वृद्धत्वातील आरोग्य  

डॉ. अविनाश भोंडवे 
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

आरोग्य संपदा

सुमारे तीन लाख पिढ्यांपूर्वी, मानव प्रजाती चिंपांझी किंवा मानल्या गेलेल्या अन्य पूर्वजांपासून उत्क्रांत झाली. त्याबरोबरच मानवाचे आयुर्मान त्याच्या शेपूटवाल्या पूर्वजांपेक्षा दुपटीने वाढले. अगदी गेल्या २०० वर्षांचा विचार केला, तर १८२० या वर्षापेक्षा आज माणसाचे आयुष्यमान दुपटीने वाढलेले आढळते. प्राणी जगतात, माणूस ही एक दीर्घायुषी प्रजाती मानली गेली आहे. जागतिक आरोग्य घटनेच्या मते (डब्ल्यूएचओ) सन २००० ते २०५० या दरम्यान, जगातील साठ वर्षांवरील व्यक्तींच्या लोकसंख्येचे प्रमाण सुमारे ११ टक्क्यांवरून २२ टक्के होईल. 

मानवी आयुर्मर्यादा वाढत चालली आहे, त्यामुळे मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातल्या पूर्वीच्या काळात वृद्धावस्थेसंबंधाने जे अनेक समज आणि गैरसमज होते, ते कालबाह्य होऊन चुकीचे ठरताना दिसत आहेत. विशेषतः शारीरिक व्यायाम, मानसिक ग्रहणशक्ती आणि विशेष म्हणजे लैंगिक क्षमतांबाबत अनेक मिथके आहेत. त्याबाबत साद्यंत विचार करणे गरजेचे आहे.. 

शरीर थकणे अपरिहार्य असते 
वय जसे वाढत जाते, तसे आपले शरीर थकत जाते. आयुष्याची अनेक दशके अथक कार्य करणाऱ्या शरीरातील हाडे, स्नायू, प्रत्येक अवयवातील पेशी हळूहळू झिजत जातात. मात्र शरीर पूर्ण कधीच झिजत नाही. शरीराची ही झीज काही प्रयत्नांनी मंदावता येते. सरत जाणाऱ्या शरीरातील जोम बऱ्याच अंशी टिकवून ठेवता येतो. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, अगदी वार्धक्यातही नियमित व्यायाम केला आणि आहाराकडे अगदी विशेष लक्ष दिले तर वृद्धापकाळात उद्‍भवणाऱ्या अनेक शारीरिक समस्यांना प्रभावीपणे सामोरे जाता येते. वृद्धांमध्ये सर्वसामान्यपणे आढळणारी शारीरिक कमजोरी, मेदवृद्धी, उच्च रक्तदाब, हाडे ठिसूळ होणे अशा विकारांवर विजय मिळवता येतो. 

संशोधकांच्या मते, ''आता काय आमचे वय झाले'' असे म्हणून आपल्यामध्ये शारीरिक दोष निर्माण होऊ नये, यादृष्टीने प्रयत्न न करणाऱ्यांमध्ये ते दोष हमखास उत्पन्न होतात. म्हणजेच स्वतःच्या शारीरिक कार्याबद्दल असलेल्या अपेक्षांचे सकारात्मक नियोजन केले तर वृद्धत्वात तंदुरुस्ती आणि आरोग्य टिकवता येते. याबाबत काही संशोधने प्रसिद्ध आहेत. 

एका वैद्यकीय सर्वेक्षणामध्ये, १४८ वयस्कर व्यक्तींचे वय, जीवनशैली आणि त्यांच्या आरोग्याच्या सामान्य अपेक्षांबद्दल पाहणी केली. त्यांनी असा निष्कर्ष काढला, की वृद्धत्वामधील स्वतःच्या अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांमधील शारीरिकदृष्ट्या सक्रिय जीवनशैली स्वीकारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. साहजिकच आपण म्हातारे झालो म्हणून शारीरिक हालचाली थांबवून फक्त आराम करणाऱ्या व्यक्तींमध्ये हमखास अनेक आजार डोके वर काढतात. 

दुसऱ्या एका संशोधनात वय झाल्यावर आता आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे असे मानून त्याप्रमाणे जीवनशैली बदलणाऱ्याचे आरोग्य उत्तम राहते. 

आणखी एका संशोधनात, अधिक सकारात्मक आत्मधारणा असणारी वृद्ध व्यक्ती, त्याच्या २३ वर्षांपूर्वीच्या वयातील शारीरिक पात्रता मिळवण्याचा प्रयत्न करतात, ते इतर लोकांपेक्षा ७.५ वर्षे जास्त जगतात. 

थोडक्यात, सक्रिय राहणे, योग्य खाणे आणि सकारात्मक दृष्टिकोन राखणाऱ्या वृद्धांमध्ये शारीरिक दोष कमी आढळतात.

वृद्धांनी व्यायाम करू नये 
बरेच लोक असा विचार करतात की त्यांनी वृद्धत्वामध्ये पदार्पण केले की व्यायाम करण्यात काहीच हशील नसते. त्यांना वाटते, त्याने कोणताही फायदा होणार नाही. हे आणखी एक मिथक आहे. 
एका संशोधनात, संशोधकांनी ६० ते ८० वयोगटातील १४२ प्रौढांकडून ४२ आठवडे नियमित वजन उचलण्याचा व्यायाम करून घेतल्यावर असे आढळले, की व्यायामामुळे त्यांच्या स्नायूंची  
शक्ती, स्नायूंचा आकार आणि कार्यक्षमता १० ते १५ टक्क्यांनी वाढली. अशा नियमित व्यायामामुळे वृद्धत्वात होणाऱ्या अल्झायमर, डिमेंशिया, ऑस्टियोपोरोसिससारख्या आजाराचा धोका कमी  होतो. 
परंतु साठीनंतर व्यायाम सुरू करायचा असेल तर डॉक्टरांकडून शारीरिक तपासणी करून घ्यावी आणि आपण कोणते व्यायाम किती प्रमाणात आणि किती वेळ करावा याबाबत सल्ला घ्यावा. व्यायामाबरोबर जवळच्या जवळ फिरायला जाणे, बागकामासारखे व्यायाम करणे, योगासने, प्राणायाम आणि पीटीचे व्यायाम अशा शारीरिक हालचाली करणाऱ्या गोष्टी नक्की कराव्यात. 

वृद्धांना कमी (किंवा जास्त) झोपेची आवश्यकता असते - काही लोकांना खात्रीने वाटते की वृद्धांना तरुणांपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असते. बहुधा त्यांच्या कुटुंबातले ज्येष्ठ सतत डुलक्या घेताना त्यांना दिसत असतात. तर काही जणांना वाटते की वृद्धांना कमी झोपेची आवश्यकता असते, त्यांना वयस्कर लोक सकाळी लवकर उठलेले आढळत असतात. 
या मिथकांचे उत्तर तसे कठीण आहे, कारण त्यात अनेक घटकांची गुंतागुंत आहे. मात्र हे निःसंशयपणे सत्य आहे की बहुसंख्य वृद्धांना अंथरुणावर पडल्यावर झोप लागायला थोडा-बहुत वेळ लागतो, शिवाय अनेकांना सलग झोप लागत नाही. थोड्या थोड्या वेळाने झोप मोडते आणि झोपेची स्थिती खंडित स्वरूपात असते. 

याचे कारण असे आहे, की आपली झोप शरीरातील एका अदृश्य घड्याळामार्फत एका लयीमध्ये नियंत्रित होत असते. याला सर्काडियन ऱ्हिदम म्हणतात. वयानुसार ही लय बिघडत जाते. त्याचा झोपेवर परिणाम होतो. शिवाय एखाद्या व्यक्तीची सर्काडियन लय बिघडली तर ती त्यांच्या शरीरातील इतर पैलूंवर विशेषतः हार्मोन्सवर परिणाम होऊन त्यांच्या झोपेची संगती बिघडते. 

सर्काडियन व्यत्यय सोडता अनेक वृद्ध व्यक्तींमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस आणि ऑस्टिओपोरोसिससारखे आजार असतात. या आजारांमुळे त्यांना झोपेतही अस्वस्थता जाणवते, त्याचा झोपेच्या तासांमध्ये आणि सलग झोप लागण्यावर प्रतिकूल परिणाम होतो.
काही विकारात श्वासाची क्षमता कमी होते झोपल्यावर किंवा आडवे झाल्यावर जास्त दम लागतो आणि शांत झोप लागणे दुरापास्त होते. उदा. सीओपीडी, कंजेस्टीव्ह हार्ट फेल्युअर यामध्येही झोप दुरापास्त होऊ शकते. अनेक वृद्धांना त्यांच्या अन्य आजारांसाठी बीटा-ब्लॉकर्स, ब्रॉन्कोडायलेटर्स, कॉर्टिकोस्टीरॉईड्स, डीकन्जेस्टंट्स आणि मूत्रप्रवृत्ती वाढवणारी डाययुरेटिक्स अशी औषधे असतात. त्यामुळेही झोपेमध्ये अडथळा येतो. 

अमेरिकेच्या सीडीसी या रोगनियंत्रण विभागाच्या मतानुसार, ६० ते ६५ वयोगटातील ज्येष्ठांना ७ ते ९ तास तर ६५ वर्षांच्या वरील वृद्धांना ७ ते ८ तास झोप आवश्यकच असते. पण या सर्व कारणांनी बिचाऱ्यांना डोळे मिटून असे शांत, सलग निद्रासुख घेण्याचे भाग्य प्राप्त होत नाही. 
मात्र त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट अशी की वृद्ध व्यक्ती तरुणांपेक्षा झोपेच्या कमतरतेला जास्त व्यवस्थित हाताळू शकतात. ‘जर्नल ऑफ स्लीप रिसर्च’मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे नमूद केले आहे की पुरेशी झोप न मिळाल्याने होणारे नकारात्मक परिणाम उदा. नैराश्य, वैचारिक गोंधळ, तणाव, राग, थकवा आणि चिडचिडेपणा तरुणांमध्ये जास्त आढळतात. वयस्कर व्यक्ती हे त्रास सहज हाताळू शकतात. 

हाडांचा ठिसूळपणा 
ऑस्टिओपोरोसिसमध्ये शरीरातील सर्व हाडे हळूहळू विरळ आणि कमकुवत होतात. जनसामान्यात असा एक पक्का गैरसमज आहे की हा त्रास फक्त स्त्रियांना होतो. पण हा समजसुद्धा चुकीचा आहे. ऑस्टिओपोरोसिसचा त्रास लिंग आणि वयातीत असतो. तथापि, वृद्ध व्यक्ती, गौरवर्णीय लोक आणि स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस जास्त आढळतो. 
आंतरराष्ट्रीय ऑस्टिओपोरोसिस फाउंडेशनच्या सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावर, ५० वर्षांवरील दर तीनापैकी एका स्त्रीला आणि दर पाचांपैकी एका पुरुषाला ऑस्टिओपोरोसिसचा विकार असतो. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसमुळे होणारी फ्रॅक्चर्स स्त्रियांप्रमाणे पुरुषांतही आढळतात. 
आणखी एक असा समज आहे की स्त्रियांमध्ये वयोमानानुसार ऑस्टिओपोरोसिस होणे अपरिहार्य असते. मात्र आंतरराष्ट्रीय ऑस्टिओपोरोसिस फाउंडेशनच्या सर्वेक्षणानुसार ५० वर्षांवरील दोन तृतीयांश स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस नसतो. 
वृद्धांमधील ऑस्टिओपोरोसिस आणि त्यामुळे होणारी फ्रॅक्चर्स टाळण्याकरता ५० वर्षाच्या वरील स्त्रीपुरुषांनी कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध असलेले पदार्थ खाण्याचा आणि नियमित व्यायामाचा सल्ला सर्व डॉक्टरांकडून दिला जातो. आवश्यक असल्यास कॅल्शिअम, ड जीवनसत्त्वाच्या गोळ्या किंवा इंजेक्शन्स दिली जातात. 

वय वाढते तसा मेंदू मंद होतो - वयानुसार मानसिक क्रिया आणि सतर्कपणा हळूहळू कमी होत जातो. मेंदूच्या शक्तींचा ऱ्हास होत जातो. याला संज्ञानात्मक घट किंवा ''कॉग्निटिव्ह डिक्लाईन'' म्हणतात. ही बाब खरी जरी असली तरी त्याबाबतीतील काही समज पूर्ण चुकीचे आहेत. 

वय वाढले की डिमेंशिया होतो - डिमेंशिया या आजारामध्ये स्मरणशक्ती, विचारशक्ती, नेहमीचे वागणे, दैनंदिन व्यवहार, स्वभाव आणि स्वतः स्वतःची रोजची कामे करणे यावर परिणाम होत जातो. व्यक्तीची स्मृती पुसट होत जाते. या आजाराची लक्षणे हळूहळू वाढत जातात. आजाराच्या शेवटी आजारी व्यक्तीचे जगणे हे पूर्णपणे परावलंबी म्हणजे इतरांच्या मदतीने होते. 
मेंदूला ग्रासणाऱ्या अशा विविध प्रकारच्या व्याधींच्या लक्षणांना आणि त्यांच्या परिणामांना एकत्रितपणे मिळून डिमेंशिया असे म्हटले जाते. 
डब्ल्यूएचओच्या मते वयानुसार डिमेंशिया होण्याचा धोका वाढतो; परंतु सर्व वृद्ध प्रौढांवर त्याचा परिणाम होत नाही. जगभरातील आकडेवारीनुसार वयाची साठी उलटलेल्या अंदाजे ७ ते ८ टक्के लोकांमध्ये हा त्रास जाणवतो. म्हणजेच साठीच्या पुढील ९२ टक्के लोकांना डिमेंशिया होत नाही. भारतात अंदाजे ४० लाख व्यक्तींना हा विकार आहे. 

संज्ञानात्मक घट झाल्याने डिमेंशिया होतो - हा समजसुद्धा चुकीचा आहे. संज्ञानात्मक घट झाल्याने डिमेंशिया होण्याची शक्यता असते, पण संज्ञानात्मक घट झाली म्हणजे डिमेंशिया होतोच असे नाही. याला पुष्टी देण्यासाठी अमेरिकेतील एका संशोधनाचा उल्लेख करावासा वाटतो. यामध्ये ७१ वर्षावरील २२.७ टक्के व्यक्तींमध्ये संज्ञानात्मक घट आढळली, पण त्यातील ११.७ टक्के व्यक्तींमध्येच डिमेंशिया होता. 

संज्ञानात्मक घट अपरिहार्य असते - वरील आकडेवारीमध्ये मानसिक आणि बौद्धिक क्रियांमध्ये मंदत्व आले, तरी डिमेंशिया होत नाही हे स्पष्ट होते. परंतु वृद्ध व्यक्तींमध्ये मानसिक मंदत्व दीर्घकाळ असूनही, संज्ञानात्मक घट होतेच असेही नसते. 

अल्झायमर असोसिएशनने डिमेंशिया आणि संज्ञानात्मक घट या दोहोंसाठी सुधारित जोखीम घटकांच्या पुराव्यांचे २०१५ मध्ये मूल्यांकन केले. वर्ल्ड डिमेंशिया कौन्सिलला सादर केलेला त्यांच्या अहवालात असे स्पष्टपणे नमूद केले आहे की ''वृद्ध व्यक्तींमध्ये संज्ञानात्मक घट होण्यासाठी अनेक जोखमीचे घटक (रिस्क फॅक्टर्स) असतात. त्यांची काळजी घेतली, ते घटक नियंत्रणात ठेवले तर वृद्धांमधील संज्ञानात्मक घट टाळता येते.'' 

या रिस्क फॅक्टर्समध्ये मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान, उच्च रक्तदाब, समतोल आहार आणि पुरेशी विश्रांती यांचा समावेश आहे. या गोष्टी टाळल्या किंवा आधीपासून असल्यास नियमित वैद्यकीय सल्ल्याने, जीवनशैली बदलून कडक नियंत्रणात ठेवल्या तर संज्ञानात्मक घट आणि डिमेंशिया टाळता येतो. 

उतारवयात धूम्रपान सोडण्यात काही अर्थ नाही - अनेक ज्येष्ठांच्या बोलण्यात येत असते, की त्यांच्या या वयात धूम्रपान सोडण्यात काही अर्थ नाही.पण या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. जागतिक स्तरावरील वैद्यकीय निष्कर्षानुसार, एखाद्याने आयुष्यात किती दिवस धूम्रपान केले आहे आणि आणि दिवसातून किती सिगारेटस ओढल्या होत्या, याचा सिगारेट सोडण्याशी संबंध जोडू नये. तरीही जेवढी जास्त वर्षे आणि जास्त प्रमाणात धूम्रपान झालेले असे, तेवढे ते सोडणे त्रासाचे जाते, पण अशक्य नसते. धूम्रपान सोडताच काही आरोग्यविषयक फायदे त्वरित मिळतात आणि काही दीर्घकालीन फायदे नंतर मिळू लागतात. पण लक्षात ठेवावे, की यासाठी कधीही उशीर झाला, आता या वयात सोडून काय उपयोग? असे समजू नये. 

वाढत्या वयात लैंगिक संबंध अशक्य असतात - काही लोकांचा असा पक्का समज असतो पन्नाशी-साठीनंतर लैंगिक क्षमता गमावली जाते. लैंगिक अवयव अकार्यक्षम बनतात. बऱ्याच प्रमाणात हेदेखील एक मिथक आहे. 

अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच निरोगी लैंगिक संबंध हे वैद्यकशास्त्रात शारीरिक आणि मानसिक आनंदासाठी आवश्यक मानले जातात. साठीपुढील स्त्री-पुरुषांना डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर निश्चित उपाय करता येतो. 

इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल प्रॅक्टिसमधील एका शोधनिबंधांनुसार वयाची साठी उलटल्यावर दहापैकी नऊ पुरुषात स्तंभन दोष नसतो. वृद्धत्वात निरोगी लैंगिक जीवन जगण्यात काहीच हरकत नसते. त्यात वेग नसतो, पण आवेग असू शकतो. तो दीर्घकाळ नसेल पण समाधान देण्याइतका असू शकतो. त्यातील वारंवारता कमी असली तरी पूर्ण अनुपस्थिती नसते. वृद्धापकाळात लैंगिक संबंधांची अभिव्यक्ती पुन्हा परिभाषित करण्याची गरज असते. अनेक आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकात वृद्धत्वातील लैंगिक संबंध शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक मानले गेले आहेत. 

थोडक्यात सांगायचे, तर वाढत्या वयाभोवतालच्या अनेक कथा या बहुतेक दंतकथा असतात. त्या वृद्ध व्यक्तींच्या अपरिहार्यतेवर केंद्रित असतात. वृद्ध व्यक्तींना असे वाटत असते, की त्यांचे आयुष्य दिवसेंदिवस असह्य, कंटाळवाणे, उत्कट आणि वेदनादायक होत चालले आहे. हळूहळू त्यांचे शरीर आणि आयुष्य धूळ खात पडणार असे त्यांना अपरिहार्यपणे वाटते. आरोग्यविषयक काही घटक वयानुसार कमी होऊ शकतात, परंतु ते होतातच आणि त्यांचे परिणाम प्रतिकूल होतात असेही नसते. ''अभी तो मै जवान हूँ'' असा वृद्धत्वाबद्दल सकारात्मक मानसिक दृष्टिकोन या वयातील शारीरिक आणि मानसिक बाबतीत निर्णायक ठरू शकतो.

संबंधित बातम्या