म्युकरमायकोसिस- समज चुकीचे, गैरसमज पक्के

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 28 जून 2021


आरोग्य संपदा

म्युकरमायकोसिस या आणखी एका आजाराने सध्या समाजमनाला वेठीला धरले आहे. या आजाराबाबतच्या काही गैरसमजांचे निराकरण होणे आवश्यक आहे.

कोरोनाबाबत नव्याने वाढत्या माहितीने आणि रुग्णसंख्येच्या व मृत्यूंच्या रोजच्या आकडेवारीने सध्या सगळ्यांच्याच डोक्यावर भयाची एक अदृश्य तलवार सतत टांगलेली आहे. एप्रिल महिन्यापासून या भीतीत आणखी एका आजाराची भर पडली आहे. म्युकरमायकोसिस! लोकांच्या भयामध्ये आणि सोशल मीडियाप्रणित ‘मुक्त’ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आणखी एका विषयाने प्रवेश केला. कोरोनाच्या बाबतीत नित्यनियमाने नव्या संभ्रमांची आणि गैरसमजांची ‘बौछार’ करणाऱ्या सोशल मीडिया पंडितांनी म्युकरमायकोसिसबाबतही काही कसूर ठेवली नाही. साहजिकच या विकाराचा उद्‌भव आणि त्यावरील उपाय यांच्या संदर्भात अनेक समज आणि गैरसमजांचे पेव फुटले. 

यामुळे खाली दिलेल्या चुकीच्या समजांचे निराकरण होणे आवश्यक आहे.

म्युकरमायकोसिस कुणालाही होऊ शकतो?
आपल्या आजूबाजूला पर्यावरणात जिवाणू (बॅक्टेरिया), विषाणू (व्हायरस), प्रोटोझोआ (आमांश किंवा अमीबासारखे), बुरशीजन्य सूक्ष्मजीव (मोल्ड्स), अनेक सूक्ष्मजीव असतात. यातील बुरशीजन्य सूक्ष्मजीवात म्युकरमायकोसिसचा समावेश होतो. हे म्युकोराल्स नावाच्या वर्गामध्ये मोडतात. माती, धूळ, चिखल, कुजलेला कचरा, कुजलेले अन्नधान्य, शेण यात यांचे वास्तव्य असते.

निरोगी मानवी शरीरात नैसर्गिक प्रतिकारप्रणालीमुळे या म्युकोराल्सचे वास्तव्य दुरापास्त असते. पण जेव्हा मधुमेह, कोरोनाची बाधा आणि स्टेरॉइड्सचा अतिरिक्त वापर हे ‘खलनायकी त्रिकूट’ एकत्र येते आणि आपली प्रतिकारप्रणाली कमकुवत होते, तेव्हाच याचा संसर्ग होऊ शकतो. याशिवाय एड्स, कर्करोग, दीर्घकालीन आजार, ऑटोइम्युन डिसिजेस, अवयवारोपण झालेले रुग्ण अशांमध्येही प्रतिकारप्रणाली दबलेली राहते. या रुग्णांमध्येसुद्धा म्युकरमायकोसिस होऊ शकतो.

मात्र, प्रत्येक मधुमेही रुग्णाला कोरोना झाला आणि त्याला स्टेरॉइड्स दिली म्हणजे त्याला म्युकरमायकोसिस होईलच असे नाही.

     भारतातील शास्त्रीय सर्वेक्षणानुसार अलीकडच्या म्युकर रुग्णांपैकी २० टक्के टक्के रुग्णांना मधुमेह नसूनही म्युकरची लागण झाली.  या रुग्णांतील ७६ टक्के रुग्णांनाच स्टेरॉइड्स दिली गेली होती.

म्युकरमायकोसिस हा नवा आजार आहे?
वैद्यकीय जगताला हा आजार सुमारे दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ माहिती आहे. फ्रेडरिक कुचेनमाएस्तर या जर्मन डॉक्टरने १८५५मध्ये याचे वर्णन केले आहे तर फरब्रिंजर या डॉक्टरने १८७६मध्ये या आजाराबाबत संशोधन केले होते. आंबराईच्या मातीत याचे स्पोअर्स सापडतात असे डॉ. पी.सी. मिश्रा यांनी १९७९मध्ये दाखवून दिले होते.

कोरोनाची महासाथ येण्यापूर्वीदेखील भारतात या आजाराचे प्रमाण जगातील इतर देशांच्या तुलनेत ७० पटीने जास्त होते. आजही भारतात याचे २५ हजार रुग्ण असावेत असा अंदाज आहे. यात महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यातच प्रत्येकी सात हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत.

म्युकरमायकोसिस केवळ नाकाला आणि डोळ्यांना होतो?
म्युकरमायकोसिसचे सहा प्रकार आहेत. सध्या आढळणारा ‘ऱ्हायनोसेरेब्रल’ नावाचा प्रकार आहे. एकुणात या प्रकाराचे रुग्ण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असतात. या प्रकारात नाकामधून म्युकरचे बुरशीजन्य जंतू प्रवेश करतात. त्यानंतर ते गालांच्या हाडांच्या खाली असलेल्या मॅग्झिलरी सायनसमध्ये प्रवेश करतात. त्यानंतर डोळ्याच्या खोबणीत आणि तिथून नंतर मेंदूतही पसरू शकतात. याशिवाय, जठरात (गॅस्ट्रो इंटेस्टायनल), फुफ्फुसात (पल्मनरी), त्वचेवरील, तसेच सर्व शरीरात पसरणारा असेही याचे प्रकार आहेत.

म्युकरमायकोसिसला ‘काळी बुरशी’ म्हणतात, कारण या बुरशीचा रंग काळा असतो?
हे मात्र सर्वस्वी चुकीचे विधान आहे. म्युकरमायकोसिस हा म्युकोराल्स नावाच्या बुरशीच्या वर्गातून होतो, त्यात अनेक प्रकार आहेत. त्यातील ऱ्हायझोपस ओरायझी हा प्रकार स्वच्छ नितळ आणि पारदर्शक असतो. त्वचेला बाधित करणाऱ्या म्युकरमायकोसीसमधील ‘डर्माशिअॅशस’ नावाच्या बुरशीच्या पेशींच्या बाह्य आवरणामध्ये मेलॅनीन हे काळ्या रंगाचे द्रव्य असते. केवळ या प्रकारालाच शास्त्रीय दृष्ट्या काळी बुरशी म्हणता येईल. भारतात काही प्रसारमाध्यमांनी त्याही पुढे जाऊन म्युकरमायकोसीसचे पांढरी बुरशी, पिवळी बुरशी असे केलेले रंगीबेरंगी नामकरणही शास्त्रीयदृष्ट्या विसंगत आहे.

रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण?
म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांचे त्वरित निदान करून त्यांना लायपोसोमल अॅम्फोटेरीसिन-बी द्यावे लागते आणि त्यांच्या नाकावर तसेच सायनसवर, डोळ्यांवर अशा एका मागून एक अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागतात. या आजारात रुग्णांचे दगावण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. 

कोरोनाची साथ येण्यापूर्वी ‘सीडीसी’ या अधिकृत अमेरिकी आरोग्यसंस्थेने त्यांच्या आकडेवारीनुसार म्युकरच्या रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण ५४ टक्के नमूद केले होते. मात्र भारतातील सध्याच्या आकडेवारीनुसार रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३१ टक्के आहे.

म्युकरमायकोसिस हा कोरोना होऊन गेल्यावर उद्‌भवतो?
कोलकात्याचे प्रख्यात एंडोक्रायनॉलॉजिस्ट आणि वैद्यकीय पाठ्यपुस्तक लेखक डॉ. अवधेशकुमार सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनपूर्ण सर्वेक्षणात ६० टक्के रुग्णांना कोरोनाची लागण असतानाच म्युकर होतो. केवळ ४० टक्के रुग्णांना तो कोरोनापश्चात होतो. 

म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या व्यक्तीचे त्वरित विलगीकरण करावे.
म्युकरमायकोसिसची लागण बाधित व्यक्तीपासून निरोगी व्यक्तीला होत नाही. या बुरशीपासून हवेत सूक्ष्म कण (स्पोअर्स) पसरतात. ते श्वासातून शरीरात जातात आणि हा आजार होतो. त्यामुळे या व्यक्तीला जर कोरोनाचे अॅक्टिव्ह इन्फेक्शन असेल तरच त्याला विलगीकरण लागेल, अन्यथा नाही. 

ऑक्सिजन सिलेंडरला लावलेल्या ह्युमिडीफायरच्या पाण्यातून म्युकर पसरतो? 
भारतातील एका प्रख्यात हॉस्पिटलमधील नामांकित डॉक्टरांनी, ‘ऑक्सिजन सिलेंडरला लावलेल्या ह्युमिडीफायरचे पाणी शुद्ध नसेल तर त्यातून म्युकरचा प्रसार होतो,’ असे विधान केले होते. मात्र या क्षेत्रातील संशोधकांनी 
   

म्युकरची बुरशी पाण्यामध्ये स्पोअर्स निर्माण करू शकत नाही.
     ऑक्सिजन सिलेंडरमधून ह्युमिडीफायमध्ये येणाऱ्या शुध्द प्राणवायूमुळे पाण्यात बुरशी असली तरी ती टिकू शकत नाही.  हे स्पष्ट केले आहे. 
रुग्णांच्या मास्कमध्ये म्युकरचे बुरशीजन्य सूक्ष्मजंतू वाढतात?
हे विधान प्रत्यक्ष तपासण्यांमध्ये चुकीचे ठरले आहे.

रेफ्रिजरेटरमधून आणि त्यात ठेवलेल्या कांद्यामधून म्युकर पसरतो?  
घरातल्या फ्रीजमध्ये अनेकदा काळ्या रंगाची बुरशी जमा होते. आणि फ्रीजमध्ये कांदे ठेवले तर त्यावर कधी कधी काळी बुरशी जमा होते. त्यामुळे ‘व्हॉट्सअॅप विद्यापीठातील’ अनेक ‘पंडित’ असे सांगत सुटले की फ्रीजमधून म्युकरचा प्रसार होतो. परंतु हे धादांत चुकीचे आहे. फ्रीजमधील कांद्यांवर जमा होणाऱ्या बुरशीचा प्रकार ‘अॅस्परगिलस नायगर’ या प्रकारचा असतो. या बुरशीमुळे म्युकर मुळीच होत नाही.

ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठातील प्रो.माल्कम रिचर्डसन या प्रख्यात मायकॉलॉजिस्टने २०१९मध्ये याबाबत संशोधन केलेले आहे. त्यानुसार बुरशी लागलेला पाव, कुजलेली, नासकी फळे तसेच भाज्या, कम्पोस्ट खते, माती आणि पाळीव जनावरांची विष्ठा यामध्ये म्युकरमायकोसिस निर्माण होतो, वाढतो आणि त्यातूनच पसरतो. म्युकरमायकोसिस संबंधित बुरशी तयार होण्यास वातावरण खूप आर्द्र (ह्युमिड) असावे लागते. त्यांच्या मते टाइल्स, फरशा, रंग दिलेल्या भिंती, कोरडे लाकडी सामान यावर म्युकरची बुरशी तयार होत नाही. त्यामुळे घरात व घराच्या परिसरात उत्तम स्वच्छता राखली, तर बुरशी आलेला पाव आणि नासकी कुजकी फळे किंवा भाजीपाला वगळता कशानेही म्युकरचा संसर्ग होऊ शकत नाही.  

म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव कशातून होतो?
याबाबतही अनेक समज गैरसमज पसरवले जात आहेत. याबाबत यापूर्वीच मूलभूत संशोधन झाले आहे. त्यानुसार रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजन, ह्युमिडीफायर किंवा मास्कमधून म्युकरचा प्रसार होत नाही. 

  • मात्र २०१४ आणि २०१६मध्ये झालेल्या संशोधनात रुग्णालयांतील चादरी, रुग्णांची पांघरूणे, बेडशीट्स, उशांचे अभ्रे अशा कापडी चीजांमधून त्याचा प्रसार होतो असे सिद्ध झालेले आहे.
  • २००९मध्ये झालेल्या एका संशोधनामध्ये हॉस्पिटलमधील व्हेंटिलेशन सिस्टिम्स, रुग्णांचा घसा तपासताना वापरला जाणारी जीभ खाली दाबण्याची लाकडी पट्टी (वुडन टंग डीप्रेसर), चिकटपट्ट्या, मोठ्या आतड्याच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये आतड्यापासून होणाऱ्या मलविसर्जनासाठी पोटावर लावल्या जाणाऱ्या ‘ओस्टोमी’ पिशव्या यातून म्युकरचा प्रादुर्भाव होतो असे दिसून आले होते.
  • अमेरिकेतील लेक्सिंग्टनमधील केंटकी युनिव्हर्सिटीच्या पॅथॉलॉजिस्ट्सच्या संशोधनात (‘क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी रिव्ह्यूज’- १३ एप्रिल २०००) हॉस्पिटलमधील तसेच घरातील एअरकंडीशनर्सच्या फिल्टर्समधून म्युकरचा फैलाव होतो असे दिसून आले होते. आजूबाजूच्या बिल्डिंगच्या बांधकामांमधून येणाऱ्या धुळीतूनही हा प्रसार होतो असे त्यांना आढळून आले होते.
  • या संशोधकांनी रुग्णांच्या त्वचेतूनही याचा प्रसार होतो असे दाखवून दिले. विशेषतः भाजल्यामुळे झालेल्या जखमा, कॅथेटर्स, इंजेक्शन्स, काही किड्यांचे दंश अशा गोष्टींकडे त्यांनी लक्ष वेधले होते.
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वापरला गेलेला इंडस्ट्रिअल ऑक्सिजनदेखील कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. पण याबाबतही शास्त्रीय संशोधन झाल्यावरच त्यातील सत्यासत्येचा पडताळता येईल.
  • कोरोना होऊ नये म्हणून अनेक महिने रोजच्या रोज गरम पाण्याची वाफ घेणाऱ्या व्यक्तींमध्ये म्युकरचा उद्‌भव सहजतेने होतो असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण याबाबतदेखील संशोधन झाल्यासच त्यातील खऱ्याखोट्याची बाजू लक्षात येईल.

घरगुती उपचारांबाबत? 
आपल्या देशात आयुर्वेदाच्या नावाखाली आयुर्वेदाचे अध्ययन न केलेल्या व्यक्तींकडून अनेक अशास्त्रीय आणि भ्रामक उपचार सांगितले जातात. याच मालेत म्युकरच्या रुग्णांना मोहरीचे तेल, तुरटी, सैंधव आणि हळद एकत्रित करून दिली तर त्यांचा आजार बरा होतो अशी माहिती अलीकडे व्हायरल होत होती. कोणत्याही आजारामध्ये कोणी कोणते उपचार घ्यावेत हा जरी प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरी कोणतेही उपचार घेताना त्या त्या प्रणालीच्या तज्ज्ञांकडूनच घ्यावा. आधुनिक वैद्यकशास्त्रातील लायपोसोमल अँम्फोटेरीसिन-बी आणि इतर काही अँटिफंगल औषधे तसेच शस्त्रक्रिया यांनी हा आजार बरा होण्याची शक्यता जास्त असते, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. या औषधांचा सध्या जाणवत असलेला तुटवडा येत्या काही काळात दूर होईल, हेदेखील समजून घ्यावे.

कोरोना आणि म्युकरमायकोसिस हे वैद्यकीय आजार आहेत. दोन्ही आजारात लवकर निदान आणि त्वरित वैद्यकीय उपचार हेच खरे तारणहार असतात. त्यामुळे सर्वसामान्यांनी याबाबत सांगोवांगीच्या माहितीवर विश्वास न ठेवता, वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार घ्यावेत.

संबंधित बातम्या