बिछान्याला खिळलेल्या ज्येष्ठांची घरीच करा शुश्रूषा

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021

आरोग्य संपदा

सन २०११च्या जनगणनेनुसार भारतात सुमारे साडेदहा कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. हेल्पेज इंडिया आणि युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडाच्या अंदाजानुसार, येत्या पाच वर्षात, २०२६ सालापर्यंत, ही संख्या १७ कोटी ३० लाख होईल. ग्लोबल एज वॉच इंडेक्सच्या २०१४च्या अहवालानुसार दीर्घकालीन किंवा अन्य आजारांनी बिछान्याला खिळलेल्या ज्येष्ठ रुग्णांच्या शुश्रूषेबाबत जगातील आकडेवारीत भारताचा ७१वा क्रमांक आहे.

ऐंशीच्या दशकात एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात आली. एकटे पडलेले अधिकाधिक ज्येष्ठ, जास्त काळ आपल्या धंदा-व्यवसायात सक्रिय राहून किंवा सामाजिक कार्यात गुंतवून घेऊन आणि नोकरी, व्यवसायातून निवृत्त झालेली मंडळी आपला ‘समानधर्मा’ गट शोधून मित्रांच्या, आजी-माजी सहकाऱ्यांच्या आणि इतर समुदायाच्या संगतीत राहणे पसंत करू लागले. आपल्या मुलाबाळांसह राहणाऱ्या काही ज्येष्ठांची मुले, आपापल्या धंदा व्यवसायात व्यग्र होत गेली, नाहीतर परगावी, परराज्यात किंवा परदेशी गेली. या मुलांच्या पिढीला ज्येष्ठांची सेवा करणे दुरापास्त आणि अडचणीचे होऊन बसले. साहजिकच वृद्ध व्यक्तींसाठी, कौटुंबिक मदतीच्या परंपरेचा हळूहळू ऱ्हास होऊ लागला.  
कौटुंबिक साहाय्य मिळू शकत नाही अशा ज्येष्ठांसाठी पाश्चात्त्य देशांच्या धर्तीवर आपल्याकडेही अनेक ‘ओल्ड एज होम्स’ सुरू झाली आहेत. मात्र अगदी थोड्या सेवाभावी संस्थांचा अपवाद वगळता, या संस्था व्यावसायिक उद्देश आणि व्यापारी वृत्तीने चालवल्या जातात. समाजातील अतिश्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीयांमधील आजारी वृद्ध हेच त्यांचे अपेक्षित ‘ग्राहक’ असतात. मध्यमवर्गीयांना आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील वृद्धांना मात्र त्यांच्या आयुष्यभराच्या संचितामध्ये असे ‘फाइव्ह स्टार’ वृद्धाश्रम परवडणे शक्य नसते. त्यांची मुले-नातवंडे, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याच आधारे त्यांना आपले आजारपण व्यतीत करावे लागते.

एखादी वडीलधारी व्यक्ती अंथरुणाला खिळल्यावर त्या व्यक्तीला तिच्या दैनंदिन क्रियाकलापांमध्ये कुणाच्यातरी मदतीची आवश्यकता भासते. आजारी ज्येष्ठांची सेवा करू इच्छिणाऱ्या तरुणांना, काही सेवाभावी संस्थांना याबाबत काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे लक्षात ठेवणे आवश्यक असते.

स्वच्छता आणि टापटीप
रुग्णाचे कपडे, अंतर्वस्त्रे, गाऊन, अंथरूण, पांघरूण, चादरी रोजच्या रोज बदलाव्यात. असे कपडे धुणे, व्यवस्थित अंथरणे याकडे लक्ष द्यावे. कपड्यांना वास येऊ नये म्हणून कोलन वॉटर शिंपडावे. याखेरीज स्वच्छ उशा, उशांचे अभ्रे आणि अन्य कपडे आठवड्यातून किमान दोनदा धुऊन बदलावेत. रुग्णांची गादी कडक नसावी तसेच खूप जाडही नसावी. साधारणतः दोन ते तीन इंच जाडीची कापसाची गादी असावी. आवश्यक असल्यास गादीच्या चादरीखाली रबरी मॅकिन्टॉश अंथरावा. त्याने बिछान्यावर होणारा ओलेपणा टाळता येतो. खातापिताना काही सांडमांड झाल्यास किंवा मलमूत्र विसर्जनामुळे चादर ओली झाल्यास ती त्वरित बदलावी.  

अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांना रोजच्या रोज अंघोळीसाठी आणि दात घासण्यासाठी मदतीची गरज असते. याखेरीज साधारणतः पंधरा दिवसांनी नखे कापणे, महिन्यातून एकदा केस कापणे यासाठी मदत लागते. यामध्ये त्यांना त्वचा खरचटणे किंवा कुठे तरी कापले जाणे अशा इजा होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. केसांची निगा राखताना, केसात उवा झाल्या नाहीत ना हे पहावे. 

रुग्णाची खोली हवेशीर असावी, खिडक्या दिवसा उघड्या ठेवाव्यात. एसीऐवजी कमी वेगाने फिरणारा पंखा सुरू असावा. मात्र त्याचा झोत दूर किंवा फिरता असावा, तो रुग्णाच्या अंगावर येऊ नये. शक्य असल्यास खोलीत रूम फ्रेशनर वापरावा किंवा धूर रुग्णाच्या अंगावर येणार नाही पण सुगंध दरवळत राहील अशा पद्धतीने धूप किंवा अगरबत्ती लावावी. अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीच्या अंथरुणाची स्वच्छता ठेवल्यास आणि विशेष काळजी घेत राहिल्यास  रुग्णाच्या स्वाभिमानालाही चालना मिळते असा अनुभव आहे.

योग्य पोषक आहार
रुग्णांना संतुलित आहाराची आवश्यकता असते, तसेच आजारानुसार काही विशेष खाद्यपदार्थ जास्त द्यावे लागतात. उदाहरणार्थ, अनेक रुग्णांना पातळ पदार्थ आणि द्रव पदार्थ, पाणी जास्त द्यावे लागते, तर काहींना प्रथिने जास्त द्यावी लागतात. याउलट काही रुग्णांच्या आहारात पाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवावे लागते, तेलकट पदार्थ कमी द्यावे लागतात, काहींना विशिष्ट फळे देऊ नयेत अशी पथ्ये असतात. रुग्णाला कोणता आहार, किती प्रमाणात, किती वेळा द्यावा यासाठी डॉक्टरांशी किंवा आहारतज्ज्ञांशी बोलावे. काही खाल्ल्यानंतर त्रास झाल्यास त्वरित कळवावे. डॉक्टरांशी बोलताना रुग्णाच्या खाण्याच्या सवयी, आवडी-निवडी, त्यांना कशाचे वावडे असल्यास त्याची नोंद ठेवून चर्चा करावी.  

आहाराबाबत आवश्यक पौष्टिक गरजा भागविल्या जाणे गरजेचे असते. पोटभर आणि भरपूर जेवणाऐवजी दिवसभर लहान स्नॅक्स थोड्या थोड्या वेळाने द्यावे लागतात. या व्यतिरिक्त, पाणी आणि साखर नसलेली पेये त्यांच्या जवळ ठेवावी, म्हणजे ठरावीक वेळाने ती देता येतात किंवा शक्य असल्यास रुग्ण स्वतः घेऊ शकतात.

औषधोपचार
रुग्णाची औषधे डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांनुसार व्यवस्थितपणे द्यावीत. त्यात सकाळी, दुपारी, रात्री देण्याच्या गोळ्या वेगळ्या बांधून ठेवाव्यात. काही गोळ्या उपाशीपोटी तर काही खाल्यावरच द्यायच्या असतात. त्याबाबत लक्ष पुरवावे. गोळ्या-औषधे संपण्यापूर्वीच मागवून ठेवावी. डॉक्टरांनी सांगितलेल्या मुदतीनंतर औषधे देऊ नयेत. डॉक्टरांनी पुन्हा भेटायला बोलावले असल्यास अथवा फोन करायला सांगितले असल्यास त्या दिवशी तो करावा. टेलिमेडिसिनद्वारे फोन किंवा व्हिडिओ कॉलिंगद्वारे डॉक्टर्स रुग्णांना तपासू शकतात.

रुग्णासोबत डिजिटल बीपी मशिन, ग्लुकोमीटर, पल्स-ऑक्सिमीटर, तापमापक असावेच. तसेच ताप, सर्दी, डोकेदुखी, उलटी अशांसाठी ऐनवेळी लागणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णाच्या औषधांमध्ये ठेवावीत. किरकोळ त्रास एक-दोन दिवसात कमी न झाल्यास डॉक्टरांना फोन करून सल्ला घ्यावा.   

मनोरंजन
अंथरुणाला खिळलेल्या रूग्णांसाठी अंघोळ घालणे आणि आहार देणे एवढेच आवश्यक नसते, तर त्यांच्या मनोरंजनाची आणि वेळ व्यतीत करण्याची साधने उपलब्ध करून देणेही गरजेचे असते. खोलीत टीव्ही आणि रिमोट ठेवावा. त्यांच्या आवडीच्या विषयांची पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे उपलब्ध ठेवावीत. 

बेडसोअर टाळणे
अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना एकाच अवस्थेमध्ये सतत झोपवू नये. अन्यथा त्वचेला लागून जिथे हाडांचे उंचवटे असतात अशा ठिकाणी जखमा होऊ शकतात. यांना बेडसोअर किंवा प्रेशरसोअर म्हणतात. माकडहाड, नितंब, शरीराच्या दोन्ही बाजूला असलेल्या कमरेच्या हाडांच्या कटिबंधाच्या उंचवट्यांवर, टाचा, कोपर, खांदे, पाठीचे खवाटे, मानेच्या वरील डोक्याची बाजू अशा ठिकाणी या जखमा उद्‌भवू शकतात.
रुग्णाची गादी कडक नसावी, मऊ असावी. दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहण्याची शक्यता असल्यास वॉटरबेड्स किंवा एअरबेड्स वापरावेत. यामध्ये छोट्या मोटरच्या साह्याने सतत पाणी आत-बाहेर होणाऱ्या गाद्या वापरता येतात. अनेक ठिकाणी असे रुग्णोपयोगी साहित्य नाममात्र भाड्याने मिळते.  

त्वचेवर झालेल्या अशा जखमांची, त्वचेच्या आतील भागांची काळजी घेणे आवश्यक असते. दर तीन तासांनी रुग्णाला एकदा पाठीवर झोपवावे, डाव्या-उजव्या कुशीवर वळवावे, झोपण्याची स्थिती बदलावी. अन्यथा अशा जागांवरची त्वचा आधी लालसर होते, फोड येऊन जखमा होतात, त्या चिघळून खोलवर जाऊ शकतात. हे फोड संक्रमित होऊन त्यातील पू सर्व शरीरात पसरल्यास रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते.

बेडसोअर टाळण्यासाठी 
रुग्ण थोडीफार हालचाल करू शकत असेल, तर त्याला बिछान्यात उठवून बसवणे, शक्य असल्यास व्हीलचेअरमध्ये फिरवणे किंवा वॉकरच्या साह्याने चालवणे अशा हालचाली करण्यास प्रोत्साहित करावे. कॉटच्या कडेवर बसून हातपाय हलवण्यासारख्या किरकोळ व्यायामांकरिता प्रोत्साहित करावे.

  • शारीरिकदृष्ट्या त्रास न होता रुग्णाला व्यायाम देण्याबाबत वैद्यकीय व्यावसायिक किंवा फिजिओथेरपीस्टचा सल्ला घ्यावा. 
  • रुग्णाची त्वचा स्वच्छ आणि कोरडी असावी. कोठेही ओलसरपणा राहून देऊ नये.
  • गुडघे आणि घोट्यांच्यामध्ये उशा ठेवाव्यात. या जागा एकमेकांवर दबून जखमा होऊ शकतात.
  • घोटे, टाचा, नितंब आणि माकडहाडासारख्या जागांवर बेडसोअर होतात, त्या रोजच्या रोज तपासाव्यात. अन्यथा त्या वाढल्यावर त्यांचे उपचार करूनही त्या बऱ्या होणे दुष्प्राप्य असते. 

    रुग्णाला सुरुवातीपासून, बेडसोअर झाले नसतील तरी या जागांवर रोज व्हाइट स्पिरीट लावावे. ते लावल्याने तेथील त्वचा निर्जंतुक तर राहतेच, पण थोडी जाड होते आणि बेड सोअर होणे टळते. मेडिकल स्टोअरमध्ये ते मिळते.

डायपर बदलणे
घरात अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांची काळजी घेताना रोजच्या रोज डायपर बदलणे ही एक अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. डायपर बदलताना रुग्णसाहाय्यकाने हातात डिस्पोझेबल वैद्यकीय हातमोजे आणि नाकतोंड झाकणारा सर्जिकल मास्क वापरावा. डायपर बदल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावेत.
डायपर बदलण्याबाबत सूचना

  • रुग्ण फुलपँट वापरत असेल तर ती गुडघ्यापर्यंत खाली करून डायपर बदलण्याऐवजी ती पूर्णपणे काढून डायपर बदलावा.
  • रुग्णाला कुशीवर वळवून डायपरच्या आतील बाजूचे निरीक्षण करून रुग्णाने केलेल्या मल-मूत्र विसर्जनाचा अंदाज घ्यावा.
  • डायपरच्या बाजू व्यवस्थितपणे सरळ करून तो उघडावा आणि मलमूत्राचा भाग आतील बाजूस ठेवून दुमडावा.
  • मलमूत्र केलेल्या रुग्णाचे अवयव स्वच्छ करण्यासाठी स्टरलाईझ्ड् वाइप वापरावे. गरजेनुसार त्या भागावर मलम लावावे. हे रुग्णाचे पाय उचलून करावे. 
  • रुग्णाला दुसऱ्या कुशीवर वळवून डायपर काढावा.
  • रुग्णाच्या पाठीकडील बाजूने नवा स्वच्छ डायपर ठेवून त्याला सरळ करून डायपर बांधावा. 

    रुग्णाला फिरवून, त्यांच्या पायांमधून डायपरचा पुढचा भाग खेचावा आणि समोरच्या आणि बाजूच्या भागांना जोडावे.

महत्त्वाच्या सूचना
    कर्करोग, अर्धांगवायू अशा आजारात रुग्णांना अंथरुणातून उठणे अशक्य होते. अशा आजारात वैद्यकीय उपचारांबरोबर काही मनोबल उंचावणाऱ्या गोष्टीही कराव्या लागतात. यात भेटायला येणारे नातेवाईक, त्यांचे फोनकॉल महत्त्वाचे ठरतात. रुग्ण झोपलेला नसल्यास, नातेवाइकांच्या भेटी आणि त्यांचे फोन जरूर घेऊ द्यावेत. मनोबल उंचावण्यासाठी अशा भेटीगाठी, संवाद वैद्यकीय उपचारात पूरक असतात. ममत्व, सहानुभूती आणि संवाद गोळया-औषधांसोबत उपयुक्त ठरतात. रुग्णाच्या कुटुंबीयांनादेखील सहानुभूतीची गरज असते. 
 

   मृत्यू ही सर्वांच्या जीवनातली चिरंतन घटना आहे. रुग्णालयात शरीरात अनेक नळ्या आणि यंत्रांच्या सान्निध्यात मृत्यू येण्यापेक्षा, आपल्या घरी, मुलाबाळांसमोर, इष्ट मित्रांच्या सहवासात तो शांतपणे येणे यात नक्कीच कृतार्थता असते.

संबंधित बातम्या