लाटा कोरोनाच्या... लाटा मनोविकारांच्या

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

आरोग्य संपदा

कोरोना काळात अनेकांना मनोविकारांचाही सामना करावा लागला. कोरोनाशी निगडित असलेल्या सर्वसामान्य चिंतेने जगभरात अनेकांच्या बाबतीत अँक्झायटी डिसॉर्डर या वैद्यकीय आजाराचे स्वरूप धारण केले. कोविड-१९ चिंताविकारावर मात करण्याकरीता सकारात्मक राहा, आपल्या प्रियजनांशी संवाद वाढवा, काही साधे नियम पाळा आणि आवश्यक तेथे तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. 

गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूमुळे आणि त्याच्या नितनव्या व्हेरिएंटमुळे जगभरात कोरोनाच्या लाटांवर लाटा आल्या. भारतात तीन तर युरोपात चार लाटा आल्या. या लाटांत कोट्यवधी लोक होरपळून निघाले. लाखो लोकांनी आपले प्रियजन गमावले. कित्येक लोकांमधील कोरोना बरा झाला, पण त्यातल्या असंख्यजणांना कोरोनापश्चात आजारांना, कोरोनाची काही लक्षणे दीर्घकाळ जाणवणाऱ्या लाँग कोविड सिंड्रोमला तोंड द्यावे लागले. कोरोनामुळे शरीरात निर्माण होणारे व्रण बरे होत होते, पण मनावर उमटणारे ओरखडे अनेकांच्या नशिबी आले. कित्येकांच्या बाबतीत हे मानसिक विकार वाढतही गेले. कोरोनाच्या लाटांप्रमाणे जगभरातील खूप मोठ्या जनसंख्येला मनोविकारांच्या दुःखद लाटाही भोगाव्या लागल्या आणि आजही त्यामध्ये अनेकजण गुदमरून जाताना दिसतायत.

कोरोनाच्या विषाणूचा उगम झाला, जानेवारी २०२०मध्ये. तेव्हापासूनच अनेकांमध्ये चिंतेचे सावट पसरताना दिसून आले. यामागच्या कारणांमध्ये- 

 • या आजाराबाबतची अनामिक भीती, 
 • आपल्या आणि प्रियजनांच्या जिवाची भीती, 
 • वाढत्या प्रसाराच्या तसेच वाढत्या मृत्यूंबद्दल ऐकू येणाऱ्या बातम्या, 
 • अजिबातच घराबाहेर न पडण्यामुळे आलेले एकटेपण, 
 • बाहेरून आलेल्या वस्तूंना स्पर्श केल्यावर कोरोना पसरतो या समजुतीने त्यांना स्पर्श करणे टाळणे 

असे घटक कारणीभूत होते. कोरोनाशी निगडित असलेल्या सर्वसामान्य चिंतेने अनेकांच्या बाबतीत थोड्याच दिवसात अँक्झायटी डिसॉर्डर या वैद्यकीय आजाराचे स्वरूप धारण केले. 

कोणतीही पूर्वकल्पना नसताना आलेल्या कोरोनाच्या या संकटाने बहुतांश लोकांच्या आयुष्याचा दिनक्रम अचानक बदलला. पर्यटन, शाळा-कॉलेजे-क्लासेस, समारंभ, गप्पांचे कट्टे, मेळावे, सभा-संमेलने, नाटक-सिनेमासारखे करमणुकीचे कार्यक्रम, गायन, वादन, नृत्यासारखे कलाविष्काराचे आनंदोत्सव अशा सर्वच गोष्टींवर निर्बंध आले. हा प्रकार थोडा-थोडका नाही तर जवळजवळ गेली दोन वर्षे होत राहिला. या सगळ्यातून जनमानसामध्ये चिंता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक विकृती उद्भवल्याचे लक्षात आले. 

अमेरिकेतील सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल (सीडीसी) या संस्थेने केलेल्या एका अभ्यासपूर्ण आकडेवारीनुसार जून २०२०पासून आजपर्यंत अमेरिकेतील ४० टक्के नागरिकांत चिंता, नैराश्य, अतिरिक्त व्यसनाधिनता, आत्महत्येचे विचार मनात येत राहणे अशा मनोविकारांचा उद्रेक झाला आहे. 

एखाद्या व्यक्तीला एखाद्या तीव्र स्वरूपाच्या शारीरिक किंवा मानसिक आघाताला अचानक सामोरे जावे लागले, तर त्या आघातानंतर त्या व्यक्तीमध्ये काही मानसिक व्याधी उद्भवतात. या पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर (पीटीएसडी) नावाच्या विकारामध्ये अनेक लक्षणांचा एक समूह असतो. कोरोनाच्या या लाटांमध्ये अशा मनोविकारांच्या समूहाच्या लाटा निर्माण झाल्या. 

कोरोना काळामध्ये किंग्स्टन युनिव्हर्सिटी ऑफ लंडन आणि लंडन साउथ बँक युनिव्हर्सिटी यामधील संशोधकांनी जगभरातील कोरोना रुग्णांच्या माहितीचे सर्वेक्षण आणि विश्लेषण करून कोविड-१९ अँक्झायटी सिंड्रोमची (कोविड-१९ चिंताविकार) संकल्पना विकसित केली. या संस्थांमधील प्रा. निक्केविक आणि प्रा. स्पाडा यांच्या संशोधनानुसार या विकारात -

 •     ॲव्हॉयडन्स : कोरोनाच्या चाचण्या टाळणे, कोरोनाची लक्षणे असूनही वैद्यकीय सल्ला व उपचार घेणे नाकारणे अशा प्रकारचे टाळाटाळीचे वागणे 
 •     ऑब्सेशन : कोणताही त्रास किंवा लक्षण नसतानाही सतत स्वतःचा ऑक्सिजन, नाडीचे ठोके, ताप तपासत राहणे
 •     कुशंका : आपल्याला कोरोना झालाय असे सतत वाटत राहणे किंवा समोरच्या व्यक्तीला कोरोना आहे अशी पक्की समजूत करून घेऊन त्या व्यक्तीला टाळणे. 
 •     भय : अगदी अत्यावश्यक कामांसाठीसुद्धा घराबाहेर पडायला घाबरणे 
 •     निद्रानाश : झोप न येणे, झोप उशिरा येणे, झोपेतून मध्येच दचकून जाग येणे
 •     असंबद्ध लक्षणे : छातीत धडधडणे, श्वासाची गती वाढणे, डोके दुखणे, संभ्रम होणे
 • अशाप्रकारची लक्षणे वारंवार दिसू लागतात.

हा विकार साधारणतः चाळीस ते सत्तर वयोगटातील महिलांमध्ये आणि ६० ते ८० वयोगटातील पुरुषांमध्ये जास्त दिसून येतो आहे. त्याचप्रमाणे १० ते १६ वयोगटातील मुलामुलींमध्येही मोठ्या प्रमाणात आढळतो आहे.

कोविड-१९ मनोविकाराची कारणे

 • आजारामुळे होणारे विलगीकरण, 
 • कोरोनाची लागण होण्याची भीती 
 • महासाथीच्या भविष्यातील स्वरूपाची अनिश्चितता ही मुख्य कारणे असतात. 
 • या संशोधकांच्या पाहणीनुसार ‘बिग फाइव्ह’ या नावाने ओळखली जाणारी स्वभाववैशिष्ट्ये असल्यास हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. म्हणजे...
 • नवे अनुभव घेण्याचा मनमोकळेपणा नसणे 
 • स्वतःशी प्रामाणिक नसणे
 • आपल्याविषयी लोक काय म्हणतील याचा सतत विचार करण्याची सवय असणे 
 • हटवादीपणा
 • अस्थिर किंवा चंचल स्वभाव

तथापि, ज्या व्यक्तींमध्ये कमालीचा प्रामाणिकपणा, इतरांच्या मताशी सहमत होण्याची वृत्ती आणि जे काही होईल त्याच्याशी जुळवून घेण्याबाबत मनाचा मोकळेपणा आहे, अशांना या मनोविकाराचा धोका कमी संभवतो.

ज्या व्यक्तीं ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर या मानसिक विकाराने आधीपासूनच पीडित असतात, अशांमध्ये कोविड-१९ चिंताविकार होण्याची शक्यता सर्वात अधिक असते. या आजारातल्या व्यक्तींमध्ये साधारणपणे खालील लक्षणे आढळतात- 

 • समाजात निषिद्ध असलेल्या गोष्टींबाबत विचार सतत मनात येणे 
 • एखाद्या गोष्टीकडे वारंवार लक्ष देणे- उदा. गॅस बंद केलाय का? दरवाजा नीट लावला का? कुलूप लावलेय का? अशा गोष्टी सतत पडताळत राहणे
 • एखादी गोष्ट विशिष्ट क्रमात किंवा विशेष प्रकारात लावली आहे का? हे पाहत राहणे. गोष्टी वारंवार मोजत राहणे
 • आपल्या शरीराच्या अवयवांची विशिष्ट हालचाल सतत करणे, उदा. सतत खांदे उडवणे, डोळे मिचकावणे, घसा खाकरणे
 • स्वतःबाबत किंवा इतरांबाबत हिंसक विचार मनात सतत येत राहणे

अशा व्यक्ती कोरोनाचा संसर्ग होतोय अशा भीतीने सतत हात धूत राहतात. याशिवाय सतत बातम्या, माहिती मिळवत राहणे, दीर्घकालीन लॉकडाउन आणि त्यामधील निर्बंधांमुळे होणारे दिनचर्येतील बदल, महत्त्वाच्या कामात येणारे व्यत्यय, इतर देशातील किंवा प्रांतातील गंभीर परिस्थिती, विषाणूंचे येणारे नित्य नवे प्रकार, कोरोनाबाबत सतत मनात वाटणारी भीती दूर करण्यात येणारे अपयश अशा अनेक बाबीही कोविड-१९ चिंता विकार होण्यासंबंधित कारणांमध्ये समाविष्ट आहेत.

चिंताविकार कसा टाळावा?

कोविड-१९च्या चिंता विकारांना टाळण्यासाठी... 

    प्रशासन आणि माध्यमांकडून सतत सकारात्मक संदेश जाणे हे कोरोनाबाबतच्या चिंता टाळण्यासाठी सर्वात गरजेचे आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी काही विशेष संदेश जाणे आवश्यक असते. उदाहरणार्थ-

 • साध्या उपायांचे पालन केल्यास तुम्ही कोरोना नक्की टाळू शकता.
 • कोरोनावरील उत्तम उपचार आता उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे कोरोना झाला तरी तुम्ही नक्की बरे होऊ शकता. 
 • लस पूर्णपणे निर्धोक आहे.
 • लस घेतल्यावर कोरोना होण्याची शक्यता अगदी कमी असते.

    लस घेतल्यावर कोरोना झाला तरी तो अगदी सौम्य असतो, इस्पितळात भरती व्हावे लागत नाही आणि मृत्यूची शक्यता अत्यल्प असते. हा संदेश सर्वांच्या मनावर बिंबवला पाहिजे. कोरोना टाळण्यासाठी नव्हे तर कोरोनाचे गंभीर परिणाम आणि मृत्यू टाळण्यासाठी लस घ्या.

कोरोना काळात लोकांच्या मनात धडकी भरविण्यास कारण ठरते ते म्हणजे लॉकडाउन. लॉकडाउन संपल्यानंतरही त्याबाबत भीती कायम राहते, हे सर्वांच्या लक्षात आलेले आहे, या भीतीचा सामना करण्यासाठी...

    लॉकडाउन किंवा निर्बंध शिथिल झाल्यावर आपले आयुष्य सामान्य स्थितीत आणण्याची घाई करू नका. आयुष्यातला पूर्वीचा सुसंवाद आणि नियमितता हळू हळू प्रस्थापित करा. 

    आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी पुनर्स्थापित करण्याच्या योजना आखा. प्रत्येक गोष्ट पूर्वीसारखीच चांगली होणार आहे, फक्त थोडा वेळ घ्या.

    हँड सॅनिटायझरचा नियमित वापर करणे, डिस्पोजेबल मास्क, हातमोजे वापरल्याने संसर्गाची चिंता कमी होऊ शकते. 

    परस्पर सामंजस्य निर्माण होण्यासाठी जवळच्या व्यक्तीला आपल्या चिंतेच्या भावना समजावून सांगा. यातून आत्मविश्वास वाढतो आणि इतरांना घराबाहेर पडताना आवश्यक असलेले समर्थन पुरवण्याची परवानगी मिळते.

 • माहिती मिळविण्यासाठी सकारात्मक आणि माहितीच्या विश्वासार्ह स्रोतांवर लक्ष केंद्रित करा. 
 • आपले आवडते छंद जोपासा. 
 • आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या गोष्टींना पुन्हा उजाळा द्या.
 • आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक, दूरदेशीचे प्रियजन यांच्याशी टेलिफोनवर किंवा व्हिडिओ कॉलिंगद्वारा संपर्क साधा. रोज किमान दोघा-तिघांशी संपर्कात रहा.
 • मेडिटेशन, ध्यान, योगासने यावर लक्ष केंद्रित करा.

वैद्यकीय सल्ला : कोविड-१९ चिंतेच्या विकाराला वेळीच आवर न घातल्यास तीव्र चिंता, भयगंड, नैराश्य, मानसिक विकृती बळावणे, आत्महत्येच्या घटना अशाप्रकारचे गंभीर परिणाम घडू शकतात. त्यामुळे त्यांना मनोविकार तज्ज्ञांचा सल्ला व उपचार गरजेचे ठरतात. यामध्ये डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून किंवा टेलीफोनद्वारे उपचार घेता येतात. याकरिता बिहेविअर थेरपी, ग्रुप थेरपी असेही उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली घेता येतात.

कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेच्या काळात मनोविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली. पण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यावर उपचार घेणे हा पर्याय खूप कमी रुग्ण स्वीकारतात. आपल्या देशात मनोविकारांसाठी वैद्यकीय उपचार घेणाऱ्यांची संख्या दहा टक्केच असते. त्यामुळे ९० टक्के रुग्ण त्रास होत असूनही मानसिक उपचारांबाबत असलेले गैरसमज आणि सामाजिक कलंकाची भीती (सोशल स्टिग्मा) या भावनेपोटी उपचार टाळले जातात. मानसिक उपचारांबाबतच्या चुकीच्या समजूती आजही केवळ अशिक्षित, अल्पशिक्षित वर्गातच नव्हे तर उच्च शिक्षितांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येतात; म्हणजे याही बाबतीत सामाजिक प्रबोधन होणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या