाऱ्या उपकरणांनी आपले प्रदूषित आणि धूसर जीवन अधिक आरोग्यदायी होईल हे नक्की.

संबंधित बातम्या