धुळीच्या वावटळीत आरोग्याची धूळधाण

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022

आरोग्य संपदा

धुळीच्या वादळाची तीव्रता, त्यातील कणांचा आकार, कणांची रचना, कणांमधील दूषित गोष्टी, वादळाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे आरोग्य आणि ती व्यक्ती किती काळ धुळीच्या वादळाच्या संपर्कात आहे, यावर या वादळाने होणाऱ्या परिणामाचे गांभीर्य आणि तीव्रता अवलंबून असते.

पृथ्वीच्या उदयापासूनच अनेक प्रकारे नैसर्गिक आपत्ती उद्‌भवत गेल्या आहेत. पण पर्यावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंचवीस वर्षांचा आढावा घेतला तर जगभरातच नैसर्गिक आपत्तींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे असे निदर्शनास येते. नैसर्गिक आपत्तींमुळे माणसाच्या जगण्याच्या अनेक पैलूंवर परिणाम होतात; घरे, रस्ते, वस्त्या, शहरे, संपर्क माध्यमे उद्ध्वस्त होतात; मानवी जीवनात आर्थिक, कृषीविषयक, सामाजिक उलथापालथ होते. अलीकडच्या दशकांमध्ये नैसर्गिक आपत्तींसोबतच माणसावर येणाऱ्या संकटांमध्ये मानवनिर्मित आपत्ती आणि जैववैज्ञानिक आपत्तींचीदेखील भर पडल्याचे लक्षात येते. मात्र अशा सर्वच आपत्तींमध्ये मानवी आरोग्याची जबरदस्त हानी पोहचत असते यात शंकाच नाही.

नैसर्गिक आपत्तींमध्ये भूकंप, भूस्खलन, महापूर, दुष्काळ, समुद्रातील चक्रीवादळे, त्सुनामी यांचा प्रामुख्याने समावेश होतो. मात्र गेल्या काही वर्षात सतत येणाऱ्या धुळीच्या वादळांमुळेसुद्धा जनजीवन उद्ध्वस्त होते आहे, हे लक्षात घेऊन त्यांचाही नैसर्गिक आपत्तींमध्ये समावेश करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. 

अनेकविध कारणांमुळे धुलिकण किंवा वालुकाकण जेव्हा मोठ्या प्रमाणात भूपृष्ठावरून हवेत बऱ्याच उंचीपर्यंत फेकले जातात, तेव्हा त्याला धुळीचे वादळ म्हणतात. धुळीच्या वादळांच्या या व्याख्येत केवळ धुळीचा समावेश असलेली वादळे, वाळूमिश्रित वादळे, वाऱ्यांबरोबर उभ्या दिशेने जमिनीवरून अवकाशात द्रुतगतीने वाहत आणि पसरत जाणारी धूळ, वालुकाकणांचे द्रुतगती प्रवाह आणि कोरडी शुष्क धूळ यांचा समावेश होतो. मात्र उन्हाळ्यात तप्त भूपृष्ठावर दिसणारे धुळीचे आवर्त यात धरले जात नाहीत. वाळवंटात, ओसाड अशा अर्धशुष्क प्रदेशांच्या विस्तीर्ण क्षेत्रावर, माळरानांवर हे आविष्कार नेहमीच दिसून येतात. 

वालुकाकणांपेक्षा धूलिकण आकारमानाने सूक्ष्म असले, तरी सामान्यतः धुळीची वादळे आणि वाळूची वादळे यांच्यात लौकिकार्थाने फारसा फरक नसतो. उत्तर अमेरिका, सहारा, इजिप्त, सौदी अरेबिया, इराक, इराण, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, चीन या देशात अशी धुळीची वादळे नेहमीच येत असतात. भारतात थरचे वाळवंट, उत्तर भारत, मध्य भारत या भागातही अशी वादळे  नेहमीच निर्माण होत असतात. 

धुळीच्या वादळांना स्थलपरत्वे अनेक संज्ञानी ओळखले जाते. अमेरिकेत सरसकटपणे त्यांना धुळीची वादळे (डस्ट स्टॉर्म) म्हणतात, तर आफ्रिका खंडात त्यांना सरसकटपणे वालुकावादळे (सँड स्टॉर्म) म्हणतात. परंतु, आशिया खंडात मात्र ही वादळे जिथे तयार होतात, तिथल्या भूपृष्ठाप्रमाणे त्यांना धुळीचे वादळ किंवा वालुकावादळ म्हणून ओळखले जाते.

धुळीची वादळे किंवा वालुकावादळांचा फार मोठ्या भूभागावर परिणाम होत असतो. या कारणामुळे वारा नसलेल्या शुष्क-तप्त क्षेत्रांवर उन्हाळ्यात दुपारी धुळीची जी छोटी वातचक्रे किंवा लहान आवर्त निर्माण होतात, त्यांची गणना धूळ वादळात केली जात नाही. लहान धुलि-आवर्तांचा व्यास साधारणपणे ३ ते ३० मीटर आणि उंची १०० ते ४०० मीटरपर्यंत असते. त्यांत चक्राकार गतीने फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी १५ ते ८० किमी. असतो. केंद्रभागी वातावरणीय दाब बराच कमी असतो. अशा लहान स्वरूपाच्या भोवऱ्यात कोरड्या जमिनीवरची धूळ, डबर, दगडांचे लहान तुकडे, वाळूचे कण भूपृष्ठापासून बऱ्याच उंच पातळीपर्यंत उचलले जातात. या अपारदर्शक वस्तूंमुळे धूलि-आवर्त एका मोठ्या नलिकेसारखा वा नरसाळ्यासारखा दिसू लागतो. धूलि-आवर्ताचा कालावधी काही मिनिटे ते दीड तासांपर्यंत असतो. हा आवर्त अति-विध्वंसक टोर्नॅडोची (घूर्णवाती वादळाची) छोटी आवृत्तीच असते. तो क्वचितच विध्वंसक असतो. अशा आवर्तातील वारे घड्याळ्याच्या काट्यांच्या सुलट्या किंवा उलट्या दिशेने फिरू शकतात.

मात्र धुळीच्या वादळात धुळीचे सूक्ष्मकण पाच हजार मीटर उंचीपर्यंत सहजगत्या उचलले जातात आणि वाऱ्यांमुळे ते त्यांच्या उगमस्थानापासून शेकडो किंवा हजारो कि.मी.पर्यंत दूर जाऊ शकतात. वातावरणात ते बराच वेळ तरंगतही राहतात. वालुकावादळात सापडलेल्या कणांचे आकारमान सापेक्षतः बरेच मोठे असल्यामुळे वालुकामेघ क्वचितच दोन मीटरपेक्षा उंच जातो व त्यातील वालुकाकणही उगमस्थानापासून फार दूरपर्यंत पसरले जात नाहीत. २० ते ३० मीटर उंचीपर्यंत वर फेकले गेलेले वाळूचे कण अल्पावधीतच थोडेसे अंतर गेल्यानंतर जमिनीवर पडतात.

धुळीच्या वादळांचा आरोग्यावर परिणाम

धुळीच्या वादळांमध्ये वाळवंटातील आणि उजाड मैदानी किंवा शहरी भागात धुळीचे किंवा वाळूचे कण, रस्त्यांवरची, मैदानातील घाण, जिवाणू, विषाणू, बुरशीजन्य जंतू, परागकण, आणि मानवी शरीरात अॅलर्जीसारखी प्रतिक्रिया निर्माण करणारे सूक्ष्म कण, हवेत उडत राहतात. वादळ संपल्यानंतरही हे कण दीर्घकाळ हवेत तरंगत राहतात आणि सर्वत्र पसरत राहतात. यापैकी काही कण आणि त्यासोबतच्या दूषित सूक्ष्म गोष्टी श्वसनाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि  आरोग्यावर विपरीत परिणाम करतात. विशेषतः ज्या व्यक्तींना आधीच काही आजारांमुळे श्वास घेण्यास त्रास होत असतो, अशांसाठी ते अत्यंत हानिकारक ठरते. बारीक धूळ श्वासाद्वारे फुप्फुसात खोलवर जाऊन गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. 

धुळीच्या वादळात समाविष्ट असलेले आरोग्यावर परिणाम करू शकणारे सूक्ष्मकण आपल्या त्वचेवर पसरतात आणि त्याचेही त्रासदायक परिणाम होऊ शकतात.

धुळीच्या वादळात जाणवणारी लक्षणे

 •     सर्वांगाला खाज सुटणे  
 •     डोळ्यांची आग होणे    
 •     घशात खवखव किंवा जळजळ होणे
 •     त्वचेची लाहीलाही होणे
 •     खोकल्याचे ढास सतत येत राहणे
 •     सतत शिंका येत राहणे
 •     दम्याचा अॅटॅक येणे
 •     श्वास घेण्यास त्रास होणे 

हृदयविकार, फुप्फुसाचे दीर्घकालीन आजार असणाऱ्या रुग्णांना छातीत घट्टपणा जाणवणे, छातीतून घरघर आवाज येत राहणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणेही दिसून येतात. अशी लक्षणे असल्यास या व्यक्तींनी तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

धुळीच्या वादळांमुळे कोणत्याही निरोगी व्यक्तीलाही तीव्र लक्षणे येऊ शकतात. जितक्या जास्त काळ उच्च पातळीच्या धुळीचा संपर्क झाला असे; तितका हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

 • गंभीर त्रास होऊ शकणाऱ्या व्यक्तींमध्ये...
 • हृदयविकार, हृदयाचे गंभीर आजारांनी पीडित व्यक्ती
 • दमा, जुना खोकला, सीओपीडी, एम्फिसिमा, न्यूमोनिया, क्षय रोग यांनी बाधित व्यक्ती 
 • सतत खूप कडक ताप आहे अशा व्यक्ती किंवा फुप्फुसाची क्षमता कमी झालेल्या व्यक्ती
 • नवजात अर्भके, पाच वर्षाखालील लहान मुले, आणि पौगंडावस्थेतील किशोर-किशोरी
 • गर्भवती महिला
 • ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक

फुप्फुसाचे आजार असलेल्या व्यक्तींना दम कोंडून त्यांच्या रक्तातील ऑक्सिजन कमी होऊन ते बेशुद्ध पडण्याची शक्यता असते. अशावेळेस त्वरित वैद्यकीय उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या प्राणांवरही बेतू शकते. नवजात अर्भके अशा वादळात सापडल्यास त्यांच्यावरही प्राणघातक संकट ओढवू शकते.

एकंदरीत पाहता धुळीच्या वादळाची तीव्रता, त्यातील कणांचा आकार, कणांची रचना, कणांमधील दूषित गोष्टी, वादळाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे आरोग्य आणि ती व्यक्ती किती काळ धुळीच्या वादळाच्या संपर्कात आहे, यावर या वादळाने होणाऱ्या परिणामाचे गांभीर्य आणि तीव्रता अवलंबून असते.

काय काळजी घ्यावी? 

धुळीचे वादळ आल्यावर आपल्या आरोग्यसुरक्षेच्या दृष्टीने खालील प्रतिबंधक उपाय करावेत..

 • शक्य असल्यास धुळीचे वादळ न पोचलेल्या स्वच्छ परिसरात जा 
 • खिडक्या आणि दारे बंद ठेवून घरातच राहा
 • वातानुकूलित आवारात राहा आणि वातानुकूलित यंत्राच्या ‘रीसायकल’ किंवा ‘रीक्रिक्युलेट’ मोडवर जा जेणेकरून घरात शिरणारी धूळ कमी होईल
 •  घरात अशी सोय नसल्यास अन्य जवळच्या स्थानिक वातानुकूलित इमारतीत जा. उदा. लायब्ररी, कम्युनिटी सेंटर किंवा शॉपिंग सेंटर
 • वादळादरम्यान व्यायाम टाळा
 • दमेकरी व्यक्तींनी आपला औषधोपचार सुरू ठेवावा. विशेषतः इनहेल्ड स्टेरॉइड्स स्प्रे असल्यास उत्तम  
 • हृदयविकार किंवा श्वसनसंस्थेचे आजार असणाऱ्या व्यक्तींना त्रास जास्त झाल्यास त्यांनी इस्पितळात भरती व्हावे.
 • वादळाच्या काळात नाक आणि तोंड झाकणारा उत्तम प्रकारचा मास्क वापरा. 

मुंबईत नुकत्याच येऊन गेलेल्या धुळीच्या वादळाच्या अनुषंगाने आणि भावी काळात येणाऱ्या अशा आपत्तींच्या संदर्भात धुळीच्या वादळाचा आपत्तीनियोजनात समावेश असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने वैद्यकीय सेवांचे प्रशिक्षण आणि सर्वसामान्यांचे उद्बोधन होण्याचीही गरज आहे.

संबंधित बातम्या