संसर्गजन्य रोग कसे टाळावेत?

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 24 जानेवारी 2022

आरोग्य संपदा

निरोगी व्यक्तीच्या शरीरातील सर्व संस्था, सर्व अवयव, सर्व ज्ञानेंद्रिये, मानसिक संतुलन ठीकठाक असते. सगळे कसे समतोल आणि आखीव रेखीव असल्यासारखे. यालाच आरोग्य म्हणतात. पण या आरोग्याची घडी विस्कटते आणि कुठेतरी काही तरी बिघडते, त्याला आपण आजार म्हणतो. 

शरीराच्या रचनेत किंवा कार्यात बदल घडवून आणणारे हे आजार अनेक प्रकारचे असतात. काही जन्मजात असतात, काही आजार शरीरातील चयापचय क्रिया बिघडल्याने होतात, तर काही रोगजंतू शरीरात प्रवेश करून एक किंवा अनेक शरीरसंस्थांना बाधित करतात. यांना संसर्गजन्य आजार (इन्फेक्शस डिसीज) म्हणतात. त्यातले अनेक आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होऊन जनसमुदायात पसरू शकतात. त्यामुळे हे आजार साथीचे आजार (कम्युनिकेबल डिसिजेस) ठरतात. हे आजार ठराविक रोगजंतूंमुळे होतात आणि त्यांची व्यवच्छेदक लक्षणे असतात

संसर्गजन्य आजार
सामान्यतः एखादा विषाणू, जिवाणू, जंत, बुरशीजन्य जीव किंवा त्यांच्यापासून निर्माण झालेले विषारी रसायन (टॉक्सिन) यांचा मानवी शरीरात प्रवेश झाल्यामुळे संसर्गजन्य आजार उद्भवतात. ह्या आजारांचा सामान्यतः हवेतून, पाण्यातून, अन्नातून, काही वाहकांद्वारे, स्पर्शातून, शारीरिक संबंधातून, रक्तातून समाजात फैलाव होत असतो. रोगप्रसाराची ही माध्यमे लक्षात घेतल्यास या आजारांपासून आपण आपला बचाव कसा करावा आणि रोगाच्या प्रसाराला आळा कसा घालावा हे समजू शकते.

हवेतून पसरणारे आजार
सध्या सगळ्या जगात फैलावलेला कोरोना, सर्दी, एन्फ्लूएन्झा, कांजिण्या, गालफुगी, गोवर, डांग्या खोकला, क्षयरोग, घटसर्प हे आजार हवेतून पसरतात. यामध्ये मुख्यत्वे आजारी व्यक्तीच्या खोकल्यातून, शिंकांतून आणि उच्छ्वासातून या आजाराचे रोगजंतू (विषाणू, जिवाणू) बाहेर पसरतात. ते द्रावाच्या स्वरूपात एखाद्या फवाऱ्यासारखे हवेत सहा फुटांपर्यंत सर्वत्र पसरतात. अशावेळी या रुग्णाच्या जवळ असलेल्या व्यक्तीच्या नाकावाटे घेतलेल्या श्वासातून त्याच्या शरीरात शिरतात आणि ही दुसरी व्यक्तीदेखील त्या आजाराने बाधित होते. त्यामुळे हे आजार होऊ नये म्हणून...

 • रोगाची सक्रिय लक्षणे असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क टाळा.
 • तुम्ही आजारी असाल तेव्हा घरीच रहा. इतर निरोगी व्यक्तींना तुमच्या जवळ येऊ देऊ नका.
 • जर तुम्ही इतरांच्या आसपास असाल तर, जंतूंचा प्रसार रोखण्यासाठी फेस मास्क घाला.
 • खोकताना किंवा शिंकताना तोंड झाका. तुमच्या हातावर जंतू पसरण्याची शक्यता कमी करण्यासाठी टिश्यू किंवा आपल्या कोपराचा वापर करा.
 • आपले हात किमान २० सेकंद स्वच्छ धुवा. विशेषतः शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर हात धुणे आवश्यक असते.
 • न धुतलेल्या हातांनी तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा. 
 • हवेतून पसरणारे बरेच आजार त्या आजाराला प्रतिबंध करणारी लस घेतल्यावर टळू शकतात. तसे पाहिले तर कोरोनाच्या काळात आपण या सर्व गोष्टींवर भर दिलेला आहे. पण हे प्रतिबंधक उपाय, हवेतून पसरणाऱ्या इतरही आजारांना लागू आहेत.

पाण्यातून पसरणारे आजार
पाण्यामध्ये अनेक प्रकारचे रोग निर्माण करणारे सूक्ष्म जीवजंतू असल्यास ते पाणी दूषित समजले जाते. अशा दूषित पाण्याद्वारे अनेक आजार पसरतात. दूषित पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच नव्हे तर अन्न शिजविण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, घरातील भांड्यांच्या स्वच्छतेसाठी केल्याने हे रोगजनक जीवजंतू मानवी शरीरात शिरतात आणि रोगप्रसार होतो. अनेक विकसनशील देशांमध्ये, विशेषतः दुर्गम ग्रामीण भागात योग्य जलशुद्धीकरण यंत्रणा उपलब्ध नसते. काही ठिकाणी पाणी मिळणेच दुरापास्त असते तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा आर्थिकदृष्ट्या न परवडणारी असल्याने स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी अनेक ठिकाणी पुरवले जात नाही. त्यामुळे या जलजन्य आजारांच्या साथी सातत्याने निर्माण होत बसतात. जलजन्य आजार होण्याचा धोका मुख्यत्वे बालकांना असतो. मुलांच्या बाबतीत स्वच्छतेच्या तत्त्वांचा अभाव आणि या बालकांमधील कमकुवत प्रतिकारशक्ती ही याची मुख्य कारणे असतात. यापैकी बहुतेक आजार प्राणघातक ठरू शकतात. गेल्या काही दशकांपासून जागतिकीकरणाच्या आगमनाने विविध प्रकारच्या जलजन्य आजारांची माहिती समोर आली आहे. अनेक रोगजनक सूक्ष्मजीव जे पूर्वी अज्ञात होते, ते या क्षेत्रातील प्रमुख संशोधनाचे केंद्रबिंदू बनले आहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात

 • सुमारे ८५ कोटी लोकांना पिण्याच्या पाण्याची प्राथमिक गरजेपासून वंचित आहेत. 
 • अंदाजे १६ कोटी लोक तलाव, नदी, ओढे अशा पृष्ठभागावरील पाण्यावर अवलंबून आहेत. 
 • किमान २ अब्ज लोक विष्ठेने दूषित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचा वापर करतात. 
 • दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी सुमारे ५ लाखांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात.
 • दूषित पाण्याने होणाऱ्या आजारांत, अतिसार, कॉलरा, टायफॉईड, आमांश (अॅमेबिक डिसेंट्री), बॅसिलरी डिसेंट्री, हिपॅटायटिस ए यांचा समावेश असतो.

प्रतिबंधक उपाय
परिसर स्वच्छ ठेवण्याची सामान्य सावधगिरी बाळगल्यास जलजन्य आजारांचा प्रसार रोखला जाऊ शकतो. कारण साठलेला कचरा, सांडपाणी आणि उघडी अस्वच्छ गटारे यातून माश्या, जंत आणि अनेक कीटक पाणी दूषित करू शकतात. 
याव्यतिरिक्त, वैयक्तिक स्वच्छता राखल्याने जलजन्य रोगांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते. याकरिता-

 • आम जनतेला मिळणारे पिण्याचे पाणी फिल्टर आणि निर्जंतुक केलेले असावे. 
 • घरात पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे पाणीही पूर्ण स्वच्छ आणि निर्जंतुक असावे. शक्य असल्यास चांगल्या प्रतीचा वॉटर फिल्टर वापरावा. किमान, पाणी स्वच्छ तिपदरी कपड्याने गाळून आणि उकळून वापरावे.
 • घरातील स्वच्छतेसाठी तसेच अंघोळ हात धुणे यासाठीचे पाणीही स्वच्छ आणि निर्जंतुक असणे तितकेच आवश्यक आहे.
 • विहिरी आणि शौचालये एकमेकांपासून दूर असावीत.

जलजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात सार्वजनिक आरोग्य प्रशासनाची कामगिरी महत्त्वाची असते. सार्वजनिक ठिकाणी मिळणाऱ्या अन्न आणि पाणी यांच्या नमुन्यांच्या वरचेवर तपासण्या, हॉटेलमधील स्वयंपाक्यांची आरोग्य तपासणी आवश्यक असते. अन्नपदार्थ साठवणे, बाहेरील अन्नपदार्थ सेवन करताना घ्यायची काळजी, दूषित पाणी आणि अन्नपदार्थ खाल्यामुळे होणारे आजार याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवणे गरजेचे असते. वैयक्तिक स्तरावरील सावधगिरी व्यतिरिक्त, पाण्याचा मोठ्या प्रमाणावर पुनर्वापर (रिसायकलिंग), कार्बन सिक्वेस्ट्रेशन अशा अनेक पद्धती जलजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरल्या जातात. नैसर्गिक जलस्रोत संवर्धन. नदी स्वच्छता, जमिनींचे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे यादेखील एक महत्त्वाच्या रणनीती ठरू शकतात. 

अन्नामधून पसरणारे आजार
जिवाणू, विषाणू, जंत, प्रोटोझोआ तसेच जड धातूंसारख्या रासायनिक पदार्थांमुळे दूषित झालेले अन्न खाल्ल्याने २००हून अधिक आजार होतात. या वाढत्या सार्वजनिक आरोग्याच्या समस्येमुळे देशोदेशीच्या आरोग्यसेवेवर ताण तर निर्माण होतोच, पण उत्पादकता कमी होऊन पर्यटन आणि व्यापारालाही हानी पोहोचते. या साऱ्याचे परिणाम सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांवरही होतात. दूषित अन्नामुळे होणाऱ्या आजारांमुळे मानवी आयुर्मानावरही मोठा परिणाम होतो. 

अन्न-उत्पादन, अन्न-वितरण आणि उपभोक्ता साखळी या प्रत्येक टप्प्यावर अन्न दूषित होऊ शकते. पाणी, माती आणि हवेतील प्रदूषण, असुरक्षित अन्न साठवण, सदोष अन्नप्रक्रिया यामुळे अन्न दूषित होऊन अनेक आजारांना कारणीभूत ठरते. या आजारांमध्ये अतिसारापासून कर्करोगापर्यंत विविध आजारांचा समावेश होतो. दूषित अन्नामध्ये काही रोगजंतू निर्माण होऊन अन्नातून विषबाधा होऊ शकते. यात मोठ्या प्रमाणात उलट्या-जुलाब होऊन रुग्णाची स्थिती गंभीर होऊ शकते.  सुरुवातीला बहुतेक समस्या पोटाचे आजार म्हणून गणल्या जातात. पण त्यातून मज्जासंस्थेचे, स्त्रीरोग विषयक, मूत्रपिंडे, यकृताचे आजार निर्माण होताना दिसतात. अतिसारामुळे होणारे रोग ही जगातील गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. त्याचप्रमाणे जगभरात पाच वर्षांखालील मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळून येते.

प्रतिबंध ः अन्नजन्य आजार टाळण्यासाठी १) अन्नपदार्थ स्वच्छ करा, २) योग्य पद्धतीने वेगवेगळे साठवा आणि ३) शिजवा, थंड करा किंवा गरम करा

स्वच्छता : रोगजंतू तुमच्या हातावर, स्वयंपाकाच्या भांड्यांवर तसेच अन्य  उपकरणांवर, जेवणाच्या ताट-वाट्यांवर जमा होऊन तेथे वाढू शकतात. त्यामुळे स्वयंपाक करताना आणि झाल्यावर त्याचप्रमाणे जेवणापूर्वी आणि जेवल्यावर शास्त्रीय पद्धतीने हात साबणपाण्याने स्वच्छ धुवा. भाज्या, मांस, फळे, कडधान्ये हाताळल्यानंतर प्रत्येक वेळी हात स्वच्छ ठेवा. प्रत्येक वापरानंतर स्वयंपाकाचा ओटा किंवा फरशी, भांडी  साबण आणि गरम पाण्याने धुवा.  फळे आणि भाज्या सोलण्यापूर्वी किंवा कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा. मांस किंवा पोल्ट्री हे पदार्थ भाज्या, धान्ये, फळे वगैरे इतर अन्नपदार्थांबरोबर धुऊ नका. मांस, चिकन, अंडी, मासे वेगवेगळे धुवावेत. हे पदार्थ स्वच्छ केल्यावर नेहमीच्याच जंतुनाशक साबणाने किंवा लिक्विड सोपने बेसिन, ओटा स्वच्छ करावा. यामुळे कच्चे मांस, चिकन, मासे, अंडी यामधून  पसरू शकणारे जिवाणू (बॅक्टेरिया) इतर अन्नपदार्थात, भांड्यात किंवा स्वयंपाकाच्या ओट्यावर पसरण्याला मज्जाव होतो. साहजिकच त्यांच्यामार्फत पसरणाऱ्या जीवजंतूंपासून आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारापासून संरक्षण मिळते.  

अन्नपदार्थ वेगळे ठेवणे: एका अन्नपदार्थावरील रोगजंतू दुसऱ्या पदार्थावर पसरू शकतात. शक्यतो न शिजवलेले अन्नपदार्थ शिजवलेल्या पदार्थांपासून वेगळे ठेवावेत. न शिजवलेले पदार्थ (उदा. भाज्या, फळे) आणि न शिजवलेले मांस, अंडी आणि मासे हे वेगवेगळ्या विळीने, चाकूने, कटिंग बोर्डने, किंवा उपकरणानी कापावेत. या गोष्टी वेगवेगळ्या भांड्यात किंवा वेगवेगळ्या कंटेनरमध्ये ठेवावेत किराणा माल आणि  इतर पदार्थांपासून मांस, अंडी, मासे वेगळे ठेवावेत. रेफ्रिजरेटरमध्येसुद्धा इतर सर्व पदार्थांपासून मांस, पोल्ट्री, सी-फूड आणि अंडी वेगळीवेगळी ठेवावीत. घरात बनवलेले अन्न व्यवस्थितपणे झाकून ठेवणे आणि सुरक्षितपणे साठवणे महत्त्वाचे असते. 

अन्न शिजवणे : अन्न योग्य तपमानाला शिजवावे. अन्न योग्य तापमानाला शिजले आहे याची खात्री करण्यासाठी कुकिंग थर्मामीटर वापरता येतो. शक्यतो अन्न शिजवल्यावर ते ताजे असतानाच जेवण करावे. शिळे अन्न खाऊ नये. 

अंतर्गत तापमान: संपूर्ण मांस १४५ अंश फॅरनहाईटवर, कच्चे मांस/ मटन १६० अंश आणि, अंडी १६५ अंशांपर्यंत शिजवावीत. शिजवलेले पदार्थ निववून फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी शिजवल्यावर ताबडतोब आणि व्यवस्थितपणे फ्रीजमध्ये ठेवावीत. नाशवंत अन्न शिजवल्यावर दोन तासांत फ्रीजमध्ये ठेवावे.

बाजारातले उघड्यावरील  खाद्यपदार्थ टाळावे. हॉटेल्स आणि रस्त्यावरील अन्नपदार्थ बनवण्याची जागा स्वच्छ नसल्यास तेथील खाणे टाळावे.

संबंधित बातम्या