कर्करोग टाळण्यासाठी सप्तप्रतिज्ञा...

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 17 जानेवारी 2022

आरोग्यभान

कर्करोग टाळण्यासाठी आरोग्य प्रबोधनाची नितांत गरज आहे. कर्करोगाबाबत जागतिक पातळीवर होत असणाऱ्या संशोधनांचा हवाला घ्यायचा, तर आजची बिघडलेली जीवनशैली कर्करोग होण्याची संभाव्यता वाढवताना दिसून येते. कर्करोग रोखण्यात स्वारस्य असणाऱ्या व्यक्तींनी या संशोधनसिद्ध सप्तप्रतिज्ञा जरूर पाळाव्यात. 

कोरोनाच्या जागतिक साथीमध्ये भारतात तब्बल साडेतीन कोटी नागरिक बाधित झाले आणि ४ लाख ८१ हजार मृत्युमुखी पडले. हा आकडा ऐकून कित्येकांच्या पोटात खड्डा पडेल. पण भारतीयांच्या एकुणातल्या मृत्यूच्या आकडेवारीचे विश्लेषण केले, तर संसर्गजन्य आजारांपेक्षा असंसर्गजन्य आजारांनी दगावणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. 

विविध आजारांचे मूल्यमापन केल्यावर असे लक्षात येते की ३७ टक्के नागरिक संसर्गजन्य आजाराने (कम्युनिकेबल डिसिजेस), तर ६३ टक्के असंसर्गजन्य आजारांनी (नॉन-कम्युनिकेबल डिसिजेस) दगावतात. या असांसर्गिक आजारांमध्ये कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, विविध अपघात, विषबाधा असे प्रकार येतात. पण या असांसर्गिक आजारांपैकी नऊ टक्के व्यक्ती कर्करोगाने दगावतात. आजमितीला भारतात दरवर्षी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त लोकांमध्ये कर्करोगाचे नव्याने निदान होते, दुर्दैवाने त्यातले साडेसात लाख लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात.  

या भयावह आकड्यांकडे नजर टाकली तर कर्करोग टाळण्यासाठी सर्वसाधारण जनतेमध्ये याबाबतच्या आरोग्य प्रबोधनाची नितांत गरज आहे. कर्करोगाबाबत जागतिक पातळीवर सातत्याने संशोधन होत असते. पण आजवरच्या असंख्य संशोधनांचा हवाला घेतला तर आजची बिघडलेली जीवनशैली कर्करोग होण्याची संभाव्यता वाढवताना दिसून येते. कर्करोग रोखण्यात स्वारस्य असणाऱ्या व्यक्तींनी या संशोधनसिद्ध सप्तप्रतिज्ञा जरूर पाळाव्यात.

तंबाखू आणि तंबाखूजन्य गोष्टी टाळेन

सिगारेट, विडी, हुक्का, चिलीम, सिगार, खाण्याची तंबाखू, गुटखा, पान मसाला अशा  कोणत्याही प्रकारातून तंबाखूचा वापर केल्याने कर्करोग उद्‌भवू शकतो.फुप्फुस, तोंड, घसा, स्वरयंत्र, स्वादुपिंड, मूत्राशय, गर्भाशयाचे मुख आणि मूत्रपिंड या महत्त्वाच्या अवयवांच्या कर्करोगासह धूम्रपान विविध प्रकारच्या कर्करोगांना कारणीभूत ठरते. तंबाखू चघळण्याचा संबंध तोंड, तोंडाच्या आतील पोकळी आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी जोडला गेला आहे.तंबाखूचा वापर अजिबात न करणाऱ्यांमध्येही इतरांनी सोडलेल्या धुराच्या संपर्कात आल्याने फुप्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. 

तंबाखू टाळणे, त्याचा वापर थांबवण्याचा निर्णय घेणे हे कर्करोग प्रतिबंधामध्ये खूप महत्त्वाचे ठरते. तंबाखू, सिगारेट, गुटखा कायमचा सोडण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करता येतात. 

सकस आहार घेईन

 • केवळ समतोल आणि पौष्टिक आहाराची प्रतिज्ञा करून चालणार नाही. दैनंदिन व्यवहारात किराणा, भुसार माल, भाजीपाला, फळे यांच्या खरेदीबाबत खूप चौकस राहणे आवश्यक असते. त्यामुळे या प्रतिज्ञेत खालील उपप्रतिज्ञा येतील.
 •     भरपूर फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेली धान्ये खाईन. धान्याबाबत होल ग्रेन्स, कडधान्यांचा मुबलक वापर करेन

 वजन आदर्श ठेवेन 

 • गोड आणि चरबीयुक्त आहार टाळेन ः उच्च-कॅलरीयुक्त पदार्थ, प्रक्रियायुक्त डबाबंद आणि पॅकबंद पदार्थ, कॅनमधील फळांचे रस, फळांच्या फोडी, प्राणिज पदार्थ, अतिगोड आणि चरबीयुक्त पदार्थ खाण्याचे टाळेन.  
 • अतिरेकी मद्यसेवन टाळेन ः  मद्यप्राशन मग ते नियमितपणे थोड्या प्रमाणात घेणे असो किंवा अधून मधून पण अतिरेकी प्रमाणात घेणे असो; मोठ्या आतड्याचा, फुप्फुसांचा, मूत्रपिंडाचा, यकृताचा तसेच स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका मद्यप्राशनामुळे वाढतो. 
 •  प्रक्रिया केलेले मांस खाणार नाही ः जागतिक आरोग्य संघटनेच्या, ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ या संशोधन समितीच्या अहवालातील निष्कर्षांनुसार प्रक्रिया केलेले मांस जास्त प्रमाणात खाल्ल्याने विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. 

स्त्रियांबाबत सांगायचे, तर ज्या स्त्रिया एक्स्ट्रा-व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि मिक्स्ड नट्स असलेले मेडीटेरेनियन डाएट घेतात त्यांना असणारा स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.  भूमध्यसागरीय आहार मुख्यतः फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य, शेंगा आणि काजू यांसारख्या वनस्पती-आधारित अन्नावर केंद्रित असतो.  या आहारात लाल मांसाऐवजी ऑलिव्ह ऑइल, ओव्हर बटर आणि मासे यासारखे निरोगी चरबीयुक्त पदार्थ वापरले जातात. 

सतत बसून राहणार नाही, शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहीन

निरोगी वजन राखल्याने स्तन, प्रोस्टेट, फुप्फुस, मोठे आतडे आणि मूत्रपिंडांच्या कर्करोगासह अनेक कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. शारीरिकदृष्ट्या सतत हालचाल करत राहणे, सतत बसणे टाळणे, वजन नियंत्रित ठेवणे  यामुळे स्तनाचा आणि आतड्याच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

सर्वसाधारणपणे प्रौढ स्त्री-पुरुषांनी- आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम एरोबिक व्यायाम (उदा. भरभर चालणे, जॉगिंग, सायकलिंग, पोहणे) करावे किंवा आठवड्यातून ७५ मिनिटे पळण्यासारखा जोरदार एरोबिक व्यायाम करावा याशिवाय दैनंदिन दिनचर्येत किमान ४०  मिनिटांच्या अतिरिक्त शारीरिक हालचालींचा समावेश करावा.

कडक उन्हामध्ये फिरणार नाही

त्वचेचा कर्करोग हा कर्करोगाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी आणि सर्वात टाळता येण्याजोगा असतो. गौरवर्णीय स्त्रीपुरुषांना याची झळ बसू शकते. यामध्ये

 • सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान उन्हात फिरू नये, विशेषतः उन्हाळ्यात हे पक्के लक्षात ठेवावे. 
 • घराबाहेर असताना शक्यतो सावलीत राहावे, डोक्यावर टोपी आणि डोळ्यांवर गॉगल्स वापरावेत. 
 • सर्वांग झाकणारे घट्ट विणीचे पण सैल फिटिंगचे सुती कपडे वापरावे. गडद रंगाचे कपडे टाळावेत. सफेद किंवा फिकट रंगाचे कपडे असावेत.
 • उन्हात जाताना सनस्क्रीन वापरेन ः किमान ३० एसपीएफ असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरावे.  सनस्क्रीन भरपूर प्रमाणात लावावे आणि दर दोन तासांनी पुन्हा वापरावे. 
 • प्रखर उजेडाचे दिवे घरात टाळेन ः  त्वचेसाठी नैसर्गिक सूर्यप्रकाशाइतकेच हे हानिकारक असतात.

आवश्यक त्या लशी जरूर घेईन

कर्करोगाच्या प्रतिबंधामध्ये काही विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण करणाऱ्या लशींचा समावेश होतो. यामध्ये -

 • हिपॅटायटीस बी ः हिपॅटायटीस बी या आजारामुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेले स्त्रीपुरुष, एकापेक्षा जास्त जणांशी लैंगिक संबंध असणारे स्त्रीपुरुष, वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, समलिंगी पुरुष, शिरेतून अमली औषधे घेणाऱ्या व्यक्ती, सार्वजनिक आरोग्यसेवा किंवा सार्वजनिक सुरक्षा कर्मचारी यांना ही लस घेणे आवश्यक ठरते.
 • ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लस (HPV) ः  एचपीव्ही हा लैंगिक संक्रमित विषाणू आहे त्याच्या संसर्गामुळे गर्भाशयाच्या मुखाचे आणि इतर जननेंद्रियाचे, तसेच डोके आणि मानेचे स्क्वॅमस सेल कर्करोग होऊ शकतात.  ही लस ११ ते १२ वयोगटासाठी आवश्यक असते.  अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने ९ ते ४५ वयोगटातील स्त्रीपुरुषांना ही लस देण्याची शिफारस केली आहे. 

रोगसंसर्गाबाबतीत धोकादायक ठरेल असे वर्तन टाळेन

 •  सुरक्षित लैंगिक संबंध ः लैंगिक भागीदारांची संख्या मर्यादित करणे आणि लैंगिक संबंधाच्यावेळी कंडोम वापरणे यामुळे कर्करोगांचा धोका टळू शकतो. जास्त लैंगिक भागीदार असणाऱ्या व्यक्तींना एचआयव्ही किंवा एचपीव्ही असे लैंगिक संबंधातून संक्रमित होणारे आजार होण्याची शक्यता असते. एचआयव्ही- एड्स असणाऱ्या व्यक्तींना गुद्द्वार, यकृत आणि फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो तर एचपीव्हीमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. समलिंगी आणि इतर प्रकारच्या लैंगिक संबंधांनी गुद्द्वार, पुरुषाचे जननेंद्रिय, घसा, योनी यांच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
 •  वापरलेल्या इंजेक्शनच्या सुया पुन्हा वापरणे ः शिरेतून अमली पदार्थ घेणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांच्या सुया शेअर केल्या जातात. त्यामुळे एचआयव्ही, हिपॅटायटीस बी आणि हिपॅटायटीस सी असे आजार होऊन यकृताच्या कर्करोगाची संभाव्यता अधिक असते.

नियमितपणे वैद्यकीय सल्ला घेईन 

त्वचा, मोठे आतडे, गर्भाशयाचे मुख, स्तन, फुप्फुसे, प्रोस्टेट तसेच तोंडाचा कर्करोग टाळण्यासाठी आणि असल्यास त्यांचे त्वरित निदान होण्यासाठी नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. स्तनांच्या कर्करोग टाळण्यासाठी स्व-तपासणी आणि स्क्रिनिंग आवश्यक असते. 

सर्व वयोगटात कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे. यासाठी प्रतिबंध हा उपचारांपेक्षा सोपा, कमी कष्टाचा आणि आरोग्य अबाधित राखायला उपयुक्त ठरतो.

संबंधित बातम्या