पायांवरील सूज - गंभीर आजारांचे सूतोवाच

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

आरोग्य संपदा

स्वतःच्या आरोग्याबाबत निःशंक आणि निश्चिंत असणाऱ्या व्यक्तींना दोन लक्षणांची खूप भीती वाटते. पहिले लक्षण म्हणजे, अचानक दरदरून घाम येणे, कारण घाम आला म्हणजे हृदयविकाराचा झटका आला, हे समीकरण डोक्यात घट्ट बसलेले असते, आणि दुसरे लक्षण म्हणजे पायांवर सूज येणे. कारण पायांवर सूज आली म्हणजे किडनी खराब झाल्या अशी पक्की समजूत मनात घर करून असते. यावेळेस पायांवरील सुजेबाबत माहिती घेऊ या.

तळपाय, घोटा आणि गुडघ्यांखालील पाय यांच्यावर आलेल्या सुजेला परिघिय सूज किंवा पेरिफेरल इडिमा म्हणतात. यामध्ये या अवयवांच्या त्वचेखालील भागात द्रव पदार्थ जमा झालेला असतो. पायांना सूज येण्यामध्ये काही प्रकार असतात.

 1. फक्त तळपायांना आणि घोट्याला सूज असणे
 2. गुडघ्यापासून तळपायाच्या अंगठ्यापर्यंत सूज
 3. फक्त एकाच पायावर सूज
 4. पाय लालबुंद होऊन सुजणे, समवेत पायांना ठणका असणे
 5. गुडघ्याला, नडगीला इजा झाल्यामुळे येणारी सूज
 6. पायांची बोटे काळी निळी होऊन आलेली सूज
 7. पायांप्रमाणे सर्वच शरीरात सूज असणे, 
 8. अशाप्रकारची पायावरील सूज येणे वृद्धांमध्ये आणि प्रौढांमध्ये नेहमीचेच असते. 
 9. खूप वेळ उभे राहिल्याने किंवा प्रवासात सीटवर दीर्घकाळ बसल्यावर येणारी सूज  
 10. कारणे
 11. तळपाय, पाय आणि घोट्याला सूज येण्याची सर्वसामान्य कारणे पाहता,
 • अतिरिक्त वजन ः वाढलेल्या वजनामुळे शरीराचे आकारमान वाढते, त्यामुळे रक्ताभिसरण कमी होते आणि परिणामतः तळपाय, पाय आणि गुडघ्याच्या त्वचेखाली द्रव पदार्थ निर्माण होतो. 
 • दीर्घकाळ उभे राहणे किंवा बसणे ः यात पायांचे स्नायू निष्क्रिय राहतात, त्यामुळे शरीरातील रक्त आणि इतर द्रवपदार्थ वरच्या बाजूला हृदयाकडे पंप करू शकत नाहीत, त्यामुळे रक्तातील पाणी आणि रसवाहिन्यातील द्रव त्वचेखाली जमा होऊन सूज येऊ शकते.
 • औषधांचा परिणाम ः काही औषधांमुळे तळपाय, पाय आणि घोट्यावर सूज येऊ शकते. उदा- स्टेरॉइड्स, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, ट्रायसायक्लिक आणि मोनोअमाइन ऑक्सिडेज इनहिबिटर्स (एमएओआय), काही अँटिडिप्रेससंट्स, आयबुप्रोफेन व अॅस्पिरिनसारखी नॉनस्टेरॉइडल अँटि-इंफ्लेमेटरी ड्रग्स (एनएसएआयडी)
 • नैसर्गिक हार्मोनल बदल ः  स्त्रियांमध्ये गर्भधारणा, मासिक पाळी आणि रजोनिवृत्ती दरम्यान इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांच्या पातळीतील चढउतारामुळे पायांमध्ये रक्ताभिसरण कमी होते, परिणामी सूज येते. 
 • पायांच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी होणे ः कमरेपासून खालील शरीरातील, पायांमधील रक्तवाहिन्यांमध्ये एखादी रक्ताची गुठळी निर्माण झाल्यास त्या रक्तवाहिनीचा रक्तप्रवाह खुंटतो. त्यामुळे त्या गुठळीखालील रक्तामधील द्रवपदार्थ रक्तवाहिनीच्या आवरणातून बाहेर पडून त्वचेखालील मांसल भागात जमा होतात आणि सूज येते. 
 • दुखापत किंवा जंतूसंसर्ग ः तळपायाला, पायाला किंवा घोट्याला दुखापत होऊन, जाळे होऊन किंवा जंतूसंसर्ग होऊन पायांना सूज येते.  
 • व्हेरिकोज व्हेन्स ः यामध्ये पायांच्या रक्तवाहिन्यांमधील, विशेषतः तळपायाकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त नेणाऱ्या वाहिन्यांमधील छोटे व्हॉल्व निकामी होतात. त्यामुळे तळपायांकडून रक्त वरच्या बाजूला पंप होत नाही. ते त्या रक्तवाहिन्यात जमा होऊन त्यातील द्रवपदार्थ बाहेर पडून त्वचेखाली जमा होतो. त्यामुळे सूज येते.  
 • पेरिकार्डिटिस ः हृदयाच्या भोवताली जे आवरण असते, त्याला पेरीकार्डियम म्हणतात. त्याचा दीर्घकालीन दाह झाल्यास हृदयातील रक्त पूर्णपणे पुढे सरकत नाही. श्वास घेण्यास त्रास होतो आणि पाय आणि गुडघ्यांमध्ये दीर्घकाळ टिकणारी सूज मोठ्या प्रमाणात येऊ शकते..
 • लिम्फीडिमा ः शरीरात रक्तवाहिन्यांप्रमाणे रसवाहिन्याही असतात. ही प्रणाली रसग्रंथी आणि रसवाहिन्यांनी बनलेली असते. याला लिम्फॅटिक सिस्टीम म्हणतात. संपूर्ण शरीरातील पेशीसमूहातील रक्त वगळता इतर द्रवपदार्थ वाहून नेणे, हे तिचे कार्य असते. लिम्फॅटिक सिस्टिममध्ये अडथळा निर्माण झाल्यास पेशीसमूह सुजतात. हा अडथळा पायांच्या रसवाहिन्यात झाल्यास पाय पूर्णपणे सुजतात.
 • प्रीएक्लेम्पशिया ः या विकारात गरोदरावस्थेतील स्त्रीमध्ये रक्तदाब वाढू लागतो. त्यामुळे रक्ताभिसरण कमी होऊन चेहरा, हात आणि पाय सुजतात.
 • लिव्हर सिरोसिस ः यकृतामध्ये दोष निर्माण होऊन यकृतामधून होणाऱ्या रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो. अतिरिक्त मद्यपान, हिपॅटायटीस बी किंवा सीद्वारे होणारा विषाणू संसर्ग, यकृताचे ऑटोइम्युन डिसीज यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते. परिणामतः यकृताच्या रक्तवाहिन्यात उच्च रक्तदाब निर्माण होतो. याला पोर्टल हायपरटेन्शन म्हणतात. त्यामुळे तळपाय, पाय आणि गुडघ्यांमध्ये रक्ताभिसरणात दोष निर्माण होऊन सूज येते.
 • अॅनिमिया ः लोहाच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन सर्वांगाला आणि पायांवरसुद्धा सूज येऊ शकते.

डॉक्टरांना कधी भेटावे?
फक्त पायांवर सूज येणे एवढाच त्रास असेल तर विशेष चिंतेचे कारण नसते, पण रुग्णाला काही विशेष आजार असेल आणि पायांवर सूज येत असेल, तर ते त्या आजाराचे गंभीर लक्षण असू शकते. उदा.

 • हृदय किंवा मूत्रपिंडाचा आजार 
 • यकृताचे आजार 
 • पाय सूजून लाल झाले आहेत आणि स्पर्श केल्यास ते उष्ण किंवा गरम वाटल्यास
 • सतत येणारा ताप 
 • स्त्रियांमध्ये गरोदरावस्था

    घरगुती उपाय करून सूज कमी न होता वाढत चालली असेल, अशा सर्व बाबतीत डॉक्टरांना त्वरित दाखवणे आवश्यक ठरते.
विशेष लक्षणे ः पायावर सूज असून खालील विशेष लक्षणे असतील तरी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

 • छातीत खूप दुखणे किंवा छातीवर दडपण येणे किंवा छातीत आवळले गेल्यासारखे वाटणे 
 • चक्कर येणे
 • अचानक गोंधळल्यासार्खी स्थिती होणे (कन्फ्युजन)
 • डोके खूप हलके होणे
 • श्वास घ्यायला त्रास होणे

निदान  
डॉक्टरांकडे रुग्ण गेल्यावर त्याच्या लक्षणांची सखोल माहिती घेऊन सर्वसाधारण शारीरिक तपासणी केली जाते. रुग्णाच्या सुजेबाबत- सूज नक्की कोणकोणत्या भागांवर येते? दिवसाच्या कोणत्या वेळेस सूज जास्त असते? रुग्ण अनुभवत असलेली इतर लक्षणे, काय केल्यावर सूज वाढते किंवा कमी होते? अशा गोष्टींचा ऊहापोह केला जातो. 

याचबरोबर सर्वसाधारण रक्ताच्या चाचण्या, मूत्रपिंडे, यकृत यांच्या कार्याच्या चाचण्या, रक्तातील इलेक्ट्रोलाईट्स तपासले जातात. हाडे आणि इतर पेशीसमूहांची तपासणी करण्यासाठी एक्सरे, सिटीस्कॅन, एमआरआय, हृदयाच्या कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी इलेक्ट्रोकार्डियोग्राम व टू-डी एकोकार्डियोग्राम, रक्तवाहिन्यातील गुठळ्यांचा संशय आल्यास पेरिफेरल व्हीनस/ आर्टेरियल डॉपलर, अवयव, रक्तवाहिन्या आणि उतींचे परीक्षण करण्यासाठी अल्ट्रासाऊंड अशा तपासण्या केल्या जातात.
  

 • औषधोपचार ः जर रुग्णाच्या पायांवरील सूज जीवनशैलीशी किंवा किरकोळ दुखापतीशी निगडित असेल तर काही घरगुती उपचारांची शिफारस केली जाते. जर ते आरोग्याशी संबंधित एखाद्या आजाराशी निगडित असेल तर त्या आजाराचे निदान करून प्रथम त्यावर उपचार केला जातो. पायांवरच्या सुजेमध्ये त्वचेखाली द्रवपदार्थ जमा होत असतात, त्यामुळे औषधोपचारात हे द्रव पदार्थ लघवीवाटे उत्सर्जित व्हावेत यासाठी सर्वसामान्यपणे डाययुरेटिक्स प्रकारातली औषधे काही काळ द्यावी लागतात.

घरगुती उपचार
काही किरकोळ कारणांनी पायांवर आलेली सूज काही साध्या घरगुती उपचारांनी कमी होऊ शकते. यामध्ये- 

 • पाय उंचावणे ः झोपताना पायांखाली किंवा गादीच्या पायाकडील भागाखाली उशा ठेवून पाय थोड्याशा उंचावलेल्या स्थितीत झोपल्यास, पायांची पातळी हृदयाच्या पातळीपेक्षा थोडी वर राहते आणि सकाळपर्यंत सूज कमी होते.  
 • हालचाल, पाय ताणणे ः प्रवासामध्ये खूप वेळ बसून राहिल्यामुळे किंवा दीर्घकाळ उभे राहिल्याने येणारी सूज, प्रवासादरम्यान थोडेसे चालल्याने किंवा बसल्या बसल्या सतत पाय ताणत राहिल्याने, पाय हलवत राहिल्याने कमी होऊ शकते. विमानप्रवासात किंवा लांबवरच्या रेल्वे तसेच मोटारप्रवासात ही गोष्ट लक्षात ठेवावी. 
 • मिठाचे सेवन ः आहारातील अतिरिक्त मीठ वापरणे, जेवताना वरून मीठ घेणे यामुळे पायावर सूज येते. साहजिकच अशी सवय असणाऱ्यांनी सूज आल्यावर मिठाचे सेवन कमी करावे.
 •  तंग कपडे ः काही व्यक्ती फॅशन म्हणून मांडीभोवती, गुडघ्याला पायांना अकारण काही पट्टे वापरतात. त्यामुळे तसेच मांडीला खूप घट्ट बसणारे कपडे घातल्यानेही पायांवर सूज येते. या गोष्टी टाळाव्यात किंवा त्या वापरण्याचा वेळ कमी करावा.      

प्रतिबंधक उपाय ः 
रोज तीन लिटर पाणी पिणे. बैठी जीवनशैली टाळून नियमितपणे ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करणे. पायांचे व्यायाम करणे आवश्यक असते. वय आणि उंचीनुसार वजन आदर्श पातळीवर राखावे.  

दैनंदिन कामामध्ये सतत उभे राहणे आवश्यक असेल तर कॉम्प्रेसन सॉक्स वापरावेत. याशिवाय रोज रात्री बादलीत कोमट पाणी घेऊन त्यात दोन चमचे काळे मीठ टाकावे आणि त्या पाण्यात वीस मिनिटे पाय बुडवून बसावे. दैनंदिन कार्यालयीन कामात दीर्घकाळ खुर्चीत बसणे आवश्यक असेल तर पाय ताणणे, पाय हलवणे या गोष्टी कराव्यात. झोपताना पायांखाली उशी ठेवावी.

आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे, तसेच चिवडा, फरसाण, लोणचे अशा मीठ जास्त असणाऱ्या पदार्थांना टाळावे. त्याउलट खाण्यात मॅग्नेशियमची कमतरता असल्यासही सूज येऊ शकते. पदार्थ खाल्ल्यास सूज कमी होण्यास उपयुक्त ठरते. आपल्या आहारात बदाम, टोफू, काजू, पालक, डार्क चॉकलेट, ब्रोकोली, अॅव्होकॅडो यामधून मॅग्नेशिअम मिळू शकते. दररोज २०० ते ४०० मिलीग्रॅम मॅग्नेशिअम घेतल्यास सूज दूर होण्यास मदत होऊ शकते. मात्र मूत्रपिंडाचे किंवा हृदयाचे आजार असतील तर मॅग्नेशिअम घेणे टाळावे.

संबंधित बातम्या