एड्सची आव्हाने

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 20 डिसेंबर 2021

आरोग्य संपदा

एचआयव्ही-एड्सच्या संसर्गाचा यशस्वीरीत्या प्रतिबंध करणारी कोणतीही लस आजतागायत उपलब्ध झालेली नाही. जगभरातले वैज्ञानिक गेली चाळीस वर्षे एड्सची लस विकसित करण्यासाठी अथक संशोधन करत आहेत.

एचआयव्ही-एड्स हा एक संसर्गजन्य आणि प्राणगंभीर विषाणूजन्य आजार आहे. १९८३च्या सुमारास आफ्रिकेमधील देशांतून जगात पसरू लागलेल्या या आजारामुळे जगात सुमारे चार कोटी रुग्ण बाधित आहेत. यातल्या सहा टक्के व्यक्ती भारतीय आहेत.  एचआयव्ही-एड्सची भारतातील आकडेवारी पाहता, २०२० मध्ये एकूण २४ लाख रुग्ण एचआयव्हीग्रस्त होते. राज्य पातळीवर महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ३.९८ लाख रुग्ण आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेश (३.१४ लाख), कर्नाटक (२.६९ लाख), या राज्यांचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेश (१.६१), तेलंगणा (१.५८), तमिळनाडू (१.५५), बिहार (१.३४), तर गुजरातमध्ये एचआयव्हीचे १.०४ लाख रुग्ण आहेत. पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, ओडिशा आणि हरयाणा या राज्यात एकुणातले १८ टक्के रुग्ण आहेत. मणिपूर, मिझोराम आणि नागालँड या ईशान्येकडील राज्यांमध्येही अमली पदार्थांच्या वापरामुळे एचआयव्हीचे रुग्ण जास्त आढळून येत आहेत.     

एड्स आणि कोरोना
कोरोनाप्रमाणे एचआयव्हीदेखील एक विषाणू आहे. या दोन्ही आजारांच्या साथीत आजवर कोट्यवधी लोक बाधित झाले. प्रतिबंधक उपाय आणि लशीद्वारे कोरोना नियंत्रित होतोय, पण एड्सचे रुग्ण कमी होत नाही येत. 

एड्सबाबत विख्यात भारतीय संशोधक डॉ. रमण गंगाखेडकर म्हणतात, ‘कोरोना महामारीपूर्वी ९०-९०-९० उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने आम्ही मार्गस्थ होतो. महाराष्ट्रातील 'एनएमपी प्लस' सारख्या एचआयव्ही संसर्गासह जगणाऱ्या लोकांच्या संघटना आणि बऱ्याच सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांमुळे लॉकडाउनच्या काळातही अँटीरेट्रोव्हायरल औषधांचा अखंड पुरवठा होत राहिला. नॅकोनेदेखील आपल्या धोरणात बदल करून रुग्णांना दीर्घ कालावधीसाठी औषधे दिली. एचआयव्ही चाचण्यांची संख्या कोरोनाच्या काळात घटली, परंतु या कालावधीत एचआयव्हीची जोखीम कमी झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०३०पर्यंत एचआयव्हीच्या निर्मूलनाच्या उद्दिष्टांसाठी वचनबद्ध असल्याने नॅको सध्या याबाबतच्या समस्यांचे मूल्यांकन करत आहे.’

भारतातील एचआयव्ही-एड्सचा इतिहास तीन टप्प्यांमध्ये विभागला जातो -१९८६-१९९२, १९९३-१९९७ आणि १९९८ते आजपर्यंत. १९९३-९७ आणि १९९८-२००० सालापर्यंत एड्ससंबंधी कार्यक्रम प्रामुख्याने उच्च जोखीम असलेल्यांवर केंद्रित होता. यामध्ये सेक्स वर्कर्स, ट्रक ड्रायव्हर, इंजेक्शनद्वारे अमली पदार्थ वापरणारे आणि काही आजारांसाठी सातत्याने रक्त घ्यावे लागणाऱ्या व्यक्ती अंतर्भूत असत.

उपचार
गेली चाळीस वर्षे एचआयव्ही-एड्सवर अथक संशोधन होत असूनही एचआयव्हीच्या विषाणूला समूळ नष्ट करणारे कोणतेही औषध आजवर उपलब्ध झालेले नाही. त्याचप्रमाणे त्याच्या संसर्गाचा यशस्वीरीत्या प्रतिबंध करणारी कोणतीही लसदेखील आजतागायत उपलब्ध झालेली नाही. जगभरातले वैज्ञानिक एड्सची लस विकसित करण्यासाठी संशोधन करत आहेत.

सध्याचे उपचार : एचआयव्हीच्या उपचारात रोगनिदान चाचण्या, समुपदेशन, एचआयव्ही अवस्थेतला रुग्ण एड्सच्या स्थितीमध्ये जातोय का, हे पाहण्यासाठी व्हायरल लोड आणि सीडी-४, सीडी-८ काउंट्स, इतर आजारांसाठी रक्ताच्या चाचण्या, सिटीस्कॅन वगैरे तपासण्या केल्या जातात. रुग्ण नुकताच पॉझिटिव्ह झाला असेल, पण सीडी-४ आणि व्हायरल लोड ठीक असेल, तर रुग्णाला विशेष उपचारांची गरज नसते. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि जीवनामधले अध्यात्माचे महत्त्व सांगावे लागते. समुपदेशनामध्ये रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीयांमध्ये सकारात्मकता निर्माण करणे गरजेचे असते. एआरटी औषधे देत असताना औषधांचे दुष्परिणाम, इतर औषधांबरोबर होणाऱ्या इंटरॅक्शन, औषधांमुळे उत्पन्न होणारे रेझिस्टन्स अशा गोष्टींबाबत समुपदेशन गरजेचे असते.

‘‘चार दशकांतल्या संशोधनातून, एचआयव्ही-एड्सची व्याख्या स्पष्ट झाली. या विषाणूची जीवनपरिक्रमा पूर्ण समजली. त्यामुळे उपचारासाठी अँटीरेट्रोव्हायरल थेरपी संशोधिली गेली आणि सुमारे ३० प्रकारची औषधे आज जगभरात उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे आजार संपूर्णपणे बरा होत नसला तरी हे उपचार घेणारे रुग्ण त्याचे आयुष्य दीर्घकाळापर्यंत सहज जगू शकतात,’’ असे डॉ. गंगाखेडकर नमूद करतात.

एआरटी उपचार पद्धतीमधील औषधांचे प्रकार

 • एनआरटीआय- (न्युक्लिओसाईड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनहिबिटर्स): अॅबॅकाव्हिर, एम्ट्रीसिटाबिन, लॅमिव्ह्युडीन, टेनोफोव्हिर डी एफ, झिडोव्ह्युडिन
 • एनएनआरटीआय : (नॉनन्युक्लिओसाईड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनव्हिबिटर्स): डॉराव्हिरिन, एफाव्हिरेन्झ, एट्राव्हिरिन, नेव्हिरॅपिन, रिल्पिव्हिरिन
 • पीआय- (प्रोटीएझ इनहिबिटर्स): अॅटाझिनाव्हिर, डॅरुनाव्हिर,फोजॅम्प्रीनव्हिर, रिटोनाव्हिर, सॅक्विनाव्हिर, ट्रिपॅनाव्हिर, एन्फूव्हिरिटाईड, मॅराव्हिरॉक
 • इन्टिग्रेझ स्ट्रॅन्ड ट्रान्स्फर इनहिबिटर्स, (आयएनएसटीआयएस) : कॅबोटेग्राव्हिर, डोल्यूटेग्राव्हिर, रॅलटेग्राव्हिर
 •  अॅटॅचमेंट इनहिबिटर्स : फॉसटेम्साव्हिर
 • पोस्ट अॅटॅचमेंट इनहिबिटर्स : इबॅलिझुमाब
 • फार्मोकायनेटिक एनहान्सर्स : कोबिसिस्टॅट, अॅबॅकाव्हिर आणि लामिव्ह्युडिन कॉम्बिनेशन; अॅबॅकाव्हिर, डोल्युटेगराव्हिर व लामिव्ह्युडिन कॉम्बिनेशन; अॅबॅकाव्हिर, लामिव्ह्युडिन आणि झिडोव्ह्युडिन; अॅटॅझानाव्हिर अॅण्ड कोबिसीस्टॅट अशी अनेक एकत्रित दिली जाणारी औषधे.
 • हे उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावे लागतात. यातील काही औषधे शासकीय एआरटी केंद्रातदेखील उपलब्ध असतात. असे उपचार शास्त्रोक्त पद्धतीने योग्य मात्रेमध्ये दीर्घकाळ घेतल्यास 
 • रुग्णाच्या शरीरामधील विषाणूंची संख्या कमालीची घटते. 
 • प्रतिकारशक्ती (सीडी-४ काउंट) वाढवण्यास मदत होते, 
 • संधिसाधू आजार लवकर उद्‌भवत नाहीत. 
 • वारंवार दवाखान्यात जाण्याची गरज पडत नाही, 
 • पैशाची बचत होते
 • आयुर्मर्यादा वाढते. 

डॉ. गंगाखेडकर यांच्या मते, ‘भारतामध्ये डोल्युटेग्रेव्हीर आधारित उपचारांचा समावेश केल्याने अँटीरेट्रोव्हायरल थेरपी दीर्घकाळ टिकणारी आणि प्रभावशाली बनली आहे. दीर्घकाळ कार्यरत राहणारी अँटीरेट्रोव्हायरल औषधे वापरून दररोजच्या गोळ्यांची संख्या कमी करण्यासाठी आखलेल्या नवीन पद्धतींवरील संशोधन मननीय आहे. नवनवीन अहवालांमुळे एचआयव्ही उपचार संशोधनाला उत्तम चालना मिळाली आहे. एचआयव्ही बाधित व्यक्तींनी त्यांची अँटीरेट्रोव्हायरल औषधे नियमितपणे घेतल्यास, हा आजार पूर्ण बरा करणारे उपचार झाल्यावर ते पूर्ण रोगमुक्त होऊ शकतील.’

एचआयव्ही प्रतिबंधक लस
कोणतीही लस संसर्ग किंवा आजारापासून संरक्षण देण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजित करते. आज जगभरातील संशोधन संस्थांमार्फत अनेक प्रकारच्या एचआयव्ही विरोधी लशी विकसित केल्या जात असून त्या क्लिनिकल चाचणीच्या विविध टप्प्यात आहेत. परंतु सध्या तरी त्यापैकी कोणतीही लस एचआयव्हीची बाधा रोखण्यासाठी प्रभावी सिद्ध झालेली नाही.

सुरक्षित, अत्यंत प्रभावी आणि प्रवेश करण्यायोग्य प्रतिबंधात्मक एचआयव्ही लशीची उपलब्धता ही इतर प्रतिबंधात्मक हस्तक्षेपांमध्ये पूरक ठरतील आणि त्यामुळे एचआयव्हीच्या प्रसाराची साखळी रोखण्यास महत्त्वपूर्ण योगदान मिळेल. कोणत्याही जागतिक महासाथीमध्ये केवळ प्रतिबंधात्मक उपाय आजार रोखण्यास उपयुक्त ठरत नाहीत, पण लसीकरण मात्र सर्व जनतेपर्यंत पोचून रोगनियंत्रण करू शकते. अँटीट्रेट्रोव्हायरल थेरपींसारख्या महागड्या उपचारांची किंमत कमी होऊ शकते आणि त्यांची दीर्घकालीन परिणामकारकता वाढू शकते. 

एचआयव्ही लशीच्या संशोधनातील सद्यःस्थिती
जगभरात १९८७ पासून सुमारे ६० लशीच्या फेज-१ आणि फेज-२ ट्रायल्स झाल्या आहेत. यात १० हजारांहून अधिक निरोगी स्वयंसेवकांचा समावेश आहे. यापैकी बहुतेक चाचण्या अमेरिकेत आणि युरोपातील प्रगत देशांमध्ये सुरू आहेत. परंतु ब्राझील, चीन, क्यूबा, हैती, केनिया, पेरू, थायलंड, त्रिनिदाद आणि युगांडासारख्या विकसनशील देशांमध्येही अशा चाचण्या घेतल्या जात आहेत. यातील अनेक लशी परिणामकारक आणि सुरक्षित ठरू शकतील अशी संशोधकांना आशा आहे. 

लशींचे संशोधन खर्चिक
औद्योगिक देशांमधील उद्योग आणि संशोधन संस्थांसह एचआयव्ही लशीवरील संशोधनासाठी दरसाली अंदाजे सुमारे ५० कोटी डॉलर्स गुंतवणूक करतात. अनेक लशींचे उत्पादन एकाचवेळी विकसित करण्यासाठी ही गुंतवणूक खूप अपुरी आहे. विकसनशील देशांमध्ये चाचण्या घेण्यासाठी क्षमता निर्माण करण्यासाठी या लशींमधील गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे. 

डॉ. गंगाखेडकरांच्या शब्दात सांगायचे झाले तर, ‘गेल्या तीन दशकांमध्ये प्रभावी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक एचआयव्ही लस विकसित करण्याच्या प्रयत्नांमुळे लशीच्या नव्या प्लॅटफॉर्मचा शोध लागला.  कोविड लस वेगाने विकसित करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा प्रभावीपणे वापर करण्यात आला.  लोकांना आश्चर्य वाटते की कोविडची लस काही महिन्यांत विकसित झाली, पण एचआयव्ही जाणून घेतल्यानंतर चार दशके उलटूनही शास्त्रज्ञ प्रभावी एचआयव्ही लस का विकसित करू शकले नाहीत? आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे, की एचआयव्ही रोगप्रतिकारक प्रतिक्रिया वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या पेशींना संक्रमित करते. हे विषाणू बाधित व्यक्तीच्या जनुकांमध्ये त्वरित मिसळून जातात.  शरीरात या विषाणूंचा एक छोटासा गट शरीरातील विविध ठिकाणी लपून राहतो आणि त्या रुग्णाचा आजार दिसून येत नाही. या व्यतिरिक्त, एचआयव्हीचा विषाणू कोरोना विषाणूपेक्षा दुप्पट वेगाने उत्परिवर्तित होतो आणि त्यामुळे प्रभावी एचआयव्ही  लस तयार करणे अवघड होऊन बसते.  तथापि, कोरोना लशींचा शोध आणि एचआयव्ही विरुद्ध अँटिबॉडीजना व्यापकपणे निष्प्रभ करण्याच्या संशोधनांनी जगभरातील शास्त्रज्ञ प्रेरित झाले आहेत.  एम-आरएनए, अॅडिनोव्हायरस व्हेक्टर आणि ट्रायमेरिक प्रोटीनवर आधारित नवीन एचआयव्ही लस विकासाच्या आणि क्लिनिकल चाचण्यांच्या विविध टप्प्यात आहेत.  जरी या लशींच्या (एचव्हीटीएन ७०२)  चाचण्यांनी अपेक्षित परिणाम जरी दिला नाही, तरी नजीकच्या भविष्यात याबाबतीत निश्चितच यश मिळणार अशी आशा आहे.’

भविष्यातील वाटचाल
जगभरातील लाखो लोक एचआयव्हीसाठी प्रभावी उपचार घेत आहेत आणि त्याहीपेक्षा अधिक कार्यक्षम उपचार भविष्यात येऊ घातले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने एड्सची साथ संपविण्याची घोषणा केली आहे.

दीर्घकाल कार्य करणाऱ्या उपचार पद्धती विकसित करणे  हे आज एचआयव्ही उपचारांवरील एनआयएआयडी समर्थित संशोधनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

एचआयव्हीच्या भविष्यातील वाटचालीत प्रतिबंध, उपचार आणि रोगमुक्ती या गोष्टी महत्त्वाच्या राहतील. ‘भारताचा राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम हा जागतिक स्तरावर सर्वात किफायतशीर आणि यशस्वी कार्यक्रम म्हणून ओळखला जातो.  यात केवळ सरकारच्या सर्वसमावेशक आणि लवचिक कार्यनियोजनच नव्हे, तर या धोरण निर्मितीमागील सामाजिक सहभागदेखील प्रतिबिंबित होतो. आज जगामध्ये असलेली उपचारांची विषमता भारत सरकारने उत्तम प्रकारे दूर केली आहे, एड्सचा अंत करण्यासाठी आम्हाला या सर्व गोष्टी आणखी मजबूत करणे आवश्यक आहे,’ असे डॉ. गंगाखेडकर भारतातील एचआयव्ही उपचारांच्या भविष्याबाबत विश्वासाने सांगतात.

संबंधित बातम्या