इन्फ्लुएन्झाचे अखंड सावट

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

आरोग्य संपदा

सुदैवाने माणसांना मोठ्या प्रमाणात बाधित करणारी बर्ड फ्लूची वैश्विक साथ आजवर निर्माण झालेली नाही. मात्र अशी साथ आल्यास त्या परिस्थितीत जनतेला माहिती देणे, रोगप्रतिबंधक उपाय सुरू करणे आणि साथ नियंत्रणासाठी वेळीच पावले उचलून या भीषण आजाराचे मानवी जीवनावर पडणारे सावट वेळीच दूर करायला हवे.

मानवाच्या इतिहासात अनेकविध रोगांबरोबर दिलेल्या लढ्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्लेगच्या महासाथीपासून कोरोनाच्या वैश्विक साथीपर्यंत असंख्य विषाणूंच्या आणि जीवाणूंच्या फैलावाने मानवी जीवनाच्या अस्तिवापुढे अनेक प्रश्नचिन्हे वेळोवेळी उभी केली आहेत. यामध्ये इन्फ्लुएन्झा किंवा फ्लूच्या विषाणूंच्या प्रजातींचा विशेषकरून सहभाग दिसून आलेला आहे. इन्फ्लुएन्झाच्या घराण्याच्या मूळ विषाणूने १९१८-१९मध्ये संपूर्ण जगात हाहाकार माजविला होता. त्यानंतर २००९च्या स्वाईन फ्लूच्या जागतिक साथीपर्यंत असंख्य साथी येऊन गेल्या. 

इन्फ्लुएन्झाच्या प्रजातीमधील काही विषाणूंद्वारे पक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये संसर्ग पसरविला जातो. यामुळे इन्फ्लुएन्झाचे बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, डॉग फ्लू, हॉर्स फ्लू आणि मानवी फ्लू असे प्रकार पडतात. यापैकी पक्ष्यांमध्ये होणाऱ्या फ्लूला 'एव्हियन इन्फ्लुएन्झा' किंवा ‘एव्हियन फ्लू’ किंवा ‘बर्ड फ्लू’ या नावाने ओळखले जाते. इन्फ्लुएन्झा व्हायरसच्या ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ या तीन प्रकारांपैकी ‘इन्फ्लुएंझा ए’ व्हायरस प्राणिजन्य विषाणू (झूनॉटिक)आहे. 

‘इन्फ्लुएन्झा ए’ हा विषाणू पक्ष्यांप्रमाणे मानवांतही संसर्ग पसरवू शकतो, असे लक्षात आले आहे. एका पक्ष्याकडून दुसऱ्या पक्ष्याकडे पसरणाऱ्या या विषाणूत उत्परिवर्तन (म्युटेशन) झाल्यावर तो पक्ष्यांकडून माणसांना आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू लागतो.

संक्षिप्त इतिहास
एव्हियन इन्फ्लुएन्झाला पूर्वी ‘फाऊल प्लेग’ म्हणून ओळखले जायचे. पक्ष्यांच्या या आजाराची नोंद सर्वप्रथम इ.स. १८७८मध्ये झाली. या आजाराची लक्षणे साथ पसरवणाऱ्या इतर पक्षी रोगांपेक्षा वेगळी होती आणि मृत्यूदर खूप जास्त होता. १९५०च्या दशकापर्यंत ‘न्यू कॅसल डिसीज’ या नावाने ओळखला जाणारा आजारही याच प्रकारचा होता. १९५९ ते १९९५च्या दरम्यान, कुक्कुटपालन व्यवसायात (पोल्ट्री) बर्ड फ्लू विषाणूंच्या १५ छोट्या मोठ्या साथी येऊन गेल्या, पण त्यात पक्ष्यांची हानी खूप कमी होती. मात्र १९९६ ते २००८च्या दरम्यान, कुक्कुटपालन व्यवसायात बर्ड फ्लूचा उद्रेक किमान अकरा वेळा झाला. यापैकी चार उद्रेकांमध्ये लाखो पक्ष्यांचा समावेश होता. १९९०च्या दशकात विकसनशील देशांमध्ये ७६ टक्क्यांनी तर विकसित देशांमध्ये २३ टक्क्यांनी पोल्ट्री व्यवसाय वाढला. परिणामतः एव्हियन इन्फ्लूएन्झाचा संसर्गही वाढला. 

विषाणूचे प्रकार
इन्फ्लुएन्झा विषाणूंच्या अनेक प्रजाती आहेत, त्यात H1N1 पासून H2N8, असे अनेक विषाणू आहेत. त्यातील H5N1, H7N9 हे प्रकार माणसांना खूप गंभीर रीतीने बाधित करतात. आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि युरोपच्या काही भागात बर्ड फ्लूचा उद्रेक अनेकदा झाला आहे. बदके, हंस टर्की, मोर, स्थलांतरित जलपक्षी तसेच कोंबड्यांशी संपर्कात असलेल्या लोकांमध्ये याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. 
जानेवारी २०२१ दरम्यान मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि केरळ या राज्यांमध्ये पक्षी मोठ्या संख्येने अचानक मरून पडल्याचं आढळलं. यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने मृतावस्थेत आढळून आलेल्या या पक्ष्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ म्हणजे एव्हियन इन्फ्लुएन्झामुळे झाला असल्याचा निर्वाळा केंद्र सरकारला दिला आहे. 

रोगप्रसार 
पक्ष्यांच्या विष्ठेतून, लाळेतून, डोळ्यातील आणि नाकातील द्रावातून विषाणूंचा संसर्ग पसरतो. त्यामुळे कोंबड्या किंवा तत्सम पक्षी, तसेच कोंबड्यांचे मांस जिथे ओपन मार्केटमध्ये विकले जातात, अशा ठिकाणी या आजाराची बाधा होण्याची शक्यता जास्त असते.

पक्ष्यांचे संगोपन करणाऱ्या आणि त्यांचे मांस विकणाऱ्या व्यक्तींना याची लागण सहजासहजी होते. १९९७मध्ये बर्ड फ्लूच्या मानवी संसर्गाचे पहिले प्रकरण आढळले होते. हाँगकाँगमधल्या पक्षी बाजारापासून याची सुरुवात झाली होती, आणि या विषाणूचा संसर्ग झालेल्या साठ टक्के रुग्ण दगावले होते. बर्ड फ्लू विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहजपणे पसरतो. साहजिकच बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास डोळे, नाक, तोंड यांच्यातून हा विषाणू निरोगी व्यक्तींच्या शरीरात शिरतो आणि या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच त्याचा जागतिक उद्रेक होण्याचा धोका असतो. 

मे २०२१मध्ये चीनच्या झेनझियांग या शहरातील ४१ वर्षीय पुरुषाला H10N3 या बर्डफ्लू विषाणूची बाधा झाल्याचे सिद्ध झाले होते. 

आजाराची लक्षणे
ताप, घसा दुखणे, खोकला, सर्वांग दुखणे, सांधे दुखणे, डोके दुखणे, दम लागणे अशी या आजाराची लक्षणे असतात. याशिवाय पोट दुखणे, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे, डोळे येणे अशा समस्याही उद्‌भवू शकतात. हा विषाणू मुख्यत्वे श्वसनसंस्थेवर हल्ला करीत असल्याने न्यूमोनिया, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, डोळे येणे, मूत्रपिंडांचे कार्य मंदावणे, हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण होणे अशा गुंतागुंतीच्या घटना या रोगात होऊ शकतात.

मृत्युदर
या आजाराने बाधित झाल्यावर साधारणपणे पन्नास टक्के लोक दगावतात. मात्र १९९७ पासून आजपर्यंत जगात केवळ ५००च्या आसपास व्यक्तींचा या आजाराने मृत्यू झालेला आहे. परंतु याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आजवर या आजाराचा मानवी संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरलेला नाही. 

प्रतिबंधक उपाय

 • बर्ड फ्लू झालेल्या पक्ष्यांपासून तसेच व्यक्तींपासून दूर राहणे. त्यांना स्पर्श न करणे.
 • आजाराने मृत पावलेल्या पक्ष्यांपासून दूर राहणे. 
 • साथ असलेल्या भागात मास्क लावून जाणे. 
 • हात स्वच्छ धूत राहणे.
 • साथ असल्यास शक्यतो चिकन, अंडी व अंड्याचे पदार्थ पूर्ण शिजवून खावे

    या आजाराला जगात लस उपलब्ध नाही. मात्र अमेरिकेच्या एफडीएने H5N1 या विषाणूविरोधी एक लस संशोधित करून ठेवलेली आहे. जर जगात याचा प्रादुर्भाव वाढला तर ती सर्वत्र उपलब्ध केली जाईल. जर वेगळ्या विषाणूमुळे ही साथ आली तर त्या विषाणूचा वापर करून त्याप्रमाणे अशीच लस निर्मिती करता येईल.
  

इन्फ्लुएन्झा आजाराची लस साथीच्या काळात घेणे उपयुक्त ठरू शकते.

मात्र हे उपाय किरकोळ प्रमाणात साथ पसरली असेल तरच उपयुक्त आहेत. पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साथ पसरल्यास, ज्या भागात साथ जास्त आहे त्या पक्ष्यांना मारून टाकले जाते. याला कलिंग अशी संज्ञा आहे. कलिंग म्हणजे संसर्ग झालेले पाळीव पक्षी सामूहिकरीत्या नष्ट करणे. त्याचबरोबर जे निरुपयोगी पक्षी आहेत त्यांनादेखील विविध प्रकारे नष्ट केले जाते. केवळ अंडी उत्पादनासाठी असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये नर जातीच्या कोंबडीच्या पिल्लांना सुरुवातीलाच नष्ट केले जाते,आणि नंतर त्यांना मोठा खड्डा खणून त्यात पुरले जाते. यामुळे इतर पक्ष्यांना संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.

जास्त लागण झालेल्या भागापासून १ ते ३ किलोमीटर भाग हा निर्बंधित प्रदेश (रिस्ट्रिक्टेड झोन) आणि ५ ते १० किलोमीटर दूरचा प्रदेश हा कंट्रोल झोन मनाला जातो.

माणसांमध्ये हा आजार पसरल्यास कंटेनमेंट झोन्स, लॉकडाउन असे उपायही योजावे लागतात.  

पक्षी व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना

 • पक्ष्यांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात घडून आल्यास पशुसंवर्धन रोगनिवारण विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवावे. पक्ष्यांना हाताळू नये. 
 • बर्ड फ्लूबाबत शेतकरी आणि पशू-पक्षी पालकांसाठी माहिती देणारे आणि जनजागृती वाढवणारे कार्यक्रम करावेत. 
 • पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रोजच्या किंवा आठवडी बाजाराच्या दरम्यान विशेष सर्वेक्षण मोहीम राबवावी.
 • संशयित क्षेत्रापासून पक्ष्यांची वाहतूक, खरेदी-विक्री, खाद्य वाहतूक बंद करावी. 
 • उघड्या कत्तलखान्यात जैवसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी. रोजच्या रोज स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करावे. या कत्तलखान्यात नेलेले पक्षी पुन्हा बाहेर आणून ठेवू नयेत.
 • या आजाराचे जंतू डुकरांमध्ये किंवा डुकरांपासून संक्रमित होणार नाहीत अशी जैवसुरक्षा योजना कत्तलखान्यात असणे आवश्यक असते.
 • कोंबड्यांची खुराडी, गुरांचे गोठे, गटारे, नाले, पक्ष्यांचा वावर असलेल्या भिंती व जमिनी यावर, सात ग्रॅम खाण्याचा सोडा (सोडा-बाय-कार्ब) १ लिटर पाण्यात टाकून त्या द्रावणाने फवारणी करावी. दर १५ दिवसांनी ही फवारणी होणे आवश्यक आहे.
 • ज्या भागात स्थलांतर करणारे पक्षी येतात, त्या भागात व्यापक, नियमित आणि वारंवार सर्वेक्षण करावे.

निदान
या आजाराच्या निदानासाठी बर्ड फ्लूची आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. त्याचसोबत या आजाराने बाधित व्यक्तीचा संसर्ग कितपत पसरला आहे किंवा किती गंभीर आहे हे जोखण्यासाठी रक्ताचा हिमोग्रॅम, नाकातील आणि घशातील द्रावाची तपासणी, छातीचा एक्सरे किंवा सिटीस्कॅन केला जातो. 

उपचार
या आजाराने बाधित झालेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवावे लागते. त्यांना पूर्ण विश्रांती आणि ताप, खोकला, उलट्या यापैकी जे त्रास असतील त्याची लक्षणात्मक औषधे केली जातात. स्वाईन फ्लूमध्ये वापरले जाणारे ऑसिल्टामिव्हिर, झानामिव्हिर ही औषधेही वापरली जातात. मात्र ही औषधे आजाराची लक्षणे दिसू लागल्यावर पहिल्या दोन दिवसात सुरू केल्यासच त्याचा परिणाम दिसू शकतो. या पूर्वी इन्फ्लुएन्झासाठी वापरली जाणारी अॅमॅन्टिडीन आणि रिमॅन्टिडीन ही औषधे आताशा परिणामकारक राहिलेली नाहीत. त्याच बरोबर रुग्णाला ऑक्सिजन, कृत्रिम श्वास यांचीही गरज भासू शकते. 

सुदैवाने बर्ड फ्लूची साथ आजवर फक्त पक्ष्यांतच सीमित राहिली. माणसांना मोठ्या प्रमाणात बाधित करणारी वैश्विक साथ आजवर निर्माण झालेली नाही. परंतु अशी साथ आल्यास त्यामध्ये जनतेला माहिती देणे, रोगप्रतिबंधक उपाय सुरू करणे आणि साथ नियंत्रणासाठी वेळीच पावले उचलून या भीषण आजाराचे मानवी जीवनावर पडणारे सावट वेळीच दूर केले पाहिजे.

संबंधित बातम्या