मायग्रेन-समज कमी, गैरसमज जास्त

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 30 ऑगस्ट 2021


आरोग्य संपदा

सर्वसामान्यपणे आणि सर्वत्र आढळणाऱ्या मायग्रेन या आजाराबाबत काही समज-गैरसमज आहेत. या  विकाराची माहिती घेऊन, रुग्णांनी वेळेवर निदान आणि उपचार करून घेणे आवश्यक असते.    

सर्वसाधारण भारतीयांमध्ये आरोग्याबाबतचे शास्त्रीय ज्ञान ही नेहमीच एक प्रश्नांकित गोष्ट राहिली आहे. पूर्वापार अशास्त्रीय समजांचे ओझे आणि प्रचलित काळातील सोशल मीडियामधील गैरसमज पसरवणाऱ्या संदेशांचे भेंडोळे या दोन्हींचे एक चमत्कारिक मिश्रण यामध्ये आढळून येते. त्यामुळे आजचा सुशिक्षित आणि उच्च शिक्षित वर्ग असंख्य आजारांबाबतीत नेमक्या चुकीच्या संकल्पनांच्या आहारी गेलेला दिसून येतो. सुशिक्षितांच्या आरोग्य साक्षरतेची प्रात्यक्षिके प्रत्येक भारतीय डॉक्टर त्याच्या दवाखान्यात किंवा इस्पितळात रोजच्या रोज अनुभवत असतो.

महापुरात ज्याप्रमाणे सर्व मालमत्ता वाहून जाते आणि एखाद्या सुंदर गावात भीषण चित्र निर्माण होते, त्याप्रमाणेच इंटरनेट आणि सोशल मीडियावरील माहितीच्या महापुरात आरोग्यविषयक मूलभूत माहिती वाहून जाऊन आरोग्याबाबत तसेच अनेक आजारांबाबत अनेक समज-गैरसमजांचे संदिग्ध जाळे निर्माण झाल्याचे लक्षात येते. या गोष्टी कोरोनाच्या वैश्विक साथीत प्रकर्षाने अधोरेखित झाल्याच, पण इतर हजारो आजारांबाबतही या ‘ज्ञानाच्या’ अनुभूतीचा साक्षात्कार आरोग्यसेवकांना नित्याने होत असतो. यापैकी अर्धशिशी किंवा मायग्रेन या डोकेदुखीच्या एका विशिष्ट आणि सर्वव्यापी प्रकाराबाबत चर्चा करणे इष्ट ठरेल.

 • मायग्रेन किंवा आपल्याकडे ज्याला अर्धशिशी म्हटले जाते, तो एक सर्वसामान्यपणे आणि सर्वत्र आढळणारा आजार आहे. गेल्या दोन-तीन वर्षातील जागतिक आरोग्यसर्वेक्षणांमध्ये दिसून आल्याप्रमाणे मायग्रेनचा प्रादुर्भाव जागतिक पातळीवर वाढतो आहे. 
 • जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीनुसार जगभरात १५ कोटी लोकांना अर्धशिशीचा विकार आहे. विश्लेषणानुसार अर्धशिशीचा विकार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक आढळतो. 
 • मायग्रेनचे प्राथमिक लक्षण हे बहुतेकदा मध्यम ते गंभीर स्वरूपातील डोकेदुखी असे असते. 
 • यातल्या ८५ टक्के व्यक्तींना डोक्यात ठसठसणाऱ्या वेदना होतात. ‘डॉक्टर डोके ठणठणतेय, हातोड्याचे घाव डोक्यात बसतायत असे वाटतेय,’ अशा शब्दात रुग्ण या वेदनेचे वर्णन करतात.
 • या आजाराला आपल्याकडे अर्धशिशी म्हणतात खरे, पण यातल्या ६० टक्के व्यक्तींमध्येच फक्त अर्धे डोके दुखते, ४० टक्के व्यक्तींमध्ये मात्र दोन्ही बाजूचे डोके दुखते. 
 • सुमारे ८० टक्के लोकांना मळमळ आणि ३० टक्के लोकांना उलट्या होतात. 
 • मायग्रेनच्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांना प्रकाश आणि ८० टक्के लोकांना आवाज सहन होत नाही.
 • मायग्रेनचा झटका येण्याआधी वीस टक्के रुग्णांना प्रकाशवलय दिसणे, दृष्टी काही काळ अंधूक होणे, चमकणारे तेजस्वी ठिपके दिसणे, किंवा नागमोडी किंवा दातेरी रेषा दिसत राहणे असे त्रास होतात.

मिथके
मायग्रेन या आजाराबाबत काही समज-गैरसमज आहेत, त्यापैकी महत्त्वाच्या मिथकांची चर्चा करू या. 

 • मायग्रेन हा गंभीर आजार नाही, असा एक समज असतो. बहुतेक प्रकारच्या मायग्रेनच्या तक्रारी गंभीर नसतात,  पण योग्य आणि पुरेसे उपचार न केल्यास त्याचा त्रास दीर्घकाळ होत राहतो. सतत उद्‌भवणाऱ्या मायग्रेनमुळे मानसिक एकाग्रता नष्ट होते, व्यावसायिक कामातली उत्पादकता घटते, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात अनेक अडथळे येतात; शिवाय मायग्रेनच्या रुग्णांना शांत, निर्विघ्न अशी मानसिक व शारीरिक विश्रांती मिळत नाही. त्यांना शारीरिक पीडासुद्धा उद्‌भवू शकते. हेमीप्लेजिक मायग्रेन हा एक उपप्रकार एक हजार रुग्णांपैकी एकाला होतो. यात अर्धांगवायूप्रमाणे अर्धे अंग काही तास लुळे पडू शकते. क्वचितप्रसंगी अर्ध्या अंगाचा लुळेपणा महिनाभरही राहू शकतो, आणि ०.०१ टक्का रुग्णांना कायमचा लकवा बसू शकतो. 
 • मायग्रेन म्हणजे एक प्रकारची फक्त डोकेदुखी असते, या म्हणण्यातही काही तथ्य नाही. मायग्रेनच्या अनेक लक्षणापैकी डोकेदुखी हे एक लक्षण असते हे खरे आहे. पण डोके दुखण्याआधी डोळ्यांपुढे तारे चमकणे, प्रकाशगोल दिसणे अशी दृष्टीसंबंधी लक्षणे आढळतात. अनेकांना मायग्रेनदरम्यान खूप मळमळणे, उलट्या होणे, पोटात अस्वस्थ वाटणे अशी लक्षणेही आढळतात. काहींना ऐकू येणाऱ्या आवाजांची तीव्रता खूप वाढून आवाज सहन होत नाही. काहींना कसलेसे वासही येऊ लागतात. काही रुग्णांमध्ये मायग्रेन होण्याआधी दोन दिवस चिडचिडेपणा वाढणे, निराश वाटणे, सतत जांभया येणे, मान ताठरणे अशी लक्षणे दिसू लागतात. याला प्रोड्रोमल सिम्प्टम्स म्हणतात. अनेक व्यक्तींना मायग्रेनचा अटॅक येण्याआधी प्रकाशवलय (ऑरा) दिसते. मायग्रेनमधील हा ऑरा, इतर दृष्टीभ्रम, कानांमध्ये होणारा त्रास, नाकाला येणारे वास, उलट्या-मळमळ आणि क्षणिक अर्धांगवायू ही सर्व मज्जासंस्थेशी निगडित लक्षणे असतात. याशिवाय अनेकांना डोके चेहऱ्याला मुंग्या येतात, त्या दंडातून तळहातांपर्यंत पसरतात. म्हणजेच मायग्रेन ही साधी डोकेदुखी नसते.
 • अतिरिक्त चहा -कॉफी प्यायल्याने मायग्रेन होते. हीदेखील एक चुकीची समजूत आहे. चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणाऱ्या अनेक उत्तेजक द्रव्यांनी मायग्रेन होत नाही. मात्र काही लोकांबाबतीत तो एक ‘ट्रिगर फॅक्टर’ असू शकतो. कॉफी आणि मायग्रेनचे नाते तसे गुंतागुंतीचे आहे. चहा-कॉफीत असणाऱ्या कॅफीनच्या अतिरिक्त वापराने मायग्रेन उद्युक्त होऊ शकते, पण इतर कारणांनी निर्माण होणाऱ्या डोकेदुखीप्रमाणे मायग्रेनची डोकेदुखीही कॅफीनने कमी होऊ शकते. नित्यनेमाने अतिप्रमाणात कॉफी पिणाऱ्यांना मायग्रेनचा अटॅक येण्यापूर्वी कॉफी प्यावीशी वाटत नाही, पण मायग्रेन दरम्यान कॉफी प्यायल्याने डोक्यातला ठणका काहीसा कमी होतो. पण तरीही वैद्यक शास्त्रामध्ये मायग्रेनचा उपचार म्हणून कॅफीनचा नियमित वापर करण्याची शिफारस केली जात नाही. सध्या उपलब्ध असलेल्या शास्त्रीय संशोधनानुसार मायग्रेनचा विकार असणाऱ्यांनी कॉफीसेवन बंद करण्याची गरज नाही. पण कॉफी प्यायचे प्रमाण अधिक असणाऱ्या व्यक्तींना त्याचप्रमाणे नित्य नियमाने कॉफी पिणाऱ्या लोकांनी कॉफीसेवन अचानक बंद केल्यास त्यांना मायग्रेनचा त्रास होण्याची दाट शक्यता असते
 • मायग्रेनची डोकेदुखी कोणत्याही डोकेदुखीच्या औषधाने थांबू शकते. मायग्रेनच्या उपचारात डोकेदुखी थांबवणे, त्याबरोबर होत असलेले इतर त्रास थांबवणे याप्रमाणे मायग्रेनचा अटॅक येण्यातील वारंवारिता कमी करणे यासाठी औषधोपचार केला जातो. मायग्रेन कायमचे बरे करणारे कोणतेही औषध आजमितीला उपलब्ध नाही, परंतु केवळ डोकेदुखी थांबवणारी औषधे हा या विकाराचा औषधोपचार नसतो. 
 • मायग्रेनचा त्रास रोखण्यास कोणत्याही औषध योजनेचा उपयोग होत नाही. हे एक चुकीचे विधान आहे.  मायग्रेनच्या लक्षणासाठी आणि नियंत्रणासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत. यात प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणारी डोकीदुखीवरील वेदनाशामक, ओरल ट्रिप्टान्स, कॅल्सिटोनिन जीन रिसेप्टॉर पेप्टाइड्स पद्धतीची औषधे, अॅटोजीपँट, नैराश्यविरोधी औषधे, अपस्मारविरोधी औषधे, बीटा ब्लॉकर्स यांचा समावेश होतो. याशिवाय जीवनशैलीमध्ये बदल करावे लागतात. यामध्ये रात्री योग्य वेळेस आठ तास निर्विघ्न झोप घेणे, दिवसातून २ ते ३ लिटर पाणी पिणे, समतोल व पौष्टिक आहार नियमितपणे दिवसातून चार वेळा घेणे, ताणतणावांचे नियोजन करणे यांचा समावेश असतो. 
 • मायग्रेन असल्यास सिटीस्कॅन, एमआरआय करून घेतला पाहिजे, हेही एक मिथकच आहे. रुग्ण आपली डोकेदुखी आणि अन्य त्रास कसे आहेत हे सांगतो यातच मायग्रेनचे निदान मुख्यत्वे होते. रुग्णाची लक्षणे आणि ट्रिगर घटकातून ते समजते.
 • गर्भवती स्त्रियांना मायग्रेनची औषधे चालत नाहीत, असा समज आहे. मायग्रेनमध्ये सर्वसाधारणपणे दिले जाणारे पॅरॅसिटॅमॉल गर्भावतींसाठी पूर्णपणे सुरक्षित असते. ट्रिप्टान गटातील औषधे गर्भवतींनी पहिल्या तीन महिन्यात घेऊ नयेत, मात्र त्यानंतर उर्वरित काळासाठी ती चालू शकतात. परंतु मायग्रेन असलेल्या गरोदर स्त्रियांनी शक्यतो तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत. मनानेच कोणतीही औषधे घेऊ नयेत.
 •  डाएट, सप्लिमेंट्स, पर्यायी औषधोपचारांनी मायग्रेन कायमचे बरे होते, असाही समज आहे. मायग्रेनमध्ये चौरस आणि पौष्टिक आहार जरूर घ्यावा, पण जाहिरातीतील औषधे, पर्यायी उपचारांच्या साह्याने मायग्रेन बरे होऊ शकते, याला कोणत्याही शास्त्रीय संशोधनाचा आधार नाही. मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन डी आणि  व्हिटॅमिन बी 2  अशांसारख्या सप्लिमेंट्सचा मायग्रेन टाळण्यामध्ये किंवा बरे करण्यामध्ये कोणताही फायदा सिद्ध झालेला नाही.
 • तुम्हाला डोकेदुखी दरम्यान प्रकाशवलय दिसत नसेल तर ते मायग्रेन नव्हे, असे म्हणणे चुकीचे आहे. प्रकाशवलयासह मायग्रेनचा त्रास होणे याला क्लासिक मायग्रेन म्हणतात. साधारणतः २० टक्के रुग्णांना प्रकाशवलय दिसते. पण ८० टक्के रुग्णांना ते दिसत नाही.
 • मायग्रेनच्या उपचाराबाबत आजकाल कोणतेही संशोधन होत नाही, हे विधान जगातील संशोधकांवर अन्यायाचे ठरेल. मायग्रेनचा विकार निर्माण होण्यामागील शारीरिक प्रक्रियेवर सखोल संशोधन सुरू आहे. मायग्रेनचा अचानक होणारा त्रास औषधांशिवाय बरा करणारी काही उपकरणे अमेरिकेत आली आहेत. ‘नेरिव्हिओ’ नावाचे स्मार्टफोनवर चालणारे एक उपकरण (वेअरेबल डिव्हाईस) शोधण्यात आले आहे. अटॅक आल्यावर दंडावर बांधायच्या या उपकरणाने तीव्र मायग्रेन ४५ मिनिटांत आटोक्यात येते. अशाप्रकारची मेंदूकडे जाणाऱ्या वेदनासंकेतांमध्ये बदल करणारी आणखी काही उपकरणे आणि औषधे येत्या काही वर्षात उपलब्ध होतील.

रुग्णाला तीव्र वेदना देणारा, त्याच्या जीवनाची घडी विस्कटून टाकणारा हा आजार वरवर किरकोळ वाटला, तरी नक्कीच त्रासदायक आहे. या विकाराची माहिती घेऊन, रुग्णांनी वेळेवर निदान आणि उपचार करून घेणे आवश्यक असते.

संबंधित बातम्या