सेल्युलायटिस- त्वचेवरची घातक सूज

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 11 जानेवारी 2021

आरोग्य संपदा

शरीराचे अनेक आजार असे असतात की ते वरवर साधे वाटतात, पण दुर्लक्ष केलेत तर ‘काट्याचा नायटा’ व्हावा तसे वाढतात, क्वचितप्रसंगी गंभीर आणि प्राणघातक रूप धारण करू शकतात. सेल्युलायटिस हा असाच एक आजार आहे. या आजारात त्वचेवर अचानक गडद लाल चट्टा येतो आणि पाहता पाहता तो वाढत जातो. हा आजार बहुधा गुडघ्यांखालच्या पायांवर होताना दिसतो, पण सर्वांगावर तो कोठेही होऊ शकतो. यामध्ये त्वचेच्या आतल्या पेशींमध्ये जंतूसंसर्ग होतो, कमालीची सूज येते, खूप वेदना होतात आणि योग्य तपासण्या आणि उपचार वेळेत केले नाहीत आणि मधुमेहासारखे आजार आधीपासूनच असले तर पाय कापण्याचीही वेळ येते.

 • जगभरात दरवर्षी साधारणपणे १० लाख लोकांना हा आजार होतो. कित्येकांना त्यासाठी रुग्णालयात दाखलही व्हावे लागते.
 • सेल्युलायटिस म्हणजे त्वचेच्या खाली असलेल्या पेशी आणि पेशींच्या समूहाला आलेली सूज किंवा त्वचेच्या उतींचा दाह. शरीराच्या कोणत्याही भागावर सूज येते तेव्हा आढळणारी लक्षणेच या आजारात दिसून येतात.
 • ·ज्या भागावर सूज येते तो कमालीचा दुखतो. हातांनी थोडा स्पर्श केला तरी अतीव वेदना होतात.
 • ·त्वचेच्या ज्या भागावर तो येतो तो भाग लालबुंद होतो. मात्र या लाल झालेल्या भागाची किनार आखीव रेखीव नसते, उलट वेडीवाकडी आणि रंगातही कमीजास्त असते.
 • ·हातांनी स्पर्श केल्यावर हा भाग शरीराच्या इतर भागांपेक्षा खूपच गरम लागतो. 
 • ·लाली किंवा पुरळ वेगाने पसरू लागते.
 • ·या भागावरची त्वचा कडक आणि चमकदार बनते, त्यात छोट्या जखमांसारख्या भेगा दिसू लागतात आणि त्यात पू भरू लागतो.
 • ·रुग्णाला ताप येऊ लागतो. अनेकदा तापापूर्वी शहारे येऊन थंडीही भरते.
 • ·कसकस भरून येणे, सगळे अंग दुखणे अन्नावर वासना नसणे, डोके दुखणे असे त्रास होऊ लागतात.
 • ·तापाच्या इतर उपलक्षणांप्रमाणे गळून जाणे, थकवा येणे, क्वचितप्रसंगी डोके जड होणे गरगरणे अशीही लक्षणे आढळतात.
 • परंतु आजार पसरू लागल्यावर त्या भागामध्ये पिवळे फोड येऊन रक्तही येऊ शकते.

कारणे
त्वचेला एखादी जखम झालेली असल्यास, त्वचेवर इसब असल्यास, जळवातासारख्या आजारामुळे पायांना भेगा पडल्या असल्यास, पायाच्या बेचक्यांमधील चिखल्या झालेल्या असतील  यातून जंतूसंसर्ग होऊन सेल्युलायटिस होतो. काही वेळेस शस्त्रक्रिया केल्यानंतर होणाऱ्या टाक्यांमधून किंवा काही  कीटकदंश झाल्यावरही होऊ शकतो.  स्टॅफिलोकॉकस किंवा स्ट्रेप्टोकॉकस प्रकारच्या जिवाणूंचा यामध्ये संसर्ग होतो.

निदान
सेल्युलायटिसचे निदान शारीरिक तपासणीत सुजलेली त्वचा पाहताच होऊ शकते. यामध्ये त्वचेवरची सूज, त्वचेवर पसरलेली लाली आणि त्वचेला हात लावताच तो गरम लागणे आणि त्या भागाच्या संबंधातील सुजलेल्या रसग्रंथी यांनी होते.
यानंतर रुग्णाच्या जंतुसंसर्गाबाबत आणि इतर काही आजार असल्यास त्यासाठी मधुमेह वगैरे आजारांची तपासणी केली जाते. रुग्णाला कोणत्या प्रकारच्या जिवाणूंचा संसर्ग झाला आहे यासाठी जखमेतील स्त्रावाची प्रयोगशाळेत तपासणी करून जखमेतील जंतूंचा प्रकार, त्यांची  वाढ आणि त्याला प्रतिबंध करणाऱ्या औषधांबाबत चाचण्या केल्या जातात.

उपचार
सुरुवातीला जंतूसंसर्गावर प्रभावी प्रतिजैविके, सूज कमी करणारी आणि वेदनाशामक औषधे ५ ते १४ दिवस दिली जातात. रुग्णाची हालचाल थांबवण्यासाठी त्याला बरे होईपर्यंत पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला जातो. सेल्युलायटिस जर पायांवर असेल तर रुग्णाला बेडवर झोपवून त्याचा पाय हृदयाच्या पातळीच्या वर राहील अशा पद्धतीने व्यवस्था केली जाते.
    वेळेवर उपचार सुरु केल्यास ७ ते १० दिवसात सेल्युलायटिस पूर्ण बरा होऊ शकतो. मात्र रुग्णाला मधुमेहासारखा आजार असेल आणि तो अनियंत्रित असल्यास किंवा त्याची प्रतिकार प्रणाली कमकुवत असेल तर आजार बरा व्हायला जास्त काळ लागू शकतो. मात्र सुरुवातीला थोडी सुधारणा झाल्यावर अनेक रुग्ण औषधे बंद करतात. त्यामुळे जंतूंचा प्रतिरोध निर्माण होऊ शकतो. साहजिकच जखमेतील जंतू पूर्ण नष्ट होऊन आजार संपूर्णपणे बरा होईपर्यंत औषधे घ्यावीत.  
    जर पहिल्या तीन दिवसात सूज कमी होतेय अशी लक्षणे न दिसल्यास किंवा कडक ताप येत राहिल्यास, वेदना आणि सूज वाढत राहिल्यास, रुग्णाला इस्पितळात दाखल करून  इंजेक्शनच्या स्वरूपात शिरेवाटे प्रतिजैविके द्यावी लागतात. 
त्याही नंतर जर रुग्णाला कडक ताप येत राहिला, त्याचा रक्तदाब कमी व्हायला लागला आणि जंतुसंसर्ग आणि इतर लक्षणे कमी होत नाही असे लक्षात आल्यास अथवा रुग्णाला प्रतिकारप्रणाली कमकुवत करणारे आजार असल्यास, त्याची प्रकृती गंभीर आहे असे लक्षात घेऊन अतिशय काटेकोरपणे उपचार करावे लागतात. जखमांमध्ये जास्त पू असल्यास शस्त्रक्रियेच्या साह्याने तो काढून टाकणे आवश्यक ठरते. तसेच जर सेल्युलायटिसमुळे त्वचेखालील थर खराब झालेले आढळल्यास तेही शस्त्रक्रियेयोगे कापून काढावे लागतात.

रुग्णाने घ्यायची काळजी-

 • जखम स्वच्छ ठेवावी. त्यावर ड्रेसिंग केले असेल तर ते मळू देऊ नये किंवा पाण्यात भिजू देऊ नये. शौचाला किंवा मूत्रविसर्जन करताना काळजी घ्यावी.
 • ड्रेसिंग एका दिवसात ओले झाल्यास योग्य जंतुनाशके, मलमे आणि औषधे वापरून पुनश्च ड्रेसिंग करावे. जखमेवर नुसता कापूस लावू नये. अन्यथा डॉक्टरांकडूनच नियमितपणे ड्रेसिंग करून घ्यावे.
 • पायाला सेल्युलायटिस असल्यास खुर्चीत बसल्यावर किंवा बिछान्यात झोपल्यावर तो वरच्या पातळीवर ठेवावा.
 • खूप वेदना आणि आग होत असल्यास दिवसातून एक-दोन वेळा बर्फाचा किंवा कूल-कॉम्प्रेसचा शेक घ्यावा. गरम पाण्याच्या पिशवीने शेकू नये.
 • सेल्युलायटिससाठी डॉक्टरांनी दिलेल्या औषधोपचाराबरोबर मधुमेह, रक्तदाब किंवा तत्सम जुन्या आजारांची औषधे व्यवस्थितपणे, नियमित आणि खंड न पडता घ्यावीत.  

सेल्युलायटिस संसर्गजन्य असतो का?
सेल्युलायटिस संसर्गजन्य नसतो, सहसा एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होत नाही. मात्र सेल्युलायटिसने बाधित व्यक्तीच्या जखमेला दुसऱ्याने स्पर्श केला आणि त्या दुसऱ्या व्यक्तीच्या हातांना जर एखादी क्षुल्लक जखम, तडा, चिखल्या, इसब असा काही विकार असला तर त्या दुसऱ्या व्यक्तीला सेल्युलायटिस होऊ शकतो. कमकुवत रोगप्रणाली असलेल्या व्यक्तीलादेखीलबाधित व्यक्तीकडून सेल्युलायटिस होण्याची शक्यता असते.

गुंतागुंत
सेल्युलायटिसचा उपचार न केल्यास जंतुसंसर्ग त्वचेच्या अंतर्भागात पसरू शकतो. तेथून तो रसग्रंथीत पसरून रक्तात पसरू शकतो. रक्ताभिसरणात पसरल्यावर ''सेप्टिसिमिया'' नावाची दुर्धर आणि प्राणगंभीर परिस्थिती निर्माण होऊन शरीरातील मेंदू, फुफ्फुसे, मूत्रपिंडे, हृदय अशा सर्व महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होतो. यामध्ये रुग्ण दगावू शकतो. 

    सेल्युलायटिसमधून पसरणारा जंतुसंसर्ग आणि सूज यामुळे ''सेप्सिस'' ही परिस्थिती निर्माण होते. यात रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होऊ शकतात. या गाठी महत्त्वाच्या अवयवात जाऊन हृदयविकाराचा झटका येणे, अर्धांगवायू होणे, मूत्रपिंडे निकामी होणे, फुफ्फुसांचे कार्य मंदावणे अशासारख्या गंभीर घटना घडू शकतात. सेप्सिस झालेल्या रुग्णात मृत्यू होण्याचे प्रमाण ३० ते ५० टक्के आहे.    उपचार न केल्यास सेप्सिसमुळे रक्तदाब खूपच कमी होऊन रुग्णाला ''सेप्टिक शॉक'' ही प्राणघातक परिस्थिती उद्भवू शकते. 

    सेल्युलायटिसचे उपचार अर्धवट घेतल्यास रसग्रंथी निकामी होतात. त्याचा परिणाम प्रतिकारप्रणालीवर होऊन अन्य आजारातले त्रास वाढू शकतात. त्याचबरोबर अपुऱ्या उपचारामुळे जंतुसंसर्ग त्वचेमधून त्वचेच्या खाली असलेल्या स्नायू आणि चरबीच्या थरांमध्ये पसरतो. यामुळे ''नेक्रोटायझिंग फेशियाटिस'' हा विकार उद्भवून तेथल्या संसर्गाने खराब झालेले थर शस्त्रक्रिया करून काढावे लागतात. क्वचितप्रसंगी हा आजार जास्त पसरल्यास अनेकदा शस्त्रक्रिया कराव्या लागतात आणि कित्येकदा रुग्णाचा पूर्ण पाय शस्त्रक्रियेने कापावा लागतो. 

डोळ्यांचा सेल्युलायटिस
बाह्य त्वचेप्रमाणे सेल्युलायटिस आपल्या डोळ्याच्या बाबतीतही होऊ शकतो. डोळ्यांच्या सेल्युलायटिसचे दोन प्रकार आहेत: पेरीऑरबिटल (किंवा प्रीसेप्टल) सेल्युलायटिस-. ही परिस्थिती पापणीच्या पेशीसमूहावर परिणाम करते आणि लहान मुलांमध्ये ती अधिक आढळते. 

ऑर्बिटल सेल्युलायटिस- ही स्थिती अधिक गंभीर असते. यात डोळ्याच्या खोबणीमध्ये सूज येते. त्यामुळे डोळ्यांची हालचाल प्रतिबंधित होते. 

डोळ्यांच्या सेल्युलायटिसमध्ये सामान्यत: मौखिक प्रतिजैविकांनी उपचार केले जातो. तोंडावाटे दिली जाणारी प्रतिजैविके प्रभावी न ठरल्यास, ती शिरेमध्ये द्यावी लागतात. काही रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करून डोळ्याच्या खोबणीतील स्त्राव आणि पू काढावा लागतो.

प्रतिबंध
मधुमेह, कर्करोग, एचआयव्ही, मूत्रपिंडे अकार्यक्षम असणे अशा विकारांच्या व्यक्तींनी खरेतर प्रत्येकानेच ही काळजी घ्यावी.

पायांना भेगा पडू नये यासाठी काळजी घ्यावी. पायांची त्वचा ओलसर ( मॉईश्चराईझ्ड) ठेवण्यासाठी उपाय करावेत. पायाच्या बोटांच्या बेचक्यांमध्ये चिखल्या होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी असल्यास त्याचा त्वरित उपचार करावा. काम करताना, खेळताना, चालताना पायांना इजा होऊ नये म्हणून योग्य प्रकारचे बूट वापरावेत. अशा रुग्णांनी चपला वापरू नयेत. इजा किंवा संसर्गाच्या लक्षणांकरिता दररोज आपल्या पायांची तपासणी करावी.

सेल्युलायटिस हा वरवर अगदी साधा वाटणारा पण अनेकदा गंभीर स्थिती निर्माण करणारा आजार आहे. याला घरगुती उपचार करून वेळ घालवू नये. कारण बहुतेकदा काही तासांतच हे जीवघेण्या रक्तसंसर्गामध्ये रुपांतरीत होऊ शकते. गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यासाठी लवकरात लवकर प्रतिजैविक उपचार सुरू करणे आवश्यक असते

संबंधित बातम्या