कोलेस्टेरॉल- भ्रामक समजुती व वस्तुस्थिती

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

आरोग्यभान

हृदयविकाराबाबत कोलेस्टेरॉल निर्विवादपणे महत्त्वाचे असूनही समाज माध्यमात प्रसृत होणाऱ्या अशास्त्रीय विपरीत माहितीमुळे अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. साहजिकच भारतीय नागरिकांच्या आरोग्य साक्षरतेच्या दृष्टिकोनातून या गैरसमजांचे निराकरण होणे आवश्यक ठरते. 

कोलेस्टेरॉल आणि त्याच्या उपचारांबाबत समाज माध्यमांवर कायमच उलटसुलट संदेश आणि लिखाण आढळते. कोलेस्टेरॉल म्हणजे रक्तातील चरबी किंवा स्निग्ध पदार्थ. मानवासह सर्वच प्राण्यांच्या पेशींच्या आवरणाचा एक महत्त्वाचा घटक. अमेरिकेतील नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे वर्ष १९४८पासून आजतागायत 'फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडी' या नावाने हृदयविकाराविषयी एक संशोधन सातत्याने होते आहे. या संशोधनामध्ये हृदयविकाराच्या जोखमीच्या विविध कारणांबाबत संशोधन करण्यात येते. 

कोलेस्टेरॉल ठरावीक पातळीपेक्षा जास्त असेल, तर हृदयविकाराचा तसेच रक्तवाहिन्यासंबंधी आजाराचा धोका वाढतो, असे सत्तरीच्या दशकात संशोधकांच्या निदर्शनास आले. साहजिकच 'रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे म्हणजे हृदयविकाराला आमंत्रण' हा सिद्धांत गेल्या काही वर्षात जगभरात चर्चिला गेला. 

  • अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) २०१५-१६मध्ये केलेल्या सर्वेक्षणात, अमेरिकेतील वीस वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींपैकी १२ टक्के व्यक्तींच्या रक्तातल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढलेली आढळली होती. 
  • कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी दरवर्षी २६ लाख लोकांच्या मृत्यूचे कारण ठरते, असे जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवाल सांगतो.  
  • २०१७मधील एका संशोधन सर्वेक्षणानुसार भारतातल्या शहरी भागातील २५ ते ३० टक्के आणि ग्रामीण भागातील १५ ते २० टक्के लोकांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी सर्वसाधारण पातळीपेक्षा अधिक आहे.    

कोलेस्टेरॉल आणि कॅल्शियमसारख्या पदार्थांमुळे, रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूला एखाद्या कडक पट्टीसारखे थर (प्लाक) तयार होतात. यामुळे कालांतराने रक्तवाहिन्या अरुंद होत जातात आणि हृदयविकाराचा किंवा अर्धांगवायूचा झटका अशा गंभीर दुर्घटना घडू शकतात.    

हृदयविकाराबाबत कोलेस्टेरॉल एवढे निर्विवादपणे महत्त्वाचे असूनही समाज माध्यमात प्रसृत होणाऱ्या अशास्त्रीय विपरीत माहितीमुळे अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. साहजिकच भारतीय नागरिकांच्या आरोग्य साक्षरतेच्या दृष्टिकोनातून या गैरसमजांचे निराकरण होणे आवश्यक ठरते. 

१) कोलेस्टेरॉल ही आरोग्याच्या दृष्टीने वाईट गोष्ट आहे.
कोलेस्टेरॉल शरीरातील सर्व पेशींच्या आवरणाचा एक महत्त्वाचा घटक असतो. स्टेरॉईड हॉर्मोन्स, ‘ड’ जीवनसत्त्व आणि यकृतातील बाईल अॅसिडच्या निर्मितीमध्ये कोलेस्टेरॉल महत्त्वाची भूमिका बजावते. साहजिकच शरीराच्या अनेक आरोग्यकारक क्रियांसाठी कोलेस्टेरॉल हा आवश्यक घटक आहे. मात्र तो ठरावीक पातळीत न राहता प्रमाणाबाहेर वाढल्यास प्राणघातक आजारांना कारणीभूत ठरतो. 

शरीरातील कोलेस्टेरॉल रक्तामधून कोणत्या पद्धतीने वाहून नेले जाते, यावर ते आरोग्यासाठी हानिकारक आहे की नाही हे ठरते. रक्तातील लायपोप्रोटीन या प्रथिने व चरबीने बनलेल्या संयुगाद्वारे कोलेस्टेरॉलची शरीरात नेआण केली जाते. ही वाहतूक दोन मुख्य मार्गांनी होते. 

    लो-डेन्सिटी लायपोप्रोटीन (एलडीएल) यकृतापासून शरीरातील पेशींमध्ये कोलेस्टेरॉल वाहून नेतात. पेशींमधील अनेक प्रक्रियांमध्ये ते वापरले जाते. लायपोप्रोटीनची पातळी वाढल्यास कोलेस्टेरॉलची रक्तातील पातळी वाढून हृदय व रक्तवाहिन्यांच्या विकारांचा धोका वाढतो. त्यामुळे याला ‘बॅड कोलेस्टेरॉल’ म्हटले जाते. 

    हाय डेन्सिटी लायपोप्रोटीनला (एचडीएल) ‘गुड कोलेस्टेरॉल’ म्हणून संबोधले जाते, कारण त्यांच्याद्वारे कोलेस्टेरॉल यकृताकडे परत आणले जाऊन शरीरातून उत्सर्जित केले जाते. परिणामतः हृदयाचा आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांचा धोका कमी होतो.

२) मी जाड नाही, माझे वजन योग्य आहे. त्यामुळे माझे कोलेस्टेरॉल जास्त असू शकत नाही.

बहुसंख्य लोकांच्या बाबत हे खरे असले, तरी रक्तातील कोलेस्टेरॉल वाढलेले राहणे यामागे आनुवंशिकता हेदेखील एक कारण असते. दर २०० व्यक्तींपैकी एकाच्या बाबतीत वारसा हक्काने मिळालेल्या या आनुवंशिक प्रवृत्तीला 'फॅमिलिअल हायपरकोलेस्टेरोलेमिया' म्हणतात. साहजिकच वजन निरोगी असले तरीही कोलेस्टेरॉल कमालीचे वाढलेले असू शकते. अशा सडपातळ व्यक्ती व्यायाम न करणाऱ्या आणि धूम्रपान करणाऱ्या असतील तर त्यांना हृदयविकाराचा धोका उद्‌भवू शकतो.  

या उलट कित्येक स्थूल व्यक्तींची कोलेस्टेरॉलची पातळी अगदी नॉर्मल असते. कारण कोलेस्टेरॉल वाढण्यामागे आणि नियंत्रित राहण्यामागे औषधे, व्यायाम, झोप आणि आहार अशा बदलता येण्याजोग्या कारणांसोबत आनुवंशिकता, थायरॉईड ग्रंथीचे कार्य, वय या न बदलता येण्यासारख्या गोष्टीदेखील असतात. 

३) मला तर काही त्रास होत नाही, मग माझे कोलेस्टेरॉल जास्त कसे असेल?
कोलेस्टेरॉलची रक्तातील पातळी ही हळूहळू वाढत कालांतराने, प्रमाणाबाहेर वाढते. या दरम्यान रक्तवाहिन्यामध्ये आतील बाजूने कडक थर निर्माण होतात. ही प्रक्रियादेखील वर्षानुवर्षे घडत राहून रक्तवाहिन्यांची अंतर्गत रुंदी कमी होत जाते. ती ६० ते ७० टक्क्यांनी कमी होईपर्यंत विशेष त्रास जाणवत नाहीत. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागल्याने सुरुवातीला काहीच त्रास जाणवत नाहीत. मात्र त्यानंतर होणारे त्रास हे प्राणगंभीर असतात. यात रक्तदाब वाढणे, छातीत अधूनमधून दुखणे (अन्जायना), चालताना किंवा जिने चढताना दमछाक होणे असे त्रास जाणवू लागतात. मात्र काही जणांच्या बाबतीत रक्तवाहिन्यांच्या आतील कडक थर रक्तवाहिनीपासून विलग होऊन अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

कोलेस्टेरॉलमुळे उद्‌भवणाऱ्या लक्षणानंतर त्याची तपासणी करण्याऐवजी त्रास होण्याआधीच त्या करत राहणे योग्य. वय, आनुवंशिकता, वजन आणि मधुमेह, हायपोथायरॉइडिझम असे इतर आजार लक्षात घेऊन कोलेस्टेरॉलची तपासणी करावी लागते. भारतातील हृदयविकारांची वाढती संख्या लक्षात घेता अगदी तरुणपणापासून आरोग्य तपासणीमध्ये कोलेस्टेरॉलची चाचणी दरवर्षी नियमितपणे करणे आवश्यक आहे. यातूनच पुढे उद्‌भवणारे गंभीर आजार टाळता येतील.       

४) मांसाहारी पदार्थ खाल्ल्यानेच कोलेस्टेरॉल वाढते. मांसाहार टाळल्यास वाढत नाही. 
काही अन्नपदार्थांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण भरपूर असते. रेड मीटमध्ये अंतर्भूत होणारे सर्व प्राण्यांचे मांस, चीज, अंडी यात एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असते. या पदार्थांचा समावेश आहारात नियमितपणे होत असल्यास एलडीएड कोलेस्टेरॉल वाढून हृदयाला हानिकारक ठरते. पण व्हाइट मीट या संकल्पनेमध्ये येणारे चिकन, टर्की अशा मांसाहारामुळे एलडीएल कोलेस्टेरॉल जास्त वाढत नाही. हे तुलनात्मकदृष्ट्या आरोग्यासाठी कमी धोकादायक ठरतात. माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात. त्यामुळे एचडीएल वाढण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

या उलट साखर, तांदूळ गव्हापासून बनणारे पिष्टमय पदार्थ, खोबऱ्याच्या तेलासारखी संपृक्त वनस्पतिजन्य तेले, बहुतेक सारे डेअरी प्रॉडक्ट्स यांच्या अतिसेवनानेही कोलेस्टेरॉल वाढते. तेल-तुपामध्ये असलेल्या सॅच्युरेटेड फॅट्समुळे कोलेस्टेरॉलमुळे उद्‌भवणारे धोके वाढतात. केवळ खाण्यामुळेच नव्हे तर व्यायामाचा अभाव आणि बैठी जीवनशैलीसुद्धा कोलेस्टेरॉलची पातळी वाढायला कारणीभूत ठरतात. 

५) सर्वांसाठी कोलेस्टेरॉलची आदर्श पातळी एकच असते.
कोलेस्टेरॉलच्या आदर्श पातळीबाबतीत जागतिक स्तरावर अधिकृत वैद्यकीय संशोधन संस्था काही संकेत जाहीर करतात. वय, इतर आजार, हृदयविकारासाठी असलेल्या जोखमीच्या गोष्टी यानुसार त्यात थोडे कमीअधिक धरणे क्रमप्राप्त ठरते. कोलेस्टेरॉलची पातळी दर डेसीलिटर (१०० मिलिलिटर) मागे अमुक मिलीग्रॅम अशी मोजली जाते. जोखीम नसणाऱ्यांनी या वर्षातून एकदा आणि जोखीम असलेल्यांनी दर ३ किंवा ६ महिन्यांनी तपासाव्यात. मागील पातळीत दिसणाऱ्या फरकांची तुलना करून रुग्णाच्या सुधारणांचा अंदाज येतो आणि उपचार कमी जास्त केले जातात. 

  • टोटल कोलेस्टेरॉल : सामान्यतः हे २०० पेक्षा कमी असावे. ज्यांना हृदयविकार, रक्तदाब, स्थूलत्व, मधुमेह, धूम्रपान असे जोखीम घटक असतात त्यांचे १५० असणे आवश्यक असते. २५०पेक्षा जास्त असणे खूप धोक्याचे.
  • एलडीएल कोलेस्टेरॉल :  हे १३० पेक्षा कमी असावे. १०० असेल तर उत्तमच. १६०पेक्षा जास्त असल्यास हृदयविकाराचा धोका संभवू शकतो. परंतु जर हृदय किंवा रक्तवहिन्यासंबंधी आजार असेल,  हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा इतर रक्तवाहिन्यांच्या आजाराचा इतिहास असेल, मधुमेह असेल तर एलडीएल कोलेस्टेरॉलचे लक्ष्य ७०पेक्षा कमी असावे.
  • एचडीएल कोलेस्टेरॉल : हे ४०च्या पातळीत असणे आदर्श. ४० ते ६० असेल तर खूप छान आणि ३०पेक्षा कमी असेल तर धोकादायक ठरू शकते.

६) कोलेस्टेरॉलच्या पातळीची चिंता पुरुषांनीच करावी. स्त्रियांना त्याचा त्रास होत नाही.
हे एक मिथक आहे. स्त्री-पुरुषांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याचे प्रमाण सारखेच असते. तरुण स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेनमुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचे प्रमाण कमी राहते. पण गेल्या पंचवीस वर्षांपासून बदललेली जीवनशैली, व्यसने, आहारात स्निग्ध आणि गोड पदार्थांचा अतिवापर, स्थूलत्व यामुळे तरुण मुलींमध्येही कोलेस्टेरॉल वाढलेले आढळते. मासिक पाळीचा काळ संपून रजोनिवृत्ती झाल्यावर स्त्रियांमध्ये याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते. एका संशोधन सर्वेक्षणात ४० ते ६० वयोगटामध्ये कोलेस्टेरॉल वाढल्याचे प्रमाण एकुणात ११.४ टक्के होते. त्यात १०.५ टक्के पुरुष आणि १२.१ टक्के स्त्रिया होत्या. या कारणामुळेच स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हृदयविकाराचा झटका येण्याची भीती अधिक असते.

७) कोलेस्टेरॉल वाढल्यास औषधांशिवाय पर्याय नाही.
वाढलेले कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलत्व अशा गेल्या दोन दशकात उद्‌भवलेल्या आजारांना ‘लाईफस्टाईल डिसिजेस’ म्हटले जाते. या बदललेल्या जीवनशैलीत आहार, व्यायाम आणि विश्रांती-झोपेचा अभाव ही या आजारांची मूलभूत कारणे आहेत. या तिन्ही बाबतीत आरोग्यदृष्ट्या सकारात्मक बदल केल्यास त्यांचे नियंत्रण होत असते. त्यामुळे या गोष्टींचे अवलंबन केल्यावरही या विकारात सुधारणा न झाल्यास औषधाचा वापर केला जातो. ज्यांच्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकते अशा पदार्थांचा आहारातील समावेश टाळणे, रोज किमान ३० मिनिटे शारीरिक व्यायाम करणे आणि किमान ६ ते ८ तास झोप नियमित वेळेस नियमितपणे घेणे, व्यसने टाळणे या गोष्टी अंगी बाणवाव्या लागतात. 

८) स्टॅटिन्स घेणे धोकादायक असते. स्टॅटिन्स फायदेशीर असतात हा औषध कंपन्यांचा निव्वळ प्रचार आहे.
खूप जास्त प्रमाणात वाढलेले कोलेस्टेरॉल स्टॅटिन्स वापरूनच कमी करावी लागतात. ज्यांना हृदयविकाराची आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांची जोखीम आहे अशांमध्ये, हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे अशांमध्ये, हृदयविकाराबाबत अँजिओप्लास्टी, बायपास अशा प्रोसिजर्स झाल्या असतील अशांमध्ये कोलेस्टेरॉल वाढत राहिल्यास हृदयविकार पुन्हा डोके वर काढू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींना स्टॅटिन्स देणे प्राणरक्षक ठरू शकते. 

९) मी स्टॅटिन्स घेतो, मग मला आहारात कोलेस्टेरॉलयुक्त अन्नपदार्थ भरपूर खायला हरकत नाही.
ही चुकीची समजूत आहे. स्टॅटिन्स घेत असलात तरी आहारातील पथ्ये पाळणे आवश्यक असते. अन्यथा स्टॅटिन्सचा अपेक्षित परिणाम न होता, कोलेस्टेरॉल वाढतच राहते. 

१०) माझे वय ४०पेक्षा कमी आहे. मी कशाला कोलेस्टेरॉल तपासू? 
कोलेस्टेरॉल जास्त असण्यामागील आनुवंशिकता, अतिरिक्त वजनवाढ, अयोग्य आहार आणि नियमित व्यायामाबाबत बिघडलेली जीवनशैली अशा कारणांमुळे आज वयाच्या पंचविशीपासून उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास होणारे असंख्य रुग्ण आहेत. या गोष्टींचा विचार करता, वयाच्या चाळिशीआधी अगदी पंचविशीमध्येही कोलेस्टेरॉलची चाचणी नियमितपणे करणे इष्ट ठरते.   

११) लसणाची एक फोड रोज खाल्ल्यास कोलेस्टेरॉल कधीच वाढत नाही.
अनेक वनस्पतिजन्य पदार्थांनी कोलेस्टेरॉल नक्कीच कमी होते. परंतु अशा पदार्थांमुळे खूप वाढलेले कोलेस्टेरॉल आदर्श पातळीपर्यंत उतरत नाही. तसेच अक्रोड, बदाम अशांसारखे पदार्थ एचडीएलची पातळी सुधारण्यास उपयुक्त ठरतात, असे निदर्शनास आले आहे त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रण करणाऱ्या औषधांना अशा नैसर्गिक पदार्थांची जोड द्यायला हरकत नाही. कोलेस्टेरॉल वाढण्यापूर्वी त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीसोबत त्यांचा वापर करणे कधीही उत्तम.  

१२) म्हशीच्या दुधापेक्षा गायीचे दूध घेतल्यास कोलेस्टेरॉल वाढत नाही. 
प्रत्यक्षात गायीच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा जास्त कोलेस्टेरॉल असते. म्हशीच्या दुधात प्रथिने आणि उष्मांक अधिक असतात. त्यामुळे ज्यांना कोलेस्टेरॉलचा किंवा रक्तदाबाचा त्रास आहे  त्यांनी शक्यतो गायीचे दूध आणि त्यापासून बनणाऱ्या पदार्थांचे अतिसेवन टाळावे. 

थोडक्यात, कोलेस्टेरॉल या महत्त्वाच्या घटकाबाबत समाज माध्यमातील अशास्त्रीय आणि अर्धवट माहितीवर विश्वास ठेवू नये. इंटरनेटच्या जमान्यात योग्य माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटवरील माहितीच ग्राह्य धरावी.

संबंधित बातम्या