दीर्घ आजारातील अरिष्ट -बेड सोअर

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 19 एप्रिल 2021

आरोग्य संपदा

बेड सोअर हा वाढत्या वयाशी आणि त्यातून उद्भवणाऱ्या अंथरुणाला खिळवून ठेवणाऱ्या आजारांशी संबंधित विकार आहे. त्याला योग्य महत्त्व देणे आणि त्याचा प्रतिबंध करणे याबद्दल सर्वांनाच जाणीव असण्याची आवश्यकता आहे.

कोणत्याही दीर्घकालीन आजारामुळे एखादा रुग्ण अंथरुणाला खिळून राहिल्यावर शरीरावर होणाऱ्या जखमांना बेड सोअर किंवा शय्या व्रण म्हणतात. अशा व्यक्ती बहुतेक वेळेस दुर्धर आजारांनी बिछान्यात दिवसच्यादिवस पडून राहिलेल्या असतात, किंवा आजारामुळे बेशुध्दीत असतात. रुग्ण बिछान्यावर झोपल्यावर किंवा व्हीलचेअरमध्ये बसल्यावर शरीराचा दबाव ज्या ठिकाणी सतत येत राहतो अशा जागांवरील त्वचेला जखमा होऊन बेड सोअर निर्माण होतात. बेड सोअरना दबावव्रण, प्रेशर सोअर किंवा डेक्युबिटस अल्सर असेही म्हणतात. अशा रुग्णांच्या त्वचेची स्पर्श संवेदना काही विशिष्ट ठिकाणी एकदम कमी झालेली असते, त्याठिकाणी या जखमा होतात.

वृध्द, कृश आणि विकलांग व्यक्तींच्या बाबतीत शय्या व्रण गंभीर स्वरूप धारण करू शकतात. अंथरुणाला खिळलेल्या या व्यक्तीला योग्य परिचारक उपचार न मिळाल्याचे ते निदर्शक असतात. साधारणतः ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये याचे प्रमाण अधिक असते. भारतामध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांत बेड सोअरचे प्रमाण ४.९४ टक्के आहे.

कारणे
शरीरातील काही जागा अशा असतात की जेथे त्वचेखाली विशेष मांसल भाग नसतो. त्याच्या खाली अगदी पातळ स्नायू असतात आणि त्याही खाली हाडांचे टोकदार भाग असतात. त्यामुळे बेड सोअर होण्याच्या जागा म्हणजे- खांद्याच्या मागील खवाटे, माकडहाड, कंबरेच्या वरील भाग, गुडघ्याच्या दोन्ही बाजू आणि मागील भाग, नितंब, टाचा, पायांच्या बोटांचा तळव्याकडील भाग, कोपर तसेच डोक्याचा मागील भाग या असतात.

रुग्ण दीर्घकाळ एकच अवस्थेत राहिल्याने एका बाजूने शरीराचे वजन हाडांच्या टोकावर येते आणि दुसऱ्या बाजूने बिछान्याकडून होणाऱ्या प्रतीरोधामध्ये हाडावरील त्वचेवर दबाव येतो. या दाबामुळे तेथील रक्तवाहिन्या दाबल्या जाऊन त्वचेला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. रक्तपुरवठा असा दोन ते तीन तास खंडित झाल्यास त्वचेला रक्तातून मिळणारा ऑक्सिजन आणि पोषण बंद होते. आणि त्यातून त्वचेच्या त्या भागावर बेड सोअरची जखम निर्माण होते.

त्वचेवर होणारे घर्षण, मज्जारज्जूला दुखापत असणे, शरीराच्या विशिष्ट भागावर ओलावा असणे -बिछान्याला खिळून असणाऱ्या रुग्णांत मलमूत्र विसर्जन अनैच्छिकपद्धतीने होत असल्यास कंबरेच्या भागावर ओलावा राहतो तसेच शरीरातील पाणी कमी झाल्यास होणाऱ्या निर्जलीकरणामुळे (डिहायड्रेशन) त्वचा शुष्क होऊन हाडांच्या वरील भागात जखमा झाल्यास अथवा मधुमेह, हृदयरोग तसेच स्थूलत्व असल्यास बेड सोअर होण्याची शक्यता जास्त असते. रुग्णाला पक्षाघाताचा झटका आल्यामुळे अर्धे अंग लुळे पडले असल्यास रुग्णाची हालचाल कमी होते, शरीराच्या त्या भागातील त्वचेची संवेदना कमी झालेली असते त्यामुळे शय्या व्रण होतात. महत्त्वाच्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला बिछान्यात हालचाल न करता झोपून राहावे लागणेही बेड सोअर व्हायला पूरक ठरते. पायांच्या हाडांच्या दुखापतीनंतर प्लास्टर घातल्यावर पायांची हालचाल करता येत नाही. अशावेळेस जर प्लास्टर घट्ट झाल्यास त्याच्या दबावामुळे आणि घर्षणामुळे प्रेशर सोअर होतात.  

लक्षणे  

  • बेड सोअर निर्माण होण्याचे चार टप्पे असतात.
  • बेड सोअर तयार होण्यापूर्वी ती जागा लालसर होते. हात लावून पाहिल्यास ती थोडी गरम लागते.. त्यानंतर ती जागा जांभळट आणि काळसर होते. रुग्णाला त्या जागेवर आगआग होणे, वेदना होणे, खाज सुटणे अशा संवेदना जाणवू लागतात. 
  • या टप्प्यात त्वचेमध्ये छेद निर्माण होतो. काही वेळेस ती खरचटल्यासारखी दिसते, काही रुग्णांना तिथे फोड येतो. त्वचा अधिकच गडद दिसू लागते. यावेळेस वेदना वाढू लागतात. 
  • ही जखम नंतर खोल जाऊ लागते. तिथे खड्डा पडतो. त्या भागावरील कातडी पूर्ण नष्ट होते.
  • यानंतर जखमेचा आकार वाढतो. ती त्वचेखालील स्नायू, स्नायूबंध, हाडे आणि सांध्यांपर्यंत इजा पोहचवते. या टप्प्यात जखमेमध्ये मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग होतो, आणि पू निर्माण होतो.

यानंतरच्या टप्प्यात ती आणखी खोल जाते आणि रुंद होते. जखमेची काळजी वेळेत न घेतल्यास जखम बिछान्याला चिटकून त्वचेचा मांसासह मोठा ढलपा विलग होऊ शकतो. रुग्णाच्या जखमेतून येणाऱ्या स्त्रावाला खूप दुर्गंधी येत राहते. जखमेमधील जंतूसंसर्गाने रुग्णाला ताप येऊ लागतो. जर जखमेत जंतुसंसर्ग जास्त झाला आणि वेळीच उपाय केले नाहीत तर जखमेच्या बाजूला असलेल्या मांसल भागात आणि शेजारील महत्त्वाच्या अवयवांमध्ये तो पसरू शकतो. यामध्ये रुग्णाच्या रक्तप्रवाहात जंतूसंसर्ग मिसळून सेप्टीसिमिया होऊ शकतो.

बेड सोअर खूप हळूहळू बरे होतात. ते जितके खोल गेलेले असतील तितके ते बरे व्हायला अधिकाधिक काळ घेतात. शिवाय रुग्णाची एकूण शारीरिक अवस्था कमजोर असेल, त्याला मधुमेहासारखा विकार असेल तर रुग्णाला त्यातून बरे व्हायला अनेक महिने किंवा काही वेळेस अनेक वर्षेही लागू शकतात. अशा खोलवर पसरलेल्या बेड सोअरवर क्वचितप्रसंगी शस्त्रक्रियेचाही उपाय करावा लागतो. 

रुग्णाची जखम आणि त्याच्या आजाराचा इतिहास घेऊनच डॉक्टर बेड सोअरचे निदान करू शकतात.

प्रतिबंधक उपचार
बेड सोअरचे उपचार मुख्यत्वे नर्सिंग केअरचेच उपचार असतात. यामध्ये जखम होण्यापूर्वीच किंवा पहिल्या टप्प्यात असताना रुग्णाला सतत बाजू बदलून झोपवणे आवश्यक असते. रुग्णाला दर दीड-दोन तासांनी कूस बदलून झोपवावे लागते. रुग्णाचे मलमूत्र विसर्जन झाल्यावर त्या जागा पूर्ण कोरड्या कराव्या लागतात. रुग्णाला डायपर वापरत असल्यासही ही काळजी प्रकर्षाने घ्यावी लागते.
रुग्णाला जरी एका जागेवर जखम झालेली असली तरी अन्य संभाव्य जागांची काळजी घ्यावी लागते. स्पिरीटने या संभाव्य जागा रोजच्या रोज ओल्या करून कोरड्या करत राहिल्यास त्या भागांवरील त्वचा थोडी कडक होऊन बेड सोअर टळू शकतात.
रुग्णाला नितंबावर किंवा कंबरेवर जखमा असल्यास जखमेभोवताली राहणाऱ्या पण जखमेवर दबाव येऊ न देणाऱ्या गोलाकार उशा वापरल्या जातात. डोक्याला जखम होण्याची शक्यता असल्यास अर्धवर्तुळाकार डोनटच्या आकाराच्या स्पंज भरलेल्या उशा वापरल्या जातात.

दीर्घकालीन आजारांच्या रुग्णाला साध्या कडक बिछान्यावर झोपवल्यास हमखास बेड सोअर होतात. आणि नुसती मऊ गादी वापरूनही जखमा होऊ शकतात. त्यामुळे अशा रुग्णांना गादीमध्ये कापसाऐवजी हवा भरलेले बेड्स किंवा पाण्याने भरलेले वॉटर बेडस वापरले जातात. वॉटर बेडमध्ये एका छोट्या मोटरने आतले पाणी सतत बाहेर काढून परत भरणाराही प्रकारही असतो. 

उपचार
बेड सोअर मधील खराब झालेली मृत त्वचा आणि आतील मांसल भाग कातरून काढावा लागतो. त्याच बरोबर जखम न उत्तम जंतुनाशक औषधे वापरून स्वच्छ केली जाते. आणि त्याचे नियमितपणे निर्जंतुक पद्धतीने ड्रेसिंग केले जाते. 

काही रुग्णांत हवेच्या निगेटिव्ह दबावाने जखमेतील स्त्राव काढून जखम कोरडी ठेवली जाते. याला ''निगेटिव्ह प्रेशर वुंड थेरपी'' म्हणतात. याने जखम कोरडी होऊन लवकर भरून येण्यास मदत होते. दाह कमी करणारी औषधे आणि प्रतिजैविके दिली जातात. रुग्णाला पोषक आहार घेण्याच्या सूचना द्याव्या लागतात. तसेच फिजिओथेरपीचे व्यायामही दिले जातात.

जखम खूप खोल असल्यास किंवा भरून येण्यास खूप उशीर होत असल्यास रुग्णाचीच अन्य निरोगी भागातील त्वचा वापरून जखमेवर त्वचारोपण केले जाते.

आधुनिक वैद्यक उपचारांनी मानवांचे आयुर्मान वाढत चालले आहे. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतीयांचे सरासरी आयुर्मान ३६ वर्षे होते आज ते सत्तरीच्या घरात जाऊन पोचले आहे. मात्र त्यामुळे वृद्धांची संख्या वाढत चालली आहे आणि साहजिकच वृद्धापकाळामधील आजारही वाढत आहेत. बेड सोअर हा असाच वाढत्या वयाशी आणि त्यातून उद्भवणाऱ्या अंथरुणाला खिळवून ठेवणाऱ्या आजारांशी संबंधित विकार आहे. त्याला योग्य महत्त्व देणे आणि त्याचा प्रतिबंध करणे याबद्दल सर्वांनाच जाणीव असण्याची आवश्यकता आहे.

संबंधित बातम्या