पित्ताशयातील खडे

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 5 जुलै 2021

आरोग्य संपदा

पित्तरसातील घटकांपैकी काही घटकांचा आपल्या पचनक्रियेत महत्त्वाचा सहभाग असतो. पित्ताशयामधील पित्तात रासायनिक असंतुलन होऊन पित्ताचे खडे निर्माण होतात. पित्ताशयात खडे असूनदेखील बऱ्याच लोकांना त्याचा काही त्रास किंवा लक्षणे जाणवत नाहीत. 

‘पित्त’ हा शब्द आपल्याकडे विविध उलटसुलट अर्थांनी वापरला जातो. म्हणजे- छातीत किंवा  पोटात जळजळले- पित्त झाले. डोके दुखले- पित्ताने दुखते. उलटी झाली- पित्त पडले. अंगावर पुरळ आले- पित्त उठले. राग आला- पित्त खवळले.... वगैरे वगैरे.
आपल्या पोटात उजव्या बाजूला असलेल्या यकृतामधून एक पाचक रस स्रवतो. वैद्यकीय परिभाषेत त्याला ‘बाईल ज्यूस’ म्हणतात तर मराठीत ‘पित्तरस’. हा बाईल ज्यूस एका नलिकेमधून यकृताकडून लहान आतड्याकडे जातो. त्या नलिकेला ‘बाईल डक्ट’ म्हणजेच ‘पित्तनलिका’ म्हणतात. यकृतात अधिक प्रमाणात तयार झालेला पित्तरस एका छोट्या पिशवीत साचवला जातो, त्याला इंग्रजीत ‘गॉल ब्लॅडर’ आणि मराठीत ‘पित्ताशय’ म्हणतात.

पित्तरसाचे घटक आणि कार्ये
यकृतात नित्यनेमाने तयार होणाऱ्या पिवळसर नारिंगी रंगाच्या द्रव्याला ‘पित्तरस’ म्हणतात. पित्तरसाचा काही भाग यकृतामध्ये तयार होतो, तर उर्वरित भाग शरीरात तयार झालेली निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकून देण्याच्या म्हणजेच उत्सर्जनाच्या क्रियेतून निर्माण होतो. साहजिकच पित्तरसाचे काही घटक स्रावजन्य तर काही घटक उत्सर्जनापासून तयार होतात. पित्तरसाचे घटक पाहता त्यात मुख्यत्वे ९२ टक्के पाणी असते. त्याशिवाय बिलीरुबिन, बिलीव्हर्डीनसारखी काही रंगीत द्रव्ये; कोलिक, डीऑक्सिकोलिक, लिथोकोलिक, चेनोडीऑक्सिकोलिक अशी बाईल सॉल्ट्स; मोनोग्लिसेरॉइड्स, कोलेस्टेरॉल, फॅटी अॅसिड्स असे स्निग्ध पदार्थ; सोडियम, पोटॅशियमसारखे क्षार; तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस, बायकार्बोनेट, तांबे, झिंक अशी खनिजे; आणि कार्बनयुक्त पदार्थ अशी उत्सर्जित द्रव्ये असतात. पित्तरसाचा प्रामुख्याने अन्नातील स्निग्ध पदार्थांच्या पचनाकरिता उपयोग होतो.
पित्तरस पित्ताशयात साठवला जातो. तिथे तो आटतो आणि समाईक पित्तनलिकेद्वारे जरुरीप्रमाणे लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात आणला जातो. दररोज सर्वसाधारणपणे ८०० ते १००० मिलिलिटर पित्तरस तयार होत असतो, मात्र पित्ताशयाची साठा करण्याची क्षमता केवळ ४० ते ७० मिलिलिटर असल्यामुळे पित्तरस जसजसा पित्ताशयात येतो तसतसे त्यामधील पाणी आणि सोडियम, क्लोराईड असे विद्युत् विश्लेष्य घटक (विद्युत् प्रवाहाच्या साहाय्याने विश्लेषण केले असता आयनरूपाने-विद्युत् भारीत अणू वा अणुगटांच्या रूपाने-अलग होणारे घटक) पित्ताशयाच्या अंतर्गत पातळ अस्तरातून परत रक्तप्रवाहात अभिशोषिले जातात, आणि उरलेले पदार्थ आटत जातात. 

पित्तरसातील घटकांपैकी काही पचनक्रियेत महत्त्वाचा भाग घेतात. यकृताच्या पेशी दर चोवीस तासांत कोलेस्टेरॉलपासून जवळजवळ ०.५ ग्रॅ. क्षार तयार करतात. कोलेस्टेरॉलचे रूपांतर कोलिक अॅसिड, चेनोडीऑक्सिकोलिक अॅसिड यामध्ये समप्रमाणात होते. ही अॅसिड्स अधिक प्रमाणात ग्लायसीन आणि अल्प प्रमाणात टौरिन या अमिनो अॅसिड्सशी संयुग्मित होतात. त्यांपासून अनुक्रमे ग्लायको-कोलिक व टौरो-कोलिक अॅसिड्स बनतात. ती सोडियम व पोटॅशियम यांच्याशी संयुग्मित होतात आणि त्यापासून क्षार तयार होतात. वरील आम्लांखेरीज डी-ऑक्सिकोलिक व लिथोकोलिक ही बाईल अॅसिड्सदेखील पित्तरसाचे घटक असतात.

पित्ताचे खडे (गॉल स्टोन्स)
पित्ताशयामधील पित्तात रासायनिक असंतुलन होऊन पित्ताचे खडे निर्माण होतात. कोलेस्टेरॉल, कॅल्शिअम ग्लायकोकोलेट आणि बिलीरुबिनचे प्रमाण वाढल्यास हे खडे बनतात. पित्ताशयातील या खड्यात ८० टक्के कोलेस्टेरॉलपासून तर उर्वरित २० टक्के बिलीरुबिन आणि कॅल्शिअम ग्लायकोकोलेटचे असतात. पित्तातील अतिरिक्त कॉलेस्ट्रॉलमुळे हे खडे कडक व न विरघळणारे असतात. जर पित्ताशयाचे काम बरोबर होत नसेल व पित्ताशय रिकामे होत नसेल तर खडे तयार होतात.

कुणाला होऊ शकतात?

 • पित्ताशयात खडे होण्याचे प्रमाण भारतात एकूण लोकसंख्येच्या ६ ते १० टक्के आहे. तर अमेरिकेत ते १५ टक्क्यांच्या जवळपास आढळते.
 • पुरुषांपेक्षा महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
 • त्यातही ज्यांना जास्त मुले असतात, त्या महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. गर्भावस्थेमध्ये स्त्रियांच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये अनेक बदल घडून येतात. या बदलांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. त्यामुळे पित्ताशयात खडे होण्याचा धोका वाढतो.
 • लठ्ठपणा असल्यास शक्यता अधिक
 • आहारात फायबरचे प्रमाण कमी असणाऱ्या व्यक्ती
 • ४० वर्षावरील व्यक्ती 
 • पित्ताशयातील खड्यांचा कौटुंबिक इतिहास असल्यास 
 • मधुमेह, गर्भनिरोधक गोळ्या वापरणारे 

लक्षणे

 •     पित्ताशयाला सूज येऊन उजव्या कुशीत वेदना होणे
 •     पोटात दुखणे
 •     जेवणानंतर पोट गच्च होणे, पोटात गुबारा धरणे
 •     सतत ढेकर येत राहणे
 •     ताप येणे
 •     मळमळ
 •     उलट्या होणे
 •     लघवीला गडद पण शौचाला पांढरट किंवा मातकट होणे
 •     सतत घाम येणे

निदान 
पित्ताशयात खडे असूनदेखील बऱ्याच लोकांना त्याचा काही त्रास किंवा लक्षणे जाणवत नाहीत. हे खडे अनेकदा इतर काही कारणांसाठी केलेल्या तपासणीत आढळून येतात.  मात्र लक्षणे असलेल्या रुग्णाची शारीरिक तपासणी करून रक्तातील बिलीरुबिन, यकृताच्या कार्याच्या तपासण्या केल्या जातात. या आजाराच्या पक्क्या निदानासाठी, एक्सरे, अल्ट्रासाऊंड, सिटीस्कॅन क्वचित प्रसंगी रेडीओन्युक्लीयर स्कॅन केला जातो. सहसा पित्ताशयात खडे असल्याचे निदान पोटाची सोनोग्राफी करून करता येते. ही तपासणी केवळ १० – १५ मिनिटांत पूर्ण होते तसेच यात रुग्णाला कुठल्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत. काही वेळेस पोटात नलिका सोडून एंडोस्कोपीक अल्ट्रासाऊंडदेखील केला जातो. पित्तनलिकेमधील खडे पाहण्यासाठी एमआरआय स्कॅन केले जाते. या तपासणीमध्ये शरीराच्या आतील अवयवांच्या तपशीलवार प्रतिमा तयार केल्या जातात.

पित्तनलिकेतील खड्यासाठी एन्डोस्कोपीक रेट्रोग्रेड कोलॅन्जिओ-पॅन्क्रिअॅटोग्राफी (ईआरसीपी) केली जाते. या प्रक्रियेत एक विशिष्ट रंगीत द्रव्य (डाय) आपल्या रक्तप्रवाहात सोडले जाते. पित्ताशय काढण्याच्या शस्त्रक्रियेच्यावेळी पित्तनलिका बघण्यासाठी असे करता येते किंवा शस्त्रक्रियेच्या दुर्बिणीद्वारे (एंडोस्कोपद्वारे) हा  रंग शरीरात सोडून पित्तनलिका, स्वादुपिंड नलिकेमध्ये अडथळा आहे का हे पाहता येते. पित्तनलिका, स्वादुपिंड नलिकेमध्ये खडे अडकले असल्यास ते त्याच वेळी एंडोस्कोपद्वारे काढता येतात. 

पित्ताशयातील खड्यांमुळे होणारे गंभीर त्रास

 • पित्ताशयाला सूज :  पित्ताशयातील खडे जर पित्ताशयाच्या अरुंद तोंडाशी अडकले तर तिथे जंतुसंसर्ग होऊन पित्ताशयाला सूज येते. यामुळे अतिशय तीव्र वेदना होतात, ताप येतो.
 • पित्ताशयात पू होणे :  तीव्र जंतुसंसर्ग झाल्यास पित्ताशयात पू तयार होतो. त्याची गाठ होऊ शकते. अशा वेळी अँटी-बायोटिक्सचा उपयोग होतोच असे नाही. असे झाल्यास तातडीने शस्त्रक्रिया करावी लागते.
 • पित्ताशय फुटणे :  खूप सुजलेले पित्ताशय कधी कधी फुटू शकते. त्यामुळे आतील सर्व पू तसेच जंतुसंसर्ग सर्व पोटात पसरतो. अशा वेळी तोंडावाटे घ्यायच्या अँटी-बायोटिक्सचा उपयोग होत नाही तर ते शिरेवाटे देऊन तातडीने शस्त्रक्रिया करावी लागते.
 • पित्तनलिकेला अडथळा :  पित्ताशयामधून आणि यकृतामधून ज्या नलिकांद्वारे पित्त आतड्यात जाते त्या नलिकांमध्ये हे खडे अडकू शकतात. परिणामतः कावीळ (ऑबस्ट्रक्टिव्ह जॉन्डीस) किंवा पित्तनलिकेला सूज येऊ शकते.
 • स्वादुपिंडाच्या नलिकेला अडथळा:  स्वादुपिंडामधून येणारी नलिका पित्तनलिकेला छोट्या आतड्याजवळ मिळते. स्वादुपिंडातून स्रवणारी पाचक द्रव्ये या नलिकांद्वारे छोट्या आतड्यात सोडली जातात. याठिकाणी जर पित्ताशयातील खडा अडकला तर स्वादुपिंडालादेखील सूज येऊ शकते. स्वादुपिंडाची सूज ही गंभीर स्थिती असून रुग्णाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ठेवावे लागू शकते.
 • पित्ताशयाचा कर्करोग :  पित्ताशयातील खड्यांचा त्रास असलेल्या व्यक्तींना पित्ताशयाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.

उपचार 
 पित्ताशयातील खड्यांचा उपचार रुग्णाला होणाऱ्या त्रासाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. रुग्णाला तपासल्यानंतर सर्जन योग्य तो पर्याय सुचवतात. 

लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी (दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणे): रुग्णाच्या पोटावर तीन ते चार लहान छेद घेतले जातात. एक छेद (२ ते ३ से.मी.) बेंबीजवळ घेतला जातो आणि इतर छेद (प्रत्येकी १ सेमी किंवा कमी) पोटाच्या उजव्या बाजूला असतात. कार्बन-डाय-ऑक्साईड वायूचा वापर करून पोट फुगवले जाते. एका छेदामधून लॅपरोस्कोप म्हणजे एक लांब, पातळ दुर्बीण, जिच्या तोंडाशी प्रकाश आणि व्हिडिओ कॅमेरा असतो, तो पोटात सोडला जातो. यामुळे सर्जनला शस्त्रक्रिया व्हिडिओ मॉनिटरवर दिसते. शस्त्रक्रियेची साधने वापरून पित्ताशय काढून टाकले जाते. पित्ताशय काढल्यानंतर आत सोडलेला वायू लॅपरोस्कोपमधून बाहेर काढला जातो. पोटावरचे छेद विरघळण्याऱ्या टाक्यांनी बंद केले जातात आणि ड्रेसिंगने झाकले जातात. शस्त्रक्रियेसाठी सुमारे एक ते दीड तासांचा अवधी लागतो.
दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्ण २ दिवसात घरी जाऊ शकतो. सर्वसाधारणपणे रुग्ण खायला, प्यायला लागला असेल आणि आधार न घेता चालू शकत असेल तर डॉक्टर रुग्णाला घरी जाण्याची परवानगी देऊ शकतात. रुग्ण पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी सुमारे एक आठवडा लागतो.
  

पोटावर छेद घेऊन केलेली ओपन (पारंपरिक) शस्त्रक्रिया: काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे किंवा रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे टाळावे लागते. अशावेळी पोटावर छेद घेऊन शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये पोटाच्या वरच्या भागात मध्यभागी किंवा उजव्या बाजूला बरगड्यांच्या खाली सुमारे १४ ते १५ से. मी. लांब छेद घेऊन पित्ताशय काढले जाते. साधारणतः पाच टक्के शस्त्रक्रियांमध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना गुंतागुंत निर्माण होऊ शकते किंवा आत्यंतिक रक्तस्राव होतो. अशावेळेस असा मोठा छेद पोटावर घेऊन शस्त्रक्रिया करावी लागते. 
ही शस्त्रक्रिया देखील दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेइतकीच प्रभावी आहे, परंतु यानंतर रुग्णाला पूर्ववत होण्यास थोडा जास्त वेळ लागतो. सहसा पोटावर छेद घेउन केलेल्या शस्त्रक्रियेनंतर पूर्ववत होण्यास ४ ते ६ आठवडे लागू शकतात. शस्त्रक्रिया न करता पित्ताशयातील खड्यांवर काही उपचार केले जातात. रुग्ण शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त नसेल किंवा शस्त्रक्रिया करण्यास नकार देत असेल तर काही औषधोपचार सुचवू शकतात. हे उपचार रुग्णाला त्यावेळी होत असणारा त्रास, जंतुसंसर्ग आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. परंतु या उपचारांनी खडे नष्ट होणे किंवा त्याचा प्रतिबंध तसेच वारंवार होणार त्रास 
थांबू शकत नाही.

संबंधित बातम्या