बीजांडकोषातील गाठी

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

आरोग्य संपदा

प्रजनन क्षमता हे सर्व सजीवांमध्ये आढळणारे वैशिष्ट्य आहे. विकसित प्राणी वर्गामध्ये त्यासाठी विशेष कार्य करणारी जननसंस्था असते, मानव प्राणीही त्याला अपवाद नाही, स्त्री-पुरुषांमध्ये पुनरुत्पादनासाठी जननसंस्था असते. स्त्रियांच्या जननसंस्थेमध्ये बीजांडकोश हा प्रजनन प्रणालीचा  महत्त्वाचा अवयव असतो.

स्त्रियांमध्ये दोन बीजांडकोश असतात आणि ते  गर्भाशयाच्या  दोन्ही बाजूला खालच्या ओटीपोटात असतात. त्यामध्ये स्त्रीबीजांची निर्मिती होते आणि इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांचे विशेष हार्मोन्स निर्माण होतात. कधीकधी एका बीजांडकोशात द्रवपदार्थाने भरलेली थैली विकसित होते.  त्याला सिस्ट किंवा गळू म्हणतात. असे सिस्ट तयार होणे ही एक सर्वसाधारण गोष्ट असते.  बहुतेक वेळेस सिस्ट सामान्य आणि  वेदनारहित असतात, तसेच त्या स्त्रीला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. 

बीजांडकोशाच्या सिस्टचे प्रकार
बीजांडकोशाच्या सिस्टचे विविध प्रकार असतात. डर्मोइड सिस्ट आणि एंडोमेट्रिओमा सिस्ट असे दोन मुख्य प्रकार असतात. पण फंक्शनल सिस्ट्स हा सर्वात जास्त आढळणारा प्रकार आहे.  फंक्शनल सिस्टचे फॉलिकल सिस्ट आणि कॉर्पस ल्युटीयम सिस्ट असे दोन प्रकार असतात.

 • फॉलिकल सिस्ट : मासिक पाळी दरम्यान काही स्त्रियांत फॉलिकल नावाच्या पिशवीत स्त्रीबीजे वाढतात.  ही थैली बीजांडकोशातच असते.  बहुतेकदा ही थैली फुटून खुली होते आणि त्यातून स्त्रीबीजांचे विमोचन होते. परंतु ही थैली जर फुटली नाही तर थैलीच्या आतला द्रव बीजांडकोशात गाठ बनवू शकतो. यालाच फॉलिकल सिस्ट म्हणतात.
 •  कॉर्पस ल्यूटियम सिस्ट : बहुतेकवेळा स्त्रीबीजे बाहेर पडल्यावर फॉलिकल्स (थैल्या) सामान्यत: विरघळतात.  परंतु जर त्या विरघळल्या नाहीत तर थैलीमध्ये अतिरिक्त द्राव तयार होतो आणि त्यांची तोंडे बंद होतात. हा द्राव जास्त प्रमाणात जमा होऊन कॉर्पस ल्यूटियम सिस्ट बनतात.

बीजांडकोशांच्या इतर प्रकारच्या सिस्ट्समध्ये खालील मुख्य प्रकार असतात.

 •  डर्मॉइड सिस्ट : केस, चरबी आणि इतर पेशीसमूहांचा समावेश असलेल्या थैलीची बीजांडकोशावर वाढ होते. 
 •  सिस्टॅडिनोमा : अंडाशयांच्या बाह्य पृष्ठभागावर विकसित होऊ शकणारी परंतु कर्करोग नसलेली पेशीसमूहांची वाढ.
 •  एंडोमेट्रिओमा : गर्भाशयाच्या आत सामान्यत: वाढणारे पेशीसमूह गर्भाशयाच्या बाहेरील भागामध्ये विकसित होतात आणि गर्भाशयाला चिकटतात, त्यामुळे हे सिस्ट तयार होते. 
 •  पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम  : यामध्ये बीजांडकोशात मोठ्या संख्येने लहान सिस्ट्स तयार होतात. बीजांडकोशाचा आकार वाढतो. अनेक स्त्रियांमध्ये ही स्थिती निर्माण होते. यावर उपचार न घेतल्यास  स्त्रीबीजांचे विमोचन होत नाही आणि वंध्यत्व निर्माण होऊ शकते.

ओव्हेरियन सिस्टची लक्षणे 
बहुतेकदा यात कोणतेही लक्षण उद्धवत नाही.  मात्र सिस्टचा आकार वाढत गेल्यास खालील लक्षणे दिसू शकतात.  पोट फुगल्यासारखे वाटणे, पोटात गुबारा धरणे किंवा सूज येणे, आतड्यांच्या हालचालीमुळे पोट दुखणे, मासिक पाळीच्या  आधी किंवा दरम्यान ओटीपोटात दुखणे, वेदना होणे, शरीरसंबंधात वेदना होणे, कंबर आणि मांड्या दुखणे, स्तनांमध्ये वेदना होणे, मळमळ आणि उलटी होणे अशी लक्षणे दिसतात. मात्र, ओटीपोटात कमालीच्या तीव्र किंवा तीक्ष्ण वेदना होत असतील, कडक ताप, अशक्तपणा किंवा चक्कर येत असेल किंवा श्वासोच्छ्वासाची गती खूप वाढली असेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असते. कारण ही लक्षणे सिस्ट फुटल्याची (रप्चर्ड ओव्हेरियन सिस्ट) किंवा सिस्टच्या देठाशी तिढा पडल्याची (ओव्हेरियन टॉर्शन) असू शकतात. त्वरित उपचार न घेतल्यास या दोन्ही गुंतागुंती गंभीर स्वरूप धारण करतात. 

गुंतागुंतीचे काही अन्य प्रकार 
बहुतेक ओव्हेरियन सिस्ट्स ही किरकोळ किंवा सौम्य असतात आणि उपचार न करताही नैसर्गिकरीत्या विरून जातात.  परंतु क्वचितप्रसंगी त्यामध्ये ‘सिस्टिक ओव्हेरियन मास’  हा कर्करोग आढळू शकतो. ओव्हेरियन टॉर्शन ही या सिस्ट्सची महत्त्वाची गुंतागुंत असते. यामध्ये सिस्ट एवढा मोठा होतो की बीजांडकोश त्याच्या मूळ जागेवरून सरकतो किंवा त्याच्या देठाशी पीळ पडतो. यामुळे बीजांडकोशाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो आणि उपचार न केल्यास बीजांडकोशाची हानी होते आणि त्यातील पेशीसमूह मृत होतात.  आपत्कालीन स्त्रीरोगविषयक शस्त्रक्रियांमध्ये या गुंतागुंतीचे प्रमाण तीन टक्क्यांपर्यंत असते. जेव्हा सिस्ट्स फुटतात त्यावेळेस तीव्र वेदना आणि  अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो.  या प्रकारात जंतूसंसर्गाची जोखीम वाढते आणि उपचार न घेतल्यास ही स्थिती जिवाला धोकादायक ठरू शकते.

 • ओव्हेरियन सिस्टचे निदान: स्त्रियांच्या नियमित तपासणीत केल्या जाणाऱ्या अंतर्गत वैद्यकीय तपासणीत ओव्हेरियन सिस्टचे निदान होऊ शकते.
 •  अल्ट्रासाऊंड : बीजांडकोशात सिस्ट आहे का? त्यावर सूज आली आहे का? हे पाहण्यासाठी  अल्ट्रासाऊंड चाचणीचे केली जाते. अल्ट्रासाऊंड चाचणीमध्ये सिस्टचा प्रकार, त्याचे स्थान, आकार, रचना आणि त्यात घन पदार्थ आहे की द्राव भरलेला आहे हे निर्धारित करण्यात मदत होते.

सीटी स्कॅन आणि एमआरआयद्वारे अंतर्गत अवयवांची सखोल प्रतिमा पाहून निदान पक्के करता येते. बहुतेक सिस्ट्स काही आठवड्यांनंतर किंवा काही महिन्यांनंतर नाहीसे होत असल्याने त्यावर त्वरित उपचार योजना करायची आवश्यकता नसते. त्याऐवजी काही आठवड्यांनी किंवा महिन्याभराने अल्ट्रासाऊंड चाचणी पुन्हा करून निदान पक्के करता येते. रुग्णाच्या स्थितीत कोणताही बदल होत नसल्यास किंवा सिस्ट आकारात वाढत असल्यास, लक्षणांची इतर कारणे निश्चित करण्यासाठी अतिरिक्त चाचण्या केल्या जातात. यात- ती स्त्री गरोदर नाही ना याची खात्री करण्यासाठी  गर्भधारणा चाचणी केली जाते तसेच हार्मोन-संबंधित मुद्द्यांचा तपास करण्यासाठी इस्ट्रोजेन  किंवा  प्रोजेस्टेरॉनच्या रक्तातील पातळ्या तपासल्या जातात. सीए-१२५ ही चाचणी गर्भाशयाच्या कर्करोगाची शंका दूर करू शकते.

उपचार 
ओव्हेरियन सिस्टसाठी औषधोपचार आणि शस्त्रक्रियांचे विविध पर्याय आवश्यकतेनुसार केले जातात.

 •  गर्भ निरोधक गोळ्या : जर ओव्हेरियन सिस्ट्स पुन्हापुन्हा होत असतील तर इस्ट्रोजेन-प्रोजेस्टेरोन असलेल्या गर्भ निरोधक गोळ्या (ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स) काही काळ दिल्या जातात. त्यायोगे स्त्रीचे अंडविमोचन आणि पाळी रोखली जाते. त्यामुळे नव्याने सिस्ट्स तयार होत नाहीत.  या गर्भनिरोधक गोळ्यांनी अशा स्त्रियांत गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.  पोस्टमेनोपॉझल महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो.
 •  लॅपरोस्कोपी (दुर्बिणीतून होणारी शस्त्रक्रिया) : ओव्हेरियन सिस्टच्या निदानासाठी केलेल्या सोनोग्राफी किंवा स्कॅनमध्ये जर छोटे सिस्ट आहेत आणि कर्करोगाची शक्यता आहे असे सांगितले असेल तर त्यासाठी लॅप्रोस्कोपी केली जाते. या प्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी आपल्या नाभीजवळ एक छोटासा छेद घेऊन ओटीपोटात लॅपरोस्कोप सोडून ही सिस्ट काढून टाकली जाते आणि सूक्ष्मदर्शकाद्वारे त्याचे परीक्षण करून कर्करोग आहे किंवा नाही हे ठरवले जाते.  
 •  लेप्रॉटॉमी : जर ओव्हेरियन सिस्ट आकाराने मोठा असेल तर पोटावर छेद घेऊन, पोट उघडले जाते आणि शस्त्रक्रियेद्वारे सिस्ट काढले जाते  किंवा त्याची बायोप्सी केली जाते आणि सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली जाते. यात जर सिस्ट कर्करोगाचा आढळल्यास  गर्भाशय, बीजांडकोश, बीजनलिका काढून टाकण्यासाठी  टोटल हिस्टरेक्टॉमी  करतात .
 •  ओव्हेरियन सिस्टचा प्रतिबंध : तसे पाहता ओव्हेरियन सिस्ट होऊच नये यासाठी कोणताही प्रतिबंधक उपाय नाही. मात्र स्त्रियांनी वरकरणी काही त्रास नसताना स्त्रीरोग विषयक शारीरिक तपासणी तज्ज्ञांकडून करून घेतल्यास त्यांचे वेळेवर निदान होऊन पुढील त्रास व धोके टाळता येतात. बहुतेक सिस्ट्समध्ये कर्करोगाची शंका घ्यायचे कारण नसते. पण ओव्हेरियन कर्करोगामध्ये सिस्टसारखीच लक्षणे असतात. त्यामुळे मासिक पाळीत बदल, ओटीपोटात खूप दुखणे, अन्नावरची वासना उडणे, भूक न लागणे, एकाएकी अचानक वजन कमी होणे, ओटीपोट फुगल्यासारखे वाटणे अशी लक्षणे असतील तर डॉक्टरांना त्वरित दाखवून निदान आणि उपचार करून घ्यावे लागतात.
 •  दीर्घकालीन समस्या : रजोनिवृत्ती होण्यापूर्वीच्या वयात अनेक स्त्रियांमध्ये ओव्हेरियन सिस्ट्स उद्धवतात. पण बहुतेकदा ते काही महिन्यात नाहीसेही होतात. पेरीमेनोपॉजल स्त्रियांमध्ये आणि संप्रेरकांचे असंतुलन असलेल्या स्त्रियांत ओव्हेरियन सिस्ट्स वारंवार उद्धवतात. उपचार न केल्यास, काही सिस्ट्स  प्रजनन क्षमता  कमी करू शकतात.  एंडोमेट्रिओमा आणि पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोममध्ये हे खात्रीने आढळते.  प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी, हे सिस्ट काढले जातात किंवा त्यांच्यातील द्रवपदार्थ काढून ते आकुंचित केले जातात.  फंक्शनल सिस्ट, सिस्टॅडेनोमा आणि डर्मॉइड अल्सर प्रजननक्षमतेवर परिणाम करीत नाहीत. रजोनिवृत्तीनंतर बीजांडकोशात निर्माण होणाऱ्या गाठी ओव्हेरियन सिस्ट असू शकतात किंवा बीजांडकोशाच्या कर्करोगाच्यासुध्दा असू शकतात. त्यामुळे या वयातील सिस्ट शस्त्रक्रियेद्वारे काढून त्यांची तपासणी करणे कित्येकदा गरजेचे असते. सर्वसाधारणपणे ५ सेंमीपेक्षा मोठ्या गाठी असल्यास त्या काढून टाकून त्यांची तपासणी करणे गरजेचे असते. मात्र ओव्हेरियन सिस्टमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढत नाही. 
 •  गरोदरावस्था आणि ओव्हेरियन सिस्ट :  काही ओव्हेरियन सिस्टमुळे प्रजननक्षमता कमी होते तर अनेक सिस्टमुळे प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, एंडोमेट्रिओमा यामुळे गर्भधारणा होण्यामध्ये अडथळे येतात. पण फंक्शनल सिस्ट, डर्मॉइड सिस्ट आणि सिस्टॅडिनोमा आकाराने फारसे मोठे नसल्यास गर्भधारणेवर काहीही परिणाम होत नाही. 
 • स्त्री गर्भवती झाल्यानंतर जर सिस्टचे निदान झाले तर ते शस्त्रक्रियेने काढून टाकायचे किंवा नाही हे त्या सिस्टच्या प्रकारावर आणि आकारावर अवलंबून राहते. बहुतेक सिस्ट निरुपद्रवी असतात आणि शस्त्रक्रियेच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नसते.  परंतु त्या सिस्टमध्ये कर्करोगाचा संशय आल्यास किंवा तो फुटला तर मात्र शस्त्रक्रिया अनिवार्य ठरते.

ओव्हेरियन सिस्ट्स हा अत्यंत कॉमन आजार असतो. शंभरातील ऐंशी स्त्रियांना त्याचा त्रास होत नाही. पण जननक्षमता आणि कर्करोग यांच्याशी त्यांचा संबंध असल्यामुळे, त्याकडे दुर्लक्ष न करता, त्याचे निदान आणि उपचार वेळेवर करावेत

संबंधित बातम्या