कोरोना लसीकरण आणि त्यानंतर 

डॉ. अविनाश भोंडवे
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

आरोग्य संपदा

विषाणूने आपल्या जीवनात प्रचंड उलथापालथ केली आहे. दैनंदिन जीवन असो, धंदा-व्यवसाय असो, पर्यटन असो किंवा सभा-संमेलने असो; सारे काही अंतर्बाह्य ढवळून निघाले आहे. या महासाथीमुळे जीवनात झालेला हा बदल कुणालाही रुचलेला नाही. अशा परिस्थितीत आपल्या स्वतःच्या आणि आपल्या प्रियजनांच्या केवळ सुरक्षिततेसाठीच नव्हे, तर आपल्या कोरोनायुगाच्या पूर्वीच्या सुरळीत आयुष्याचा हरिओम करण्यासाठी सारे जग कोरोनाच्या लसींच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले आहे. 

दुर्दैवाने आपले आयुष्य आपल्याला कितीही सुरळीत व्हावेसे वाटले, तरी पुन्हा सारे काही पहिल्यासारखे होणार नाही हे नक्कीच. पण त्या ‘न्यू नॉर्मल’ आयुष्याची पहाट उगवण्यासाठी लसींचे संशोधन पूर्ण होऊन, त्या सुरक्षितपणे कोरोनाचा निर्बंध करण्यास समर्थ ठराव्या लागतील. पण यातल्या मुख्य तीन अडचणी म्हणजे - 

 • जगातील बहुतांश लोकांना पुरेल एवढे उत्पादन कसे होणार? 
 • त्यानंतर जगातील प्रत्येक व्यक्तीला ते मिळेल असे वितरण व्हायला लागणारा काळ किती लागणार? 
 • हे लसीकरण होताना त्यात बारीकसारीक असंख्य गोष्टींचे नियोजन कसे होणार? 

या तिन्ही समस्यांचा विचार केला तर पूर्ण कोरोनामुक्त सुरळीत जीवनाचा उषःकाल होण्यासाठी कदाचित आणखी एक-दोन वर्षे जातील हे नक्कीच. 

आजच्या घडीला एकूण २०९ लसी संशोधन होऊन विकसित होत आहेत. त्यातील १६५ लसी या प्रीक्लिनिकल ट्रायल्समध्ये आहेत. म्हणजे या लसींच्या प्रयोगशाळेतील चाचण्या सुरू आहेत. 

प्रीक्लिनिकल चाचण्या यशस्वीपणे पार करून मानवी चाचण्यांच्या मान्यतेपर्यंत ४४ लसी पोचल्या आहेत. यातल्या २१ लसी पहिल्या, १३ लसी दुसऱ्या आणि ८ लसी तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. २ लसींच्या मर्यादित वापराला त्या त्या देशातील संशोधन संस्थांकडून परवानगी मिळाली आहे. यामध्ये - 

 1. कॅनसिनो बायोलॉजिक्स या चिनी कंपनीने अॅकॅडमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायन्सेस या चीनच्या लष्करी संशोधन संस्थेबरोबर विकसित केलेली लस, मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. ९ ऑगस्टपासून सौदी अरेबियात त्याच्या अंतिम चाचण्या घेतल्या जात आहेत. परंतु त्यापूर्वीच त्यांनी त्या लसीचा चीनमध्ये वापर सुरू केला आहे. 
 2. रशियामध्ये तयार झालेली ‘स्पुटनिक ५’ ही लस मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरल्यावर त्यांनी ११ ऑगस्टला त्याचा रशियात वापर सुरू केला आहे. अशा अपुऱ्या चाचण्या असतानाही त्या लोकांना दिल्या जात असल्याबाबत जागतिक संशोधन संस्थांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र व्हिएतनामने या लसींच्या ५ ते १५ कोटी डोसेस घ्यायची तयारी दर्शवली आहे. 

वस्तुस्थिती लक्षात घेतल्यास ७८० कोटी संख्येच्या मानवजातीला कोरोनामुक्त करण्याचे आव्हान पेलून यशस्वी होण्यासाठी केवळ एकच लस पुरेशी ठरणार नाही, उलट या साऱ्या लसींचा वापर केला तरी कदाचित तो कमीच पडेल. शिवाय या लसी घेतल्यावर १०० टक्के लोकांना कोरोना पुन्हा होणार नाही याची खात्री नसल्याने, हे नियंत्रण समर्थपणे आणि कायमस्वरूपी होईल की नाही हादेखील प्रश्न आहेच. 

लसीनंतरची दुनिया 
येती काही वर्षे आपल्या आयुष्यात काही वेगळेच गडद रंग भरले जाणार आहेत. पण तरीही कोरोनाच्या या बहुचर्चित लसी आल्यावर हे जग नक्की कसे असेल? या जीवनातले  सार्वजनिक, व्यावहारिक, आर्थिक, राजकीय, वैद्यकीय, मानसिक आयुष्याचे कंगोरे कसे असतील याचे कुतूहल केवळ सर्वसामान्य व्यक्तींनाच नव्हे, तर जाणत्या तज्ज्ञांना आणि संशोधकांनासुद्धा आहे. 

या विषाणूची अंतर्रचना बदलून त्याचे म्युटेशन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लस आली, ती टोचून घेतली तरी कोरोना पुन्हा होणार नाही याची खात्री नाही. त्यामुळे ही लस एकदा घेऊन कार्यभाग साधला जाईल असे मुळीच नाही. ही लस पुनःपुन्हा घ्यायची गरज भासेल. कदाचित इन्फ़्लुएन्झाच्या लसीसारखी ती दरवर्षीदेखील घ्यावी लागेल. 

भारतासारख्या देशात लोकांची मनोभूमिका लस टोचून घेण्याची नसते, हे अनेकदा दिसून आलेले आहे. भारताला पोलिओमुक्त करण्यासाठी वीस वर्षे अथक प्रयत्न करावे लागले. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने एमआर व्हॅक्सिनेशनची मोहीम हाती घेतली होती. लहान वयातील मुलामुलींना गोवर आणि रुबेलाची लस मोफत देऊन त्यांचे भविष्यातील आरोग्य निरामय करण्यासाठी ही योजना होती. पण ठिकठिकाणी पालकांचा प्रचंड विरोध झाला. कदाचित कोरोनाच्या झळा मोठ्या स्वरूपात बसल्याने हा विरोध कमी होईल. पण जगाच्या कानाकोपऱ्यात ही लस प्रत्येकजण सहजासहजी घेईल याची मुळीच खात्री नाही. 

संपूर्ण लसीकरण झाल्यावरच जगातील लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी निर्माण होईल आणि हा आजार कदाचित नष्ट होईल. तोपर्यंत मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात  स्वच्छ धुणे, घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे या गोष्टी कटाक्षाने पाळतच राहाव्या लागणार आहेत. आजमितीला कोरोनाचा कहर शीगेला पोचला असूनही या सर्व प्रतिबंधक उपायांकडे कानाडोळा करणाऱ्या आपल्या जनतेकडून येती अनेक वर्षे हे नियम पाळले जातील याची मुळीच खात्री नाही. आजही क्लिनिकल सेटिंग्ज सोडता संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी मुखवटा घालणे हा आपल्या सामाजिक संस्कृतीचा भाग नाही हेच लक्षात येते. या बाबत भारतात क्रांतिकारक बदल घडवून आणावे लागतील. 

आरोग्यविषयक अशास्त्रीय संकल्पना हा मानवी जीवनाचा स्थायीभाव आहे. आजही तथाकथित रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी अनेक अशास्त्रीय औषधे, गोळ्या, काढे लोकांच्या गळ्यात मारली जात आहेत. यापुढच्या काळात अशा गोष्टी वाढतच जाणार हे नक्की. एचआयव्ही-एड्सच्या काळात औषधोपचारांच्या नावाखाली अशी जबरी फसवणूक करणाऱ्या खूप घटना घडल्या होत्या. 

आजही, ‘कोरोना हे एक षड्यंत्र आहे. डॉक्टर्स आणि सरकार यांची मिलीभगत आहे’ अशी बिनबुडाची वक्तव्ये करणारे लोक आहेत. त्यांच्या त्या वक्तव्यात तथ्य आहे असे समजणारा वर्गसुद्धा अस्तित्वात आहे. केवळ भारतीय जनतेतच नव्हे, तर असे अशास्त्रीय विचार मांडणारे असंख्य लोक अगदी युरोप-अमेरिकेतील तथाकथित उच्चशिक्षित नागरिकांतसुद्धा आढळून येतात. अमेरिकेत मध्यंतरी लहान मुलांना लस देऊ नये असा प्रचार करणाऱ्या अनेक जनसमूहांनी हाहाकार माजवला होता. कोरोनाच्या लसीकरणात अशा व्यक्ती लोकांची मते कलुषित करायला आणि येनकेन कारणेन प्रसिद्धी मिळवायला पुढे येतील अशी खात्री आहे. 

लस आणायची घाई? 
कोणत्याही आजाराची लस अस्तित्वात आणण्यासाठी चार-पाच वर्षे प्रदीर्घ प्रयत्न करावे लागतात. एचआयव्ही-एड्सची लस आज तीस-चाळीस वर्षे झाली तरी येऊ शकलेली नाही. तरीसुद्धा कोरोनाच्या जगद्व्यापी संकटात ही लस वेगाने विकसित करण्याचे प्रयत्न झाले. असंख्य समस्यांचा सामना करून आज कित्येक लसी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. 

मात्र, विज्ञान वेगाने पुढे सरकत असले, तरी लस वेगाने विकसित करण्याचा जागतिक दबाव सर्व संशोधकांवर आहे. परिणामतः ही लस बाजारात आणण्यासाठी कमालीची घाई केली गेली, ही वस्तुस्थिती आहे. जगाच्या वैज्ञानिक इतिहासात एवढ्या वेगाने आणि एवढ्या मोठ्या संख्येने लसींची निर्मिती कधीही झाली नव्हती. त्यामुळेच या लसींच्या कार्यक्षमतेबद्दल चिंतेचे वलय या तमाम संशोधकांमध्ये आहेच. या लसींची रोगजंतूंना कायमचा प्रतिबंध करण्याची क्षमता आणि लस दिल्यावर होणारे दुष्परिणाम किंवा तिच्यामुळे येणाऱ्या रिअॅक्शन्स, साईड इफेक्ट्स यांच्या चाचण्या व्यापक स्वरूपात केल्या जाणार नाहीत. साहजिकच लस दिल्यावर भविष्यात काय घडेल, ती कितपत उपयुक्त ठरेल, तिचे न तपासलेले कोणते दुष्परिणाम आढळून येतील, ते परिणाम मानवी आयुष्याला किती धोकादायक आणि गंभीर असतील अशा प्रश्नचिन्हांची टांगती तलवार या साऱ्यांच्या डोक्यावर तळपते आहे. 

ही लस देणाऱ्या डॉक्टरांनासुद्धा खात्री नसणार की ती कितपत उपयुक्त ठरेल, ती परत केव्हा घ्यावी लागेल आणि ती घेतल्यावर त्याचे कोणते दुष्परिणाम दिसतील? आज अनेक प्रकारच्या आजारांच्या प्रतिबंधासाठी अनेक लसी अस्तित्वात आहेत. पण तरीही त्या दिल्यावर त्यांच्या रिअॅक्शन्स येतातच. अनेकदा ती लस देणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कायद्याचा बडगा उपस्थित केला जातो. त्यामुळे ही लस घेताना डॉक्टरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत राहणारच आहे. ती दिल्यावर येणाऱ्या संभाव्य रिअॅक्शन्स बऱ्या करणाऱ्या औषधांची तजवीज डॉक्टरांना करून ठेवावी लागणार आहे. लस दिल्यावर रिअॅक्शन्स आल्यास उद्‍भवणाऱ्या कायदेशीर बाबी सांभाळण्यासाठी संमतिपत्रके बनवून घ्यावी लागतील. 

लसीकरणासाठी प्राधान्य 
भारत सरकारने कोरोनाचे लसीकरण मोफत करण्याचे धोरण जाहीर केलेले आहे. पण बाजारात तीन ते चार कंपन्यांच्या लसी विविध दरात उपलब्ध होण्याची खूप शक्यता आहे. सरकारी दवाखान्यांप्रमाणे खासगी दवाखाने आणि हॉस्पिटल्स यांनाही ती उपलब्ध होऊ शकतील. आजमितीला भारत बायोटेक कंपनीची लस १५ रुपयांना तर सिरम इन्स्टिट्यूटची लस २२५ रुपयांना उपलब्ध केली जाण्याच्या घोषणा झालेल्या आहेत. 

खरेतर लसीकरण करताना कोणत्याही नागरिकाचा त्यावर प्रथम हक्क हवा. पण लस घेणाऱ्यांची संख्या आणि लसीची उपलब्धता यातील तफावत क्रमाने साधावी लागेल. कारण लस उत्पादित होऊन त्यातील एकेक बॅच तयार होऊन तिचा पुरवठा होण्यात वेळ जाऊ शकतो. त्यामुळे लसीकरणामध्ये प्राधान्य द्यावे लागेलच. यामधील क्रम असा असावा - 

 • कोरोना रुग्णांवर उपचाराची आघाडी सांभाळणारे डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी. 
 • पोलिसदल. 
 • अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी - अग्निशामक दल, पाणीपुरवठा, वीजपुरवठा इत्यादी सरकारी सेवा, बँक कर्मचारी आणि मेडिकल स्टोअर्ससह खासगी सेवा देणारे डॉक्टर्स. 
 • कंटेन्मेंट झोन्स आणि हॉटस्पॉटमधील व्यक्ती, विशेषतः ज्यांना जुने आजार (कोमॉर्बिड कंडिशन्स) आहेत अशा व्यक्ती. 
 • सर्व कोमॉर्बिड आणि ज्येष्ठ नागरिक, गर्भवती माता, लहान मुले. 
 • कामकाजासाठी नित्य बाहेर पडायला लागणाऱ्या व्यक्ती, तरुण वर्ग. 
 • इतर सर्व नागरिक. 

लसीकरण शिबिरे 
व्यापक स्वरूपात हे लसीकरण होण्याच्या दृष्टीने लसीकरण शिबिरे घेतली जातील. त्याचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी आतापासूनच योजना आखणे आवश्यक ठरेल. मध्यंतरी स्वाईनफ्लू लसीकरण शिबिरांच्या नावाखाली होणारी भोंदू डॉक्टरांनी केलेली शिबिरे यावेळी होऊ नयेत यासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागेल. घरोघरी पत्रके वाटून, घरी येऊन आगाऊ पैसे घेऊन, खोट्या लसी देणारे महाभाग निर्माण होतात. जनतेची अशी फसवणूक होऊ नये यासाठी शासनाला विशेष काळजी घ्यावी लागेल. 

कोरोनाच्या लसीकरणाची शिबिरे सामाजिक संस्थांमार्फत खुल्या जागेत, शाळा-कॉलेजात, मोठ्या सभागृहात घेतली जाण्याची शक्यता आहे. सामाजिक संस्थांचा, तरुण मंडळांचा या पद्धतीच्या कार्यात नेहमी आढळून येणारा मोठ्या प्रमाणातला उत्साह पाहता अशी जाहीर सार्वजनिक शिबिरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या लसी संभाव्य रिअॅक्शन्स बाबतीत पूर्णपणे सुरक्षित नसल्याने अशी शिबिरे घेताना ती आयसीयुची सोय असलेल्या रुग्णालयांतच घ्यावीत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रशिक्षित नर्सेसनीच द्यावीत. जर खुल्या सार्वजनिक ठिकाणी ती घ्यायची असतील, तर तिथे सर्व तातडीचे उपचार उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका उपलब्ध असाव्या लागतील आणि जवळच्या आयसीयु असलेल्या रुग्णालयांना त्यांनी शिबिराआधीच संभाव्य उपचारांची कल्पना दिलेली असावी लागेल. 

लसीकरण करताना एका व्यक्तीला जरी त्रास झाला आणि काही दुर्दैवी घटना घडली तर संपूर्ण लसीकरण मोहिमेला मोठा फटका बसू शकतो. अशा वेळी लोकांचा प्रक्षोभ तर होतोच, पण या घटनाची वार्तांकने भडक स्वरूपात मीडिया आणि प्रेसमध्ये येतात. परिणामतः पूर्ण मोहीम अयशस्वी होऊ शकते. पोलिओ आणि गोवर लसीकरणात अशा घटना अनेकदा घडलेल्या आहेत. 

या रिअॅक्शन्सची कारणे लसीची साठवण आणि परिवहन (स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट) शास्त्रीयदृष्ट्या काळजी काटेकोरपणे न घेतल्यानेही होत असते. कोणतीही लस ही २ ते ८ अंश सेंटीग्रेड (३६ ते ४६ अंश फॅरनहाइट) या तापमानात रेफ्रिजरेटरमध्ये साठवावी लागते. ती दवाखान्यात किंवा शिबिरात नेताना याच दरम्यानच्या तापमानाची शीतसाखळी सांभाळावी लागते. अन्यथा लसीची उपयुक्तता तर नष्ट होतेच पण ती दिल्यावर दुष्परिणामही होतात. यासाठी लसीबरोबर तिचा साठा आणि पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी शीतसाखळीसाठी आवश्यक असलेल्या बाटल्या, कुंड्या, स्टॉपर्स आणि कोल्डपॅकेट्स तितक्याच प्रमाणात उपलब्ध कराव्या लागतील. या लसींचा पुरवठा दूर अंतरावर करताना या पद्धती सांभाळणाऱ्या विशेष वाहनांचा वापर करावा लागेल. त्यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात करावी लागेल. 

काही लसी पावडरच्या स्वरूपात येतात, त्यात लसीबरोबर दिलेले द्रावणच वापरून ती बनवावी लागते आणि लगेच द्यावी लागते. हे द्रावण न वापरता डिस्टिल्ड वॉटर वापरल्याने अनेकदा गंभीर त्रास होतात. कोरोनाच्या काही लसी अशा पावडर स्वरूपात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबतीत काळजी घेणे गरजेचे ठरेल. 

अनेकदा लस ही पाच किंवा दहा डोसेस एकत्र असलेल्या बाटलीमध्ये (व्हायल) येतात. अशा लसी एका वेळी द्याव्या लागतात. म्हणजे पाच डोसेस असतील तर एकापाठोपाठ त्या पाच जणांना टोचाव्या लागतात. त्या तशा न देता एक डोस आत्ता दिला, दुसरा दोन तासांनी दिला, तिसरा दुसऱ्या दिवशी दिला, असे केल्यासही लसीची उपयुक्त परिणामकारकता संपते आणि गंभीर घटना घडू शकतात. 

कोरोना विषाणूची जागतिक साथ आणि त्यात होरपळणारे जग ही एक प्रदीर्घ कादंबरी आहे. यातील काही प्रकरणेच फक्त आपण उलगडली आहेत. भविष्यात अजून किती प्रकरणे उद्‍भवतील आणि पाने चाळावी लागतील याची कल्पना कोणालाच नाही. सध्या हे कोरोना प्रतिबंधक लसीचे प्रकरण आपण सुरू केले आहे. भविष्यात त्यात काय घटना घडतात याची उत्सुकता आणि एक अनामिक भीती सर्वांच्याच मनात आहे.

संबंधित बातम्या