निरामय प्रवासासाठी...

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

आरोग्य संपदा

कोरोनामुळे थांबलेला प्रवास आता पुन्हा सुरू होतोय. दिवाळी आणि नाताळाच्या सुट्यांसाठी प्रवासाचे बेत आखले जाऊ लागले आहेत. पण लक्षात ठेवा, कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली, तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे प्रवास करताना काळजी घेणे आवश्‍यक आहे.

यावर्षीची दसरा-दिवाळी खूपच आनंदात जाणार आहे. कारण कोरोना महासाथीची दुसरी लाट
आटोक्यात येते आहे. एकेका क्षेत्रावरचे निर्बंध कमी होऊन, मास्कसह का होईना, पण वातावरण पुन्हा मोकळे होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर अनेकांनी देशातील आणि विदेशातील सफरीचे बेत आखलेत.

दिवाळीची सुटी आणि त्यानंतरचा नाताळच्या दरम्यानचा सुटीचा हंगाम डोळ्यासमोर ठेवून, कित्येक रसिक मुशाफिरांनी प्रवासाची बुकिंग्जसुद्धा करून ठेवली आहेत. आजूबाजूची गावे, दूरच्या नातेवाइकांची घरे, निसर्गरम्य ठिकाणे, परराज्यातील आणि परदेशातील स्थळे आदी प्रवासाची संधी येऊ घातली आहे. गेल्या वर्ष-दीड वर्षात लोकांचे दूरचे प्रवास होत होते, पण अगदी नाममात्र. पण येत्या काही आठवड्यात पुन्हा एकदा मुक्तपणे प्रवास करायला जाण्याची मुभा मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने सर्व जनतेत प्रवासाचा एक उदंड मूड निर्माण झाला आहे. 

पण लक्षात ठेवा, कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली, तरी कोरोना संपलेला नाही. या दुसऱ्या लाटेत तो केव्हाही उसळी घेऊ शकतो. त्याचा नवा व्हेरिएंट जर आला तर मग तिसरी लाटही येऊ शकते. अशावेळी आपण दोन्ही डोस घेतलेले असले, तरी कोरोनाच्या लाटेत प्रवाहपतित होण्याची शक्यता असते. पण म्हणून काय प्रवास टाळायचा? तसा विचार करायचा नाही. पण प्रत्येक प्रवाशाला काही विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. प्रवास मग तो कोणताही असो, जवळचा किंवा लांबचा, देशांतर्गत किंवा परदेशातला, काही विशेष गोष्टींचे काळजीपूर्वक नियोजन करणे अगत्याचे ठरते.

काही महत्त्वाचे नियम
लसीकरण
जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या बाहेर जायचे असेल किंवा परदेशी जायचे असेल तर तुमचे लसीकरण पूर्ण झालेले असायला हवे. म्हणजे लशीचे दोन्ही डोस घेतलेले पाहिजेतच. परदेशी जाण्यापूर्वी तर दुसरा डोस घेऊन किमान १५ दिवस उलटलेले असायला हवेत. त्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवे. या प्रमाणपत्रावर तुमचा पासपोर्ट क्रमांकही नोंदवलेला असायलाच हवा. जर तुम्ही कोरोना प्रतिबंधक लशीचा एकही डोस घेतला नसेल, तर कोणताही प्रवास करणे टाळा. जर लशीचा एकच डोस घेतला असेल, तर जवळच्या ठिकाणी किंवा तुमच्या जिल्ह्यातल्या गावी जाऊ शकता. पण त्यातही कोरोना होण्याची शक्यता टाळता येत नाही.

तुम्ही लस घेतलेली असो किंवा नसो, प्रवासापूर्वी तुम्हाला सर्दी, खोकला, ताप, जुलाब, गंधज्ञान न होणे अशी कोरोनासदृश लक्षणे आढळली तर कोरोनाची चाचणी त्वरित करून घ्या. तुम्ही दोन्ही डोस घेतलेले असले तरी ही काळजी घेणे आवश्यक आहे. कारण घरापासून दूर गेल्यावर जर तुमच्या तापाची तपासणी केली गेली, तर एखादे वेळेस तुम्हाला १० ते १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाऊ शकते. परदेशात आणि भारतातल्या काही राज्यात असे नियम आहेत. अशा अनवधानाने तुमच्या आणि तुमच्याबरोबर असलेल्या तुमच्या कुटुंबीयांच्या किंवा मित्रपरिवाराच्या संपूर्ण प्रवासाच्या आनंदावर विरजण पडू शकते.

आपण ज्या ठिकाणी भेट देत आहात, त्या ठिकाणी पोचल्यावर विलगीकरणात ठेवण्याची पद्धत आहे का, हे प्रवासाला निघण्यापूर्वी काही दिवस आधीच जाणून घ्या.  प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वीच आपण जाणार आहोत तेथे  बाहेरून येणाऱ्या व्यक्तींबाबत काय नियम आहेत, त्याची माहिती जाणून घेण्यासाठी राज्य किंवा प्रादेशिक आणि स्थानिक आरोग्य विभागांशी संपर्क साधा.

परदेशप्रवास 
आपण ज्या देशात जाणार आहात त्या देशात प्रवेशाबाबतचे नियम आणि निर्बंध काय आहेत याची अचूक माहिती घ्या.  परदेशात असताना आपल्याला तेथील सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे असते, अन्यथा त्या देशाचे अधिकारी आपल्याला तेथून परत मायदेशी पाठवू शकतात. कोरोना चाचणी, लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि अन्य नियमांची अद्ययावत आणि काटेकोर माहिती आपल्याला असणे गरजेचे असते.

कोरोनाची चाचणी केली नसेल तर कोणत्याही परदेश प्रवासाला परवानगी नाही. काही देशांत लसीकरण झाले असले तरी प्रत्येकाला किमान ७२ तास आधी तपासलेल्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट बरोबर बाळगणे आवश्यक असते. ब्रिटन आणि अमेरिकेसह अनेक देशात लसीकरण झाले असेल आणि कोरोना चाचणी निगेटिव्ह असली तरी १० ते १४ दिवस विलगीकरणात राहण्याची सक्ती असते. आपण ज्या देशात भेट देण्याची योजना करत आहात त्या देशात कोरोनाची सद्यपरिस्थिती काय आहे? लागण नव्याने पसरत चालली आहे का? बाहेर फिरायला परवानगी आहे का? कडक लॉकडाउन नाही ना? या प्रश्नांची उत्तरेही आपण शोधून ठेवली पाहिजेत.  तेथील सध्याची कोरोनाबाबतची परिस्थिती आपल्याला खडानखडा माहिती असणे आवश्यक असते.    

 • परदेशप्रवासात लसीकरणाच्या प्रमाणपत्रासोबत खालील आणखी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
 • निघण्यापूर्वी किमान ३ दिवस आधी कोरोनाची चाचणी करा.
 • आपल्यासोबत प्रवास करत नसलेल्या लोकांपासून ६ फूट दूर राहण्याचा प्रयत्न करा.
 • आपले हात साबण पाण्याने किंवा कमीत कमी ८० टक्के अल्कोहोल असलेल्या हँड सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ ठेवा.

मास्क
विमान, बस, ट्रेन, स्वतःची किंवा भाड्याची कार, दुचाकी किंवा इतर प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीद्वारे प्रवास करताना मास्क वापरणे अनिवार्य आहे.  बसस्थानक, रेल्वे स्टेशन, विमानतळ, प्रवासादरम्यानची हॉटेल्स अशा सर्व ठिकाणी मास्क परिधान केलेला असावाच लागतो.  दोन डोस झालेले असले तरी विषाणूचा संसर्ग तुम्हाला होऊ शकतो आणि तुमच्या सभोवतीच्या इतर लोकांमध्ये तो संसर्ग तुम्ही पसरवू शकता.

तुमचे आजार
 तुम्हाला एखादा दीर्घकालीन आजार असेल, तर तो उत्तम नियंत्रणात आहे ना, याची प्रवासाला निघण्याआधी किमान एक आठवडा तुमच्या डॉक्टरांना भेटून, खात्री करून घ्या. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग, यकृताचे किंवा मूत्रपिंडाचे आजार असलेल्या व्यक्तींना लसीकरणानंतरही कोरोना होण्याचा आणि त्यामध्ये आजार बळावण्याचा अल्पसा का होईना पण धोका नक्कीच असतो.

परतल्यानंतर
परराज्यातल्या किंवा परदेशातल्या सहलीतून परत आल्यावर, आपल्याला त्रास असो वा नसो, ३ ते ५ दिवसांच्या आत कोरोनाची चाचणी करून घ्यावी. चाचणी निगेटिव्ह आली तरी आपल्या घरी स्वतःला विलगीकरणात ठेवणे उत्तम.  जर तुमची चाचणी पॉझिटिव्ह असेल किंवा तुम्हाला लक्षणे दिसू लागली तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने काही रक्त तपासण्या, एक्सरे किंवा स्कॅन करून आपल्या उपचाराबाबत निर्णय घ्या.

प्रवास करून आल्यावर त्यापुढील १४ दिवस कोरोनापासून गंभीर आजारी पडण्याचा धोका असलेल्या घरातील किंवा जवळपासच्या व्यक्तींपासून दूर राहावे. तुमच्यामुळे त्यांना लागण होण्याची आणि त्यांचा आजार बळावण्याची छोटीशी का असेना पण तशी शक्यता उद्‍भवू शकते.

प्रवासाची साधने

 1. वैयक्तिक वाहन :  स्वतःच्या कारमधून प्रवास करत असाल तर एका गाडीत ड्रायव्हरसह जास्तीत जास्त चारच लोक असावेत.  प्रत्येकाचे लसीकरण झालेले असले, तरी प्रत्येकाने संपूर्ण वेळ मास्क वापरणे अपरिहार्य आहे. अन्यथा पोलिसांकडून आपल्याला दंड होऊ शकतो. कारमधील सर्वांनी एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.  कारमधील वायुवीजन व्यवस्थित राहणे आवश्यक असते, त्यासाठी एकतर काचा खाली करून खिडक्या उघड्या ठेवाव्यात किंवा वाहनातील एसी बाह्य हवा आत येईल अशा मोडवर ठेवावा. भाड्याची कार वापरण्यापूर्वी सर्व दरवाजे, हँडल्स, स्टिअरिंग व्हील, डॅशबोर्ड वगैरे पृष्ठभाग, ६० टक्के अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने पुसून घ्यावेत. गाडीत बसण्यापूर्वी आणि उतरण्याआधी आपले हात साबण आणि पाण्याने किंवा सॅनिटायझरने कमीतकमी २० सेकंद धुवावेत. सुटीच्या ठिकाणी वैयक्तिक वापरासाठी स्कूटर, बोट, स्केटबोर्ड, सायकल, व्हीलचेअर भाड्याने घेताना अशाच मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे.
 2. सार्वजनिक वाहतूक :  तुम्ही बस किंवा ट्रेनने प्रवास करत असाल, तर नाक आणि तोंड व्यवस्थित झाकणारा मास्क लावावा.  तो मुळीसुद्धा काढू नये. 
 • इतर प्रवाशांपासून सहा फूट दूर राहण्याच्या सामाजिक अंतराच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे.
 • बसमध्ये एकाआड एक सीटवर बसावे.
 • गर्दीच्या वेळा टाळून नॉन-पीक अवर्स दरम्यान प्रवास करावा.
 • वाहनामध्ये इतरत्र कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श करणे टाळावे.
 • बसस्टँड किंवा रेल्वेस्टेशनवर इतर प्रवाशांच्या गटांमध्ये एकत्र येणे टाळावे.
 • शेअर्डराइड, टॅक्सी किंवा कारपूल ः
 •  तुम्ही बाहेरच्या किंवा अनोळखी लोकांबरोबर राईड शेअर करत असाल, तर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करा.

    मास्क वापरा.

 1. ड्रायव्हर किंवा इतर सहप्रवाशांनी योग्यरीत्या मास्क घातले नसल्यास ती राईड टाळा.
 2. शक्य असेल तेव्हा इतर प्रवाशांमध्ये कमीत कमी दोन हातांचे अंतर राखा.
 3. पुढच्या ऐवजी मागच्या सीटचा वापर करा.
 4. शक्य असेल तेव्हा चालकाला खिडक्या उघड्या ठेवणे किंवा वाहनांतर्गत एसी न वापरता बाह्य हवा आत आणणारा मोड वापरायला सांगा.
 5. पाण्याच्या बाटल्या, मासिके किंवा इतर प्रवाशांनी वापरलेल्या वस्तूंना स्पर्श करणे टाळा.
 6. शक्य असेल तर नोटा न वापरता मोबाईल पेमेंट करा.
 7. प्रत्येक राईडच्या आधी आणि नंतर आपले हात स्वच्छ करण्यासाठी ६० टक्के अल्कोहोल असलेला सॅनिटायझर सोबत ठेवा.

पर्यटनासाठी गेल्यावर ठिकठिकाणची विशेष स्थळे दाखवताना रस्त्यावरून फिरावे लागते. अशावेळेस तुमच्या घरातील नसलेल्या इतर लोकांपासून अंतर ठेवा.  गर्दी किंवा दाटीवाटीच्या जागा टाळा. चालताना जर कोणी तुमच्या दिशेने येत असेल किंवा तुमच्या शेजारून जात असेल, तर अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा, शक्य तितके एका बाजूला राहा. फुटपाथ छोटा असेल तर खाली रस्त्यावर उतरा. जर तुम्हाला इतरांच्या जवळ राहावे लागत असेल तर मास्क खाली करू नका. पर्यटन स्थळांवर आजूबाजूच्या वस्तूंच्या सामान्य पृष्ठभागाला स्पर्श करणे शक्य तितके टाळा.
क्रूझ जहाजे : अमेरिकेच्या सीडीसी या आरोग्यखात्याच्या अधिकृत संस्थेने, अमेरिका आणि परदेशात क्रूझ जहाजे आणि रिव्हर क्रूझवरील प्रवास टाळण्याची शिफारस जागतिक स्तरावर केलेली आहे.  त्यांच्या मते क्रूझवर दाटीवाटीने लोकांच्या हालचाली होतात आणि कोरोना प्रसाराची शक्यता जास्त असते. 

कोरोना काळात आपण प्रवासाहून परत आल्यावर स्वतःहून कोरोनाची चाचणी करणे किंवा १० ते १४ दिवस विलगीकरणात राहणे वैद्यकीय दृष्टिकोनातून योग्य ठरते.
जागतिक पातळीवरच्या काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल्स पाळले, तर आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रांतर्गत विमान आणि अन्य प्रवासात कोरोनाच्या संसर्गाची शक्यता, आपल्याच गावात बाजारात जाऊन एखादी वस्तू आणताना होणाऱ्या संसर्गाच्या संभाव्य शक्यतेपेक्षा खूप कमी 
ठरू शकते. तर शुभास्ते पंथानः!

संबंधित बातम्या