रोबोटिक शस्त्रक्रिया

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

आरोग्य संपदा

या नश्वर जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यू जसा अटळ आहे, त्याप्रमाणेच कोणता ना कोणता आजार किंवा शरीरात निर्माण होणारी विकृतीही कोणालाच टळलेली नाही. काही आजार औषधांनी बरे होतात, तर काही आजारात शरीरातील अवयवांच्या कार्यामध्ये दोष निर्माण होतात. कधी काही आजारांनी किंवा दुखापतीमुळे अवयवात व्यंग निर्माण होते, तर काही आजार अवयवांपासून शरीरात इतरत्र पसरत जातात, अशा वेळेस त्यावर उपचार करण्यासाठी आणि कौशल्यपूर्वक तो अवयव पूर्ववत करण्यासाठी किंवा त्याचे कार्य पूर्ववत सुरु राहावे या दृष्टीने शस्त्रक्रिया करावी लागते.  

शल्यचिकित्सा ही आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक प्रमुख शाखा आहे. या शाखेच्या अंतर्भूत 
 - कारणमीमांसा- इटिऑलॉजी
 - विकृतिविज्ञान- पॅथॉलॉजी
 - रोगनिदान
 - शस्त्रक्रिया, 
 - उपचारांची निष्पत्ती असे अनेक टप्पे असतात.

शस्त्रक्रिया विभाग या शब्दाने केवळ शस्त्रक्रियेचा किंवा शल्यचिकित्सेचा बोध होतो. पण आधुनिक वैद्यकीय शास्त्र जसजसे विकसित आणि प्रगत होत गेले, तसतसे शरीरातील प्रत्येक संस्थेनुसार शल्यविद्येची एकेक नवी उपशाखा विस्तारित होत गेली. उदा. डोळ्यांची शस्त्रक्रिया, हाडांची शस्त्रक्रिया, मेंदूची, हृदयाची, पचनसंस्थेची, नाक-कान-घशाची शस्त्रक्रिया वगैरे. कर्करोगासारख्या आजारांच्या शस्त्रक्रियेचीही शाखा निर्माण झाली.

वैद्यकीय विज्ञानाच्या प्रगतीनुसार शल्यउपचारांमध्ये देखील नव्या पद्धती उदयाला आल्या. यात शस्त्रक्रिया न करता रुग्णाला केवळ औषधोपचार करून बरे करण्याची कॉन्झर्व्हेटिव्ह पद्धत, शरीराचा छेद घेऊन करायची पारंपारिक शस्त्रक्रिया यासोबतच एन्डोस्कोप वापरून करण्याच्या अनेक शस्त्रक्रिया विकसित झालेल्या आहेत. यात परत पोट-अन्ननलिका- जठर, मोठे आतडे, गर्भाशय, डोळे, मूत्रमार्ग, मेंदू अशा वेगवेगळ्या अवयवांसाठी वेगवेगळे एन्डोस्कोप किंवा त्यापध्दतीची उपकरणे शोधली गेली आणि एन्डोस्कोपिक सर्जरी ही एक नवी उपशाखा उदयाला आली. 

एन्डोस्कोपीच्या पुढे जाऊन आता यंत्रमानवाचे तंत्र वापरून कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेचा जमाना आला आहे. गेली काही वर्षे रोबोटिक सर्जरी ही एक अत्याधुनिक पद्धत वैद्यकीय क्षेत्राच्या क्षितिजावर अवतीर्ण झाली आहे आणि साहजिकच येत्या काही वर्षात शस्त्रक्रिया शास्त्राचे स्वरूप आणखीच बदलले जाणार आहे. 

रोबोटिक शस्त्रक्रिया
रोबो किंवा रोबोट म्हणजे यंत्रमानव. संगणकीय प्रणालींच्या योगे प्राप्त होणारी कृत्रिम बुद्धी वापरून असंख्य क्षेत्रात यंत्रमानव वापरले जाऊ लागले आहेत. या तंत्राच्या साह्याने केलेली शस्त्रक्रिया म्हणजे रोबोटिक किंवा रोबोट-साहाय्य शस्त्रक्रिया. ही शस्त्रक्रिया कुशल सर्जनच करतात, पण ती करताना त्यांना अतिसूक्ष्मपातळीवरची अचूकता, प्रगत संगणक तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रिया केल्या जाणाऱ्या मानवी अवयवांची दहा पटीने वाढवलेली त्रिमितीय (३-डी) प्रतिमा, आणि संगणकीय आज्ञावली यांचे साहाय्य मिळते. ज्या रोबोटप्रणालीच्या मदतीने रोबोटिक सर्जरी केली जाते तिला  ‘दा व्हिन्सी सर्जिकल सिस्टीम’ नावाने ओळखले जाते. 

इतिहास
‘रोबोट’ हा शब्द अस्तित्वात आणण्याचे श्रेय झेक नाटककार कारेल कॅपे यांना दिले जाते. इ.स.१९२१ मध्ये त्याच्या ‘रोसम्स युनिव्हर्सल रोबोट्स’ या नाटकात हा शब्द प्रथम वापरला गेला. स्लाविक भाषेतील ‘रोबोटा’ या शब्दापासून याचा जन्म झाला. ‘रोबोटा़’ म्हणजे ‘श्रम’. त्यानंतर १९४०च्या दशकात वैज्ञानिक लेखक आयझॅक असिमोव्ह यांनी हा शब्द इंग्रजीत प्रचलित केला. १९६१मध्ये अमेरिकेच्या ट्रेन्टनमधील जनरल मोटर्सच्या फॅक्टरी असेंब्ली लाइनवर पहिला औद्योगिक रोबोट ‘युनिमेट’ या नावानिशी अवतरला आणि रोबोटिक्स साकार झाले. औद्योगिक यंत्रमानव सामान्यतः कारखान्यामध्ये धोकादायक किंवा मनुष्यांद्वारे सहज न जमणाऱ्या भागात कार्य करण्यासाठी वापरले जाऊ लागले. मात्र वैद्यकीय क्षेत्रात त्यांचा वापर करायला १९८०मध्ये सुरुवात झाली. त्याकाळात त्याचा वापर शस्त्रक्रियेसाठी नव्हे तर मानवाला न जमणाऱ्या वेगवान हालचाली न थकता सातत्याने करण्यासाठी केला जात होता. 

प्रारंभिक सर्जिकल रोबोट्स डिझाइन / मॅन्युफॅक्चरिंग (कॅड/कॅम) सिस्टमद्वारे वापरले जाऊ लागले. अमेरिकेतील सॅक्रॅमेन्टो येथे ‘इंटिग्रेटेड सर्जिकल सिस्टम’ या कंपनीने १९९२मध्ये बनवलेल्या ‘रोबोटोक’चा  वापर रुग्णांची मोडलेली हाडे अचूकरीत्या जुळवण्यासाठी केला गेला. त्याच दरम्यान इंग्लंडच्या इंपिरियल कॉलेजने विकसित केलेला ‘प्रोबॉट’ यंत्रमानव प्रोस्टेट ग्रंथीच्या शस्त्रक्रियेसाठी आणि मूत्रपिंडाच्या अवघड शस्त्रक्रियांसाठी वापरला. याचसाठी अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने ‘पॅकी-आरसीएम’ आणि ‘अॅक्युबॉट’ हे दोन यंत्रमानव बनवले.

रोबोटिक कार्यपद्धती
रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी अनेक पद्धतीचे रोबोट वापरले जातात. हृदयविकार विषयक उपचारांसाठी हॅन्सेन सेन्सी रोबोटिक कॅथेटर वापरला जातो. तर मूत्ररोग विषयक, स्त्रीरोग विषयक आणि काही सामान्य शस्त्रक्रियांदरम्यान ‘दा विंची सी सर्जिकल रोबोट’ डॉक्टरांना कमालीची सुस्पष्टता देतो. त्याचवेळेस शस्त्रक्रियांदरम्यान रुग्णांना होणाऱ्या वेदना आणि त्रास अगदी नगण्य स्वरूपात असतो.

रोबोटिक शस्त्रक्रिया प्रक्रिया कार्यपद्धती आज वेगाने प्रगत होत आहेत. त्यात अनेक बदल सातत्याने घडून येत आहेत. पण तरीही रोबोटिक शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेमध्ये सामान्यतः पुढील गोष्टी समाविष्ट असतात.

संपूर्ण रोबोटिक शस्त्रक्रिये दरम्यान सर्व नियंत्रणासाठी जी खास जागा असते, तिला कन्सोल म्हणतात. कन्सोलमध्ये विशेष शस्त्रक्रिया साधने हाताळण्यासाठी अनेक छोटी नियंत्रणे वापरतात, ती मानवी हातापेक्षा अधिक लवचिक आणि वेगळी असतात. मुख्य सर्जन या कन्सोलमधील सुविधांचा वापर करून शस्त्रक्रिया करतो.. रोबोटद्वारे हाताची कंपने कमी करून सर्जनच्या हाताच्या हालचालींची प्रतिकृती बनवली जाते. यामुळे सर्जन अतिशय जटिल शस्त्रक्रिये दरम्यान वर्धित सुस्पष्टता, कौशल्य आणि नियंत्रणासह शस्त्रक्रिया करू शकतात.

रोबोटिक सर्जरीच्या संचामध्ये एक छोटेखानी त्रिमितीदर्शक (थ्री-डी) कॅमेरा असतो. त्याद्वारे शल्यचिकित्सकांना ज्या भागावर शस्त्रक्रिया करायची आहे, त्याचे दर्शन ३६० अंशात हवे तसे आणि हव्या त्या कोनातून मिळवता येते. याचे नियंत्रण पायांना असलेल्या पेडलद्वारे किंवा आवाजी आज्ञा देऊन केले जाते.

कन्सोलपाशी बसलेला सर्जन एक अतिविशिष्ट प्रकारचा पोलराइझ्ड चष्मा किंवा दुर्बीण वापरतो. त्यातून त्याला समोरील मॉनिटरवरील कॅमेऱ्यातून प्रक्षेपित होणारी दृश्ये त्रिमितीमध्ये दिसतात.   

शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे साधारणपणे आपल्या एक रुपयाच्या नाण्याच्या आकाराची असतात आणि ती रुग्णाच्या शरीरात एका लहानशा छेदातून दुर्बिणीच्या साह्याने आत सोडली जातात. 

कन्सोलमध्ये रोबोटिक तत्त्वावर हालचाल करणारे हाताचे आणि पायांचे नियंत्रक असतात. हे नियंत्रक वापरून, रुग्णाला स्पर्शही न करता, रुग्णापासून थोड्या अंतरावरून रोबोटिक प्रणालीच्या साहाय्याने सर्जन शस्त्रक्रियेची उपकरणे, शस्त्रे वापरत शस्त्रक्रिया करतो.  यासाठी सर्जन आपल्या हातांची हालचाल करतो त्याची नक्कल रोबोटच्या हातांनी केली जाते.

शस्त्रक्रियेची उपकरणे योग्य पद्धतीने हलत आहेत आणि योग्य पद्धतीनेच शस्त्रक्रिया होत आहे याची खातरजमा करण्यासाठी दुसरा शल्यचिकित्सक शस्त्रक्रियेच्या टेबलानजीक नियुक्त केलेला असतो.

रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी ऑटोमॅटिक एन्डोस्कोपिक सिस्टीम फॉर ऑप्टिमल पोझिशनिंग (AESOP-एसप) ही अत्याधुनिक संगणकीय प्रणाली वापरली जाते. अमेरिकेतील कॉम्प्युटर मोशन इनकॉर्पोरेशन या कंपनीने ही प्रणाली विकसित केली. या प्रणालीत ‘मालक आणि गुलाम’ (मास्टर अॅण्ड स्लेव्ह) हे तत्त्व वापरले जाते. शस्त्रक्रिया करणारा सर्जन हा मालक असतो आणि त्याच्या आज्ञांप्रमाणे संगणक त्याचे कार्य एखाद्या गुलामासारखे करत असतो. अमेरिकन एफडीएने त्यांना १९९३मध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी वापरण्यास अधिकृतरीत्या परवानगी दिली. या प्रणालीयोगे शस्त्रक्रियेसाठी वापरला जाणाऱ्या एन्डोस्कोपिक कॅमेऱ्याची हालचाल नियंत्रित केली जाते.

याच कंपनीने विकसित केलेली झीअस रोबोटिक सिस्टीम आणि एसप यांच्या योगे रोबोटिक सर्जरीला २००२मध्ये अत्याधुनिक आणि विश्वसनीय स्वरूप प्राप्त झाले. ही कंपनी इन्टीट्युव्ह सर्जिकल इन्कॉर्पोरेशन या कंपनीत विलीन झाली. या कंपनीनेच आज प्रचलित असलेली ‘दा व्हिन्ची सर्जिकल सिस्टीम’ विकसित केली आहे. आजमितीला हृदयरोग, मूत्रसंस्था अशा अनेकविध शस्त्रक्रियेच्या विविध पद्धतींमध्ये रोबोटिक्स वापरले जात आहे.   

काही महत्त्वाच्या रोबोटिक शस्त्रक्रिया
स्त्रीरोगविषयक – महिलांच्या कर्करोगविषयक, जननेंद्रियांच्या जटिल शस्त्रक्रिया अधिक सूक्ष्मतेने आणि सहजपणे होऊ शकतात. 

प्रोस्टेटचा कर्करोग
मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रिया – मधुमेह, कर्करोग, मूतखडे अशा कारणांनी मूत्रपिंड खराब होऊ शकतात. अशा रुग्णांच्या मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यक्रिया 

कोलोरेक्टल सर्जरी – रोबॉटिक  कॉलेक्टॉमीमध्ये मोठे आतडे आणि गुदाशय यामधील कर्करोगाने ग्रासलेला भाग रोबोटच्या साहाय्याने काढून टाकल्यानंतर दोन आतड्याचे उरलेले भाग पुन्हा जोडले जातात.

स्पाइन सर्जरी – मणक्यांवरील नाजूक शस्त्रक्रिया 

एन्डोमेट्रिओसिस उपचार- गर्भाशयाच्या अंतस्थ आवरणाला एन्डोमेट्रीयम म्हणतात. असेच आवरण जर गर्भाशयाव्यतिरिक्त अंडाशय, गर्भनलिका आणि जननेंद्रियांच्या बाजूच्या पोटाच्या पोकळीत वाढले तर त्याला एन्डोमेट्रिओसिस म्हणतात.

निओप्लाझमचा शोध- पोटात किंवा इतरत्र जेंव्हा अनेक पेशी किंवा पेशींचे समूह यामध्ये अमर्यादपणे अतिरिक्त वाढ होते त्याला निओप्लाझम म्हणतात. ही अतिरिक्त साधी वाढ (बीनाइन) असू शकते, किंवा कर्करोगही असू शकतो. निओप्लाझमवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रोबोटिक  पद्धतीने सहज होऊ शकतात. 

रोबोटिक  सर्जरीचे फायदे
अचूकता – या शस्त्रक्रिया अगदी अचूक असतात. हाय-डेफिनिशन 3-डी कॅमेऱ्याचा वापर केल्याने शल्यचिकित्सकांना एरवीच्या खुल्या शस्त्रक्रिये दरम्यान ते पाहू शकले नसते एवढ्या जवळून, बारकाईने आणि सुस्पष्टतेने शस्त्रक्रिया केली जाणारा रुग्णाच्या शरीराचा भाग पाहायला मिळतो. लॅप्रोस्कोपिक उपकरणांद्वारे शल्य चिकित्सकांना कमालीच्या कौशल्यपूर्ण आणि नियंत्रित हालचाली करता येतात. रोबोटिक उपकरणामधील हात तंतोतंत मानवी हाताच्या हालचालींची नक्कल करतात, पण त्यात जास्त सूक्ष्मता आणि अचूकता असते. मानवी चुकीच्या कुठल्याही गोष्टी घडत नाहीत.
कमीत कमी वेदना 
अतिशय नगण्य रक्तस्राव

अतिशय छोटे छेद – पारंपरिक तंत्राच्या तुलनेत, रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये कमालीच्या छोट्या छेदामधून ही शस्त्रक्रिया होते. साहजिकच जखम भरून यायला अगदी कमी वेळ लागतो. 
शरीरावर शस्त्रक्रियेचे व्रण राहत नाहीत.

कमी जोखीम- शस्त्रक्रियेत कमीत कमी काळ भूल लागते. 
जंतुसंसर्गाचा धोका नगण्य- शस्त्रक्रियेच्या जखमेत संसर्ग होण्याचा धोका अगदीच नगण्य असतो. रुग्णालयात रुग्णांना दाखल राहण्याचा काळ कमी होतो.

इस्पितळात कमी वेळ वास्तव्य – या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण अतिशय जलदरित्या पूर्वस्थितीत येतो आणि आपली दैनंदिन कामे करू शकतो. 

रोबोटिक शस्त्रक्रिया आजमितीला भारतात महाराष्ट्रातील अनेक नामवंत इस्पितळात होत आहेत. आज जरी त्या महाग असल्या तरी भावी काळात मोठ्या प्रमाणावर वापरल्या गेल्यास त्याचे शुल्क नक्कीच कमी होईल. 

काही वर्षांपूर्वी दुर्बिणीतून होणाऱ्या शस्त्रक्रिया लोक नाकारायचे. पण आज त्याच्या नियमित वापरामुळे आणि त्यातील उपयुक्तता सिद्ध झाल्यामुळे लोक दुर्बिणीच्या शस्त्रक्रियांचाच आग्रह धरतात. नजीकच्या भविष्यकाळात रोबोटिक शस्त्रक्रियेबाबत हीच गोष्ट नक्कीच घडणार आहे.

संबंधित बातम्या