मध्यमवयीन स्त्रियांच्या समस्या
आरोग्य संपदा
बालआयुष्याची सुरुवात रम्य समजली जाते. आयुष्याची अखेर नेहमी दुःखद समजली जाते. पण आयुष्याचा मध्य मात्र नियोजनबद्ध असणे गरजेचे असते, याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असते. स्त्रियांच्याच बाबतीत बोलायचे झाले, तर वयाची विशी उलटल्यानंतर पस्तिशी-चाळिशीपर्यंत असंख्य आरोग्यसमस्या स्त्रियांचे जीवन हैराण करून टाकतात. या आजारांबाबत आणि ते टाळण्याबाबत त्यांचे प्रबोधन करण्यात आजही आरोग्यव्यवस्था कमी पडते.
आज एकविसाव्या शतकातही घरातल्या जबाबदाऱ्या आणि नोकरी व्यवसायातील ताणतणाव, धावपळ यामुळे स्त्रियांना स्वतःकडे आणि स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला पुरेशी फुरसत मिळतच नाही. साहजिकच या साऱ्या तशा रोजच्या रोज घडणाऱ्या प्रसंगांचा तिच्या शरीरस्वास्थ्यावर परिणाम होऊन अनेक व्याधी तीस ते पंचेचाळीस वयाच्या स्त्रियांमध्ये दिसून येतात.
आहारातील त्रुटीजन्य विकार
अॅनिमिया
स्त्री शिकली, जबाबदारीच्या नोकऱ्या, हरतऱ्हेचे व्यवसाय, उद्योगधंदे करू लागली. पण सांसारिक जबाबदारीच्या वेसणीतून तिची सुटका पूर्णपणे झाली असे म्हणता येणार नाही. घर आणि नोकरीतल्या दुहेरी व्यापामध्ये अडकलेल्या स्त्रियांना आजही स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देता येत नाही. घरातली सकाळची कामे उरकून ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया असोत किंवा फक्त घर सांभाळणाऱ्या गृहिणी असोत, ८० टक्के भारतीय स्त्रिया सकाळची न्याहारी करत नाहीत. त्यात मुलांच्या शाळा-कॉलेजच्या आणि नवऱ्याच्या ऑफिसच्या वेळा सांभाळण्यात त्यांचे दुपारचे आणि रात्रीचे जेवणही यथातथाच असते. अधिकतम महिला चौरस आहारापेक्षा फक्त भात खाणेच पसंत करतात. स्वतःसाठी वेळ देता येत नसल्याने घरकामाचे कष्ट भरपूर होतात, पण व्यायामाचा मात्र अभावच असतो. त्यात भर म्हणजे मागील पिढीच्या संस्कारांमुळे चालत आलेली दर आठवड्यातले दोन-तीन उपवास, सांसारिक आयुष्यात अपरिहार्य असलेली बाळंतपणे, त्यानंतर बाळांचे स्तनपान, या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून या स्त्रियांत आढळणारा सर्वात महत्त्वाचा आजार म्हणजे अॅनिमिया किंवा अंगातील रक्ताचे प्रमाण कमी होणे.
एका आकडेवारीनुसार, ३२ टक्के भारतीय स्त्रियांचे हिमोग्लोबिन दहापेक्षा कमी असते, १५ टक्के स्त्रियांत ते सहा ते दहा असते आणि ३ टक्के स्त्रियांत ते सहापेक्षाही कमी असते. ही आकडेवारी सर्व सामाजिक आणि आर्थिक स्तराबाबत सारखीच आहे. यामुळे थोड्या कामानेसुद्धा थकवा येणे, दम लागणे, चेहरा निस्तेज दिसणे अशी लक्षणे दिसू लागतात. या स्त्रियांना पाळीच्या वेळेस अंगावरून कमी जाणे, पाळी अनियमित येणे असे त्रास तर होतातच; पण प्रसूती काळात जिवाला धोकादायक असे गंभीर त्रास होऊ शकतात. अशा मातांची बाळेसुद्धा कमी वजनाची निपजतात. भारतात गरोदर मातांचा आणि नवजात अर्भकांचा मृत्युदर खूप जास्त असण्याचे कारण, भारतीय स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात असणारा ‘अॅनिमिया’ हेच आहे.
काय खावे?
या वयातील सर्व स्त्रियांनी आपली आहाराची पद्धत बदलली पाहिजे. खाण्यात हिरव्या पालेभाज्या, कॉलीफ्लॉवर, सोयाबीन, वाटाणे, ओला हरभरा, नाचणी, बाजरी, गूळ, हळीव, काळे मनुके, खारीक अशा लोहयुक्त पदार्थांचा आणि कडधान्ये, सोयाबीन (अथवा शक्य असल्यास मांसाहार) अशा प्रथिनयुक्त आहारावर भर दिल्यास रक्तातील हिमोग्लोबिन वाढू शकते. अन्यथा नियमितपणे लोह, जीवनसत्वे आणि फॉलिक
अॅसिडच्या गोळ्या घेतल्यास हिमोग्लोबिन वाढू शकते.
अनेकांना वरकड खाणे, हॉटेलिंग, बर्गर-पिझ्झासारखे फास्ट फूड; भेळ, भेळपुरी, कच्छी दाबेली, वडापाव, सामोसे अशा जंक फूड्सचा शौक असतो. या गोष्टी शक्यतो टाळणे आवश्यक असते.
हाडांचा ठिसूळपणा
या वयातील स्त्रियांना रोज किमान एक-हजार मि.ग्रॅ. कॅल्शिअम आहारातून मिळणे आवश्यक असते. गर्भवती स्त्रियांना ते १५०० ते २००० मि.ग्रॅ. एवढे कॅल्शिअम लागते. पण आहाराकडे आणि शारीरिक व्यायामाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे जसे हिमोग्लोबिन कमी होते, तसेच कॅल्शिअमदेखील रोजच्या शारीरिक गरजेपेक्षा कमी मिळाल्याने या स्त्रियांची हाडे ठिसूळ होण्यास सुरुवात होते. भारतीय स्त्रियांच्या आहारात जेमतेम ५००-६०० मि.ग्रॅ. कॅल्शिअम असते.
कॅल्शिअमच्या जोडीने हाडांच्या मजबुतीसाठी ‘ड’ जीवनसत्त्व आवश्यक असते. खरेतर ते सूर्यप्रकाशातून सर्वात जास्त प्रमाणात मिळते; परंतु त्यासाठी सकाळी १० ते ११ यावेळेत सूर्यप्रकाश सर्वांगावरील त्वचेवर किमान अर्धा तास पडणे गरजेचे असते. सकाळच्या उन्हात खेळणाऱ्या मुलांना ते मिळू शकते. आजमितीला आपण पाहिले, तर बहुतांश भारतीय स्त्रियांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव जाणवतोच. साहजिकच ४० टक्के स्त्रियांमध्ये विशी-पंचविशीतच हाडे ठिसूळ व्हायला सुरुवात होते. त्यानंतर गरोदरावस्थेत पोटातील बाळाच्या वाढीमध्ये आणि बाळाला दिलेल्या स्तनपानामुळे आईच्या शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्व आणखीन कमी कमी होत जाते. साहजिकच भारतीय स्त्रीच्या आहारामधील ‘ड’ जीवनसत्त्वाचे महत्त्व अधोरेखित होत जाते.
शरीरातील हाडांमध्ये कॅल्शिअममुळे भक्कमपणा येत असतो. मात्र ‘ड’ जीवनसत्त्व आणि कॅल्शिअमच्या अभावाने हातापायांची हाडे दुखणे, सांधे दुखणे, स्नायूंमध्ये चमक भरणे, कंबर-पाठ, मान सतत दुखण्यासारखे त्रास होऊ लागतात. उतारवयात हाडातील कॅल्शिअम कमी झाल्यावर हाडांचा भक्कमपणा कमी होत जातो. याला ओस्टिओपेनिया म्हणतात. कॅल्शिअम खूपच कमी झाल्यास हाडे खूपच ठिसूळ होतात. याला ओस्टिओपोरोसिस म्हटले जाते. अशा स्थितीतल्या स्त्रियांच्या हाडांना थोडा जरी धक्का बसला तरी त्या हाडांचे फ्रॅक्चर होऊ शकते. बालपणापासून आहार आणि व्यायामाकडे लक्ष न दिल्यामुळे तोळामासा प्रकृती असलेल्या स्त्रियांमध्ये चाळिशीमध्ये ओस्टिओपोरोसिस मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
काय खावे?
रोजच्या आहारात नियमितपणे दूध, दही, पालक, राजमा, मशरूम्स, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, लसूण, केळी, संत्री यांचा समावेश असल्यास आणि मांसाहारी स्त्रियांनी अंडी व मटण यांचा प्रमाणबद्ध समावेश केल्यास कॅल्शिअम आणि ‘ड’ जीवनसत्त्व भरपूर मिळू शकते.
व्यायाम
समतोल आहाराबरोबर सपाटीवर भरभर चालणे, पळणे, जॉगिंग, पोहणे, सायकलिंग, सूर्यनमस्कार अशा शारीरिक व्यायामाने हाडे भक्कम तर होऊ लागतातच, पण हाडांचे विकारसुद्धा नियंत्रणात ठेवता येतात. ज्यांना शक्य आहे अशांनी जिममध्ये जाऊन व्यायाम करणे, योगाच्या प्रशिक्षित व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार योगासने करणे याही गोष्टींचा समावेश करावा. तरीही या जोडीला मध्यमवयीन स्त्रियांनी कॅल्शिअम आणि ‘ड’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या नियमितपणे आणि दीर्घकाळ घेतल्यास हा ठिसूळपणा या स्त्रियांच्या आयुष्यातील पुढील टप्प्यात म्हणजे रजोनिवृत्तीच्या काळात, कमी त्रासाचा होऊ शकतो.
स्त्रियांचे विशेष आजार
स्त्रियांच्या आयुष्यातल्या या महत्त्वाच्या टप्प्यात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांच्या बदलत्या पातळीमुळे सुमारे ४० टक्के स्त्रियांना अनेक विकार होतात. मात्र या विकारांच्या उपचारासाठी आणि ते टाळण्यासाठी तिने स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
- मासिक पाळीपूर्वीचा विकार : पाळी येण्यापूर्वी एक ते दोन आठवडे अनेक जणींना पोटात दुखणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, छाती आणि स्तनांमध्ये वेदना होणे, पोट साफ न होणे, हातापायांचे सांधे दुखणे, स्नायू दुखणे, चेहऱ्यावर मुरूम येणे, कधी खूप राग, कधी निराशा वाटणे, तर कधी अचानक आनंदित होणे असे सतत मूड बदलत जाणे असे अनेक त्रास तिला होत राहतात.
- मासिक पाळीचे विकार : अनियमित पाळीचा पॉलीसिस्टीक ओव्हेरियन डिसीज्, पाळीमध्ये अंगावरून खूप रक्तस्राव होण्याचा एन्डोमेट्रिओसिस, फायब्रॉइड्स यासारखे विकार, योनिमार्गातील जंतूसंसर्ग यामुळे होणारा त्रास या वयातल्या अनेक स्त्रियांना होत असतो.
- मूत्रमार्गाचे विकार : तरुण स्त्रियांमध्ये मूत्रमार्गात जंतूसंसर्ग होऊन जळजळ होणे, मूत्रमार्गातून रक्तस्राव होणे, मूत्रमार्गाला, मूत्राशयाला आणि मूत्रपिंडांना सूज येणे असे आजार होतात.
- गर्भाशयाचा किंवा स्तनांचा कर्करोग ः २००९मधील एका आकडेवारीनुसार भारतातील तरुण स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे. मॅमोग्राफी, पोटाची आणि स्तनांची सोनोग्राफी, पॅपस्मिअर अशा तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने दरवर्षी केल्यास हे आजार होण्यापूर्वी किंवा सुरुवातीच्या काळात लक्षात येऊन त्यामुळे नंतर होणारे प्राणघातक त्रास टाळता येतात.
मानसिक विकार
धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मानसिक विकारांचे प्रमाण आजच्या स्त्रियांत खूप जास्त आढळून येते. सतत होणारी चिडचिड, चिंता, नैराश्य, मानसिक अस्थिरता, एखाद्या साध्या गोष्टीचा खूप बाऊ करून घेणे, सतत मूड बदलता राहणे अशा अनेक व्याधी होत आहेत. यासाठी नियमित व्यायाम, मानसिक एकाग्रता आणि स्थैर्य येण्यासाठी ध्यान, चिंतन, मनन, मेडिटेशन, मनाच्या रिलॅक्सेशनसाठी असलेली काही तंत्रे अशा गोष्टी अवगत करून घेणे इष्ट ठरते. या काळातील आयुष्यात विशेष छंदांची जोपासना करणे, एखाद्या कलेचा पाठपुरावा करणे, मित्रमैत्रिणींसमवेत नियमितपणे भेटीगाठी करत राहणे, प्रवासाला जाणे, सामाजिक संस्थांत काही कामे करणे, अशा समाजाभिमुख सवयी जोपासल्यास आयुष्यातील ताणतणावांचे नियोजन होऊ शकते. साहजिकच तणावातून उद्भवणारे मानसिक विकार दूर ठेवता येतात.