तळपायाची आग...

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 12 एप्रिल 2021

-

वैद्यकीय परिभाषेत ज्याला ‘पेरिफेरल न्यूरोपाथी’ किंवा ‘बर्निंग फीट सिंड्रोम’ म्हणतात, त्यात पायातील सूक्ष्म मज्जातंतू दुखावल्याने अतिक्रियाशील बनलेले असतात, त्यांच्यातील ऊर्जा वेगाने बाहेर पडत राहते. हे क्षतिग्रस्त मज्जातंतू मेंदूला विपरीत संदेश देतात. त्यामुळे मज्जातंतूंना सूज येणे आणि ते खराब होणे हेच या तळपायांच्या आगीचे कारण असते.

खूप राग आला की आपण म्हणतो, ‘तळपायाची आग मस्तकात गेली’. परंतु या जगात काही व्यक्ती अशा असतात, की त्यांना राग आलेला असो, आनंद झालेला असो वा दुःख, त्यांच्या तळपायांची सततच आग आग होतच राहते. कधी ही आग सौम्य असते, तर कित्येकदा इतकी असह्य होते की त्यांना पाऊलही उचलवत नाही. पायांची आग होण्याबरोबरच काहींच्या पायांना मुंग्या येत राहतात, काहींचे पाय बधीर होतात, तर त्या उलट काही जणांना पायांना कशाचाही स्पर्श झाला तरी त्रास होतो, तर अनेकांना पायांना असह्य वेदनादेखील होत राहतात.

कारणमीमांसा
या लक्षणाला वैद्यकीय परिभाषेत ‘पेरिफेरल न्यूरोपाथी’ किंवा ‘बर्निंग फीट सिंड्रोम’ म्हणतात. पायातील सूक्ष्म मज्जातंतूना इजा झालेली असल्याने ते अतिक्रियाशील बनतात आणि त्यांच्यातील ऊर्जा वेगाने बाहेर पडत राहते. हे क्षतिग्रस्त मज्जातंतू मेंदूला विपरीत संदेश देतात, त्यामुळे जखम झालेली नसतानाही ती झाल्यासारखे संदेश मेंदूला जातात. त्यामुळे मज्जातंतूंना सूज येणे आणि ते खराब होणे हेच या तळपायांच्या आगीचे कारण असते. तसे पाहिले तर तळपाय हा शरीराचाच भाग असतो. त्यामुळे शरीराला इतरत्र होणारे आजार तळपायांनाही होत असतात. आगआग होण्याचा आजार तळहातांना आणि तळपायांना विशेष करून होतो. शरीराच्या कुठल्याही भागातून मेंदूकडे संवेदना वाहून नेणारे मज्जातंतू त्या त्या भागातून विविध प्रकारच्या संवेदना मेंदूकडे पोचवितात. त्वचेकडून संवेदना वाहून नेणारे मज्जातंतू प्रामुख्याने उष्णता किंवा गारव्याच्या संवेदना मेंदूकडे पोचवतात. अंतस्थ अवयवांतून बहुतांशी वेदनेच्या संवेदना वाहिल्या जातात. हे सर्व कार्य विद्युत-रासायनिक पद्धतीने चालते. त्वचेमध्ये विविध प्रकारच्या संवेदनांचे रिसेप्टर असतात. हे रिसेप्टर त्या विशिष्ट प्रकारच्या संवेदना ओळखून संबंधित मज्जातंतूंमार्फत मेंदूकडे पाठवतात. 
तळपायातून मेंदूकडे जाणाऱ्या या संवेदना विजेच्या प्रवाहाप्रमाणे जातात. या मज्जातंतूंमधून जाणारा विजेचा प्रवाह विशिष्ट गतीने जात असतो. मेंदूमधे या गतीवरुन ही संवेदना कोणत्या प्रकारची आहे हे ओळखले जाते. म्हणजे विशिष्ट गतीने जाणारी संवेदना गरम आहे का गार, वेदना आहे का सुखदायक आहे, याचे विश्लेषण आणि ग्रहण मेंदूत होते. एकाच मज्जातंतूंमधून एकाच मार्गाने जाणाऱ्या संवेदना कोणत्या प्रकारच्या आहेत हे मेंदूच्या विविध भागात ठरविले जाते. तळपायांची आग होते तेव्हा तळपायाचे तपमान पहिले तर ते वाढलेले नसते, तेथील पेशी गरम होत नाहीत. परंतु संवेदना नेणाऱ्या मज्जातंतूंमधून जाणाऱ्या विजेच्या प्रवाहाची गती बदलते आणि मेंदूमध्ये त्याचा अर्थ गरम संवेदना असा लावला जातो. मेंदूत अनेक भागामध्ये सतत काम करणाऱ्या पेशी रासायनिक द्रव्ये तयार करतात. ही रासायनिक द्रव्ये विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळात व विशिष्ट गतीने तयार होणे आवश्‍यक असते. यात काही बदल झाला तर ज्या अवयवातून हा विद्युतप्रवाह मेंदूकडे जातो, तेथे कोणताही विकार नसला तरी वेगळीच संवेदना निर्माण होते. 

विविध आजार
तळपायांची आग होण्याचे लक्षण विविध आजारांमध्ये दृष्टोत्पत्तीस येते.

 • मधुमेह ः मधुमेह जेव्हा नियंत्रित नसतो, त्यावेळेस तळपायांची आग हे हमखास जाणवणारे लक्षण असते. किंबहुना पायांची आग होते अशी तक्रार घेऊन डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांत मधुमेही रुग्णच सर्वात जास्त प्रमाणात आढळतात.
 • मद्यपान ः मद्यपानामुळे अनेक शारीरिक दुष्परिणाम जाणवतात. मद्यपानानंतर रक्तामधील अल्कोहोलचे प्रमाण वाढते. सततच्या अतिरिक्त मद्यपानाने रक्तातील वाढलेल्या अल्कोहोलमुळे शरीरातील मज्जासंस्थेवर दुष्परिणाम होतात. अतिरिक्त मद्यपानामुळे आणि तेही सातत्याने करत राहिल्याने, डोक्यापासून पायापर्यंत पसरलेल्या सर्वच मज्जातंतूंना इजा होतेच, पण पायाचे मज्जातंतू याला हमखास बळी पडतात आणि त्यातूनच या मज्जातंतूंचा दाह सुरू होतो. मधुमेह वगळता ही तक्रार मद्यपी व्यक्तींमध्येच जास्त प्रमाणात आढळते. 
 •  ‘ब’ जीवनसत्त्वाचा अभाव ः ‘ब’ जीवनसत्त्वाचे बारा घटक असतात. त्यातील ‘ब-१२’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे मज्जातंतूंना सूज येऊन हा त्रास उत्पन्न होतो. पूर्ण शाकाहारी व्यक्तींमध्ये ‘ब-१२’  जीवनसत्त्वाचा अभाव हमखास आढळतो. क्वचित प्रसंगी ‘फोलेट’ आणि ‘ब-६’ या जीवनसत्त्वांची कमतरता असल्यासही पायांची आगआग होण्याचीच लक्षणे निर्माण होतात. जठरावर शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींमध्ये ‘ब’ जीवनसत्त्वाचे अभिशोषण मंद होते आणि हा त्रास जाणवू शकतो.
 • अॅनिमिया ः रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप कमी असल्यास सर्वांगाची आग जाणवते. पर्निशियस अॅनिमिया या विकाराने ग्रासलेल्या व्यक्तींमध्ये ‘ब’ जीवनसत्त्वाचे अभिशोषण होत नाही. त्यांना पायांची आग सतत जाणवते. 
 • मूत्रपिंडाचे विकार ः मूत्रपिंडांचे कार्य कमी झाल्यास रक्तातील दूषित पदार्थ वाढून ‘युरेमिया’ नावाची परिस्थिती निर्माण होते. यातही पायांची आग होत राहते.
 • थायरॉईडचे प्रमाण कमी असणेः हायपोथायरॉईडिझम या विकारात शरीरातील थायरॉईड संप्रेरकांची पातळी कमी होते. यामध्ये पायांची आग होऊ शकते.
 • औषधे ः काही विशिष्ट औषधांचे साइड इफेक्ट्स म्हणून हा त्रास होऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने कर्करुग्णाला दिल्या जाणाऱ्या केमोथेरपी, एचआयव्हीसाठी दिली जाणारी काही औषधे, ‘ब-६’ जीवनसत्त्व जास्त प्रमाणात दिले गेल्यास, ‘आयसोनायझाईड’ हे क्षय रोगाकरिता वापरले जाणारे औषध, ‘अमायोडेरॉन’ हे हृदयाच्या अनियमित ठोक्यांसाठी वापरले जाणारे औषध अशा औषधांबरोबरच ‘मेटफॉर्मीन’ ह्या मधुमेहातील औषधाने देखील असा त्रास होतो.
 • रक्तवाहिन्यांची सूज ः व्हॅस्क्युलायटिस नावाच्या विकारात रक्तवाहिन्यांना सूज येते, त्यातही हा त्रास होतो.
 • विषबाधा ः शिसे, पारा, आर्सेनिक अशा रासायनिक धातूंचा शरीराशी सतत संपर्क आल्यास त्यांचे रक्तातील प्रमाण वाढून पायांची आग होणे हे एक लक्षण दिसून येते.
 •  अॅथलीट्स फीट ः यात पायांना बुरशीजन्य आजार होऊन पायांची आग होते.
 • पेरीफेरल व्हॅस्क्युलर डिसीज ः या आजारात तळपायाच्या रक्तवाहिन्या आकुंचित राहून पायांना होणारा रक्तप्रवाह कुंठित होतो आणि चालताना पायांना वेदना होतात, ते बधीर होतात आणि पायांची आग होते. 
 • एचआयव्ही ः एचआयव्हीची बाधा झाली असल्यास हातापायाची जळजळ वाढणे हा त्रास आढळतो. यासोबतच स्नायू कमजोर होणे, वेदना जाणवणे, जळजळ वाढणे तसेच सुसंगती बिघडणे अशा समस्यादेखील वाढतात.  
 • या व्यतिरिक्त पिसवांच्या दंशाने होणारा लाईम डिसीज, जनुकजन्य मज्जातंतूंचा आजार एमीलॉईड पॉलीन्युरोपाथी, सार्कोयडोसीस, गिया बारी सिंड्रोम, मज्जातंतूंच्या आवरणांना नष्ट करणारा डीमायलीनेटिंग न्यूरोपाथी हा विकार, एरीथ्रोमेगॅलिया हा रक्तवाहिन्यांच्या आकुंचन प्रसरणामध्ये बाधा आणणारा विकार, अशा असंख्य आजारात पायांची आग होण्याची लक्षणे नजरेत भरतात.

निदान
पायांची आगआग होते अशी तक्रार घेऊन डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांचे निदान करताना खालील महत्त्वाच्या गोष्टी असतात.

रुग्णाची प्राथमिक तपासणी  

 • यात त्याचा मद्यपानाचा इतिहास, इतर आजारांचा आणि त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांचा इतिहास तपासला जातो. 
 • रुग्णाच्या पायांचे, गुडघ्याचे, टाचेचे रिफ्लेक्सेस तपासले जातात. त्याच्या त्वचेची संवेदना पाहिली जाते.  
 • रक्तातील हिमोग्लोबिन, ‘ब-१२’ जीवनसत्त्व, साखरेची पातळी अशा गोष्टी तपासल्या जातात. 
 • आवश्यक वाटल्यास पाठीतील पाणी तपासले जाते.
 • आवश्यक वाटल्यास पायांच्या मज्जातंतूंमधील विद्युतवहन मोजण्यासाठी ‘नर्व्ह कंडक्शन’ ही विशेष तपासणी केली जाते.
 • स्नायूंमधील विद्युतवहन तपासणारी ‘ईएमजी’ या तपासण्या केल्या जातात. 
 • काही वेळेस आवश्यक वाटल्यास मज्जातंतूंची बायोप्सी करून अंतस्थ बदलांचा अभ्यास केला जातो.

उपचार
पायांच्या आगीला थोपविण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपचारात मज्जातंतूंची इजा थोपविणे हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. परंतु काही आजारात ही इजा नियंत्रित करणे शक्य नसते, त्यामुळे पायांची आग शमविण्यासाठी फक्त लक्षणाचा त्रास कमी करणे एवढेच शक्य असते. रुग्णाला मधुमेहामुळे हा त्रास जाणवत असेल तर सर्वात आधी रक्तातील साखरेची पातळी योग्य नियंत्रणात आणून ती सातत्याने नॉर्मल ठेवावी लागते. त्यासाठी औषधे, इन्शुलिन याबरोबर व्यायाम आणि पथ्य पाळणे निकडीचे असते. मद्यपानाने तळपायांची आगआग होत असेल तर मद्यपान कायमचे बंद करणे गरजेचे असते. मूत्रपिंडाचे कार्य कमी झालेल्या रुग्णाला डायलिसिसद्वारे रक्तात साचत जाणाऱ्या अशुद्ध पदार्थांची पातळी कमी करणे हा उपाय असतो. 
गिया बारी सिंड्रोम किंवा डीमायलीनेटिंग न्यूरोपाथीमध्ये प्लाझ्माफेरेसिस, इम्यून ग्लोब्युलीन थेरपी हे आधुनिक उपचार केले जातात. ‘ब-१२’ जीवनसत्त्वाचा अभाव असेल तर रुग्णाला या जीवनसत्त्वाच्या गोळ्या किंवा इंजेक्शन्स घ्यावी लागतात. अॅथलीट्स फीटमध्ये पायांच्या बुरशीजन्य आजाराचे उपचार करावे लागतात. पायांना काही जखमा नसल्यास थंड पाण्यामध्ये दहा मिनिटे पाय ठेवून बसल्यास थोडा आराम मिळू शकतो.
औषधे
पायांची आग थांबण्यासाठी आग होण्याचे लक्षण कमी करणारी काही औषधे वापरली जातात. यात ‘अॅमिट्रिप्टिलिन’, ‘कार्बामेझापिन’, ‘डेसिप्रॅमिन’, ड्युलोक्सेटीन’, ‘गाबापेंटीन’, ‘प्रीगाबलीन’, ‘टोपिरॅमेट’, ‘व्हेनलॅफेक्सिन’ अशी औषधे गुणकारी ठरतात. वेदना कमी करायला पेनकिलर्स देणे गरजेचे ठरते. खरेतर तळपायांची आगआग होणे हा तसा क्षुल्लक प्रकारातला त्रास असतो, पण त्यामागची कारणे शोधल्यास त्याचा बंदोबस्त नक्कीच करता येतो.
 

संबंधित बातम्या