तीव्र मानसिक तणाव  

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 18 जानेवारी 2021

आरोग्य संपदा

‘मला खूप मानसिक तणाव आहे,’ असे जाहीर करण्याला आजकाल एक स्टेट्स सिम्बॉल मानले जाते. व्यक्ती जेवढी मोठी, त्याचे/ तिचे कार्यक्षेत्र जेवढे मोठे तेवढे ताण-तणाव जास्त. त्यामुळे अगदी पहिलीतल्या मुलापासून ते देशाच्या बड्या नेत्यांपर्यंत सर्वांना दैनंदिन जीवनातल्या ताणतणावांना सामोरे जावेच लागते.
मात्र ‘तीव्र मानसिक तणाव’ हा सर्वस्वी वेगळाच प्रकार असतो. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एखादी जबरदस्त आघात करणारी घटना घडते. आघात शारीरिक असतो किंवा मानसिक असतो. त्यानंतर काही तासात किंवा एक दोन दिवसात त्या व्यक्तीमध्ये काही तीव्र लक्षणे दिसू लागतात. साधारणतः ही लक्षणे एका महिन्यापर्यंत दिसतात. त्याला ‘तीव्र मानसिक तणाव’ किंवा अक्यूट स्ट्रेस डिसऑर्डर’ म्हणतात. 
तीव्र लक्षणांचा हा काळ एका महिन्यापेक्षा जास्त दिवस राहिला तर त्याला ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर’ (पीटीएसडी) म्हणतात. 

कारणे
तीव्र मानसिक तणाव निर्माण होण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या आयुष्यात एखादी भयानक घटना घडलेली असते. उदाहरणार्थ, एखादा गंभीर अपघात, गंभीर दुखापत, हिंसाचार किंवा मारून टाकण्याची धमकी. असे काही प्रत्यक्ष त्या व्यक्तीसमोर किंवा तिच्याबाबत घडलेले असेल. त्या व्यक्तीच्या जवळच्या कुणाबाबत घडलेली, म्हणजे त्या व्यक्तीशी अप्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या घटनादेखील या प्रकारचा तीव्र तणाव निर्माण करू शकतात. काहीवेळा आपल्या जवळच्या व्यक्तींबाबत काही भयानक घटना घडते. त्याची बातमी ऐकताच किंवा इतरांकडून त्याचा वृत्तांत ऐकताच किंवा इतरांबाबत अशी काही भयानक घटना त्यांच्या समोर घडल्यास या व्यक्ती त्या मानसिक क्लेशकारक घटनांचा पुन्हा अनुभव घेतात,  त्यांना त्या गोष्टी आठवतात आणि एक जबरदस्त चिंता त्यांच्या मनात उद्भवते.

या लोकांमध्ये त्यांचे शरीर आणि मन यांचे विघटन झाल्यासारखी वेगळी लक्षणे दिसू लागतात. याला ‘डिसोसिएटिव्ह सिम्प्टम्स’ म्हणतात. म्हणजे त्यांना 

 • भावनिकदृष्ट्या सुन्न वाटते 
 • स्वत: स्वतःपासून विलग झालो आहोत 
 • ज्याला ते स्वतः अमुकतमुक समजतात ती कोणी तरी वेगळीच व्यक्ती आहे. 
 • आपण जे आहोत ते खरे नाही आपण कोणी वेगळेच आहोत.
 • आपण आपल्यापासून डिस्कनेक्ट झालो आहोत असे वाटत राहते. 

तीव्र मानसिक तणाव असलेल्या लोकांची संख्या जगभरात खूप जास्त आहे. जेव्हा क्लेशदायक घटना खूप गंभीर असतात, पुनःपुन्हा घडत राहतात किंवा तीव्र  
मानसिक ताण निर्माण होण्याची शक्यता जास्त असते, तेव्हा हा विकार होण्याची शक्यता जास्त असते. 

निदान
या आजाराचे निदान करताना डॉक्टर्स काही विशिष्ट निकष आधारभूत धरतात. त्याबाबतचे रुग्णांचे मूल्यमापन करून निदान केले जाते. यात प्रामुख्याने ती व्यक्ती एखाद्या गंभीर आणि भयानक घटनेस सामोरी गेलेली असावी लागते, तरच त्यांना तीव्र मानसिक तणाव आहे किंवा नाही हे ठरवता येते. 

या व्यतिरिक्त खाली उल्लेख केलेल्या लक्षणांपैकी किमान ९ लक्षणे, जर कमीत कमी ३ दिवस ते ओक महिना एवढ्या कालावधीत त्या व्यक्तीने सहन केलेली असली तर त्याला अॅक्युट स्ट्रेस डिऑर्डरने ग्रासले आहे असे समजावे.. 

 • वारंवार घडणाऱ्या, अनियंत्रित आणि त्रासदायक घटनांच्या आठवणी.
 • त्रासदायक घटनेची पुनरावृत्ती होतेय असे वाटणारी स्वप्ने पडणे.
 • दिवसभरात ती क्लेशदायक घटना पुन्हा घडतेय अशी जाणीव करून देणारे फ्लॅशबॅक येणे 
 • त्या घटनेसदृश आणि त्या घटनेची आठवण करून देणारी परिस्थिती उद्भवल्यास तीव्र मानसिक किंवा शारीरिक त्रास होणे. उदाहरणार्थ,  ती घटना घडली त्या जागी पुन्हा गेल्यास, किंवा त्या जागेसारखाच परिसर दिसल्यास. काही बाबतीत त्या घटनेच्या वेळी ऐकलेले आवाज ऐकू येणे आणि तो त्रास पुन्हा जाणवणे वगैरे. 
 • आनंद, समाधान किंवा प्रेमळ भावना अशा सकारात्मक भावनांशी फारकत घेणे. जीवनातल्या अन्य प्रसंगातला आनंद अनुभवण्याची इच्छा किंवा क्षमता संपणे. 
 • मध्येच एकदम खूप गरगरणे, बधीर होणे किंवा कालचक्र खूप मंदगतीने चालले आहे असे वाटणे. आजूबाजूच्या वास्तवाबाबत जाणीवा बदलणे.
 • आघातजन्य घटनेच्या महत्त्वपूर्ण भाग अजिबात न आठवणे, आंशिक स्मृतिभ्रंश होणे
 • त्या विवक्षित घटनेशी संबंधित त्रासदायक आठवणी, विचार किंवा भावना टाळण्यासाठी सतत प्रयत्न करणे
 • त्या घटनेची आठवण देणारे लोक, तशाच जागा,  ठिकाणे, त्याप्रकारची संभाषणे, क्रियाकलाप, वस्तू आणि परिस्थिती टाळण्याचे प्रयत्न करत राहणे
 • झोप नीट न लागणे
 • चिडचिडेपणा वाढणे किंवा मध्येच क्रोधाचा अतिरेक होणे
 • तशा प्रकारचा धोका पुन्हा होऊ नये म्हणून अत्याधिक लक्ष देणे (हायपरव्हिजिलन्स)
 • कोणत्याही गोष्टीवर एकाग्रता होण्यास अडचण येणे
 • मोठा आवाज, अचानक हालचाली किंवा इतर उत्तेजनांना कमालीच्या जास्त प्रमाणात  प्रतिसाद देणे (एक्झॅगरेटेड रिस्पॉन्स) किंवा अचानक दचकणे (स्टार्टल रीअॅक्शन)  
 • या सोबतच या  लक्षणांमुळे त्या व्यक्तीच्या महत्त्वपूर्ण दैनंदिन कार्यात अडथळे येत राहणे आवश्यक असते. मात्र ही लक्षणे दुसऱ्या एखाद्या आजारामुळे किंवा काही औषधांचा परिणाम म्हणून तर उद्भवलेली नाहीत ना हे देखील पाहिले जाते. 

उपचार
मनावर खोलवर आघात करणाऱ्या परिस्थितीतून बाहेर पडल्यावर अनेकांचा तीव्र मानसिक तणाव दूर होतो असे आढळून येते. अशावेळेस त्यांना समंजसपणे समजावून सांगावे लागते, त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल सहानुभूती व्यक्त करावी लागतेच. जे काही घडले आणि त्याबद्दल त्या रुग्णाची प्रतिक्रिया याचे वर्णन करण्याची संधी त्या व्यक्तीला द्यावी लागते. किंबहुना ही वर्णने आणि प्रतिक्रिया जितक्या जास्त वेळा त्यांना सांगायला लावाल तेवढ्या लवकर त्या व्यक्ती त्या आघातातून बाहेर पडतात. हे काम बहुधा भेटायला येणारे विविध नातेवाईक आणि मित्रमंडळी अजाणतेपणे पार पाडत असतात. अन्यथा डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्यसेवकांना हे काम करावे लागते. 

अशा व्यक्तींना काही वेळा चिंता कमी करण्यासाठी किंवा झोप येण्यासाठी काही तात्पुरती औषधे दिली जातात;  परंतु नैराश्यविरोधी औषधे (अँटिडिप्रेसंट्स) मात्र सामान्यत: दिली जात नाहीत.

स्वत:ची काळजी
संकट किंवा आघातादरम्यान आणि नंतर रुग्णाने स्वत:ची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. स्वत:ची काळजी तीन घटकांमध्ये विभागली जाऊ शकते:

 1. वैयक्तिक सुरक्षा- वैयक्तिक सुरक्षा हा मूलभूत घटक आहे. एखाद्या दु:खद घटनेनंतर, जेव्हा लोकांना आपले प्रियजन सुरक्षित असल्याचे कळते, तेव्हा लोक त्या अनुभवावर प्रतिक्रिया देण्यास अधिक सक्षम असतात. घरगुती अत्याचार, युद्ध किंवा कोरोनासारखे संसर्गजन्य आजार अशा सर्व जगभरात  चालू असलेल्या संकटात संपूर्ण सुरक्षा मिळविणे अवघड असते. अशा प्रकारच्या अडचणी दरम्यान,  आपण किंवा आपले प्रियजन शक्य तितके सुरक्षित कसे राहतील याबद्दल त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
 2. शारीरिक स्वास्थ्य- कोणताही आघातपूर्ण प्रसंग घडला तर शारीरिक आरोग्यावर अनेक परिणाम होतात. यामध्ये वेळेवर न जेवणे, खाण्याकडे दुर्लक्ष करणे, नियमित वेळेला झोपणे यामध्ये विस्कळीतपणा येणे. नियमित केला जाणार व्यायाम बंद होण्याचे प्रकार नक्की घडतात. त्यामुळे अशा आघातपूर्ण प्रसंगात सापडलेल्या व्यक्तीने सुरुवातीला आणि नंतरसुद्धा खाणे, झोपणे आणि व्यायामाचे निरोगी वेळापत्रक पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मादक औषधांच्या आणि मद्यसेवनाच्या आहारी जाता कामा नये. अशा सवयी आधीपासून असल्यास त्या व्यक्तीने त्यापासून या काळात दूर राहायला हवे.
 3. माइंडफुलनेस- स्वत:ची काळजी घेताना मनावर आघात करणाऱ्या तणावपूर्ण घटना,  कंटाळवाणे प्रसंग, राग, दु:ख आणि एकाकीपणाची भावना या कमी कशा होतील याकडे लक्ष पुरवावे लागते. शक्य असल्यास तीव्र मानसिक तणावातून बाहेर पाडण्यासाठी दररोजचे सर्वसाधारण वेळापत्रक तयार करून, त्यांचे नियमितपणे अनुसरण केले पाहिजे. म्हणजे सकाळी उठणे, स्नान करणे, कपडे घालणे, बाहेर जाणे आणि फिरायला जाणे आणि नियमित जेवण बनवणे इत्यादी

आपल्याला आवडणारे छंद, गायन, वादन, नृत्य, चित्रकला, पेंटिंग्ज, विनोदी चित्रपट पाहणे, उत्तम पदार्थ बनवणे अशा मनाला उल्हसित करणाऱ्या क्रियाकलापांमध्ये मन गुंतवणे, खूप उत्तम. यामुळे मनातले त्रासदायक आणि भीतीदायक विचार दूर पळतात. एखाद्या संकटात आप्तेष्टांशी संबंध टिकवून ठेवणे अवघड असले तरीही त्यांचा पाठिंबा असणे खूप आवश्यक असते. शरीराला सैलावणारे स्ट्रेचिंग एक्झरसायझेस, अन्य व्यायाम हे तर उपयुक्तच असतात. रोजच्या रोज शांत बसून स्वत:च्या श्वासाकडे लक्ष देऊन श्वास मोजत मोजत आजूबाजूचे आवाज काळजीपूर्वक ऐकत केलेले मेडिटेशन मनाला स्थिर करू शकते. 

पण नुसते शांत बसून राहिले तर त्या प्रसंगाच्या आठवणी जाग्या होतात आणि लोक आघातग्रस्त होतात. म्हणूनच इतर गोष्टींकडे आपले विचार वळवणे आवश्यक असते. कादंबरी वाचणे किंवा कोडे सोडवण्यात गुंग होणे आवश्यक असते. अप्रिय संवेदना एखाद्या आघाता दरम्यान आणि नंतर सामान्यतः ‘गोठलेल्या’ वाटू शकतात, म्हणूनच भावना कल्लोळ करणाऱ्या कला, छंद आणि आवडत्या गोष्टी केल्यास आराम मिळू शकतो. गप्पा मारत नुसते हसणे, एखादा मजेदार चित्रपट पाहणे, काहीतरी बिनमहत्त्वाचे काम करणे किंवा चित्र काढणे अशा अनेक वाटा त्या व्यक्ती चोखाळू शकतात. 

ताणतणावाच्या प्रसंगात आपली जवळच्या व्यक्तींशी विशेषतः आपण ज्यांची खास काळजी करतो त्यांच्याशी सुद्धा रागाने वागणे, भांडण काढणे अशा गोष्टी घडत असतात. आवडत्या क्रियाकलापात मन रिझवल्यावर अशा घटना आपोआपच कमी होत जातात.

एखाद्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिलेला असूनही त्याला उत्स्फूर्तपणे माफ करणे ही प्रत्येकासाठी एक विन-विन परिस्थिती असते. म्हणजे मी पण हरलो नाही आणि तू पण जिंकला नाहीस. एक छान पत्र पाठविणे, कोणता तरी एखादा मस्त पदार्थ बनवून भेट देणे, कुकी बनविणे आणि ती व्यक्ती भेटल्यावर त्याच्याबरोबर खळाळून हसण्याने त्या दुसऱ्या व्यक्तीला आश्चर्यचकित तर करतेच पण आपला हताशपणा आणि उदासीनता कमी होते.

आजच्या वेगवान जीवनात आणि बदललेल्या जीवनशैलीत हताश करणारे, सर्वस्वावर घाला घालणारे अनेक प्रसंग घडत असतात. त्यातून तीव्र मानसिक तणावाचे प्रसंग उभे राहत असतात. पण अशा वेळी स्वतःला सावरणे आणि योग्य त्या वेळी मानसोपचार तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हे नितांत आवश्यक असते.

संबंधित बातम्या