बायोटेररिझम- जैविक दहशतवाद

-डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

आरोग्य संपदा

आरोग्यसंपदाकोरोना विषाणूच्या जागतिक साथीचा उगम आणि प्रसार तसेच गेल्या दोन दशकांत सातत्याने उद्‌भवणाऱ्या नवनवीन विषाणूंच्या जागतिक साथींकडे एका वेगळ्या आंतरराष्ट्रीय चष्म्यातून पाहिले, तर जैविक युद्धाचा धोका ही बिनबुडाची भीती किंवा मिथक अजिबात नसून एक कठोर सत्य आहे असेच लक्षात येते.

गेल्या १५-२० वर्षांत, जगाला नव्याने ज्ञात झालेल्या आणि पुन्हापुन्हा डोके वर काढणाऱ्या कमालीच्या संसर्गजन्य असलेल्या रोगजनक विषाणूंमुळे होणारे साथीच्या आजारांचे उद्रेक पाहता, जैविक युद्धाची अस्त्रे (बायोटेररिझम एजंट) म्हणून अशा विषाणूंचा वापर होण्याचा धोका उघडउघड जाणवतो. बायोटेररिझम म्हणजे जीवाणू, विषाणू किंवा त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या विषारी द्रावांचा वापर करून, जगातील एखाद्या देशात किंवा मोठ्या भूभागातील लोकांमध्ये एखादा जीवघेणा आजार मुद्दाम पसरवून, तेथील मानवी जीवन नष्ट व्हावे यासाठी केले जाणारे कटकारस्थान असते.

एकविसाव्या शतकाला ‘जीवशास्त्र शतक’; म्हणून मानले जाईल असा अनेक शास्त्रज्ञांचा होरा आहे.  एखाद्या देशातील संशोधन संस्थेवर हल्ला करून तेथील संशोधन वापरून जैविक शस्त्रास्त्रे बनवणे किंवा ताब्यात घेणे दहशतवाद्यांना आजपर्यंत खूप अवघड होते. पण आजमितीला जीवाणू-विषाणूंच्या अंतर्गत असलेल्या जैविक आणि अनुवांशिक घटकांना आश्चर्यकारकपणे जलद आणि गहन पद्धतीने बदलून टाकणे तुलनेने सोपे झाले आहे. जैवआण्विक अभियांत्रिकी (बायोमॉलिक्युलर इंजिनिअरिंग) आणि अत्यंत प्रगत झालेले जैव-उत्पादन तंत्रज्ञान यामुळे हे सहज घडू शकते. साहजिकच बायोटेररिझमचा वापर करू इच्छिणाऱ्या दहशतवाद्यांना स्वतःच एखादी प्रयोगशाळा तयार करून असा जैविक दहशतवाद निर्माण करणे आता शक्य आहे.

इतिहासाकडे नजर टाकली, तर शत्रूच्या प्रदेशातील नदीत किंवा विहिरीत विषारी पदार्थ टाकणे, प्राण्यांचे मलमूत्र किंवा सडलेली मानवी प्रेते किंवा कुजलेले मृत प्राणी सोडणे असे प्रकार सर्रास होत असत. त्याची जागा आता एखाद्या नव्या विषारी जीवाणू-विषाणूचे संपृक्त द्रावण अन्नात, पाण्यात किंवा हवेत सोडणे यांनी घेतली आहे. एखादी छोटी परीक्षानळी भरून हे जीवजंतू शत्रूराज्यात सोडले तर काही तासात लाखोंच्या संख्येमध्ये माणसे मरू शकतात.

भारतातील संशयित घटना
जैविक युद्धाच्या धोक्याबाबत भारतीय  संरक्षण दलाचे वैद्यकीय तज्ज्ञ अनेक वर्षांपासून सजग आहेत. उदाहरणार्थ, १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान ईशान्य भारतातील स्क्रब टायफसचा उद्रेक, १९९४मध्ये सुरत परिसरात अचानक पसरलेला न्युमॉनिक प्लेग अशा काही साथींच्या बाबतीत तज्ज्ञांच्या मनात संशयाचे प्रश्नचिन्ह आहे. थोडक्यात, बायोटेररिझम म्हणजे माणसे, प्राणी किंवा वनस्पतींमध्ये जीवघेणे आजारपण किंवा मृत्यू होण्यासाठी व्हायरस, बॅक्टेरिया किंवा तत्सम रोगजनक जंतू मनुष्यहानीचा एक कट म्हणून वितरीत करणे.
निसर्गामध्ये एरवी सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या जीवजंतूमध्ये काही जैविक बदल केले जातात, त्यांची रोगाचा संसर्ग करण्याची क्षमता वाढवली जाते, उपलब्ध असलेली औषधे लागू होऊ नयेत अशाप्रकारे त्यांच्यात प्रतिरोध निर्माण केला जातो आणि वातावरणात अतिशय वेगाने पसरण्याची त्यांची क्षमता वाढवली जाते.

बायोटेररिझमची अस्त्रे
बायोटेररिझम अस्त्रांचे ए, बी आणि सी श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते. 

श्रेणी ए : सर्वोच्च-प्राधान्य असलेल्या या अस्त्रांमध्ये जनजीवनास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण करणारे जीवजंतू समाविष्ट असतात. एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ते सहजपणे पसरतात. त्यांच्या बाधेने होणारा मृत्युदर खूप जास्त असतो आणि त्याचे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.  या साथीमुळे लोक घाबरून जातात आणि सामाजिक जीवन विस्कळीत होऊन जाते. या जीवजंतूंना नियंत्रितकरायला आरोग्यखात्याला विशेष तयारी करावी लागते. आणि त्यासाठी सहसा पुरेसा अवधी मिळत नाही. यांची उदाहरणे पाहता-

 •   अँथ्रॅक्स (बॅसिलस अँथ्रासिस)- प्राण्यांमध्ये पसरणारा आजार
 •   बोटूलिझ्म (क्लॉस्ट्रिडीयम बोटूलिनम)- अन्नातून विषबाधा पसरवणारा आजार
 •   प्लेग, देवी, टूलारेमिया आणि इबोलासारखे व्हायरल हिमरेजिक फीवर्स,
 •   लासा, माचुपो सारखे एरिना व्हायरस, सार्स, मर्स, कोविडसारखे कोरोना व्हायरस हे येतात.

श्रेणी बी : यामध्ये आजाराचा प्रादुर्भाव तुलनेने थोडा कमी होतो, याची बाधा कमी लोकांना होते आणि मृत्यू पावणाऱ्याची संख्या मर्यादित असते. मात्र याचे निदान करणे थोडे कठीण असते आणि रोगांवर नजर ठेवणे आवश्यक असते.

यामध्ये येणाऱ्या रोगजनकात

 • ब्रुसेलोसिस हा श्वसनसंस्थेचा आजार, क्लॉस्ट्रीडीयम पर्फिन्जेन्स या हवेशिवाय जगणाऱ्या आणि कोष बनविणाऱ्या जंतूचे एप्सिलॉन नावाचे विषारी द्राव,
 • अन्नधान्यातून, माणसांच्या आहारातून मानवी सुरक्षिततेला आणि जीवाला धोक्यात आणणाऱ्या साल्मोनेला प्रजातीमधील  इश्चेरीया कोलाय, शिगेला हे जीवाणू,
 • ग्लांडर्स- हा घोड्यांना होणारा सांसर्गिक रोग असतो, त्यात घोड्याच्या जबड्याखाली सूज येते, घसा आणि नाक यांत जखमा होतात. 
 • मेलिओइडॉसिस, सीटाकोसिस, क्यू फीवर, हे जीवाणू,
 • राइसिनस कम्युनिस या जीवाणूचा एरंडेलाच्या बियांना संसर्ग होऊन त्यामधून पसरणारे रायसीन हे विष,
 • स्टॅफिलोकॉकल एन्टेरोटॉक्सिन बी,
 • टायफस फीवर,
 • मेंदूला सूज आणणारे अनेक प्रकारचे व्हायरल एनकेफेलायटीस
 • पाण्यातून पसरणारे कॉलऱ्याचे जीवाणू, क्रिप्टोस्पोरिडीयम 

श्रेणी सी : या तिसऱ्या सर्वोच्च प्राधान्य वर्गात नव्याने शोधले गेलेले विषाणू आणि जीवाणू येतात. भविष्य काळात यांची उपलब्धता, निर्मिती आणि प्रसार सुलभता सहजासहजी होत असल्याने यामध्ये असंख्य व्यक्तींना लागण होऊ शकते, त्यात अनेकांचा मृत्यू घडू शकतो आणि कित्येकजणांमध्ये कायमची विकृती निर्माण होऊ शकते. यामध्ये

 • निपाह व्हायरस
 • हांटा व्हायरस
 • सर्व औषधांना प्रतिरोध असणारा क्षयरोग (मल्टी ड्रग रेझिस्टन्ट) यांचा समावेश होतो.

नवीन ट्रेंड : भविष्यात हे जैविक दहशतवादी अशा सूक्ष्मजंतूंचे उत्पादन करून त्यांच्या शत्रूच्या नागरिकांच्या ठराविक शारीरिक संस्था आणि शारीरिक घटक दुबळे करू शकतील अशी शक्यता आहे. यांना शत्रूच्या एखाद्या विशिष्ट अवयवाला लक्ष्य करणारे ‘डिझाइनर पदार्थ‘ म्हणतात.  उदाहरणार्थ- हार्मोन्स,  न्यूरोपेप्टाइड्स, साइटोकाईन्स. त्याचप्रमाणे नगदी पिके नष्ट करणारे किडे, प्राणी आणि जीवजंतू यांचा समावेश असलेले ‘वांशिक बॉम्ब’ आणि परोपजीवी जैविक शस्त्रे आहेत.

लक्ष्य
अशा बायोटेररिझममध्ये दहशतवाद्यांचे उद्दीष्ट ही भरपूर लोकसंख्या असलेली महानगरे, मोठे शहरी समूह आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील जिल्हे असतात.  मात्र देशाचा कोणताही भाग याबाबतीत सुरक्षित मानू नये..

हल्ल्याचे तंत्र
जैविक हल्ल्याची पद्धत वापरल्या जाणाऱ्या अस्त्राच्या प्रकारावर अवलंबून असते.  मोठ्या लोकसंख्येला बाधित करायला, त्यांच्यावर लगेच परिणाम होण्यासाठी बंदिस्त भागांत, जिथे मोठ्या संख्येने लोक जमतात अशा ठिकाणी   ‘एरोसॉल यंत्रणा’ वापरली जाऊ शकते, उदा. मॉल्स, डीपार्टमेंटल स्टोअर्स, सिनेमा हॉल, सभागृहे, रेल्वे स्टेशन्स इत्यादी.
याशिवाय अन्न आणि पाण्यातून पसरवण्याचे विष, विषाणू आणि जीवजंतू सीमेवरील गावांमध्ये किंवा गुप्तहेरांद्वारे सोडता येतात. देशाच्या सीमेवरून संक्रमित प्राणी, कीटक किंवा व्हेक्टर्स जाणूनबुजून घुसवले जातात.

जैविक शस्त्रे वापरण्यासाठी, वेगवान गतीने या जीवजंतूंचा मारा करणारी क्षेपणास्त्रे, जंतूंचा स्प्रे उडवणाऱ्या मोटारगाड्या, हातपंप स्प्रेयर्स, एखादी व्यक्ती, पुस्तक किंवा पत्र, बंदूक, रिमोट कंट्रोल, रोबोटिक डिलिव्हरी याद्वारे जैविक युद्ध छुप्या पद्धतीने छेडले जाऊ शकते. 

बायोटेररिझमला उत्तर ः बायोटेरॉरिझमच्या आव्हानांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिसादाची आवश्यकता असते.  कोणतीही एकच पद्धत यशस्वी होईल असे नसते.  बायोटेरॉरिझमच्या प्रतीकारामध्ये खालील गोष्टींचा समावेश असावा लागतो.

कायदेशीर कारवाई : बायोडिन्फेस अधिक बळकट करण्यासाठी  अमेरिकेच्या सिनेटने ‘बायोटेरेरिझम अॅक्ट’ संमत केला.  हा कायदा म्हणजे बायोटेररिझमविरोधी अमेरिकेच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिबंधक तयारीचा एक महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये औषधे, अन्न, जैविक एजंट आणि विषारी पदार्थ आणि द्राव यांच्यापासून संरक्षण यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. भारतात मात्र अद्यापही अशा बायोटेरॉरिझम विरोधी ठोस कायदा झालेला नाही.

प्रत्यक्ष कृतीदल : भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) याबाबत तयारी केली आहे, परंतु कंपन्याकडून आणि समाजाकडून अधिक सहकार्याची त्यांना अपेक्षा आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या सध्या आठ बटालियन्स आहेत. त्यांना बळकटी देण्यासाठी, प्रत्येकी एक हजार सैनिकांची आणखी दोन बटालियन्स मंजूर केलेली आहेत. सध्याच्या बटालियन्सपैकी निम्म्यांना रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि आण्विक (सीबीआरएन) धोक्यांशी सामना करण्यास विशेष प्रशिक्षण दिले जाते.  यामध्ये राज्य सरकारांनी सक्रीय भाग घ्यावा असेही सांगितले आहे . सुधारित आंतरराष्ट्रीय आरोग्य नियंत्रण कायदा भारतात जून २००७ मध्ये अंमलात आला. सार्वजनिक आरोग्याबाबत आपत्कालीन परिस्थितीत याचा वापर केला जाईल. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा बायोटेररिझमच्या माहितीचा त्वरित वापर करून त्या देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि तेथील नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी अंतरराष्ट्रीय मदतीने त्वरित कारवाई करता येईल.

सजगता : बायोटेररिझमच्या कोणत्याही घटना होण्यापूर्वी सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी अशा घटनांवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवणे (सर्व्हीलन्स) आणि यंत्रणेची अंमलबजावणी करणे आवश्यक असते. त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळ्या आजारांचा अचानक होणारा प्रादुर्भाव नोंदला जाऊन त्याकडे लक्ष वेधले जावे. त्यातून जैविक युद्धाच्या हल्ल्याबाबत प्रारंभिक संकेत मिळू शकतात.  याबाबतची कार्यपद्धती ही वक्तशीर, त्वरित, संवेदनशील, विवक्षित आणि व्यावहारिक असणे आवश्यक आहे. 

 • बायोटेररिझमबाबत वेगळ्या आजारांवर लक्ष ठेवताना खालील गोष्टी महत्वाच्या असतात :
 •      नेहमीच्याच साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव अचानक भलत्याच ठिकाणी आढळणे
 •      अनाकलनीय आजाराने अचानक मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू होणे
 •      नेहमीचाच पण अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर अवस्था निर्माण करणारा आजार, किंवा नेहमीच्या प्रमाणित उपचारांना बिलकुल प्रतिसाद न मिळणे
 •      रोगजनकांच्या संसर्गाचे नेहमीपेक्षा वेगळे संसर्ग मार्ग, उदा. पाण्यातून पसरणारा आजार हवेतून किंवा श्वसनातून पसरणे.
 •      एखाद्या भागात किंवा प्रदेशात यापूर्वी न उद्‌भवलेला आजार. किंवा नेहमीपेक्षा भलत्याच ऋतूमध्ये एखादा आजार उद्‌भवणे
 •      स्थानिक भागात यापूर्वी न आढळलेल्या वाहकांद्वारे (व्हेक्टर्स) प्रसारित होणारा आजार.
 •      एकाच भूभागात एका मागोमाग एक असे अगदी वेगवेगळे साथीचे आजार उद्‌भवणे
 •      देवी किंवा काही विषाणूजन्य हेमोरॅजिक फिव्हरची अचानक एखादा रुग्ण आढळणे
 •      एखाद्या वयोगटात एरवी कधीही न उद्‌भवणारा आजार दिसून येणे
 •      एखाद्या भागात पूर्वी न आढळलेल्या वेगळ्या प्रजातीने पसरणारा आजार किंवा एखाद्या आजाराबाबत माहिती असलेल्या औषधांपेक्षा वेगळ्या औषधांचा प्रतिरोध असलेला आजार
 •      वेगवेगळ्या भागात जीवजंतूंचे समान अनुवांशिक प्रकार आढळणे
 •      एखाद्या भागात कोणताही आणि कोणाचाही संपर्क नसताना उद्‌भवणारा साथीचा आजार
 •      कीटकांमार्फत पसरणाऱ्या आजाराचा अचानक उद्रेक
 •      संभाव्य हल्ल्याबाबत दहशतवादी, गुप्तचर यंत्रणेमार्फत हल्ल्याचा दावा किंवा जैविक शस्त्रे किंवा जैविक संशोधन यांचा तपास
 •   एखाद्या रुग्णात एकाच वेळेस साथीच्या अनेक आजारांचे जीवजंतू सापडणे यावरून जैविक टेररिझममध्ये वापरले जाणारे विविध घटक समजून येणे.
 • भारतात, एकात्मिक रोग सर्व्हिलन्स प्रकल्प (आयडीएसपी), एक विकेंद्रीकृत आणि राज्य-आधारित सर्व्हीलंस कार्यक्रम नोव्हेंबर २००४मध्ये सुरू करण्यात आला. यामध्ये संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचा समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र, ग्रामीण आणि शहरी भागातील वैद्यकीय सेवा, खासगी आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालये यात अंतर्भूत आहेत तसेच डब्ल्यूएचओ, सीडीसी, एनआयसी अशा आंतरराष्ट्रीय आरोग्यसंस्थाही समाविष्ट आहेत.  याद्वारे सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, मानव संसाधन विकास, आणि संग्रह यांना अधिक कार्यक्षम करण्याचे योजिले होते. अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारच्या माहितीची, नोंदींची सविस्तर तुलना करणे, त्यांचे संकलन, विश्लेषण करणे आणि त्यातून मिळणारे निष्कर्ष आणि संकेत सर्वांना पोचवणे या गोष्टी योजिल्या आहेत.

जैविक अस्त्रांचे निदान
बायोथ्रीएट,  बायोक्रिम  किंवा  बायोटेररिझमच्या  कृतीचा संशय आला तर क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेद्वारे ती शंका दूर करणे आवश्‍यक असते. रुग्णाच्या वैद्यकीय चाचण्यांचे संग्रहण, जतन, वाहतूक यातून अशा छुप्या घटना त्वरित ओळखून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांची जय्यत तयारी हवी. आपत्कालीन डॉक्टर्स आणि क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेतील कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्यसेवा पुरवठा देणारे डॉक्टर्स हे प्रथम प्रतिसादक असतात. त्यांच्या निदानातून या जैविक हल्ल्याची कल्पना येते.
याकरिता प्रयोगशाळेच्या संचालकांसह प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनी संक्रमणास नियंत्रण करण्याच्या आणि त्याचे विश्लेषण करून त्यावरील उपचार सांगण्याच्या योजना विकसित कराव्या लागतात.  त्यासाठी :

 •      बायोटेररिझम घटनेच्या प्रकारात फरक करण्यासाठी निकष; 
 •      डायग्नोस्टिक टेस्टिंग प्रोटोकॉलसह, प्रयोगशाळा प्रतिसाद नेटवर्कची तयारी आणि त्यांच्या वापरासंदर्भातील माहिती; 
 •      सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; 
 •      संसर्ग, उपचार याबाबतच्या अधिसूचना;
 •      संसर्गजन्य पदार्थांच्या सुरक्षित पॅकेजिंग आणि वाहतुकीचे निकष;
 •      प्रयोगशाळा सुरक्षा वाढवण्यासाठी उपाय .

वैद्यकीय व्यवस्थापन बायोटेररॉरिझमच्या घटनेला उत्तर म्हणून रोगाचा प्रसार रोखण्यासाठी  केमोप्रोफिलॅक्टिक  औषधे दिली जाणे.  अशासाठी, औषधे आणि लसीकरण,  केमोप्रोफिलॅक्सिस/ इम्युनोप्रोफिलॅक्सिस औषधांची आवश्यक प्रमाणात उपलब्धता  आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांसह प्रशासनाच्या यंत्रणेची रूपरेषा तयार होणे गरजेचे आहे.

प्रतिबंध : लोकांमधील घबराटीचे प्रमाण कमी करण्यासाठी जनतेला मूलभूत माहिती देणे, प्रतिबंधक उपाय सांगणे, योग्य निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी तथ्यात्मक तपशील देणे आवश्यक असते. तसेच सरकारी आणि खासगी डॉक्टरांमध्ये जागरूकता निर्माण करणे;  त्या विभागासाठी औषधे आणि लशींचा साठा करण्यासाठी  स्वतंत्र निधीचे वाटप करणे आणि त्याचा पुरेसा साठा ठेवणे,  आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करणे या गोष्टी गरजेच्या आहेत.

बायोटेररिझम हा दहशतवादाच्या रासायनिक किंवा आण्विक प्रकारांपेक्षा भिन्न असतो.  देशातील सार्वजनिक आरोग्य आणि आरोग्य सेवाप्रणालीवर बायोटेररिझम हल्ल्याच्या परिणामास तोंड देण्याची मुख्य जबाबदारी आहे.  जैविक दहशतवादाचे आव्हान पेलण्यासाठी विविध एजन्सींचे समन्वित आणि एकत्रित प्रयत्न होणे अत्यंत आवश्यक आहे.  

संबंधित बातम्या