जलोपचाराची जपानी तऱ्हा 

डॉ. अविनाश भोंडवे 
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

आरोग्य संपदा

प्रत्येक माणसाच्या अंतर्मनात आपण निरोगी राहावे आणि दीर्घायू व्हावे अशी अपरंपार इच्छा असतेच. आरोग्य टिकावे आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रत्येक जण जमेल तसा आणि जमेल तेवढा प्रयत्न करत असतो. दीर्घायू होणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात मनातली ही इच्छा साकार करण्यासाठी प्रयत्न करणे जमत नाही. त्यामुळे फारसे कष्ट न घेता आणि चटपट साध्य होईल असे काही आरोग्याबाबत असेल तर त्यावर अनेकांच्या उड्या पडतात. 

जन्म आपल्या हातात नसतो, पण मृत्यू कोणाला चुकत नाही. अगदी सकाळी भेटलेला धडधाकट मित्र हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक जातो. बातमी येते आणि सगळेच जण चकित होतात. आजच्या काळात हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब या आजारांचा विळखा घट्ट होत चालला आहे. 

जगण्यातला संघर्षही कोणालाही चुकलेला नाही. पण तो करताना आपले आयुष्य जास्तीत जास्त आरोग्यवान, दीर्घायुषी कसे होईल, आनंदी कसे असेल याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. मृत्यूचे भय, भीषणता, दैन्य, दुःख वाटू नये अशी जीवनाची अखेर आखता येते. मनाचा पक्का निर्धार केला तर निरामय अशी जीवनाचे नियोजन करता येते. 

बहुतांश चाकरमानी, सुशिक्षित मंडळी, नोकरी करणारे बडे साहेब, लहानमोठे स्वयंरोजगारवाले, डॉक्टर, वकील, इंजिनीअर लोक, आपापल्या परीने विमा, मुदत ठेवी, भविष्यनिर्वाह निधी, रोख रक्कम, दागदागिने इत्यादी स्वरूपात उद्याची बेगमी करून ठेवतात. पण आपल्या प्रकृतीच्या स्वास्थ्याचा, निरोगी जीवन मिळविण्याकरिता करावयाच्या यम-नियमांचा विचार फार उशिरा म्हणजे पन्नाशी-साठीनंतर सुरू होतो. तोपर्यंत काही प्रमाणात उशीर झालेला असतो. त्याकरिता सुजाण लोकांनी अगोदरपासून पुढील विचार दिशा वाचून आपणास लागू पडतील अशा गोष्टी अमलात आणल्या तर ‘नाबाद शंभर’ आकांक्षा करावयास हरकत नाही. 

जपानी वॉटर थेरपी 
आयुष्याचे शतकवीर आणि सुपरसेंटेनेरियन लोक जगात सर्वाधिक जपानमध्ये आहेत. त्यामुळे जपानी लोकांनी दीर्घायुषी होण्याची कला आत्मसात केली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. जपानी लोकांच्या दीर्घायुष्याची जी रहस्ये आहेत, त्यातील एक म्हणजे त्यांची  वॉटर थेरपी आहे, असे सांगितले जाते. 

या पद्धतीत दररोज सकाळी उठल्यावर न चुकता उपाशीपोटी, तीन ते चार ग्लास कोमट पाणी पिणे. ही वॉटर थेरपी पारंपरिक जपानी औषधोपचारांचा एक प्रकार मानला जातो. याला विज्ञानाचा पाया आहे असे या पद्धतीचे पुरस्कर्ते ठामपणे सांगतात. जागे होताच पाणी प्यायल्याने पचनसंस्था उत्तम राहते आणि त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते असे जपानी लोक मानतात. या जपानी वॉटर थेरपीमुळे निरंतर आरोग्याचे वरदान आपल्याला लाभते यावर त्यांचा विश्वास आहे. 

वॉटर थेरपीचे टप्पे

 • जपानच्या या जलोपचाराचे काही महत्त्वाचे टप्पे सांगितले जातात. त्यांचे नियमितपणे आणि सातत्याने अनुसरण केल्यास आरोग्याच्या दृष्टीने इष्ट फायदे मिळतात. 
 • सकाळी उठल्यावर सर्वात प्रथम, अगदी दात घासण्यापूर्वी, पूर्ण उपाशीपोटी, चार ते सहा ग्लास कोमट पाणी प्यावे. प्रत्येक ग्लास १६० ते २०० मिलीलीटर पाण्याने भरलेला हवा. 
 • चवीसाठी त्यात लिंबू पिळून टाकावे. पण लिंबू वापरलेच पाहिजे असे अजिबात नाही. काही जणांना लिंबाच्या पाण्यामुळे छातीत जळजळ होते. लिंबातल्या आम्लतेमुळे दातांची झीज होऊ शकते. 
 • जर एका वेळी ४ ते ६ ग्लास पाणी पिताना पोट डब्ब झाल्यासारखे वाटत असेल, तर थोड्या थोड्या अंतराने एक एक ग्लास करत पाण्याचा तो ४-६ ग्लासांचा हप्ता पूर्ण करावा. 
 • या पद्धतीत कोमट पाणी वापरले जाते, कारण याच्या उद्‍गात्यांच्या मते थंड पाण्याने आतड्यातील चरबी आणि तैलता घट्ट होते आणि पचण्यास जड होते. 
 • पाणी प्यायल्यावर लगेच दात ब्रश करावेत. 
 • त्यानंतर ४५ मिनिटे काहीही खाणे किंवा नाश्ता टाळावा. 
 • दुपारी आणि रात्री जेवणापूर्वी अर्धा तास एक ग्लास पाणी प्यावे. 
 • दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर दोन तास काहीही खाऊ किंवा पिऊ नये. 
 • वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी केवळ एक ग्लास कोमट पाणी प्यावे. या पाण्याचे प्रमाण त्यांनी हळूहळू वाढवत न्यावे. 
 • जपानी पेयजल पद्धतीचे काही आरोग्यदायी फायदे सांगितले जातात. 

त्वरित होणारे फायदे

 1. हेल्थलाईन या आरोग्यपत्रिकेत नमूद केल्यानुसार या जपानी जलोपचाराचे काही फायदे थोड्या दिवसात जाणवायला सुरुवात होते. 
 2. केवळ दहा दिवसात बद्धकोष्ठतेची त्रासदायक लक्षणे दूर होऊ लागतात. 
 3. एका महिन्यात टाइप-२ मधुमेह आणि उच्च रक्तदाब काही प्रमाणात कमी होऊ लागतो. 
 4.  सहा महिन्यांच्या कालावधीत कर्करोगाच्या त्रासामध्ये सुधारणा होते. 
 • वजन कमी होणे - दिवसातून बऱ्याच वेळा भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे  प्रमाण योग्य राहते. आणि डिहायड्रेशनची काळजी घेतल्यामुळे साखरयुक्त गोड पेयांपासून दूर राहणे सोपे होते. त्यामुळे साहजिकच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. जेवणापूर्वी ग्लासभर पाणी प्यायल्याने अतिरिक्त खाणे टळते. प्रत्येक जेवणानंतर दोन तास न खाण्याची सक्ती असल्याने जेवल्यावर भूक नसताना अकारण चरणे कमी होते. त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज प्रतिबंधित होतात. या दोन्ही कारणांमुळे रक्तातील साखर कमी राहते आणि वजनही नियंत्रणात राहते. 
 • चयापचय क्रिया - पाणी पिण्यामुळे अन्नाचे पचन लवकर होण्यास मदत होते. ज्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा पक्क्या असतात अशांना अन्नपचन होऊन वेळेवर पोट साफ होऊ लागते. पाण्याच्या सेवनाच्या या जपानी पद्धतीमुळे चयापचय क्रिया २४ टक्क्याने वाढते असे सिद्ध झाले आहे. 
 • रोगप्रतिकारशक्ती - या पद्धतीत पाणी नियमितपणे आणि आवश्यक त्या प्रमाणात प्यायले जाते. त्यामुळे अन्नपचनाच्या क्रियातून निर्माण होणारे, शरीराला अनावश्यक असलेले दूषित पदार्थ शरीराबाहेर उत्सर्जित होतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक उत्साह वाढतो. याचा उत्तम परिणाम शरीरातील लसिका प्रणालीच्या संतुलनावर होऊन प्रतिकारशक्ती वाढते. 
 • मेंदूची तरतरी - मानवी मेंदूच्या पेशीत ७५ टक्के पाणी असते. एक ग्लास पाणी प्यायल्याने मेंदूच्या परिशीलन करण्याची गती १४ टक्क्यांनी वाढते. मेंदूतील संदेश नियंत्रण विद्युत प्रवाहाने होते. हा प्रवाह मज्जापेशीतील द्रव पदार्थांमुळे होत असतो. नियमित आणि भरपूर पाण्यामुळे तल्लखपणा, एकाग्रता, कल्पकता, सर्जनशीलता, स्मरणशक्ती वृद्धिंगत होते. 
 • त्वचेचे आरोग्य - पाण्याचे प्रमाण योग्य राहिले तर त्वचा टवटवीत राहते. चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. त्वचा निरोगी राहते. 
 • डोकेदुखी - अनेकदा सकाळी उद्‍भवणाऱ्या डोकेदुखीचे कारण डिहायड्रेशन असते. या जलोपचाराने डोकेदुखी होण्याचे प्रमाण खूप कमी होते. 
 • मूत्रपिंडाचे आरोग्य - पाणी योग्य प्रमाणात प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार विशेषतः किडनी स्टोन्स, युरिनरी इन्फेक्शन्स कमी होतात. 
 • मासिक पाळीतील समस्या - मासिक पाळीमध्ये पोट दुखण्याचा त्रास असेल तर कोमट पाणी प्यायल्याने आराम मिळतो. खरेतर या काळात होणाऱ्या वेदना मासपेशी ताणल्या गेल्यामुळे होतो. कोमट पाणी प्यायल्याने आराम मिळतो. 
 • भूक वाढते - भूक न लागण्याची समस्या रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने कमी होते. वेळेवर आणि उत्तम भूक लागू शकते. 
 • सांधे दुखणे - आजच्या धकाधकीच्या जीवनात सकाळी उठल्यावर अंग मोडून गेल्यासारखे वाटते. हा त्रासही या जलोपचाराने सांध्यातील स्नायूबंधांमध्ये लवचिकता येऊन कमी होतो. 

या सर्व फायद्यांमुळे शरीरातील विविध संस्था उत्तम राहतात आणि त्यामुळे ही वॉटर थेरपी अनुसरणारे लोक शतायुषी बनतात असा या जपानी लोकांचा दावा आहे. जॅपनीज मेडिकल सोसायटी या अधिकृत संस्थेच्या मते अनेक प्रकारच्या जुन्या आणि नव्या आजारांवर ही वॉटर थेरपी १०० टक्के उपयुक्त आहे. या संस्थेच्या अधिकृत दाव्यानुसार या पद्धतीमुळे डोकेदुखी, अंगदुखी, हृदयविकार, सांधेदुखी, छातीत धडधडणे, अपस्माराचे झटके, अतिरिक्त वजनवाढ, खोकला, दमा, क्षय रोग, मेनिनजायटिस, मूत्रपिंडाचे आणि मूत्रसंस्थेचे आजार, उलट्या, जठराची सूज, जुलाब, मूळव्याध, मधुमेह, बद्धकोष्ठता डोळ्यांचे आजार, गर्भाशयाचे कर्करोग, मासिक पाळीचे त्रास, आणि नाक-कान-घशाचे आजार बरे होतात. 

आक्षेप 
मात्र या पद्धतीबाबत वैद्यकीय क्षेत्राकडून काही आक्षेप आहेत. 

 1. या संपूर्ण पद्धतीच्या फायद्यांबाबत कोणतेही शास्त्रीय संशोधन अधिकृतरीत्या झालेले नाही. 
 2. पाणी पिण्याने फार तर बद्धकोष्ठता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मूळव्याधीमध्ये फरक पडेल, तसेच मूतखडे निर्माण होणे काही प्रमाणात कमी होईल. 
 3. मधुमेह, कर्करोग, मेंदूचे आजार यांच्यामध्ये केवळ पाणी पिऊन सुधारणा होणार नाही. 
 4. पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन कमी होईल, पण या साऱ्या आजारांना औषधोपचार घ्यावा लागतोच. अन्यथा ते आजार गंभीर स्वरूप धारण करतील. 

माणसाची निरामय होण्याची आणि दीर्घायुषी होण्याची मनीषा अपरंपार आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या उपचारपद्धती मध्येच डोके वर काढतात आणि हातचे सोडून पळत्यापाठी लागल्यासारखे लोक त्याच्या मागे लागतात. पण त्यांना शास्त्रीय आधार नसतो. 
    
आधुनिक वैद्यकशास्त्र अनेक आजारांवर उपाय शोधत असते. त्यामुळेच तर उद्‍भवणाऱ्या गंभीर रोगांवर खात्रीशीर उपाय करून त्या रुग्णाची आयुर्मर्यादा वाढवली जाते. पण योग्य वेळी घेतला जाणारा समतोल चौरस आहार, नियमितपणे व्यायाम, पुरेशी विश्रांती, व्यसने टाळणे, नियमितपणे आरोग्याची तपासणी करणे हेच दीर्घायू होण्याचे खरे उपाय आहेत. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय नागरिकांची आयुर्मर्यादा केवळ ३८ वर्षे होती, आज २०२० मध्ये ती सत्तरीच्या घरात येऊन पोचली आहे. हे दीर्घायुष्य नव्हे का? साहजिकच झटपट आणि पटपट मिळणाऱ्या सवंग उपायांच्या मागे न लागता, आरोग्यासाठी रोज थोडा वेळ दिला तर दीर्घायुष्य नक्की मिळते.

संबंधित बातम्या