अमली पदार्थांची व्यसने आणि व्यसनमुक्ती

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 13 डिसेंबर 2021

आरोग्य संपदा

जगभरातल्या असंख्य संशोधकांनी व्यसनी व्यक्तींच्या मेंदूच्या एमआरआय चाचण्या करून त्यांच्या मेंदूच्या महत्त्वाच्या भागांमध्ये झालेले अनेक बदल सिद्ध केले आहेत. यामध्ये मेंदूतले निर्णय घेणारे केंद्र, तारतम्य ठेवून चांगले वाईट ठरवणारे केंद्र, वर्तनावर नियंत्रण ठेवणारे केंद्र यांच्या कार्यावर दुष्परिणाम झालेले आढळले. 

आजच्या जीवनशैलीत निरनिराळी व्यसने आणि अहितकारक सवयी अंगभूत होऊन बसली आहेत. पण सवयी आणि व्यसने या दोन संकल्पनांमध्ये नेहमीच गल्लत केली जाते. सवयींचे दोन प्रकार असतात. काही सवयी चांगल्या असतात आणि काही साहजिकच वाईट. उदाहरणार्थ,  सकाळी लवकर उठणे ही चांगली सवय मानली जाते, तर जागरणे करत उशिरा झोपण्याची सवय अर्थातच वाईट मानली जाते. पण जागरण हे व्यसन मानले जात नाही. दुसरे उदाहरण पाहू. आरोग्यदृष्ट्या शरीराला रोज तीन लिटर द्रव पदार्थांची आवश्यकता असते. त्यामुळे रोज भरपूर पाणी पिणे ही चांगली सवय मानली जाते. पण त्याचवेळी चहा, कॉफी, कोलापेये, एनर्जी पेये, मद्य या गोष्टी द्रव पदार्थ म्हणून जास्त प्रमाणात रोज घेत राहणे ही वाईट सवय मानली जाते.     

वैद्यकीयदृष्ट्या व्यसन हा एक मानसिक आजारच असतो. त्यात अमली पदार्थांच्या सेवनाची किंवा ते वापरण्याची सवय हा आणखी एक गंभीर भाग असतो. मानसरोगशास्त्रात अमली पदार्थांच्या वापराला ‘सबस्टन्स यूज डिसऑर्डर’ (एसयूडी) म्हणतात. जेव्हा- 

 • अमली पदार्थाच्या सेवनाची आणि वापराची वारंवारता असते. 
 • हानिकारक परिणाम माहिती असूनही या पदार्थाचा अनियंत्रित वापर केला जातो.
 • एखाद्या व्यक्तीचे सारे लक्ष त्या पदार्थांच्या वापरावर केंद्रित झालेले असते. 
 • या पदार्थांच्या सेवनाने केवळ आरोग्याबाबतच नव्हे, तर कौटुंबिक आणि सामाजिक जीवनामध्येही समस्या निर्माण होतायत हे लक्षात येऊनही, त्या पदार्थांचा वापर सातत्याने होत राहतो. 
 • या सवयींमुळे दैनंदिन जीवनातील कार्यक्षमता बिघडते, त्यांच्या व्यावसायिक जीवनातील कौशल्ये लयाला जाऊ लागतात. अशा पातळीवर गेलेल्या सबस्टन्स यूज डिसऑर्डरचे रूपांतर पक्क्या व्यसनात (अॅडिक्शन) होत असते. मद्यप्राशन आणि मादक पदार्थांचे सेवन हे जगभरात 'टाळता येण्याजोगे आजार' मानले जातात. आज व्यसने ही अकाली मृत्यूचे प्रमुख कारण ठरू पाहतायत. माणसाच्या आयुष्याला विळखा घालणाऱ्या व्यसनांमध्ये काही ‘पदार्थ’ जास्त घातक मानले जातात. यात..

मद्य

 • गांजा
 • पीसीपी, एलएसडी आणि इतर आभास किंवा दृष्टिभ्रम निर्माण करणारे पदार्थ (हॅलुसिनोजेन्स)
 • इनहेलंट्स, उदा., पेंट थिनर, गोंद (ग्लू)
 • अफूजन्य वेदनाशामके उदा. कोडीन,ऑक्सीकोडोन, हेरॉइन
 • झोपेची औषधे (सेडेटिव्हज), गुंगी आणणारी औषधे (हिप्नोटिक्स), चिंताशामक औषधे (ट्रँक्विलायझर्स)
 • कोकेन, मेथअॅम्फेटामाइन आणि तत्सम उत्तेजक द्रव्ये
 • तंबाखू 

नशील्या पदार्थांव्यतिरिक्त जुगारासारख्या गोष्टींचे व्यसनही वर्तणुकीतले व्यसन मानले जाते. नशील्या पदार्थांचा वापर आणि वर्तणुकीशी संबंधित व्यसनाधीन लोकांना त्यांच्या समस्यांची जाणीव असते, परंतु इच्छा असूनही आणि प्रयत्न करूनही त्यांच्या या व्यसनांना पूर्णविराम ते देऊ शकत नाहीत.

अशा प्रकारच्या पदार्थांचे व्यसन लागल्यावर त्या व्यक्तींची विचार करण्याची पद्धत विकृत होऊ लागते. व्यसनांची व्याप्ती आणि कालावधी जसजसा वाढत जाऊ लागतो, तसतसा त्यांच्या मेंदूच्या रचनेत आणि कार्यामध्ये होणारे बदल होतात. परिणामतः त्यांच्या वागणुकीत आणि व्यक्तिमत्त्वात असाधारण बदल होऊ लागतात. त्यांच्या शारीरिक हालचाली बदलतात, चांगल्या वाईटाबाबतची मते बदलतात, आणि मुख्य म्हणजे ते व्यसन सतत करण्याची तीव्र भावना (क्रेव्हिंग) निर्माण होते.

या पदार्थांच्या वापराने या व्यक्तींना नशा येते. नशेमध्ये विविध प्रकारच्या भावना जागृत होतात. यामध्ये खुशी, सुख, आनंद,  उत्साह अमर्याद जाणवतात. मानसिक शांतता मिळतेय असे वाटते, कोणत्याही गोष्टीची आकलनशक्ती, समज वाढली आहे असे वाटू लागते आणि काही अनाकलनीय संवेदना जाणवू लागतात.  वेगवेगळ्या नशील्या पदार्थांमुळे येणाऱ्या नशेची लक्षणे साहजिकच वेगळी असतात. या सर्व भावना आणि अनुभूती अमली पदार्थांचा मेंदूवर झालेल्या परिणामांमुळे जाणवतात. नशा संपली की या भावनांची अनुभूती संपते, पण नशील्या पदार्थांमुळे मेंदूमध्ये होणारे बदल टिकतात आणि वाढत राहतात. हळूहळू ते पदार्थ नेहमीच्या प्रमाणात घेतल्यावर येणारी अनुभूती कमी होते. याला वैद्यकीय भाषेत टॉलरन्स म्हणतात. असा टॉलरन्स आलेली व्यक्ती, या भावनांची पुनरुक्ती व्हावी म्हणून ते पदार्थ जास्त प्रमाणात आणि जास्त काळ घेत राहतात. साहजिकच काही काळाने मेंदूच्या रचनेत आणि कार्यात झालेले बदल दृश्य स्वरूपात येऊ लागतात.     

जगभरातल्या असंख्य संशोधकांनी व्यसनी व्यक्तींच्या मेंदूच्या एमआरआय चाचण्या करून त्यांच्या मेंदूच्या महत्त्वाच्या भागांमध्ये झालेले अनेक बदल सिद्ध केले आहेत. यामध्ये मेंदूतले निर्णय घेणारे केंद्र, तारतम्य ठेवून चांगले वाईट ठरवणारे केंद्र, वर्तनावर नियंत्रण ठेवणारे केंद्र यांच्या कार्यावर दुष्परिणाम झालेले आढळले. त्याचप्रमाणे नव्या गोष्टी आणि कौशल्ये शिकण्याचे केंद्र तसेच स्मृतीकेंद्र यांच्या कार्यातही बिघाड झालेले आढळले.

अमली पदार्थ घेण्याची कारणे

 • फील गुड - आनंदाच्या ऊर्मी येण्याची भावना, छान वाटणे, 
 • फील बेटर- सततच्या तणावामधून काही काळ बरे वाटणे, तणाव कमी करणे,  समस्या, दुःखे विसरणे, सुन्न बधीर होऊन जाणे
 • डू बेटर- आपली कार्यक्षमता सुधारणे, समाजापुढील आपले सादरीकरण अधिक चांगले करणे, विचार सुधारणे, नवनव्या कल्पना सुचणे
 • कुतूहल आणि समवयस्कांचा दबाव, करून बघू काय होतंय असा प्रयोगशील विचार.

लक्षणे

 • नशील्या पदार्थांच्या वापरामुळे होणाऱ्या आजारांच्या लक्षणांचे चार प्रकार आहेत. 
 • स्वतःवर ताबा नसणे ः  ज्या पदार्थाचे व्यसन आहे ते करण्याची तीव्र ऊर्मी आल्यावर, ऊर्मीवर नियंत्रण करण्याची त्यांची इच्छा नसते. अशा ऊर्मीवर ताबा मिळवून व्यसनापासून दूर होण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरतात.
 • सामाजिक समस्या : व्यसनांमुळे शाळा, कॉलेज, घर किंवा व्यवसाय, धंदा, नोकरी अशा ठिकाणी महत्त्वाची किंवा खूप जबाबदारीची मोठी कामे करण्यात अपयश येते. या व्यक्ती व्यसनासाठी सामाजिक सोहळे, कौटुंबिक समारंभ चुकवत राहतात. विश्रांती घेण्याच्या आणि झोपेच्या कालावधीचा वापरही व्यसनांसाठी केला जातो.  
 • धोकादायक परिस्थितीमध्येही व्यसनांचा वापर केला जातो. त्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जाते. यामध्ये समाजविरोधी कृत्ये, हिंसक कारवाया, अनैतिक आणि अवैध कामे यांचा समावेश होतो. अमली पदार्थांच्या नशेमुळे एखादेवेळी आत्महत्या घडू शकते.
 • व्यसनांसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे प्रमाण खूप वाढते. पदार्थ न मिळाल्यास व्यसनाच्या माघारीची तीव्र लक्षणे (विद्ड्रॉअल सिम्प्टम्) दिसू लागतात. ही लक्षणे त्या त्या पदार्थानुसार वेगवेगळी असतात.
 • अनेक व्यसनी व्यक्तींमध्ये इतर प्रकारचे मानसिक आजार निर्माण होऊन व्यसने वाढतात आणि ते मानसिक विकारही बळावतात. काही व्यक्ती पक्क्या व्यसनाधीन होण्याआधीच त्यांना अन्य मानसिक विकार जडू शकतात. 

व्यसनाधीनतेवर उपचार
व्यसनाधीनतेच्या विकारांवर प्रभावी उपचार करता येतात. यामध्ये रुग्णाने आपली समस्या ओळखणे आणि व्यसन सोडण्याची इच्छा दाखवणे ही पहिली पायरी असते. मात्र एखाद्या व्यक्तीला व्यसनामुळे त्याला होणाऱ्या त्रासांची जाणीव नसली तर व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेस विलंब होऊ शकतो. बहुतेकदा मित्र किंवा कुटुंबीय जबरदस्ती करून व्यसन सोडण्यासाठी उपचार करायला लावतात. पण जेव्हा व्यसनी व्यक्ती स्वतःहून व्यसन सोडायच्या उपचारांसाठी पुढाकार घेते तेव्हा व्यसनमुक्त होण्याची शक्यता अधिक असते. 

व्यसनी व्यक्तीच्या लक्षणांचे डॉक्टरांकडून मोजमाप केले जाते. ही लक्षणे सौम्य, मध्यम किंवा तीव्र असली तरी त्यावर यशस्वी उपचार करता येतात. परंतु व्यसन सोडण्यासाठी ज्यांच्यावर सहज उपचार करता येतील अशा व्यक्तींना, दुर्दैवाने योग्य ते वैद्यकीय साहाय्य आपल्या देशात वेळेवर मिळत नाही.

व्यसनी व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक घटकांवर व्यसनांचे दुर्धर परिणाम झालेले असतात. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करताना विविध प्रकारे उपचारपद्धती वापराव्या लागतात. मुख्यत्वे औषधोपचार, वैयक्तिक समुपदेशन आणि ग्रुप थेरपी या तिन्ही गोष्टींचा वापर उपचारात संमिश्र पद्धतीने व्हावा लागतो. व्यसनी व्यक्तीची विशिष्ट परिस्थिती आणि त्याला असलेल्या वैद्यकीय, मानसिक आणि सामाजिक सहव्याधींमधील समस्यांचे निराकरण करणारी उपचार पद्धती व्यसनमुक्ती करण्यात अधिक यशस्वी ठरते.

व्यसन पुनःपुन्हा करण्याची ऊर्मी, व्यसन काही काळ सोडल्यावर निर्माण होणारी विद्ड्रॉअल लक्षणे नियंत्रित करण्यासाठी आणि व्यसन पुन्हा लागू नये म्हणून औषधांचा उपयोग होतो. तर मानसोपचारांचा उपयोग रुग्णाला त्याचे वर्तन सुधारण्यास, त्याला व्यसन सोडण्याची प्रेरणा आणि उत्तेजन देण्यास तसेच त्याच्यातील आत्मविश्‍वास जागृत करण्यास उपयुक्त ठरते. या तिन्ही उपचारांनी रुग्णाला ताणतणावांवर आणि त्याच्या इतर मानसिक विकारांवर नियंत्रण मिळवण्यात यश येते.

 • प्रत्येक व्यक्तीचा व्यसनमुक्तीचा आराखडा वेगवेगळा असू शकतो. त्या त्या व्यक्तीच्या समस्या आणि गरजा यासाठी विविध प्रकारच्या योजनांचा विचार केला जातो. 
 • विद्ड्रॉअल लक्षणांच्या वैद्यकीय नियोजनासाठी (डिटॉक्सिफिकेशन) रुग्णालयात दाखल करणे.
 • व्यसनासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची उपलब्धता अजिबात नसणारी, व्यसनमुक्तीच्या तत्त्वांबाबत कडक नियंत्रण असणारी, गोंगाट आणि गजबजाटापासून दूर असणारी शांत अशी व्यसनमुक्ती पूर्णपणे उपचारात्मक समुदाय (अत्यंत नियंत्रित, औषधमुक्त वातावरण) किंवा शांत घरे
 • काही रुग्णांना उपचार केंद्राच्या किंवा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात औषधे देणे आणि मानसोपचार करणे
 • इमर्जन्सी (तातडिक) बाह्यरुग्ण उपचार
 • घरीच राहून निवासी उपचारांनी केले जाणारे पुनर्वसन
 • अनेक व्यसनी व्यक्तींना काही स्वयंसेवी मदतगटांचा उपयोग होतो. उदा.अल्कोहोलिक अॅनॉनिमस, नार्कोटिक्स अॅनॉनिमस, स्मार्ट रिकव्हरी इत्यादी.
 • स्वयं-मदत गट, ज्यात कुटुंबातील सदस्यांचा समावेश होतो. अल-अनॉन किंवा नार-अनॉन कौटुंबिक गट

धूम्रपान, मद्यपान आणि अंमली पदार्थांचा वापर हा जगभरातल्या मृत्यूंमध्ये एक महत्त्वाचा जोखीम घटक आहे. यामुळे आज जगभरात दरवर्षी सव्वा कोटी मृत्यू घडतात. दरवर्षी साडेतीन लाखांपेक्षा जास्त लोक अमली पदार्थ आणि मद्यपानातील ओव्हरडोसमुळे दगावतात. यातील निम्म्याहून अधिक लोक ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. अमली पदार्थांचा वापर स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतो. जगातील विविध आजारांच्या संख्येमधील दीड टक्के रुग्ण अमली पदार्थांच्या व्यसन व्याधीने ग्रस्त आहेत. काही देशात हे प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत आहे. समाज संपूर्ण निरामय होण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य हे आरोग्याचे तिन्ही घटक सुधारणे आवश्यक असते. व्यसनाधीनतेच्या आजारात या तिन्ही गोष्टी बाधित होतात. त्यामुळे आरोग्यसंपन्न समाजाच्या निर्मितीसाठी व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करणे ही काळाची नितांत गरज आहे.

संबंधित बातम्या