आजच्या जगातील नव्या बाल-आरोग्य समस्या

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

आरोग्य संपदा

असंख्य प्रकारच्या जोखमी आणि गंभीर समस्यांमुळे लहान मुलांच्या जीवनातील अनिश्चितता आणि विविध प्रकारचे धोके निर्माण झाले आहेत. ते दूर करण्यासाठी जागतिक स्तरावर तातडीने उपाय योजण्याची आवश्यकता आहे.

लहान मुले म्हणजे देशाचे भवितव्य असते. जर नवी पिढी सुदृढ, निरामय आणि आरोग्यसंपन्न असेल, तर देशाची प्रत्येक क्षेत्रात उन्नती होऊ शकते. भारतातील लहान मुलांच्या आयुर्मानाचा विचार केला, तर गेल्या सत्तर वर्षात त्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे लक्षात येते. 

 • १९५० साली, जन्मलेल्या दर १००० मुलांमध्ये १८९.२ मुलांचा मृत्यू व्हायचा
 • १९६० साली हा आकडा १६१.७ झाला
 • १९७०साली १४१.८
 • १९८०मध्ये ११४ होता 

आता २०२१ची आकडेवारी हा मृत्यूदर २८.७ पर्यंत कमी झाल्याचे दर्शवते नवजात बालकांच्या आणि पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या मृत्यूच्या पूर्वीच्या कारणांमध्ये, अपुऱ्या दिवसातील प्रसूती, मातेचे आणि बाळांचे कुपोषण, गोवर, कांजिण्या, देवी, जुलाब, घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, मेंदूज्वर, क्षय, न्युमोनिया असे संसर्गजन्य आजार यांची भरती होती. त्याचबरोबर बालआरोग्याचे अपुरे नियोजन, लसीकरणाला विरोध, दवाखान्यांची कमतरता ही कारणे होतीच. 

मात्र, २१व्या शतकात लहान मुलांच्या आरोग्याला बाधा आणणारी अनेक नवी कारणे जगभरात दिसून येऊ लागली. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१५च्या निष्कर्षांनुसार अठरा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलामुलींच्या आरोग्याला बदलत्या जीवनशैलीतील आणि प्रगतीच्या नावाखाली होणाऱ्या असंख्य गोष्टींचा तडाखा बसत असल्याचे लक्षात येते. यानुसार-

 •     हवामानात सतत होणारे बदल
 •     प्रदूषण
 •     हानिकारक धंदेवाईक मार्केटिंग
 •     बिघडलेली जीवनशैली आणि त्यातील आहार
 •     दुखापती, हिंसा, संघर्ष
 •     स्थलांतर, देशांतर 
 •     मानवी जीवनातील विषमता 

अशा असंख्य प्रकारच्या जोखमी आणि गंभीर समस्यांमुळे लहान मुलांच्या जीवनातील अनिश्चितता आणि विविध प्रकारचे धोके निर्माण झाले आहेत. ते दूर करण्यासाठी जागतिक स्तरावर तातडीने उपाय योजण्याची आवश्यकता आहे.  बालकांच्या दृष्टीने आरोग्याबाबतीत  जोखमीच्या गोष्टी

पर्यावरण विषयक
हरितगृह वायू उत्सर्जनामुळे जगात सर्वत्र हवामानातले त्रासदायक बदल घडत आहेत. यामुळे बालकांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या उपस्थित होत आहेत. पर्यावरणातील अनेक समस्यांमुळे बालकांच्या भवितव्याबाबत मोठेच प्रश्नचिह्न उभे आहे. यामध्ये..

 • समुद्राची उंचावणारी पातळी
 • चक्रीवादळे, वारेमाप पाऊस, दुष्काळ, हिमवर्षाव अशा हवामानातील आत्यंतिक घटना
 • अन्नपाण्याची असुरक्षितता
 • उष्णतेच्या आणि थंडीच्या लाटा 
 • नवनव्या संसर्गजन्य रोगांचा फैलाव 

मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे स्थलांतर आणि देशांतर अशा समस्यांमुळे लाखो मुलांच्या जीवनावर झालेले असंख्य दुष्परिणाम आजमितीस नजरेस येत आहेत.  

याकरिता कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उपाय तातडीने करणे आवश्यक आहे तापमानातील वाढ १.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. जगातील १९६ देशांनी १२ डिसेंबर २०१५ रोजी पॅरिस येथे पर्यावरणविषयक एक जागतिक करार केला. या करारानुसार वातावरणाचे तपमान हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून १.५ अंश सेल्सिअसपक्षा वाढू न देण्याची हमी या सर्व देशांनी दिली आहे.      

२०२०च्या जागतिक आकडेवारीनुसार घरातील आणि घराबाहेरील अशा दोन्ही प्रकारच्या वायू प्रदूषणामुळे दरवर्षी अंदाजे ७० लाख व्यक्तींचे नाहक मृत्यू होतात. वायू प्रदूषणामुळे बालकांच्या आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. आज जगातील ४० टक्के मुलांमध्ये हवामानाशी संबंधित आरोग्य समस्या वाढल्या आहेत. फुफ्फुसाचे विकार आणि मज्जासंस्थेच्या कार्यातील विकृती, हृदय आणि रक्तवाहिन्यांमध्ये दोष, अनेक प्रकारचे हृदयविकार या आजारांचे बालकांमधील वाढते प्रमाण याचेच द्योतक आहे.

गरिबी
सामाजिक परिस्थिती, गरिबी आणि मूलभूत सेवांची कमतरता यामुळे मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचते. झोपडपट्टीत आणि कच्च्या घरात राहणाऱ्या मुलांना घराचा निकृष्ट दर्जा, दाट लोकवस्ती, घरात दाटीवाटीने राहावे लागणे, धोकादायक ठिकाणी असलेली वस्ती, आजूबाजूची अस्वच्छता, पिण्याचे पाणी आणि मलविसर्जन योग्य पद्धतीचे नसणे, चौरस आहाराचे दुर्भिक्ष्य याचे दुर्धर परिणाम होतात.  

लठ्ठपणा आणि असांसर्गिक आजार
बाल वयातील मुलांमधला वाढता लठ्ठपणा आणि स्थूल मुलांची वाढती संख्या हे २१व्या शतकातील  सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वात गंभीर आव्हान आहे. सहा ते १८ या वयोगटातील लठ्ठ बालकांची आणि किशोरवयीन मुलांची जगभरातील संख्या १९७५मध्ये १ कोटी १० लाख होती, तर २०१६मध्ये ती दहा पटीने वाढून साडेबारा कोटी झाली आहे. भारतात शालेय वयाच्या मुलांमधले स्थूलत्वाचे प्रमाण ८ टक्क्यापर्यंत गेलेले आहे. दक्षिणेतील राज्यातील शहरांमध्ये ते २१ टक्क्यापर्यंत आढळते. 

नव्या जीवनशैलीतील जाहिराती
आरोग्यावर दुष्परिणाम करणाऱ्या असंख्य गोष्टींच्या जाहिराती, प्रायोजित कार्यक्रम, धडाकेबाज मार्केटिंग याचा मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो असे सिद्ध झाले आहे. यामध्ये-    

 • तंबाखू, गुटखा, सिगारेट, विडी, तंबाखू मसाला असे व्यसनजनक पदार्थ  
 • फास्ट फूड, शर्करायुक्त पेये, एनर्जी ड्रिंक्स अशा अनारोग्यकारक आधुनिक जीवनशैलीतील खाद्ये 
 • जुगार, ड्रग्ज, सोशल मीडिया, मोबाईल फोन 

या सर्व गोष्टींना पुढावा देणाऱ्या बेबंद जाहिरातींचा परिणाम आजच्या शाळा-कॉलेजातल्या विद्यार्थ्यांवर होऊन त्यांचे शालेय यश, मानसिक आरोग्य, शारीरिक क्षमता आणि एकुणातल्या आरोग्याला कायमचे ग्रहण लागू शकते.   

याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे लहान बाळांना दिली जाणारी डबाबंद दुधाची पावडर. याला आईच्या दुधाला पर्याय किंवा फॉर्म्युला मिल्क म्हणूनही संबोधले जात असे. या दूध पावडरीचे अमेरिकेतले मार्केट सुमारे ७० अब्ज डॉलर्स (सव्वा पाचशे हजार कोटी रुपये) आहे. मात्र या दुधाचा वापर तान्ह्या मुलांमध्ये केल्याने बुद्धिमत्ता खुंटणे, लहानवयापासून लठ्ठपणा वाढणे, तरुण वयातच मधुमेह होणे असे परिणाम दिसतात.. मातेच्या दुधातून मिळणारी प्रतिकारशक्ती न मिळाल्याने, अनेक संसर्गजन्य आजार बाळांना त्वरित बाधित करतात. या मुलांच्या आजारपणामुळे, ७० अब्ज डॉलर्सच्या या जाहिरात विश्वाकडून अमेरिकेचे प्रतिवर्षी ३०२ अब्ज डॉलर्सचे नुकसान होते. 

वैज्ञानिक दृष्टिकोनातून जागतिक स्तरावर याबाबत अनेक सर्वेक्षणे झाली आहेत.  

 • जागतिक पातळीवरच्या एका सर्वेक्षणानुसार, प्रगत आणि विकसनशील देशातील मुले वर्षभरात तब्बल  ३० हजार जाहिराती  पाहतात. त्यातील ६० टक्के जाहिराती मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. 
 • लॅटिन अमेरिकेल्या वेगवेगळ्या २३ सर्वेक्षण संशोधनांमध्ये दिसून आले की स्थूलत्व जास्त असलेल्या कुटुंबातील पालक आणि मुले अस्वास्थ्यकर पदार्थांच्या जाहिराती दूरदर्शनवर पाहतात आणि त्याने प्रभावित होऊन त्या  पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत राहतात.
 • ब्राझील, चीन, भारत, नायजेरिया आणि पाकिस्तानमधील ५ ते ६ वर्ष वयोगटातील ६८ टक्के मुले कमीतकमी एक सिगारेट ब्रँड नक्की ओळखू शकतात. हेच प्रमाण रशियामध्ये ५० टक्के तर चीनमध्ये ८६ टक्के आहे. 
 • अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील ११ ते १४ वर्षांच्या मुलांच्या रोजच्या पाहण्यात  मद्याच्या सरासरी चार जाहिराती येतात, नंतर कुतूहलापोटी त्याबाबत ते अधिक माहिती घेतात.

ब्रिटन आणि इराणमध्ये टीव्हीवरील लहान मुलांच्या कार्यक्रमांदरम्यान दातांचे आरोग्य बिघडवणाऱ्या अन्नपदार्थांच्या जाहिरातींचे प्रमाण ६७ टक्के आहे. 

अशा प्रकारच्या बिझनेस प्रमोशनमुळे लहान मुलांच्या आरोग्याबाबत निर्माण होणाऱ्या गंभीर त्रासांचा आजपर्यंत कोणत्याही देशाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सखोल विचारच केलेला नाही. किंबहुना अशा जाहिरातींच्या प्रदर्शनामध्ये या गोष्टी सर्रासपणे दुर्लक्षिल्या जातात. आजची लहान मुले इंटरनेट आणि अनेक सोशल मीडियावर कार्यरत असतात. अनेक कंपन्या व्यावसायिक लक्ष्यीकरणाच्या उद्देशाने त्यांच्या प्रोफाइल्स चक्क विकत घेतात आणि विकतातही.  इंटरनेटच्या माध्यमातून जगातील असंख्य मुले गुंडगिरी आणि  शोषणाला बळी पडतात. शिवाय गुन्हेगारांची रॅकेट्स आणि मुला-मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या लुटारूंच्या संपर्कात येतात. यातून त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण होण्याच्या लक्षावधी घटना आजवर उजेडात आल्या आहेत. 

 • दुखापती, हिंसा, संघर्ष, स्थलांतरे - जगातील विविध देशांच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर नजर टाकल्यास मुलांच्या सर्वांगीण आरोग्यावर या तीन घटकांचे गंभीर परिणाम तर होतातच. पण या परिणामांबाबत आजवर विशेष लक्ष जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर दिलेले नाही. 
 • वय वर्षे ५ ते २९ या वयोगटातील अगणित मुले त्यांच्या जीवनात दोन ते तीन वेळा रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे दुखापतग्रस्त होत असतात. रस्त्यावरील अपघात हे बालकांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे
 • जगातील पन्नास टक्के मुले आणि तरुण हे सामाजिक आणि वैयक्तिक हिंसाचारात सापडतात.  दरवर्षी सुमारे एक अब्जापेक्षा जास्त मुले अशा हिंसाचारात जखमी होतात किंवा मरण पावतात. 
 • अंतर्गत यादवी युद्धे, संघर्ष, दंगली, हिंसाचार, दुष्काळ, आपत्तीकारक नैसर्गिक परिस्थिती, दैनंदिन पोटापाण्याचे प्रश्न यामुळे एक अब्ज व्यक्ती देशांतर्गत विस्थापित होतात, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थलांतरित होतात किंवा आपल्या मुलांसह निर्वासित म्हणून अन्यत्र स्थलांतरित होतात. यामध्ये मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. 

या समस्यांवर तोडगा काय?
जागतिक आरोग्य संघटनेने२०१५मध्ये  लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाबाबत एकूण सतरा उद्दिष्टे जाहीर केली होती. ''सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स्'' (शाश्वत विकास उद्दिष्टे) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सूचीतली उद्दिष्टे २०३०पर्यंतच्या पंधरा वर्षात साध्य करावीत असा सकारात्मक प्रस्ताव जगातील सर्व राष्ट्रांसमोर मांडला होता. 

वर्ल्ड हेल्थ असेंब्लीने  २०१०मध्ये, लहान मुलांसाठी खाद्यपदार्थ आणि नॉन-अल्कोहोलिक पेये वितरित करण्यासंबंधाने १२ शिफारशींचा एक ठराव संमत केला होता. त्यानुसार संपृक्त चरबी (सॅच्युरेटेड फॅट्स), ट्रान्स फॅटी अॅसिडस्, साखरेचे तसेच मिठाचे अतिरिक्त प्रमाण असलेले पदार्थ मुलांसाठी बनवायला आणि त्याच्या जाहिराती करायला बंदी असावी असे सुचवले होते.  

''डब्ल्यूएचओ-युनिसेफ-लॅन्सेट  कमिशन''ने  २०२०मध्ये प्रसिध्द केलेल्या, जगभरातील ४०हून अधिक सर्वोत्तम बालरोग तज्ज्ञांच्या मतावर आधारित असलेल्या "जगातील मुलांचे भविष्य?" (अ फ्युचर फॉर द वर्ल्डस्‌ चिल्ड्रन?)  नावाच्या अहवालात, बालकांच्या आरोग्यासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी आरोग्यदृष्ट्या जोखमीच्या या सर्व नव्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. सद्यःस्थितीत तसेच भविष्यात मुलांचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी अनेक शिफारशीसुद्धा सुचवण्यात आल्या होत्या.  त्यानुसार...

 • जगातील सर्व देशांनी त्यांच्या नागरिकांमध्ये बालकांच्या हक्काबाबत जागृती निर्माण केली पाहिजे. 
 • फास्ट फूड, अतिरिक्त शर्करायुक्त पेये, मातेच्या दुधाऐवजी पर्याय म्हणून दिले जाणारे मिल्क सबस्टीट्युट्स, मद्य आणि तंबाखूयुक्त पदार्थ अशासारख्या बालकांना मोहविणाऱ्या आणि त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या खाद्यपदार्थांची निर्मिती, वितरण, जाहिराती आणि वापर रोखण्यासाठी कठोर कायदे आणि नियम बनवणे आवश्यक आहे.
 • बालकातील कुपोषण आणि स्थूलत्व या दोन्ही बाबतीत नियमित वैद्यकीय तपासण्या करून त्याची प्रतिबंधक उपाययोजना केले जावी. 
 • सार्वजनिक क्षेत्रातील प्रत्येक विभागाचा समावेश असणारे, बालआरोग्याला प्राधान्य देणारे नवे धोरण देशपातळीवर विकसित करावे.
 • अपघात, हिंसाचार, मुलांचे लैंगिक शोषण रोखण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
 • सोशल मीडिया, मोबाईल, व्हिडीओ गेम्स आणि अन्य माध्यमातून मुलांवर होणाऱ्या परिणामाबाबत जागृती केली जावी. 
 • सर्व सांसर्गिक आजारांचे लसीकरण राष्ट्रीय स्वरूपावर मोठ्या प्रमाणात होऊन एकूण एक बालकाचे पूर्ण लसीकरण योग्य त्या वेळेत व्हायला हवे. 
 • मुलांच्या शारीरिक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्याबाबत विशेष 
 • धोरण आखून त्याची अंमलबजावणी व्हावी.
 • बालविकासाची धोरणे आणि कार्यक्रम आखण्यासाठी आवश्यक असलेल्या नोंदी, पुरावे शोधून ते कार्यान्वित करावे. 
 • देशातील बाल-आरोग्य  कार्यक्रमांना  सर्व प्रकारचे तांत्रिक साहाय्य दिले जावे.
 • आरोग्य संघटनेच्या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीचे वेळोवेळी परीक्षण करून या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या संस्थांनी केलेल्या कामाची नोंद करत जाणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या