मानसिक आरोग्यातील मिथके 

-डॉ.अविनाश भोंडवे 
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

आरोग्य संपदा

आरोग्य या संकल्पनेबाबत सर्वसामान्यांच्या मनात एक धूसर चित्र असते. आपल्याला कुठलाही आजार नाही, म्हणजे आपले आरोग्य उत्तम असे सर्वसाधारणपणे समजले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याच्या व्याख्येत शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आणि सामाजिक आरोग्यालादेखील अंतर्भूत केले आहे. शारीरिक आरोग्य निदान आपल्याला दिसू शकते, आजार बाह्य स्वरूपातल्या लक्षणांनी सगळ्यांनाच जाणवतात. पण मनाचे आरोग्य या संकल्पनेमध्ये सगळेच सैद्धांतिक आहे. 

मानसिक आरोग्य म्हणजेच मनाचे आरोग्य. ‘मानसिक विकारांचा अभाव’ म्हणजे मानसिक आरोग्य असे अनेकांना वाटते. पण ही समजूत वरवरची आणि अपूर्ण असते. ‘ज्या दीर्घकालीन मानसिक अवस्थेत व्यक्तीला एकंदरीत स्वस्थ वाटत असते, भाव सर्वसाधारणपणे सुखकारक असतात, गैरभावनांचा अतिरेक नसतो, विचारसरणी बुद्धिप्रणीत आणि वागणूक समाजमान्य असते, जीवनातील विशिष्ट उद्दिष्टे गाठण्यासाठी ती व्यक्ती झटत असते. मात्र ती उद्दिष्टे सफल न झाल्यास ती व्यक्ती असंतुष्ट आणि असंतुलित होत नाही. अशा दीर्घकालीन मानसिक अवस्थेला मानसिक आरोग्य संबोधतात,’ असे मानसिक आरोग्याची आधुनिक भावार्थी व्याख्या सांगते. 

गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये हळूहळू मानसिक आरोग्याबाबत जाणीव निर्माण होऊ लागली आहे. शतकानुशतके चालत आलेल्या अशास्त्रीय कल्पना बाजूला सारून, मानसिक आरोग्याचे महत्त्व लोकांना ध्यानात येत आहे. मात्र याबाबतचे अनेक गैरसमज कायम आहेत. पंधरा दिवसांपूर्वी (१० ऑक्टोबरला) जगभर मानसिक आरोग्य दिन पाळला गेला. त्या निमित्ताने ही मिथके दूर करण्यासाठी हा लेख. 

मिथक १. मानसिक विकाराचे प्रमाण समाजात खूप कमी आहे. 

 • कोरोनाची महामारी जगभर पसरण्यापूर्वीसुध्दा हे विधान चुकीचे होते आणि या साथीच्या काळात ते कधी नव्हे एवढे अवास्तव ठरले आहे. 
 • जगातील दर चारांपैकी एकाला जीवनात कधीतरी मानसिक किंवा मज्जासंस्थेच्या आजाराला सामोरे जावे लागेल असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने २००१ मध्ये वर्तवला होता. 
 • आज जगभरात ४५ कोटी व्यक्ती मानसिक आजारांनी त्रस्त आहेत. मानसिक विकार हे कोणतेही मोठे आजारपण यायला आणि त्यातून विकलांग अवस्था उद्‌भवायला कारणीभूत ठरते. 
 • मानसिक आरोग्य विकारांपैकी सामान्यपणे आढळणारा आजार म्हणजे नैराश्य. २०१७च्या एका सर्वेक्षणानुसार जगामध्ये २४.४ कोटी व्यक्ती नैराश्याने ग्रासलेल्या आहेत. 
 • अमेरिकेत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनाच्या निष्कर्षानुसार कोरोनाच्या जागतिक साथीमध्ये मानसिक नैराश्याने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या तिपटीने वाढली आहे. 
 • जागतिक लोकसंख्येच्या चार टक्के, म्हणजे २७.५ कोटी व्यक्ती, चिंतेच्या विकाराने (जनरल अॅन्क्झायटी डिसऑर्डर) ग्रासलेल्या आहेत. यात १७ कोटी म्हणजे ६२ टक्के महिला आहेत. 

मिथक २. पॅनिक अॅटॅक प्राणघातक असू शकतात. 

 • पॅनिक अॅटॅक म्हणजे अचानक होणारी तीव्र घबराट. यामध्ये छातीची धडधड खूप वाढणे, हातपाय गार पडणे, श्वास घ्यायला त्रास होणे, घाम फुटणे, मळमळणे आणि कमालीची भीती वाटणे अशी लक्षणे आढळून येतात. मात्र ती थेट प्राणघातक ठरू शकत नाहीत. अशा व्यक्तीं काम करत असताना त्यांना अशा घबराटीचा झटका आला तर त्यांच्या हातून अपघात घडून ते प्राणघातक शकतात. मात्र एखाद्याला पॅनिक अॅटॅकचा त्रास होत असेल, आणि तो सुरक्षित ठिकाणी असेल तर ही जोखीमदेखील उद्‌भवण्याची शक्यता नसते. 

मिथक ३. मनोरुग्ण व्यक्ती कोणतेही काम करण्यास अपात्र असतात. 
हा एक अत्यंत पूर्वापार चालत आलेला आणि लोकांच्या डोक्यात पक्का बसलेला गैरसमज आहे. बहुतेकदा मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींना नोकरीवर ठेवले जात नाही. मनोरुग्ण हे कोणत्याही औद्योगिक, व्यावसायिक अशा संस्थेत तिथल्या कामगार दलातील उपयुक्त सदस्य होऊ शकत नाहीत, असा एक अनाठायी गैरसमज आहे. अतिशय गंभीर मानसिक आजाराने ग्रासलेला रुग्ण महत्त्‍वाचे आणि जोखमीचे काम करण्यास पूर्ण सक्षम नसतो हे खरे आहे. पण तरीदेखील असे काही मानसिक आजार नक्की असतात की ज्यात रुग्ण व्यक्ती मानसिक आरोग्य विकार नसलेल्या व्यक्तीइतक्याच उत्पादनक्षम असू शकतात. 

अमेरिकेत २०१४मध्ये 'मानसिक आजार आणि रोजगाराची स्थिती' या विषयावर एक अधिकृत वैद्यकीय सर्वेक्षण केले गेले. समाजातल्या वाढत्या मानसिक आजाराच्या तीव्रतेमुळे रोजगाराचे प्रमाण कमी झाल्याचे त्यात दिसून आले. कोणत्याही औद्योगिक आणि खासगी संस्थात आलेल्या अर्जांपैकी- 

 • मानसिक आजार नसलेल्या ७५.९ टक्के व्यक्तींना 
 • गंभीर आजार असलेल्या ५४.५टक्के व्यक्तींना. 
 • सौम्य मानसिक आजार असलेल्या ६८.८ टक्के व्यक्तींना 
 • मध्यम मानसिक आजार असलेल्या ६२.७ टक्क्यांना नोकऱ्या दिल्या गेल्या. 
 • संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षात १८ ते २५ वयोगटात मानसिक आजार नसलेल्या व्यक्ती आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्ती यांच्यात नोकरीवर घेण्याच्या प्रमाणात फक्त एका टक्क्याचे अंतर होते. मात्र ५० ते ६४ वयोगटात ही तफावत २१ टक्के होती. म्हणजेच पन्नाशीच्या पुढच्या वयातल्या मानसिक आजारांचा सामना करणाऱ्या व्यक्तींना कामावर घेताना त्यांच्या मानसिक आजारांचा बाऊ केला जातो. 

मिथक ४. मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्ती शरीराने आणि मनाने कमकुवत असतात. 

 • असे म्हणणेही चुकीचे असते. म्हणजे ज्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब आहे, ते शारीरिक दृष्ट्या असमर्थ आहेत असे म्हणण्यासारखे आहे. हे आजार जर सातत्याने उपचार घेऊन नियंत्रित ठेवले तर ती व्यक्ती कोणत्याही निरोगी व्यक्ती इतकीच सक्षम असते. तशीच मानसिक रुग्ण असलेली व्यक्ती, विशेषतः चिंता, नैराश्य यांनी ग्रासलेले रुग्ण नियमित आणि दीर्घकाळ उपचार घेतल्यास आपला आजार नियंत्रित ठेवू शकतात आणि मानसिक आजार नसलेल्या व्यक्ती इतक्याच सक्षम असतात. उलट मधुमेह किंवा हृदयविकारांशी झुंजणाऱ्या व्यक्तींपेक्षा मानसिक आरोग्याच्या विपरीत स्थितीशी झुंज द्यायला खूप मनोबल लागू शकते. 

मिथक ५. ज्यांना कुटुंबीय किंवा मित्रमंडळींचा पाठिंबा नसतो अशांनाच मानसोपचारांची गरज असते. 

 • मानसिक आजारात उपचारांचा एक भाग म्हणून मनोविकार तज्ज्ञ डॉक्टरांशी किंवा मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशकांशी बोलण्यात आणि मित्रांच्या, नातेवाईकांच्या सल्लामसलतीमध्ये बराच फरक असतो. दोघेही मानसिक आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करू शकतात. परंतु प्रशिक्षित थेरपिस्ट समस्यांचे रचनात्मक आणि उपचारात्मक पृथक्करण करू शकतात. कितीही हुशार आणि चांगला मित्र किंवा नातेवाईक ते करू शकत नाही तसेच, प्रत्येकजण आपल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तीसमोर संपूर्णपणे ‘मोकळा’ होत नाही. मानसोपचार थेरपी पूर्ण गोपनीय असते आणि ती संपूर्णपणे एका व्यक्तीवर केंद्रित असते. तिला काही साध्य आणि उद्दिष्ट असते. अप्रशिक्षित मित्रांसह अधिक अनौपचारिक गप्पांमध्ये सामान्यतः: हे शक्य नसते. मात्र मित्र, कुटुंबीय जास्त चांगला भावनिक आधार देऊ शकतात. पण सध्याच्या काळात असे चांगले मित्र असणे आणि ते हवे तेव्हा उपलब्ध असणे नेहमीच शक्य होत नाही. त्यामुळे मित्र असोत वा नसोत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर्स आणि समुपदेशक सर्व मनोरुग्णांसाठी जास्त आवश्यक असतात. 

मिथक ६. मानसिक आरोग्याच्या समस्या एकदा सुरू झाल्या की त्या कायम राहतात. 

 • मानसिक आरोग्य निदान म्हणजे ‘जन्मठेपेची शिक्षा’ नसते. प्रत्येक व्यक्तीगणिक मानसिक आजाराचा प्रकार आणि अनुभव वेगळा असतो. काही व्यक्तींमध्ये थोडा काळ काही त्रास उद्‌भवतात आणि त्यानंतर ते पुन्हा एकदम नॉर्मलही होतात. इतरांच्या बाबतीत मानसोपचार, समुपदेशन, ग्रुप थेरपी असे अनेकविध उपचार काही विशिष्ट काळ घ्यावे लागतात आणि त्यांच्या आयुष्यात संतुलन निर्माण होऊन ते मानसरोग विरहित सर्वसामान्य आयुष्य जगू लागतात. काही ठराविक आजारात रुग्ण लवकर पूर्ण बरे होत नाहीत. पण औषधोपचार आणि इतर उपचार दीर्घकाळ सुरू ठेवून त्यांचा आजार नियंत्रणात राखता येतो. फार कमी व्यक्तींचा आजार उत्तरोत्तर लक्षणे वाढत जाऊन हाताबाहेर जातो. 
 • तथापि, मानसिक आजार झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात पूर्वीसारखे ठणठणीत होऊ शकतात हे निर्विवाद सत्य आहे. 
 • आजारातून पूर्ण बरे होणे हे काहींच्या बाबतीत त्यांच्या आजारापूर्वी त्यांचे जसे जीवन होते, तसेच पुन्हा मागील पानावरून पुढे सुरू होते. तर काही जणांमध्ये लक्षणे थांबतात, त्यांना बऱ्यापैकी आराम मिळतो आणि त्यांचे जीवन थोडे भिन्न पण समाधानी राहते. 
 • ‘मेंटल हेल्थ अमेरिका’ या सामाजिक संस्थेच्या शब्दांत सांगायचे तर मानसिक आजारातून मुक्त होण्यामध्ये केवळ बरे होणेच नव्हे तर संपूर्ण आणि समाधानकारक जीवन मिळवणे देखील समाविष्ट आहे. बरेच लोक खात्रीने सांगतात की आजारातून मुक्त होण्याचा प्रवास सरळ, स्थिर नसतो. त्यामध्ये अनेक चढ-उतार, नवीन गोष्टींचा अनुभव आणि असंख्य अडचणी येत राहतात. आजारातून पूर्ण मुक्ती मिळवण्याचा प्रवास करायला वेळ लागतो, परंतु सकारात्मक दृष्टी ठेवली तर अनेक चांगले बदल घडू शकतात. 

मिथक ७. व्यसन म्हणजे इच्छाशक्तीचा अभाव असतो. 
हे विधान खरे नाही.  तज्ज्ञ वैद्यकीय मानसोपचारतज्ज्ञ व्यसनांना जुनाट आजार मानतात. व्यसनमुक्त वागणूक अहवालात इच्छाशक्ती आणि निरनिराळ्या व्यसनांपासून सुटका मिळण्यादरम्यानच्या संबंधाचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणानुसार व्यसनांना पराजित करण्यात इच्छाशक्तीचा अभाव हा निर्णयात्मक घटक नव्हता. व्यसनी व्यक्तींमध्ये इच्छाशक्ती शाबूत ठेवून व्यसन करण्याचा निर्णय घेतानाची आजूबाजूची परिस्थिती कितपत ताब्यात ठेवता येते, तसेच इच्छाशक्ती टिकवून ठेवण्याच्या किंवा ती विकसित करण्याच्या रणनीतीवर अवलंबून असते. 

मिथक ८. स्किझोफ्रेनिया असलेल्या लोकांमध्ये दुभंगलेले व्यक्तिमत्त्व असते. 
स्किझोफ्रेनिया म्हणजे दुभंगलेले मन असते. १९०८मध्ये युजेन ब्लेलर यांनी हा शब्द तयार केला तेव्हा या आजारात मनाचे आणि वागण्याचे तुकडे होतात आणि आणि ते सर्वत्र विखरत असतात असे त्यांच्या लक्षात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, स्किझोफ्रेनिया म्हणजे विचार, समज, भावना, भाषा, आत्म्याची भावना आणि वर्तन यामध्ये विकृती निर्माण होते. या विकृतींमध्ये मतिभ्रम आणि संवेदनांमधील भ्रमांचा समावेश असू शकतो. स्किझोफ्रेनिया म्हणजे व्यक्तिमत्त्वाबाबतीतला एक दोष असलेला विकार असतो, ‘डिसोसिएटिव्ह आयडेंटीटी डिसऑर्डर’ या आजारात विविध व्यक्तिमत्त्वांचा दोष आढळतो. 

मिथक ९. अतिखाण्याचे आणि अजिबात न खाण्याचे दोष फक्त स्त्रियांमध्ये आढळतात. 
असा एक परंपरागत समज होता की दैनंदिन खाण्यामधले दोष, जे मानसिक आजारांचे स्वरूप धारण करतात ते फक्त स्त्रियांत असतात आणि तेही तरुण आणि श्वेतवर्णीय श्रीमंत महिलांमध्येच आढळतात. पण याबाबत तब्बल दहा वर्षे एक सर्वेक्षणात्मक संशोधन करण्यात आले होते. त्यामध्ये आलेले निष्कर्ष बोलके आहेत. 

 • पुरुषांमध्ये, कमी उत्पन्न गटातील आणि वय वर्षे ४५हून अधिक वयाच्या लोकांमध्ये हे दोष मोठ्या प्रमाणात आढळू लागले आहेत. 
 • या प्रकारच्या विकारांमधील एनोरेक्सिया आणि बुलीमिया नर्व्होसा अशा आजारांच्या सर्व प्रकरणांमध्ये पुरुषांची संख्या १० ते २५ टक्के आहे, तसेच अति प्रमाणात खाण्याच्या विकारांच्या पुरुषांचे प्रमाण २५ टक्के आहे. 

मिथक १०. खाण्याबाबतीतील विकृती ही आजच्या जीवनशैलीमुळे निर्माण होते. 
मानसविकार शास्त्रानुसार खाण्याची विकृती ही गंभीर मानसिक आरोग्याची परिस्थिती आहे आजची बैठी जीवनशैली असणाऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही विकृती आढळते. पण आधी विकृती असते, मग अतिखाणे होते. 

मिथक ११. मानसिक आजार असलेले सर्व लोक हिंसक असतात. 

 • हे आणखी एक लोकप्रिय मिथक आहे. सुदैवाने मानसिक आरोग्याच्या परिस्थितीबद्दल जगामध्ये थोडी जाणीव निर्माण होत असल्याने हा गैरसमज हळूहळू संपुष्टात येत आहे. स्किझोफ्रेनियासारख्या अत्यंत गंभीर परिस्थितीचा सामना करणार्‍या व्यक्तीही बहुधा अहिंसक असतात. 
 • काही विशिष्ट मानसिक आजार असलेले लोक हिंसक आणि अतर्क्य वर्तन करू शकतात, हे खरं असलं तरी त्यांचे प्रमाण अगदीच थोडे असते.. 
 • मानसिक विकार आणि हिंसा यामधला संबंध शोधू जाता खालील गोष्टी लक्षात येतात. 
 • मनोरुग्णांकडून होणारे हिंसक प्रकार खळबळजनक असतात. त्यामुळे प्रसार माध्यमांचे त्याकडे लक्ष जाऊन त्या ठळकपणे दाखवल्या जातात. यामुळे सर्वसामान्यांच्या मनात ही चुकीची कल्पना पक्की ठसते. 
 • परंतु मानसिक आजार असलेल्या व्यक्तींवर जेव्हा योग्य उपचार केले जातात तेव्हा त्याच्याकडून हिंसेचा धोका उद्भवत नाही. समाजात असलेल्या हिंसाचाराचा विचार करता, मनोरुग्णांकडून होणाऱ्या हिंसेचे प्रमाण अत्यल्प आहे. पण तरीही मोठी हिंसक घटना घडल्यावर ती करणारी व्यक्ती मानसिक रुग्ण आहे अशी टिप्पणी नेहमी केली जाते. 
 • द लॅन्सेटमधील एका लेखात किंग्ज कॉलेज लंडन येथील समुदाय मानसोपचार प्राध्यापक सर ग्रॅहम थॉर्निक्रॉफ्ट यांच्या मते गंभीर मानसिक विकृती, अमली पदार्थाचे व्यसन आणि समाजविरोधी व्यक्तिमत्व विकार (अॅण्टिसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर) या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्यास हिंसाचार नक्की घडतो. 

थोडक्यात, मानसिक आजारांवर उत्तम उपचार उपलब्ध आहेत. मानसिक आजारांबाबतची मिथके, गैरसमज आणि या आजारांची अकारण होणारी बदनामी दूर करण्यासाठी समाजाने आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी एकत्रितपणे कार्य केले पाहिजे. दहा वर्षापूर्वीपेक्षा आज आपण खूप पुढे आलो असलो, तरीही अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.     

संबंधित बातम्या