झिका-डासांमुळे होणारा आजार

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

आरोग्य संपदा

खरेतर झिका नावाच्या विषाणूबाबत आपल्या देशातील लोकांना तशी फारशी माहिती नाहीच. जुलै महिन्यात पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील बेलसर गावामध्ये ‘झिका’ विषाणूचा रुग्ण आढळल्यावर मोठीच खळबळ उडाली होती. 

जुलै  महिन्यामध्ये राष्ट्रीय विषाणू संस्थेने केलेल्या तपासण्यांमध्ये पुरंदर तालुक्यातील बेलसर गावातील एका ५० वर्षीय महिलेला चिकुनगुन्या आणि झिका या दोन्ही विषाणूची एकत्र लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. झिका विषाणूचा महाराष्ट्रातील हा पहिला रुग्ण होता. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ५ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या आदेशात जिल्ह्यातील ७९ गावे झिका विषाणूच्या संसर्गासाठी निरीक्षणाखाली ठेवण्याचे स्थानिक प्रशासनाला सांगितले.

खरेतर झिका नावाच्या विषाणूबाबत आपल्या देशातील लोकांना तशी फारशी माहिती नाहीच. या वर्षी जुलैच्या सुरुवातीला केरळमध्ये झिकाचे १४ रुग्ण सापडल्याची बातमीही अनेकांच्या काळजात चर्र करून गेली होती. यापूर्वी २०१६मध्येही केरळात या आजाराचे रुग्ण सापडले होते.

काय आहे हा आजार?
सन १९४७मध्ये आफ्रिका खंडातील युगांडामधील झिका नावाच्या जंगलात या आजाराचे विषाणू सापडले, त्यामुळे याला हे नाव पडले. २००७ सालापर्यंत या आजाराची जगाला फारशी माहिती नव्हती. परंतु २००७ साली प्रशांत महासागरातील काही बेटांत याचा उद्रेक आढळून आला. त्यानंतर अमेरिका, आफ्रिका, आग्नेय आशिया, पॅसिफिक बेटे, कॅरिबियन बेटांचा काही भाग, मध्य आणि दक्षिण अमेरिका या प्रदेशात झिकाचा  उद्रेक गेल्या तेरा-चौदा वर्षांत आढळून आलेला आहे. २०१५मध्ये, या उद्रेकाने महासाथीचे स्वरूप धारण केले होते. मात्र त्यानंतरही झिका विषाणूच्या अनेक केसेस जगात अधूनमधून आढळतात, पण मोठा उद्रेक होऊन साथ आल्याची नोंद झालेली नाही. 

झिका विषाणू भारतात प्रथम केरळात सापडत होता, आता तो महाराष्ट्रातही आढळला आहे. एखाद्या व्यापक साथीच्या आजाराची सुरुवात अशीच होत असते. कदाचित येत्या काही वर्षांत हा मोठ्या प्रमाणात पसरूही शकेल. अशा नव्या आजाराबाबत सर्वसामान्य अनभिज्ञ असतात, त्यामुळे या झिकाबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. झिका  हा डेंग्यू, चिकुनगुन्या, यलो फीवर या आजारांना कारणीभूत असणाऱ्या विषाणूंप्रमाणेच एक आर्बो व्हायरस प्रजातीचा विषाणू आहे, जो  एडिस इजिप्ती नावाच्या डासाच्या दंशाने माणसांमध्ये पसरतो. 

एखाद्याला झिका विषाणूची बाधा झाली असेल आणि त्याला जर हा डास चावला, तर त्या डासाच्या शरीरात झिकाचे विषाणू जातात. त्यानंतर तो डास जेव्हा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला चावतो, तेव्हा त्याच्या शरीरात झिकाचे विषाणू प्रवेश करतात आणि ती व्यक्ती झिकाने बाधित होते. झिका विषाणूचा प्रसार केवळ डासांच्या चाव्यानेच नव्हे तर अन्य मार्गांनीसुद्धा होतो. गर्भधारणेमध्ये मातेकडून तिच्या अर्भकाला होऊ शकतो. तसेच बाधित पुरुषांच्या वीर्यामध्ये हा विषाणू दीर्घकाळ राहतो आणि त्यामुळे त्या पुरुषामध्ये लक्षणे नसली तरी तो शरीरसंबंधांद्वारे स्त्रियांना बाधित करू शकतो. झिका बाधित व्यक्तीने रक्तदान, अवयव दान, उतक दान केल्यासही झिका त्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करून त्याला बाधित करू शकतो.     

झिकाची  लक्षणे
डासांचा दंश झाल्यावर २ ते ५ दिवसांनी रुग्णामध्ये काही सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसून येतात. यामध्ये थंडी वाजून कडक ताप येणे, डोके खूप दुखणे, अंगावर लालसर पुरळ उठणे, डोळे लाल होणे, हातापायांचे सांधे तसेच स्नायू खूप दुखणे अशी लक्षणे असतात. ही लक्षणे साधारणपणे २ ते ७ दिवस टिकतात. क्वचित काही लोकांमध्ये ती जास्त दिवसही राहू शकतात. गरोदर स्त्रियांना झिकाचा संसर्ग झाल्यास अनेकदा त्यांच्यामध्ये झिकाची लक्षणे सहसा आढळत नाहीत, मात्र प्रसूतीनंतर त्यांच्या बाळांमध्ये ती दिसू लागतात. अशा बाळांमध्ये मस्तकाचा आकार छोटा असण्याची, मायक्रोसिफॅली नावाची जन्मजात विकृती, तसेच मेंदूच्या रचनेत आणि कार्यात गंभीर स्वरूपाचे दोष आढळतात. गरोदर स्त्रीला झिकाचा संसर्ग झाल्यास, कमी दिवसात प्रसूती होणे, अचानक गर्भपात होणे, बाळ जन्मतः मृत निपजणे असे दुष्परिणाम आढळून येतात.      

 प्रौढांमध्ये आणि नवजात अर्भकांमध्ये मज्जातंतूचे विकार होऊ शकतात. यात गियाँ बारी सिंड्रोम, न्यूरोपॅथी आणि मायलिटिसचा असे विकार उद्‍भवण्याची दाट शक्यता असते. ज्या मुलांना मायक्रोसीफली हा दोष निर्माण होतो, त्यांच्यात -

 • अपस्माराचे झटके येणे
 • शारीरिक विकासाच्या टप्प्यांमध्ये विलंब होणे (उदाहरणार्थ, उशिरा बोलू लागणे, उशिरा बसणे, उभे राहणे, चालू शकणे) 
 • बौद्धिक अपंगत्व
 • हालचाल आणि तोल सांभाळण्यात समस्या
 • खाताना आणि अन्न गिळताना त्रास होणे
 • श्रवणशक्ती कमी होणे
 • दृष्टिदोष समस्या ही लक्षणे दिसून येतात.

आजाराची कारणे 
एडीस  इजिप्ती या प्रकारच्या डासांच्या  चाव्यामुळे  झिका  आजार होतो.  याच डासामुळे डेंग्यू आणि  चिकनगुनियाच्या विषाणूचा संसर्ग प्रसारित होत असतो. हे डास दिवसा चावतात.
एडीस इजिप्ती डास साचलेल्या स्वच्छ आणि स्थिर पाण्यामध्ये आपली पैदास वाढवतात. त्यांच्या अळ्या अशा पाण्यात दिसून येऊ शकतात. घरातील रेफ्रिजरेटर, शोभेच्या कुंड्या, फुलदाण्या, एअर कंडिशनर, छपरावर ठेवलेले निरुपयोगी सामान, रिकाम्या बादल्या, प्लास्टिकची भांडी, रस्त्यावरील टायर्स अशात हे पाणी साचून या डासांची पैदास वाढते. या विषाणूची बाधा झालेल्या ७० टक्के रुग्णांत कोणतीही लक्षणे नसतात, पण डासांच्या चाव्याने ते रुग्ण्प्रसाराला कारणीभूत ठरतात.

निदान  
रुग्णाची शारीरिक तपासणी, त्याची लक्षणे, लक्षणे निर्माण होण्याआधी १० दिवसांत झिकाची साथ किंवा प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशातला प्रवास यावरून या आजाराचे प्राथमिक निदान होऊ शकते. 
निदानाची पुष्टी करण्यासाठी, काही रक्ताच्या आणि मूत्राच्या चाचण्या केल्या जातात. यात-  

 • न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लिफिकेशन टेस्ट (एनएएटी) : ही जास्त ग्राह्य मानली जाते. यात चुकीचे निष्कर्ष कमी येतात.
 • झिका इम्युनोग्लोब्युलीन अँटिबॉडी टेस्ट (आयजीएम) : ही चाचणी आजार झाल्यानंतर ७ दिवसांनी पॉझिटिव्ह येते. ती काहीवेळेस संसर्ग झाल्यावर १५ दिवस ते काही महिने पॉझिटिव्ह येऊ शकते. त्याच प्रमाणे इतर पद्धतीच्या फ्लावी व्हायरसचा संसर्ग झाला असेल तरी कित्येकदा पॉझिटिव्ह येते. त्यामुळे तिची ग्राह्यता काहीशी कमी मानली जाते.
 • प्लाक रिडक्शन न्युट्रलायझेशन टेस्ट (पीआरएनटी) : यामध्ये विषाणूंमुळे निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीजचे प्रमाण मोजले जाते.    
 • पीसीआर टेस्ट : लक्षणे सुरू झाल्यानंतर एक किंवा दोन आठवड्यांच्या आत चाचण्या झाल्यास रक्त किंवा मूत्र चाचण्या झिका विषाणू शोधू शकतात. या चाचण्या पॉलिमरेज चेन रिअॅक्शन (पीसीआर) तंत्राचा वापर करू शकतात. व्हायरसच्या जनुकीय सामग्रीचे प्रमाण यात तपासले जाते आणि त्यामुळे व्हायरस शोधणे सोपे होते.
 • अँटिबॉडीज टेस्ट्स : रक्तातील झिका विषाणूविरोधी प्रतिपिंडे तपासण्या करूनदेखील निदान केले जाते. 

गरोदर स्त्रिया 
गर्भवती स्त्रिया जर झिका विषाणूच्या संसर्गाने बाधित असतील, तर त्यांच्या पोटाची सोनोग्राफी केली जाते आणि गर्भामध्ये काही विशेष विकृती, डोके छोटे असणे (मायक्रोसीफॅली), मेंदूच्या वाढीत दोष असणे यांचे निदान केले जाते. त्याचप्रमाणे गर्भजलाचीही विशेष तपासणी करून त्यात झिका विषाणूच्या संसर्गाची चाचणी केली जाते. 

अनेक देशांमध्ये गर्भवती स्त्री झिकाने बाधित असेल तर तिचे ‘झिका प्रेग्नन्सी रजिस्टर’मध्ये नाव नोंदवले जाते. ही नोंदणी गोपनीय आणि विनामूल्य असते. डॉक्टर आणि संशोधक या माहितीचा आणि झिकाच्या  गर्भावरील परिणामांचा अभ्यास करतात. बाळाचे स्वास्थ्य तपासण्यासाठी काही अतिरिक्त चाचण्या केल्या जातात.  गर्भधारणेदरम्यान किंवा जन्मानंतर  बाळाची मायक्रोसेफलीसाठी चाचणी केली जाते.

प्रतिबंध 
झिकाचा संसर्ग रोखण्यासाठी कोणतीही लस आजमितीला उपलब्ध नाही.  झिकाचा प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशात प्रवास करणे टाळावे. झिका बाधित प्रदेशांमध्ये लैंगिक संबंधांमध्ये सुरक्षित शारीरिक संबंध आणि कंडोम वापरण्याचा सल्ला दिला जातो.

वैयक्तिक काळजी 
डास चावण्याचे प्रसंग येऊ नयेत म्हणून डास पळवून लावणारे  मान्यताप्राप्त फवारे आणि मलमे वापरावीत (मॉस्किटो रिपेलंट आणि स्प्रे). झोपताना शक्यतो लांब पायघोळ पायजमे आणि मनगटापर्यंत येणारे अंगरखे वापरावेत. वातानुकूलित ठिकाणी राहावे.  घराला आतील बाजूस उघडणारे दरवाजे आणि खिडक्या असाव्यात आणि त्यांच्यावर डास पळवणारे अतिनील किरणांचे दिवे असल्यास उत्तम असते. साठलेल्या पाण्याच्या जवळ चालणे फिरणे टाळावे.  झोपताना मच्छरदाणी जरूर वापरावी. गर्भवती किंवा स्तनदा महिलांनी कीटक नाशक फवारे, डास प्रतिबंधक मलमे आणि फवारे वापरताना ती गरोदर स्त्रियांना वापरण्यास सुरक्षित आहेत, याची खात्री करावी. 

उपचार 
झिका  विषाणूला नष्ट करणारे कोणतेही औषध नाही. केवळ लक्षणांचाच उपचार केला जातो. पण तरीही कोणतेही औषध परस्पर न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. विशेषतः गरोदर स्त्रियांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी. झिका विषाणूमुळे मायक्रोसीफॅलीचा दोष घेऊन जन्मलेल्या बालकांवरही कोणताही इलाज नसतो. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने काही शस्त्रक्रिया कराव्या लागतात. 

झिकासह जगणे
भारतात अद्यापि झिका विषाणूची साथ पसरल्याची घटना नाही. पण तरीही कोरोनाप्रमाणे अशा साथी किंवा महासाथी अचानक उद्‍भवू शकतात. या आजारावरही प्रतिबंधक लस आणि पूर्ण गुणकारी औषध नसल्याने आरोग्याचे नियम आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्वरित निदान, स्वतःहून औषधे न वापरणे, गर्भवती स्त्रियांची विशेष काळजी घेणे आणि लैंगिक संबंधांवर नियंत्रण ठेवणे या गोष्टी पाळाव्याच लागतात. शास्त्रज्ञांच्या मते, मौखिक संबंध, योनी संबंध आणि गुदसबंध या सर्वप्रकारच्या शरीरसंबंधातून झिका विषाणूचा संसर्ग पसरू शकतो. ज्या स्त्रियांनी गर्भधरणेबाबत नियोजन केले असेल, अशांनी झिकाव्याप्त प्रदेशात प्रवास केला असल्यास झिकाच्या संसर्गाबाबत संपूर्ण वैद्यकीय तपासणी करूनच निर्णय घ्यावा. 

जगभरातील डॉक्टर्स आणि वैद्यकीय संशोधकांना झिका विषाणूवर  लस आणि उपचार लवकरच लस आणि उपचार येत्या काही काळात नक्कीच शोधले जातील अशी आशा आहे.

संबंधित बातम्या