चिकुनगुन्या - डासांद्वारे पसरणारा ‘संधिवात’?

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

आरोग्य संपदा

फुलदाण्या, पाण्याची भरलेली पिंपे व नारळाच्या करवंट्यात साठलेले पाणी अशा मनुष्यवस्तीभोवती मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या वस्तूंमध्ये साचलेल्या पाण्यावर चिकुनगुन्या पसरविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या वाढतात. परिणामी, अशा पाणी साठणाऱ्या वस्तू असलेल्या वस्तीतील माणसांना हे डास चावण्याचे प्रमाण वाढते आणि चिकुनगुन्या विषाणूंचा प्रसार वेगाने होतो. 

पावसाळा सुरू झाला की डासांचा प्रादुर्भाव खूप वाढतो आणि डासांमुळे पसरणाऱ्या मलेरिया, डेंग्यू या आजारांची साथ सुरू होते, हा गेल्या अनेक वर्षांतला अनुभव आहे. डासांमुळे पसरणाऱ्या आजारात ‘चिकुनगुन्या’ या आजाराचेही काही रुग्ण दरवर्षी पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी या आजाराची मोठी साथही महाराष्ट्रासह भारतातल्या काही राज्यात पसरली होती. मात्र या आजाराबाबत जनसामान्यांमध्ये मूलभूत माहिती आणि आरोग्य जागरूकतेचा अभाव दिसून येतो.

‘चिकुनगुन्या’ हा शब्द आफ्रिकेतील माकोंडे भाषेतील आहे. या शब्दाचा अर्थ आहे ‘वाकविणारा’. या आजारात रुग्णाचे सांधे एवढे दुखतात की तो वाकून चालायला लागतो, म्हणून या आजाराला ‘चिकुनगुन्या’ हे नाव देण्यात आले. टांझानिया आणि मोझाम्बीक देशांच्या सीमेवर असलेल्या किमाकोंडे पठारावर सन १९५२मध्ये या आजाराच्या प्रादुर्भावाची पहिली नोंद झाली. पुढे १९५५ मध्ये रॉबिन्सन आणि लुम्स्डेन या वैद्यकीय संशोधकांनी या रोगाचे निदान केले.

दर चार -पाच वर्षांनी या आजाराची साथ उद्‌भवते, असे चिकुनगुन्याच्या पहिल्या प्रादुर्भावानंतरचा या आजाराचा इतिहास पाहता लक्षात आले आहे. १९६०-८० दरम्यान या आजाराच्या साथी आफ्रिका आणि आशिया खंडांत वरचेवर येऊ लागल्या. जगभरातील वाढते दळणवळण आणि प्रवासी वाहतुकीमुळे, २००४ सालापासून आफ्रिका, आशिया, युरोप आणि अमेरिका खंडातील साठ देशांत या आजाराच्या साथी येत आहेत. मागील काही वर्षांत भारत, इंडोनेशिया, मालदीव, म्यानमार आणि थायलंड या देशांत याच्या साथी मोठ्या स्वरूपात आल्या होत्या. 

या आजाराच्या मोठ्या साथींच्या नोंदी पाहिल्या तर...

 • २००६मध्ये चिकुनगुन्याची मोठी साथ फ्रान्समधील ला-रियुनियन बेटावर आली होती. त्यामध्ये सुमारे एक लाख नागरिक या आजाराने बाधित झाले होते.
 • २००७मध्ये इटली
 • २०१०मध्ये आग्नेय आशिया
 • २०१३मध्ये अमेरिका खंडातील कॅरेबियन बेटांमधील सेंट मार्टिन, युरोपमधील फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन
 • २०१५मध्ये सेनेगलमधील साथ पसरली होती. त्याचवर्षी अमेरिका खंडातील देशांत चिकनगुनियाचे सुमारे सात लाख संशयित रुग्ण आढळले होते.
 •  २०१६मध्ये ब्राझील, कोलंबिया, बोलिव्हिया या देशात एकुणात सुमारे तीन लाख रुग्ण
 •  २०१७मध्ये फ्रांस, इटलीसह युरोपातील १० देश
 •  २०१८मध्ये भारतात ६२ हजार, पाकिस्तानात नऊ हजार रुग्णांची नोंद झाली.
 • याशिवाय २०१८मध्ये सुदान, २०१९मध्ये येमेन आणि २०२०मध्ये येमेन आणि छाड यादेशात याच्या महासाथी येऊन गेल्या.
 • भारतात २०१०मध्ये दिल्ली शहरात चिकुनगुन्याची साथ आली होती. मात्र हा आजार जीवघेणा नाही; आणि भारतामध्ये त्याच्या नोंदी काटेकोरपणे झालेल्या नाहीत. 

कारणमीमांसा
चिकुनगुन्या हा एक विषाणूजन्य आजार आहे. टोगाविरिडी अल्फा व्हायरस या प्रजातीमधील या विषाणूचे शास्त्रीय नाव चिकव्ही (CHIKV) आहे. आणि तो आरएनए पद्धतीचा विषाणू आहे. एडिस इजिप्ताय जातीचे डास चिकुनगुन्या विषाणूंचे मुख्य वाहक आहेत. दिवसा चावणारे डास या रोगाला कारणीभूत असल्याचे दिसले आहे. चिकुनगुन्याचा विषाणू सामान्यपणे उष्ण प्रदेशात आढळतो आणि म्हणूनच या आजाराचे रुग्ण आफ्रिका व आशिया खंडांत आढळतात. 

एडिस अल्बोपिक्टस  जातीचे डाससुध्दा या रोगाचे वाहक असल्याचे अलीकडे दिसून आले आहे. या डासांच्या अंगावर पांढरे ठिपके असतात. फुलदाण्या, पाण्याची भरलेली पिंपे व नारळाच्या करवंट्या, जुने टायर अशा मनुष्यवस्तीभोवती आढळणाऱ्या वस्तूंमध्ये साचलेल्या पाण्यावर या डासांच्या अळ्या वाढतात. परिणामी, अशा पाणी साठणाऱ्या वस्तू असलेल्या वस्तीतील माणसांना हे डास चावण्याचे प्रमाण वाढते आणि चिकुनगुन्या विषाणूंचा प्रसार वेगाने होतो. 

या आजाराने बाधित रुग्णाला डास चावला की रुग्णाच्या शोषून घेतलेल्या रक्तासोबत तो विषाणू डासाच्या पोटात जातो. असा डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावला की त्यालादेखील चिकुनगुन्याची लागण होते. अशारीतीने असंख्य डास अगणित रुग्णांना चावल्यानंतर या आजाराची मोठी साथ येते. याच डासांमुळे डेंग्यू आणि झिका हे विषाणूजन्य आजारही पसरतात. 

लक्षणे

 • चिकनगुनिया विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये संक्रमित डास चावल्यानंतर साधारणपणे ३ ते ७ दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. यात -
 • थंडी वाजून ताप येणे
 • सांधे कमालीचे दुखणे. विशेषतः गुडघा, घोटा सर्वात जास्त दुखतात. सांधे सुजतात आणि त्यांची हालचाल वेदनामय होते.
 •  इतर लक्षणांमध्ये डोकेदुखी, स्नायू दुखणे, किंवा अंगावर पुरळ येणे यांचा समावेश असू शकतो.
 • चिकनगुनियाच्या आजारात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे, बहुतेक रुग्णांना एका आठवड्यात बरे वाटते. मात्र काही व्यक्तींमध्ये बरे वाटण्यासाठी चार आठवड्यांपर्यंत काळ लागू शकतो. पण सांधेदुखीच्या तीव्र लक्षणांमुळे रुग्ण अक्षम बनतो. शिवाय २० टक्के रुग्णांत सांधेदुखी काही महिने कायम राहू शकते.

जोखीम
या आजारात ६५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये या आजाराची लक्षणे गंभीर स्वरूप धारण करू शकतात. तसेच गरोदर स्त्रियांना या आजाराची लागण झाल्यास हा आजार त्यांच्या अर्भकांमध्ये संक्रमित होतो. अशा नवजात शिशूंसाठी आजार गंभीर स्वरूपाचा ठरू शकतो. उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयरोग अशा सहव्याधी असलेल्या व्यक्तींमध्ये या आजाराची लक्षणे तीव्रतेने जाणवतात. गंभीर प्रकरणांमध्ये न्यूरॉलॉजिकल, रेटायनल आणि हृदयरोगविषयक गुंतागुंतदेखील होऊ शकते. 

निदान
चिकुनगुन्याची साथ असलेल्या भागात रुग्णाने, आधीच्या ७ ते १० दिवसात प्रवास केलेला असेल आणि त्याला या आजाराची लक्षणे दिसू लागली तर या आजाराचे क्लिनिकल निदान होते. विशेषतः थंडी वाजून येणारा ताप आणि सुजलेले सांधे ही व्यवच्छेदक लक्षणे असतात. या रुग्णांची रक्तचाचणी करून निदान पक्के करता येते. यामध्ये

 •     हिमोग्रॅम
 •     इएसआर
 •     सीआरपी
 •     आयजीएम चिकुनगुन्या या चाचण्या महत्त्वाच्या असतात.

    त्याचप्रमाणे आरटीपीसीआर फॉर चिकुनगुन्या ही चाचणीदेखील करता येते.

उपचार

 • चिकनगुनियाचा विषाणू नष्ट करणारे कोणतेही औषध नाही तसेच या आजाराची लसही उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णाच्या लक्षणांवर उपचार केले जातात. यामध्ये 
 • पॅरासीटॅमॉल आणि इतर नॉन-स्टेरॉइडल दाहशामक औषधे वापरली जातात. स्टेरॉइड्स यात वापरू नयेत.
 • हायड्रोक्सिक्वीनॉल (एचसीक्यू) हे डिसीज मॉडिफायिंग औषध रुग्णाची लक्षणे लवकर आटोक्यात येण्यास अतिशय उपयुक्त ठरते.
 • ट्रॅमॅडॉलसारखी वेदनाशामके वापरता येतात. 

याशिवाय, 

 • पूर्ण विश्रांती
 • दररोज ३ लिटर पाणी घेणे
 • नियमितपणे समतोल आहार ३ ते ४ वेळा घेणे आवश्यक असते. 
 • रुग्णाला चावणाऱ्या डासांमुळे आजार संक्रमित होत असल्याने त्यांनी मच्छरदाणीत झोपणे आवश्यक ठरते.

प्रतिबंध

 • चिकुनगुन्यासारख्या औषधे आणि 
 • लस नसलेल्या आजारात उपचारांपेक्षा प्रतिबंधक उपाय काटेकोरपणे पाळणे आवश्यक असते. 
 •  डासांची उत्पत्ती रोखणे : चिकुनगुन्याचा डास हा स्वच्छ पाण्यात वाढतो. त्यामुळे घरातील फुलदाण्या, टेरेस गार्डनमधील कुंड्या यामध्ये पाणी साठून देऊ नये. रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर यामधील पाणी वरचेवर साफ करावे. घरात बादल्या, भांडी यात भरून ठेवलेले पाणी झाकून ठेवावे, रोजच्या रोज वापरावे आणि बदलावे.
 • घराच्या वरील टेरेसमध्ये टायर, डबडी, जुन्या बादल्या काढून टाकाव्यात. त्यात पावसाचे पाणी साठून राहू शकते.
 • घरासभोवती पाणी साठून देऊ नये. खड्डे बुजवून टाकावेत. 
 • चिकनगुनिया पसरविणारे डास दिवसाच्या वेळेस चावतात, म्हणून डासांना पळवून लावणारी मॉस्क्विटो रिपिलंट औषधे दिवसाही सुरू ठेवावीत.
 • घरामध्ये दिवसा तसेच रात्री झोपतानाही पूर्ण हात आणि पाय कव्हर करणारे कपडे घालावेत. हाफ पँट्स, बर्म्युडा, बिनबाह्याचे किंवा अर्ध्या बाह्यांचे शर्ट घालून झोपू नये. 
 • झोपताना मच्छरदाणी वापरावी. 
 • डास घरात प्रवेश करू शकणार नाहीत अशा जाळ्या खिडक्यांना बसवून घ्याव्यात.
 •  चिकुनगुन्याची साथ असलेल्या प्रदेशात जाणे टाळावे.
 •  आजाराची शक्यता वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच रक्त तपासण्या आणि औषधे घ्यावीत.

संबंधित बातम्या