उपचारातील संगणकीय बुद्धिमत्ता 

डॉ. अविनाश भोंडवे
मंगळवार, 5 जानेवारी 2021

आरोग्य संपदा

विसाव्या शतकात मानवाने संगणकाची निर्मिती केली. आजच्या प्रगत जीवनातील असंख्य गोष्टी लक्षात ठेवणारी संगणकीय महास्मृती निर्माण झाली. गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण क्षणार्धात करून त्यातून उत्तरे शोधणाऱ्या संगणक प्रणाली आणि त्यानुसार कार्य करणारी यंत्रे निर्माण झाली. यालाच संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हटले जाऊ लागले. 

वैद्यकीय उपचार करताना डॉक्टर्स एका तर्कशास्त्रीय भूमिकेतून जात असतात. हे तर्क करताना त्यांचे त्या बाबतचे ज्ञान आणि त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव यातून ते एकएक टप्पा पुढे जात, म्हणजे रुग्णाची लक्षणे ऐकून, त्याला त्याबाबत सुसंगत प्रश्न विचारत, काही तात्पुरते निदान मनाशी करतात. त्यानंतर रुग्णाची शारीरिक तपासणी केली जाते. त्यामुळे काही गोष्टींची खात्री केली जाते किंवा  निदानाबाबतच्या काही शंका दूर केल्या जातात. त्यानंतर निदान पक्के करण्यासाठी आणि त्याबाबत आणखी काही शंका दूर करण्यासाठी रक्त, लघवी, थुंकी, एक्सरे, इसीजी, स्कॅन यांसारख्या चाचण्या केल्या जातात. यातूनच निदान पक्के होते. 

संगणकीय बुद्धिमत्तेमध्ये आजारांचे यच्चयावत ज्ञान आणि अनुभव संगणकात साठवले जाते आणि आलेल्या चाचण्यातून निदान केले जाते आणि उपचारही सुचवले जातात. वैद्यकीय शास्त्रातील प्रगाढ ज्ञान आणि संगणकीय बुद्धिमत्ता यांचा वापर आजमितीला अनेक प्रकारे केला जातो.

    रुग्णांना प्रश्न विचारून त्यांच्या लक्षणांच्या माहितीचे संगणकाद्वारे विश्लेषण करून रुग्णाला कोणकोणत्या निदानांची शक्यता आहे याची यादी सादर करणे म्हणजेच प्रोव्हिजीनल डायग्नोसिस वर्तवणे. डीएक्सप्लेन या संगणकप्रणालीचा वापर यासाठी केला जातो आहे.

    रुग्णासाठी विविध प्रकारच्या चाचण्या सुचवणे, त्यांचे नियोजन करणे, आणि त्या चाचण्यांमधून आलेल्या माहितीचे परिशीलन करून निघणारे निष्कर्ष आणि निदान वर्तवणे. जर्मवॉचर ही संगणक प्रणाली यासाठी विकसित केली गेली आहे.

 • अचूक निदानासाठी डेटाचे अनेक स्रोत वापरणे. 
 • उपचारांची प्रक्रिया आणि परिणाम यांचे विश्लेषण करणे. 
 • योग्य उपचार पद्धतीचे पर्याय सादर करून त्यातील सर्वात योग्य पद्धती निश्चित करणे.  
 • निवडलेली उपचार पद्धत अमलात आणणे.
 • संगणकीय बुद्धिमत्ता वापरून केलेल्या यंत्रमानवाद्वारे सर्जनच्या हालचालीनुसार रोबोटिक शस्त्रक्रिया अचूकरीत्या करणे. दा व्हिन्ची रोबोटिक सिस्टीम यासाठी वापरली जाते.
 • रुग्णांच्या आजाराचे आणि त्यातील चढ उतारांचे निरीक्षण करून परिशीलन करणे.
 • शस्त्रक्रियेपश्चात आणि उपचारांपश्चात रुग्णाची देखभाल, पाठपुरावा आणि पुढील भेटी यांचे नियोजन करणे. 
 • बॅबिलॉन आणि तत्सम संगणकीय उपचारपद्धतीचा वापर रुग्णांच्या अॅपॉईंटमेंटपासून, चाचण्या आणि उपचारांपर्यंत आजकाल सर्वत्र केला जातो. 
 • एआय थेरपी या प्रणालीचा वापर मानसिक चिंतेसारख्या मानसशास्त्रीय आजाराच्या उपचारासाठी केला जातो.

फायदे
    आरोग्यक्षेत्रातील सुविधांचे योग्यप्रकारे नियोजन : डॉक्टरांची वेळ घेण्यापासून, रुग्णांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करेपर्यंत आणि हॉस्पिटलमधील रुग्णांच्या राउंड्‌स घेण्यापासून त्यांच्या अॅडमिशन्स, डिस्चार्ज, दिलेली औषधे, मोकळे बेड्स, डॉक्टरांची उपलब्धता, लागणाऱ्या औषधांची आणि अन्य गोष्टींच्या सोयीची उपलब्धता याबाबतचे नियोजन करता येते.
  

 नवी औषधे आणि लशींच्या चाचण्यांचे अभ्यास : सध्या कोरोनाच्या लशींच्या क्लिनिकल चाचण्यांच्या आणि नंतरच्या मानवी चाचण्यांच्या पाहण्यांच्या अहवालांचे वेगाने विश्लेषण करण्यात एआयचा मोठा वाटा आहे. इतरही अनेक आजारांवरील औषधांच्या जगभरात चाललेल्या अनेक चाचण्यांमध्येदेखील या संगणकीय प्रणाली अतिशय वेगवान पद्धतीने कार्य करून संशोधनाच्या कामाची वेळ कमी करण्यात यशस्वी झाल्या आहेत.

    आरोग्यसेवकांची सुविधा : आयसीयूमधील गंभीर आजारी रुग्णाला त्याच्या तब्येतीच्या महत्त्वाच्या गोष्टींची देखरेख करणारी अनेक उपकरणे लावलेली असतात. त्यांचे बीपबीप आवाज सतत सुरू असतात. रुग्णाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली तर त्या उपकरणामधून धोक्याचा अलार्म वाजू लागतो. हॉस्पिटलमधील नर्सेस सतत बीपिंग अलर्टच्या संपर्कात आल्यामुळे त्या या अलार्मना असंवेदनशील होतात. अमेरिकेतील एका सर्वेक्षणात काही नर्सेस दररोज  १८७ अलार्म ऐकतात असे निदर्शनास आले. त्यापैकी  ७२ ते ९९ टक्के  अलार्म चुकीचे असतात. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर जसजसा भार पडत आहे तसतसे त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या त्या छोट्या सतर्कतेला सामोरे जावे लागते. या सर्वेक्षणात अशा धोक्याच्या गजराला आरोग्यसेविका योग्यपणे सामोऱ्या न गेल्याने अनेक रुग्ण मृत्यू पावल्याचे नमूद केले आहे. मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून हे अलार्म योग्य आहेत किंवा नाही आणि असल्यास त्यावर काय उपचार करावेत हे आपोआप ठरवले जाते. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होते असे निदर्शनास आले आहे.   

 • डॉक्टरांचा वेळ : रुग्णाच्या नोंदी आणि अनेक रिपोर्ट्स अशी प्रशासकीय कामे करण्यात वाया जाणारा डॉक्टरांचा वेळ अशा संगणकीय प्रणालीमुळे वाचतो आणि ते रुग्णासाठी अधिक वेळ देऊ करू शकतात.
 • संकलित माहितीचे संशोधन : अनेक संशोधनात जगभरातल्या असंख्य देशांमधील लाखो रुग्णांची माहिती संकलित करून त्यावर अनेक प्रकारची संशोधने केली जात आहेत. यामध्ये औषधांचे परिणाम, रुग्णांना औषधे लागू पडणे, अनेक आजारांमागील कारणांचे, त्यांच्या लक्षणांचा अभ्यास करून आजारांबाबत नवे बदल तसेच इतर विविध बाबींची माहिती मिळवून त्याचे परिशीलन एआयद्वारे केले जाते. यामुळे वैद्यकीय संशोधनाच्या प्रगतीला चालना मिळाली आहे.
 • साथींचे नियोजन : आजमितीला कोरोनाच्या साथीचे आकडे, रुग्णसंख्या अशा विविध प्रकारच्या माहितीचे विश्‍लेषण करून साथ नियोजन केले जात आहे. आजाराची नवी लक्षणे आणि त्यावरील उपाय, औषधांची योग्यायोग्यता याबात निर्णय घेतले जात आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आकडेवारीतून करता साथीचे आणि जागतिक साथींचे सूतोवाच आणि तिचा परिणाम या विषयीचे अंदाज संगणकीय येतात.

तंत्रज्ञान सतत पुढे जात असते आणि मानवजातीसाठी वरदान ठरते. सर्वच यंत्रे कोणतेही कार्य सुलभ करतात आणि नंतर मानवी मार्गाने समस्येचे निराकरण करण्यात मदत करतात. जगातील प्रत्येक तंत्राचे स्वतःचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असतातच, मग कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला अपवाद कसा ठरू शकेल? मात्र विविध उद्योग, संशोधन क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्रात याला मोठ्या प्रमाणात महत्त्व येत आहे.

संगणकीय बुद्धिमत्तेवरील आक्षेप
    यंत्रमानव डॉक्टरांची जागा घेतील : डॉक्टरांची सगळी कामे जर यंत्रेच करणार असतील तर एक दिवशी डॉक्टरांची जागा यांत्रिक डॉक्टर्सच घेतील अशी शंका अनेकांना वाटते. पण ही यंत्रे अथांग वैद्यकीय ज्ञान साठवण्यासाठी वापरली जातात. त्यांचा वापर कुठे करायचा? संगणकाने दिलेल्या माहितीचा वापर कसा करायचा हे हाडामांसाचे डॉक्टर आपल्या बुद्धीने ठरवतात. रोबोटचे काम फक्त वैद्यकीय उपकरणे त्याच्या हातांच्या हालचालीच्या आज्ञे बर हुकुम अतिशय सूक्ष्मतेने आणि अचूकपणे (प्रिसाईज) कार्यरत ठेवणे एवढेच असते. त्यामुळे यंत्रमानव हे यापुढेही डॉक्टरांच्या मदतनिसांचीच भूमिका निभावतील. 
  

डॉक्टर आणि रुग्ण नाते : हे नाते या पद्धतीने यांत्रिक होईल अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकते आहे. संगणकीय बुद्धिमत्ता रुग्णाचे उपचार वेगाने आणि अचूक होतात. यामुळे रुग्णांचे समाधान वाढेल. या शस्त्रक्रिया डॉक्टरांनी अधिक कौशल्याने केल्याने रुग्णांशी संबंध जास्त पक्के होतील. डॉक्टरांवरील कामाचा बोजा कमी वेळात हलका झाल्याने, वाचलेल्या वेळात डॉक्टरांना रुग्णाशी जास्त वेळ संपर्कात राहता येईल.

रुग्णांच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता : संगणकीय माहितीचे संकलन करताना रुग्णांच्या माहितीची जगभरात देवाणघेवाण होते. यामुळे रुग्णाला त्याच्या आजाराची गोपनीयता ठेवता येणार नाही. काही दिवसांपूर्वी जगातील सोशल मीडियावरील अनेक कंपन्यांनी असे प्रयत्न केले खरे. मात्र अशा माहिती संकलनामध्ये रुग्णांच्या नावापेक्षा त्यांचे वय, लिंग, वंश, देश, वजन-उंची, त्याना असलेले आजार, त्यांच्या विविध तपासण्यांचे रिपोर्ट्स, आणि त्यांचे उपचार, त्यांच्या तब्येतीत झालेले बदल, औषधांचे चांगले वाईट परिणाम यांच्यावर जास्त भर असतो. अनेक देशात यामधील गोपनीयतेबाबत रुग्णांच्या बाजूने कायदे झालेले आहेत. साहजिकच हा प्रश्न निकालात निघतो आहे.

    वैद्यकीय निर्णय संगणक घेतील : या पद्धतीच्या उपचारांमध्ये माहितीचे संकलन आणि परिशीलन करून संगणक अनेक पर्याय देतात. रुग्णाला त्यातला कोणता पर्याय योग्य ठरेल याचा निर्णय डॉक्टरांनीच घ्यायचा असतो. यामध्ये देशोदेशीचे कायदे आणि नीतिनियम यांचा विचार संगणक करू शकत नाही. ते काम डॉक्टरांनाच करावे लागते.

तंत्रज्ञान सतत पुढे जात असते आणि मानवजातीसाठी वरदान ठरते. यंत्रे कोणतेही कार्य सुलभ करतात आणि नंतर मानवी मार्गाने समस्येचे निराकरण करण्यात मदत करतात. जगातील प्रत्येक तंत्राचे स्वतःचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असतातच, मग कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला अपवाद कसा ठरू शकेल?

संबंधित बातम्या