संसर्गजन्य रोग कसे टाळावेत? (उत्तरार्ध- सजीव प्राणी वाहकांतून पसरणारे आजार)

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 31 जानेवारी 2022

आरोग्य संपदा

वाहकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी या गटामध्ये कोणते सजीव प्राणी, कीटक येतात आणि त्यांच्यायोगे कोणते आजार होतात ही माहिती असणे आवश्यक ठरते. यातील अनेक आजारांवर प्रतिबंधक लशी उपलब्ध नाहीत. साहजिकच या गटातील कीटकांची आणि अन्य सजीवांची पैदास रोखणे, आणि सार्वजनिक आणि वैयक्तिक दोन्ही पातळीवर प्रतिबंधक नियमांचे कडक पालन हाच या आजारांच्या प्रतिबंधातील मुख्य मुद्दा ठरतो.

मानवाला होणाऱ्या संसर्गजन्य आजारांपैकी अनेक आजार काही ठराविक सजीव प्राण्यांकडून होतात. ह्या आजारांचे रोगजंतू विषाणू, जिवाणू, जंत, बुरशीजन्य सजीव (फंगस) असतात. हे रोगजंतू आधी या सजीवांच्या शरीरात प्रवेश करतात, पण त्यांना या रोगजंतूंची बाधा होत नाही. मात्र हे सजीव पुढच्या टप्प्यात मानवाच्या संपर्कात येतात आणि आपल्या शरीरातील रोगजंतू मानवाच्या शरीरात सोडतात. या सजीवांना या रोगजंतूंचा संसर्ग सहसा होत नाही. त्यामुळे या सजीवांना या संसर्गजन्य आजारांचे 'वाहक' (व्हेक्टर) म्हणतात.

थोडक्यात, वाहकांमुळे होणारे आजार म्हणजे परजीवी जंतू, विषाणू तसेच जिवाणूंमुळे होणारे मानवी आजार असतात. डास, विविध प्रकारच्या माश्या, पिसवा, उवा, ढेकूण अशा वाहकांद्वारे ते माणसांमध्ये संक्रमित होतात. अशा वाहकजन्य आजारात दरवर्षी जगभरात सात लाख लोक मरण पावतात. त्यामुळेच या वाहकजन्य आजारांचा प्रतिबंध करणे हे प्रत्येकाला आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी माहिती असणे गरजेचे ठरते. 

वाहकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी या गटामध्ये कोणते सजीव प्राणी, कीटक येतात आणि त्यांच्यायोगे कोणते आजार होतात ही माहिती असणे आवश्यक ठरते. साहजिकच या गटातील कीटकांची आणि अन्य सजीवांची पैदास रोखणे, हा या आजारांच्या प्रतिबंधातील मुख्य मुद्दा ठरतो.

डास

वाहकांमुळे फैलावणाऱ्या आजारात डासांचा नंबर नक्कीच पहिला आहे. डासांच्या विविध प्रजाती काही विशिष्ट आजारांच्या रोगजंतूंचे वहन करत असतात. डासांच्या या प्रजाती आणि त्यांच्याद्वारे पसरणारे संसर्गजन्य आजार म्हणजे...

 • एडीस इजिप्ती ः डासांचा हा प्रकार मानवजातीला संत्रस्त करून टाकणाऱ्या अनेक विषाणूजन्य गंभीर आजार पसरवतो.यात डेंग्यू, चिकुनगुन्या, झिका, पीतज्वर (यलो फीवर), रिफ्ट व्हॅली फीवर असे विषाणूजन्य तर लिम्फॅटिक फिलेरियासिस हा परजीवी जंत शरीरातील रसवाहिन्यांमध्ये पसरणारा आजार या डासांमुळे होतो. 
 • अॅनॉफेलीस ः डासांच्या या प्रजातीपासून मलेरिया आणि लिम्फॅटिक फिलेरियासिस हे आजार पसरतात. वाहकांमुळे पसरणाऱ्या आणि मानवजातीच्या आरोग्याला तडा देणाऱ्या मलेरियाच्या विषाणूमुळे हा डास महत्त्वाचा आहे. तर फिलेरियासिस हा परजीवी (पॅरासाईट) म्हणजे जंतांमुळे पसरतो..
 • क्युसेक्स ः जॅपनीज एन्केफेलायटीस, लिम्फॅटिक फिलेरियासिस, वेस्ट नाईल फीवर हे आजार या डासांमुळे पसरतात. सर्वसामान्यांना अपरिचित असलेले हे आजार गेली काही वर्षे भारतातही आढळून येत आहेत.

प्रतिबंध 

डासांपासून पसरणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी दोन पातळ्यांवर लक्ष द्यावे लागते.

    डास चावू नये म्हणून काळजी घेणे

    डासांची पैदास रोखणे

 • घरातील आणि वैयक्तिक काळजी ः डास चावू नये म्हणून घराच्या आणि दरवाजांच्या खिडक्या व्यवस्थित बंद होणाऱ्या हव्यात. खिडक्यांमधून डास आत येऊ नये म्हणून आतून जाळ्या लावाव्यात. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात डास जास्त वाढतात. डेंग्यूचे डास संध्याकाळी आणि सकाळी लवकर यावेळेत चावतात. त्यामुळे सूर्य मावळल्यावर खिडक्या लावून घ्याव्यात आणि त्या दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर उघडाव्यात.   
 • डासांचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणच्या लोकांनी लांब बाह्यांचे शर्ट, सैल फुलपॅन्ट अथवा पायजमा वापरावा पायात मोजे घालावेत. झोपतानाही पूर्ण बाह्यांचे कपडे आणि पायजमे घालावेत. बिनबाह्यांचे कपडे, हाफ पँट, बर्म्युडा घालून अथवा उघड्या अंगाने झोपू नये. लहान बाळांसाठीसुध्दा ही काळजी घ्यावी. प्रौढांनी आणि दोन महिन्यांपेक्षा मोठ्या बाळांना २५ टक्के ते ३० टक्के डीईईटी असलेले मॉस्कीटो रिपिलंट वापरावे. दोन महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर डीईईटी असलेले रिपिलंट वापरू नयेत. रिपिलंट फवारलेले कपडे वापरल्यावर जंतुनाशक साबणाने धुवावेत. या करिता लिंबूमिश्रित निलगिरीचे तेल वापरल्यास त्याचा डीईईटीच्या तुलनेत थोडा कमी पण चांगला परिणाम दिसून येतो. मात्र ते ३ वर्षापेक्षा लहानमुलांमध्ये वापरू नये. 
 • लहान मुलांसाठी रिपिलंट वापरताना, ते आपल्या हातांना लावून मग मुलांच्या अंगावर चोळावे. मुलाचे डोळे आणि तोंड या भागांवर ते लावू नये. रिपिलंटच्या बाटल्या मुलांचा हात पोचणार नाही, अशा ठिकाणी ठेवाव्यात.
 • डासांची पैदास रोखण्यासाठी ः डास स्थिर पाण्यात अंडी घालतात. यामध्ये एडीस इजिप्ती स्वच्छ पाण्यात तर मलेरियाचा अॅनॉफेलीस डास अस्वच्छ आणि खूप दिवस साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. हे रोखण्याकरिता पुढील पद्धतीने काळजी घ्यावी.
 • अंगणातील डासांच्या उत्पत्तीची संभाव्य ठिकाणे कोरडी करून, झाकून ठेवावीत. न वापरलेले टायर तसेच गच्चीत, आजूबाजूला फुटक्या फरशांखाली, झुडुपाखाली, पोर्चेस, डेक किंवा पायऱ्या अशा ठिकाणी पाणी जमा होणारी कंटेनर्स, अडगळ काढून टाकावी.
 • घरातील फ्लॉवर पॉट, रेफ्रिजरेटरखालील साचणारे पाणी, एअर कंडीशनरमध्ये साचणारे पाणी, अंगणातील बर्डबाथ, स्वीमिंग पूल, बादल्या, डबे आणि बॅरल्स यासारख्या पाणी साचणाऱ्या वस्तू सर्व रिकाम्या आणि कोरड्या ठेवाव्यात. 
 • पावसाचे पाणी साचू शकेल अशा पन्हाळी, वाफे, खाचा आणि सपाट छतावर साचलेले पाणी रोजच्या रोज काढून टाकावे. 
 •  घराच्या आजूबाजूला खड्ड्यात किंवा गटारात पाणी साचत असेल तर आपल्या गावाच्या अथवा शहराच्या आरोग्य प्रशासनाला कळवावे.

माश्या

आपल्या घरांमध्ये अस्वच्छतेचे प्रतीक मानली जाणारी माशी हाउसफ्लाय म्हणून ओळखली जाते. तिच्या सुमारे २२०० प्रजाती आहेत. तिच्यामुळे अतिसार, हगवण, कॉलरा, टायफॉईड असे आजार पसरतात. ब्लॅकफ्लाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माशीद्वारे ऑन्कोसर्सीयासिस किंवा रिव्हर ब्लाईंडनेस हा अंधत्व आणणारा आजार पसरतो. ऑन्कोसर्का व्होल्व्युलस नावाचा जंत या माश्यांमुळे पसरून हा आजार होतो. सँडफ्लायनावाने ओळखल्या जाणाऱ्या माशीमुळे लिशमॅनियासिस हा परजीवी जंतामुळे होणारा तर सँडफ्लाय फीवर (फ्लेबोटोमस फीवर) हा विषाणूजन्य आजार पसरतो. त्सेत्से नावाच्या आफ्रिकेत आढळणाऱ्या माशीमुळे आफ्रिकन ट्रायपॅनोसोमियासिस नावाचा आजार होतो. 

प्रतिबंध

 • माश्यांचा उपद्रव टाळण्यासाठी घराभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी. 
 • घरातील खाद्यपदार्थ नीट झाकून ठेवावेत. 
 • जाळीपासून तयार केलेले माश्या मारण्याचे साधन वापरून माश्या माराव्यात.
 • डिंकासारखा चिकट पदार्थ लावून तयार केलेला कागद ठिकठिकाणी ठेवल्यास त्याला माश्या चिकटतात. नंतर या कागदाचा नाश करता येतो. 
 • सार्वजनिक संस्थानीही शहरात स्वच्छता राखण्याची दक्षता घ्यावी. 
 • कीटकनाशके वापरून माश्यांच्या अंड्यांचा व डिंभांचा नाश करावा. 
 • उघड्यावरील पदार्थ, हातगाड्यांवरील अन्नपदार्थ, दूषित पाणी टाळावे.

पिसवा

 उंदरांना पिसवा चावल्यावर त्यानंतर त्या माणसांना चावल्यास त्यांच्यामार्फत प्लेग पसरतो. या आजाराने इ.स. १३४७ पासून १९व्या शतकापर्यंत जगभरात अनेक महासाथी येऊन गेल्या. ब्युबोनिक प्लेगमुळे अगदी १९व्या शतकात भारतातही असंख्य लोक मृत्युमुखी पडले होते. पिसवांमुळे टंगियासिस हा परजीवी जंतांमुळे होणारा आजारही पसरतो.

प्रतिबंध

पिसवांपासून विविध प्रकारचे सांसर्गिक रोग फैलावत असल्यामुळे त्यांचे नियंत्रण करणे वा नाश करणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी- 

 • आधुनिक कीटकनाशकांच्या आणि अन्य साधनांनी घरांची स्वच्छता ठेवणे, 
 • उंदरांचा नायनाट करणे, 
 • कुत्री, मांजरे, कोंबड्या हे पाळीव प्राणी स्वच्छ ठेवणे या प्राथमिक गोष्टी करणे आवश्यक असते. 
 • डीडीटी, क्लोरडान, लिंडेन, मॅलॅथिऑन, पायरेथ्रिन, लेथेन, थानाइट अशा कीटकनाशकांचा घरांच्या भिंती, छत यांवर फवारा मारल्यास पिसवांचा नाश होतो. 
 • मेंथॉलयुक्त मलमे, कार्बोलेटेड व्हॅसेलीन, कापराचे तेल, डायमिथिल थॅलेट, बेंझिल बेंझोएट, डाय-एथिल टोल्युअमाइड इ. पायांवरील कपड्यांच्या भागाला अथवा त्वचेला लावल्यास पिसवा दूर ठेवता येतात.

गोचिड 

इंग्रजीमध्ये टिक या नावाने ओळखला जाणारा, हा एक सूक्ष्म परजीवी सजीव असतो. प्राण्यांच्या किंवा माणसांच्या त्वचेला चिकटून आतले रक्त शोधून घेतो आणि त्यावरच तो जगत असतो. अशा गोचिडांपासून क्रिमियन-काँगो रक्तस्रावी ताप, लाईम डिसीज, रीलॅप्सिंग फीवर (बोरेलिअॅसिस), रिकेट्सियल आजार; उदाहरणार्थ स्पॉटेड फीवर आणि क्यु फीवर), टिक-जन्य एन्केफलायटीस, तुलारेमिया.असे जीवाणूजन्य आजार पसरतात.

क्रिमीयन काँगो हिमोरेजिक फीवर, हादेखील एक विषाणूजन्‍य आजार असून तो गोचिडांपासून संक्रमित होतो. अलीकडील काळात या आजाराचे बरेच तीव्र स्वरूपाचे तापाचे उद्रेक आढळून आलेले आहेत. या आजारामध्‍ये मृत्‍यूचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत आहे. भारतामध्‍ये या आजाराचा पहिला रुग्‍ण जानेवारी २०११मध्ये गुजरात येथे आढळून आला होता. या आजारासाठी मानवासाठी तसेच प्राण्‍यासाठी कुठलीही लस उपलब्‍ध नाही. हा विषाणू जंगली तसेच पाळीव प्राण्यांच्या शरीरात राहतो. दूषित गोचिड चावल्‍यानंतर प्राण्‍यांना या रोगाची लागण होते. हा विषाणू या प्राण्‍यांच्‍या रक्‍तामध्‍ये साधारणतः आठवडाभर राहतो. अशा रीतीने गोचिड–प्राणी–गोचिड हे चक्र चालू राहते.

प्रतिबंध

 • संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे वापरावेत.
 • फिकट रंगाचे कपडे वापरावेत त्‍यामुळे गोचिड बसलेली लगेच दिसून येईल
 • कीटकनाशकभारित कपडे वापरावेत तसेच गोचिड प्रतिबंधक क्रिमचा शरीरावर वापर करावा.
 • शरीराची तसेच कपडयांची गोचिडीसाठी सतत तपासणी करावी जर गोचिड आढळली तर ती त्वरित सुरक्षितपणे काढून टाकावी.
 • प्राण्‍यांच्‍या अंगावरील गोचिडींचा नायनाट करावा तसेच ज्‍या भागामध्‍ये गोचिडींचा प्रादुर्भाव आहे तेथे जाणे टाळावे.
 • जनावरांना स्पर्श करताना ग्लोव्‍हज व इतर सुरक्षित साधनसामुग्री वापरावी.
 • कत्‍तलखान्‍यांमध्ये जनावरे आणण्यापूर्वी दोन आठवडे योग्‍य त्‍या कीटकनाशकाची मात्रा देऊन गोचिडींचा नायनाट करावा.
 • ज्या लोकांना या रोगाची लागण झाली आहे अशा रुग्‍णांशी संपर्क करू नये.
 • वारंवार हात धुवावेत.

ढेकूण 

 • ट्रायटोम बगपासून चागस डिसीज, अमेरिकन ट्रायपॅनोसोमियासिस पसरतो.
 • उवा ः यांच्याद्वारे टायफस आणि लाउज बॉर्न रीलॅप्सिंग 
 • फीवर हे जीवाणूजन्य आजार पसरतात. ढेकणांच्या प्रतिबंधासाठी आजकाल उत्तम कीटकनाशके उपलब्ध आहेत. घरगुती स्वरूपात
 •  याचे फवारे मारणे किंवा खासगी पेस्टकंट्रोल संस्थांच्या मदतीने याचे उत्तम नियंत्रण केले जाऊ शकते.  

गोगलगाय 

 अतिशय निरागस समजल्या जाणाऱ्या गोगलगायीमुळे शिस्टोसोमियासिस (बिल्हार्जियासिस) हा परजीवी आजार पसरतो. शेतांमध्ये आणि बागांमध्ये गोगलगायी आढळल्यास कीटकनाशके वापरून त्यांचे नियंत्रण करता येते. मात्र या घरात येऊ नयेत याची काळजी वैयक्तिक स्वच्छता पाळून घ्यावी.

कीटक आणि इतर सजीव प्राण्यांद्वारे पसरणारे हे आजार म्हणजे मानवी आरोग्यापुढे असलेले ज्वलंत प्रश्न आहेत. यातील अनेक आजारांवर प्रतिबंधक लशी उपलब्ध नाहीत. त्यामुळे सार्वजनिक आणि वैयक्तिक दोन्ही पातळीवर प्रतिबंधक नियमांचे कडक पालन केल्यासच ते नियंत्रित होऊ शकतात.

संबंधित बातम्या