टाळूया पावसाळ्यातील आजार 

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 19 जुलै 2021

आरोग्य संपदा

‘येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा’ अशा बडबड गीतातून पावसाची, पावसाळ्याची ओळख आपल्या सगळ्यांना होते. हल्ली वाढत्या शहरीकरणामुळे पावसाळ्यात हिरवाई ऐवजी चिखल दिसतो आणि जोडीला असतात पाण्याने तुंबलेले रस्ते आणि पावसात भिजण्यामुळे होणारी सर्दी, खोकला आणि इतर आजार!

पावसामुळे सृष्टीचा तहान भागत असली तरी सर्व ऋतूंचा विचार करता पावसाळ्यातच अनेकविध विकार, साथींचे आजार यांचे थैमान सुरू होते, हे एक चिरंतन सत्य आहे. 

सर्दी-खोकला
वारंवार पावसात भिजणे, कपडे ओले झाल्यावर अंगावरच वाळवल्यामुळे, अंग, विशेषतः केस, ओले राहून ते कोरडे न केल्यामुळे शरीरावर विषाणूंचा त्वरेने हल्ला होतो. मग सुरू होतात शिंका, नाकातून पाणी वाहणे, घसा सुजून दुखणे, थंडी भरून येणे, अगोदर कोरडा आणि नंतर कफ पडणारा जोरदार खोकला. त्यातच त्यावेळेला ढगाळ हवामान असेल तर तापाचे प्रमाण जरा जास्त राहते. पावसाळ्यात स्वाईनफ्लू, कोरोना आणि अनेक जातीच्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो. 
साध्या सर्दी-खोकल्याचे पर्यवसान ब्राँकायटिस, अस्थमा, न्यूमोनिया अशा गंभीर आजारांमध्ये होते. प्रसंगी इस्पितळातल्या अतिदक्षता विभागात दाखल करून उच्च दर्जाची प्रतिजैविके देऊन प्राणवायूदेखील लावावा लागतो. अशा आजारांचा पूर्वेतिहास असलेल्या रुग्णांना पावसाळ्यात विशेष खबरदारी घ्यावी लागते.

टाळण्याच्या गोष्टी

  • पावसाळ्यात शक्यतो भिजणे टाळावे. 
  • पावसात भिजल्यावर अंग कोरडे करून पूर्ण वाळलेले स्वच्छ कपडे घालावेत. केस पूर्णतः कोरडे करावेत, लांब केस असलेल्या महिलांनी, युवक-युवतींनी ही खबरदारी घ्यावीच. 
  • अंगावर चिखल उडाला असल्यास गरम पाण्याने स्वच्छ अंघोळ करावी. चिखलातील कृमी, जंतू इतर कपड्यात जाऊ नये याकरिता, चिखलाने भिजलेले कपडे वेगळ्या बादलीत जंतूनाशक औषध टाकून भिजवावेत. 
  • सर्दी-खोकला झाल्यावर गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात, 
  • शक्यतो थंड पदार्थ, थंड पेये घेऊ नयेत. 
  • कडक ताप असल्यास, खोकला-सर्दी कमी न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मलेरिया
पाऊस पडून गेल्यावर जागोजागी पाणी साचते, डबकी तयार होतात. या डबक्यांमध्ये तयार होणाऱ्या अॅनाफेलिस जातीच्या डासांमुळे मलेरिया पसरतो. या डासांच्या पोटात मलेरियाचे ‘प्लाझ्मोडीयम फाल्सिपेरम’ आणि ‘प्लाझ्मोडीयम व्हायवॅक्स’ विषाणू असतात. मलेरियाचा डास चावल्यावर विषाणू माणसाच्या रक्तात जाऊन लाल रक्तपेशींमध्ये वास्तव्य करतात. योग्य संधी मिळताच ते लाल रक्तपेशींचे कवच फोडून रक्तप्रवाहामध्ये पसरतात. 

या आजारात रुग्णाला थंडी वाजून ताप येऊ लागतो, रक्तपेशी नष्ट झाल्याने हिमोग्लोबिनही कमी होते. परिणामतः एक प्रकारची कावीळ होते. निकामी रक्तपेशींना नष्ट करण्याच्या प्रक्रियेमुळे पोटातील प्लिहा वाढते. मलेरियाच्या एका प्रकारात मेंदूला सूज येऊन जिवाला धोका निर्माण होतो. मलेरियाचा डास चावल्यावर १० ते १५ दिवसांनी दिवसा आड किंवा रोजसुद्धा खूप थंडी भरून ताप येतो, डोके दुखणे, मळमळणे, उलट्या होणे सुरू होते. 

निदान 

बोटाला सुई टोचून ४-५ थेंब रक्त काचेच्या पट्टीवर पसरवून सूक्ष्मदर्शकयंत्राद्वारे मलेरियाचे जिवाणू निरखले जातात. नव्या तंत्रज्ञानायोगे आलेल्या ‘अतिजलद निदान चाचणीत’ (रॅपिड टेस्ट) खात्रीलायक निदान सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय होऊ शकते. प्रयोगशाळेची सोय नसणाऱ्या ठिकाणी ही चाचणी खूप उपयोगी पडते.
उपचार : मलेरियासाठी क्लोरोक्विन हे मुख्य औषध. मात्र क्लोरोक्विनला दाद न देणाऱ्या मलेरियाचा प्रादुर्भाव आजकाल अधिक आहे. त्याकरिता औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. ताप उतरल्यानंतर मलेरियाचे जिवाणू पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पंधरा दिवस ‘प्रायमाक्विन’ दिले जाते. योग्य औषधोपचाराने मलेरिया पूर्ण बरा होऊ शकतो, अन्यथा तो गंभीर बनू शकतो.      

डेंगी
‘एडीस इजिप्ती’ ही डासांची प्रजाती डेंगी प्रसाराला कारणीभूत असते. डेंगीचे विषाणू डासांद्वारेच माणसाच्या शरीरात शिरतात. डेंगीमध्ये अचानक खूप ताप येणे, प्रमाणाबाहेर डोके दुखणे, हातापायांचे सांधे, हाडे कमालीची दुखणे, शरीरावर विशेषतः पाठीवर एक बारीक लालसर, न खाजणारे पुरळ येणे अशी लक्षणे दिसतात. डास चावल्यावर डेंगीचे विषाणू रक्तातील पांढऱ्या पेशीत शिरतात. तिथे त्यांची वाढ होते. यामध्ये यकृत व हाडातील मगजावर परिणाम होतो. रक्तवाहिन्यांवरही परिणाम होऊन रक्तदाब कमी होतो. रक्तातील प्लेटलेट्स पेशी झपाट्याने कमी होतात. त्यामुळे रक्ताची गोठण्याची क्रिया कमी व्हायला लागते. शरीरांतर्गत तसेच शरीरातून बाहेर पडणाऱ्या इतर स्रावांमधून रक्तस्राव व्हायला लागतो. यामध्ये रुग्णाची परिस्थिती अतिशय गंभीर होऊन तो दगावू शकतो. डेंगीचे पक्के निदान रक्ताच्या तपासणीतून होते. ‘आयजीजी’, ‘आयजीएम’, ‘एनएसवन’सारख्या विशिष्ट चाचण्या, पांढऱ्या रक्तपेशींची आणि प्लेटलेट्सची संख्या यावरून हे निदान होते. प्लेटलेट्स खूप कमी झाल्यास रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवून त्याला शिरेतून प्लेटलेट्स द्याव्या लागतात. डेंगीमध्ये २० टक्के रुग्ण याप्रकारे गंभीर होऊ शकतात. इतर रुग्णांमध्ये हा आजार आपोआपच बरा होतो. तापासाठी फक्त पॅरासिटॅमॉल हेच औषध घ्यावे, जाहिरातींमध्ये दाखवल्या जाणाऱ्या तापाच्या गोळ्या वापरू नये. त्यामुळे रक्तस्राव होऊन रुग्णाची तब्येत प्राणगंभीर होऊ शकते.

चिकुनगुनिया
या आजाराचा विषाणू एडीस जातीच्या डासांद्वारेच पसरतो. हा डासही घरातल्या बगीच्याच्या कुंडीत साठलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतो. यात दोन-तीन दिवस ताप येतो, डोके दुखते, अंगावर विशेषतः पाठ, पोट, कंबर या भागांवर पुरळ येते. चिकुनगुनियाचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे पायांचे घोटे, गुडघे, तळपायांचे सांधे तीव्रतेने दुखतात. रुग्णांना चालणेही किंवा पायांची मांडी घालणेसुद्धा वेदनादायी होते. आजार बरा झाला तरी बराच काळ सांधेदुखी सुरू राहते.

चिकुनगुनियाचीदेखील आयजीजी आणि आयजीएम् अशी रक्ताची तपासणी करून खात्री करता येते. अजून तरी यावर लस आणि प्रभावी उपाय गवसलेला नाही. हायड्रोक्सीक्लोरोक्विन वापरल्यास सांधेदुखी कमी होऊ शकते. परंतु अॅस्पिरीन, आयबुप्रोफेन, नाप्रोक्सेन किंवा स्टेरॉईडस अशी औषधे वापरू नयेत.

सांधे-हाडे दुखणे
कुठल्याही प्रकारचा संधिवात पावसाळ्यात जास्त वेदनामयी होतो. ज्येष्ठ नागरिकांमध्ये विरळ आणि ठिसूळ झालेली हाडे दुखतात. पावसाळ्यात विशेषतः ढगाळ हवामानात पूर्वी झालेल्या फ्रॅक्चरची जागा प्रकर्षाने दुखू लागते. गरम पाण्याच्या पिशवीने दुखऱ्या जागा सकाळ-संध्याकाळ शेकणे आणि त्यावर वेदनाशामक मलम चोळणे या वेदना शमवायला उपयुक्त ठरतात. असह्य वेदनांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक औषधांचा वापर करावा.   

अतिसार 
पावसाळ्यातील चिकचिक, अस्वच्छता यामुळे आणखी एका जंतुवाहक कीटकाची म्हणजे माश्यांची पैदास वाढते. उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ, पेये, सरबते, रस यातून माश्यांच्या पायांना लागून आणि त्यांच्या पोटातील स्रावांसमवेत अनेकविध प्रकारचे जंतू आणि जिवाणू ते पदार्थ खाणाऱ्या माणसांच्या शरीरात प्रवेश करतात. यामुळेच वेगवेगळ्या जिवाणूंनी होणारे अतिसार, उलट्या जुलाब, आमांश, कॉलरा असे साथीचे संसर्गजन्य आजार उद्‌भवतात. जुलाबांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप कमी होऊन शिरेतून सलाईन देण्याकरिता रुग्णालयात दाखल व्हावे लागते. ते टाळण्यासाठी पावसाळ्यात पाणी उकळून गार करून किंवा चांगला फिल्टर वापरून प्यावे, उघड्यावरचे भेळ, वडा, भजी, समोसा असे जंकफूड टाळावे. ताजे आणि गरम असलेले पचायला हलके जेवण करावे. मीठ-साखर-पाणी किंवा ओरल रीहायड्रेशन (ओआरएस) पावडर योग्य प्रमाणात पाण्यात टाकून घ्यावी. 

विषमज्वर
उघड्या अन्नपदार्थांवर बसणाऱ्या माश्यांमुळे अन्न दूषित होऊन विषमज्वर (टायफॉईड) होतो. यात सुरुवातीला कमी, पण नंतर वाढत जाणारा आणि दिवस-दिवस न उतरणारा ताप येतो. पोट दुखणे, उलट्या होणे, नाकातून रक्तस्राव होणे अशी लक्षणेही दिसू लागतात. ताप खूप चढल्यास रुग्ण असंबद्ध बडबड करतो. योग्य उपचार न मिळाल्यास शरीरांतर्गत रक्तस्राव होऊन रुग्ण दगावू शकतो. 

विषमज्वराचे निदान ‘विडाल टेस्ट’ या रक्ताच्या चाचणीतून आणि समवेत रक्तामधील पांढऱ्या पेशी कमी होण्यावरून करता येते. या तपासण्या तापाच्या पाचव्या दिवसांनंतर कराव्यात. त्याअगोदर केल्यास चाचण्यांचे निकाल ‘नॉर्मल’ येतात. साहजिकच दिशाभूल होऊन, या आजाराचे निदानोपचार न होऊन तो बळावतो. विषमज्वराचा रुग्ण इस्पितळात दाखल न करता, घरच्या घरी डॉक्टरी सल्ल्याने आधुनिक प्रतिजैविके वापरून पूर्णपणे बरा होतो. परंतु औषधे अपुऱ्या मात्रेत किंवा कमी दिवस घेऊ नयेत.

टाळण्यासाठी

उघड्यावरचे अन्नपदार्थ, आरोग्यास अपायकारक जिन्नस खाणे टाळावे. घर आणि परिसरात अस्वच्छता, माश्यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घ्यावी. इंजेक्शन तसेच गोळ्यांच्या स्वरूपातील विषमज्वर प्रतिबंधक लस दर तीन वर्षांनी घ्यावी. शाळा-कॉलेजातल्या मुला-मुलींना लस घेतल्यास टायफॉईड टाळता येतो.

लेप्टोस्पायरोसिस
पूर्वी मोठ्या प्रमाणात आढळणारा हा आजार आजकाल मुंबईसह अनेक शहरात दरवर्षी पावसाळ्यात उद्‌भवतो. याचे जिवाणू उंदीर, घोडे, गाई-म्हशी अशा प्राण्यांच्या मूत्रपिंडात जमा होतात. मात्र त्यांना त्याचा त्रास होत नाही. 

पावसाळ्यात सर्वत्र नद्यांना पूर येतात. मुंबईसारख्या महानगरातदेखील पाणी तुंबते. जमिनीखालच्या भुयारी ड्रेनेजमधील आणि रस्त्यावरील गटारांमधील उंदरांचे मूत्र आणि त्यातील लेप्टोस्पायरोसिसचे जिवाणू या सांडपाण्यात मिसळतात. रस्त्यावरून येजा करणाऱ्या व्यक्तींच्या पायांवर जर एखादा जखम किंवा ओरखडा असेल तर त्यातून जिवाणूंचा प्रवेश होऊन लेप्टोस्पायरोसिसची बाधा होते. नदीला पूर आल्यावर त्यात उडी मारून साहसाने पोहणाऱ्या व्यक्तींना, वॉटरस्पोर्ट्ससाठी नदीच्या पाण्यात होणाऱ्या जलक्रीडेत सहभागी होणाऱ्यांना हा आजार होऊ शकतो. 

लक्षणे

सुरुवातीला थंडी येते, ताप येतो, हातपाय, डोके व अंग दुखते, त्यातून आपोआप बरे वाटते. पण काही दिवसांनी रुग्णाला कावीळ होते. यकृत व मूत्रपिंडांच्या कार्यात गंभीर अडथळा निर्माण होऊन ती निकामी होऊ लागतात. या आजारात जिवाणूंनी मेंदूच्या आवरणाला सूज येऊन (मेनिंजायटिस) रुग्ण दगावू शकतो. 

टाळण्यासाठी

पायांवर जखम असल्यास रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जायचे टाळावे. पायात शक्यतो बूट असावेत. पाण्यातून चालत आल्यावर साबण-पाण्याने पाय स्वच्छ करावेत. पुराच्या पाण्यात पोहणे टाळावे. पुराच्या पाण्यात, रस्त्यावरील सांडपाण्यातून चालत आल्यानंतर ताप आल्यास डॉक्टरांना त्याची कल्पना द्यावी. योग्यवेळी या आजाराचे निदान आणि उपचार केले तर हा आजार काबूत राहतो. 

त्वचा रोग
पावसात भिजून अंगावरच ओले कपडे वाळून देणे, नीट न वाळलेले कपडे, विशेषतः अंतर्वस्त्रे वापरणे, यामुळे काखांमध्ये, जांघांमध्ये गजकर्णासारखे त्वचाविकार होतात. भिजल्यावर पाय कोरडे न केल्यास, ओले मोजे आणि बूट वापरल्यास पायांच्या बेचक्यांमध्ये चिखल्या होतात. मधुमेही रुग्णांत चिखल्यात जंतूसंसर्ग झाल्यास संपूर्ण पायावर सूज येते. सेल्युलायटिस किंवा गँगरीन होऊन पाय कापण्याची शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते.

टाळण्यासाठी

पावसात पाय कोरडे आणि पायाच्या बेचक्यासुद्धा व्यवस्थित पुसून कोरडे ठेवण्याची काळजी घ्यावी. 

अपघात
पावसाळ्यात चालताना किंवा वाहन चालवताना घसरून पडणे, भिंती-घरे कोसळणे, मोठे वृक्ष उन्मळून पडणे, वीज कोसळणे अशा घटना घडतात. त्यापासूनदेखील आपला बचाव करणे आवश्यक असते. आजारांची यथायोग्य जाणीव आणि ते टाळण्यासाठी प्रतिबंधक काळजी घेतल्यास पावसाळ्यातले ‘हरित तृणांच्या मखमालीने नटलेले हिरवे हिरवे गार गालिचे’ निश्चितच आनंदाने  उपभोगता येतील.

संबंधित बातम्या